Meghana suryawanshi

Comedy Others

4.5  

Meghana suryawanshi

Comedy Others

कोव्हीड कुटुंबियांतील संवाद

कोव्हीड कुटुंबियांतील संवाद

6 mins
332


     पुण्यात रहाणार्‍या कोव्हीडला भेटण्याकरीता त्याचे कुटुंबीय (कोरोनाची नवीन स्टेज) ब्रिटन हून आज पुणे स्टेशन वर दाखल झाले. जगभरातील पन्नास देशांच्या यशस्वी प्रवासानंतर प्रथमच आपल्या मुलाला भेटण्याकरीता आलेले कुटुंबीय येथील हवामान पाहून हक्काबक्क राहिले. नवीन अनोळखी प्रांतात आलेल्या कुटुंबीयांना आणण्यासाठी कोव्हीड स्टेशन वर दाखल!

     स्थळ - पुणे स्टेशन.  

     वेळ - बिना बोलावलेल्या पाहुण्यांना वेळ नसते! 


कोव्हीड - ( एकदम आनंदात आपल्या आई वडिलांना अलिंगन देतो) आई बाबा मी खुप आठवण काढली तुमची. आज अखेर तो दिवस आलाच! मी व्यक्त नाही करू शकत इतका आनंद झाला आहे मला!


कोव्हीड - ( 3-4 मिनिटांच्या कालावधी नंतर) कसा झाला तुमचा प्रवास? आणि माझ्याजवळ रहाणार ना आता? 


कोव्हीड च्या मातोश्री - अरे अरे हो राजा! किती ते प्रश्न! तु अजूनही तसाच आहेस बघ खट्याळ. आज काय स्टेशन वरच मुक्काम करायचा आहे की काय?


कोव्हीड चे पिताश्री - अगं काय तरीच काय, किती मोठा प्रदेश आहे. तो मनुष्य किती महान असेल ज्याने त्याच्यासोबत फुकटात आपल्याला पुण्यात आणले!


कोव्हीड चे पिताश्री - प्रदेश नंतर फिरायला येईल गं, आज वर्षभराने भेट होतेय मुलाची!


कोव्हीड - बाबा तुम्ही फुकट कसे काय आलात? कौतुक केले पाहिजे तुमच्या धाडसाचे. कोणी पकडले असते तर अवघड होते.


कोव्हीड च्या मातोश्री - (कोव्हीड ला उद्देशून) तुझ्यात खुपच बदल झाला आहे बघ. एक वर्ष मनुष्य वस्तीत राहून. नियमांची भाषा करायला लागलास. तुझा जन्म चीन सारख्या खोटारड्या प्रदेशात झाला आणि बघता बघता घरट्यास अनोळखी करून तू झेप घेत राहिलास. वर्षभर तुझ्या विरहाने काय घालमेल होतेय हे नाही समजणार तुला.


कोव्हीड च्या मातोश्री - आणि काय रे हे बाळा किती दगदग करतोस! किती सुकलय माझं बाळ.. लॅब मधून निघताना कसा टुणटुणीत होतास. आता सुकट बोंबील गत वाटतोय.


कोव्हीड चे पिताश्री - हो ते तर आहेच. पण आता आलो ना आपण. बघ काही दिवसांत पुर्वीसारखा टुणटुणीत होईल आपलं पोरगं. शेवटी पोरगं कुणाचं हाय. कमी नको समजू त्यास. माझ्या एवढ्याश्या लहानग्याने जगात दरारा निर्माण केलयं 


कोव्हीड च्या मातोश्री - हो मी कुठे नाही म्हणले. पण माझं शेवटी आईचं काळीज. काळजी लागुन रहाते. 


कोव्हीड - आई बाबा किती वेळ आपण असे उभे राहून बोलत रहाणार? पाय खुप दुखायलेत. आणि मला आता एका जागेवर थांबण्याची सवय नसल्याने ञास होतो. चला मी तुम्हाला पुर्ण पुणे फिरवून दाखवतो. 


कोव्हीड चे पिताश्री - हो हो बाळा चल आमची पण सवय मोडल्या बघ आता. एका जागेवर बसवत नाही. आपला कामधंदाच असा आहे की बस्स! जेवढं फिराल तेवढा जास्त रोजगार. पन्नास देशांमधील यशस्वी वाटचालीनंतर इथे महाराष्ट्रात कंपनी सुरू करावी म्हणतोय. आणि तु ही माझा जरासा भार हलका केलास. इतर देशांत कंपनीची बीज पेरून आलोय. 


कोव्हीड च्या मातोश्री - आता काय उद्योगाची चर्चा इथे रस्त्यावरच करता काय? आधी मौज मजा तरी करून घेऊ. इतक्या दिवसांनी भेटलोय पोराला. ते काही नाही उद्योग वगेरे नंतर आज मी फक्त माझ्या मुलाला वेळ देणार आहे. 


कोव्हीड चे पिताश्री - (हसत हसत कोव्हीड ला म्हणतात) हो बाळा आज तुझ्या आई पुढे माझे काही चालणार नाही. आज फक्त गप्पांची पंगत रंगेल बघ. आणि तसं ही आपण डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या कंपनींना मागे टाकले आहे. आता मध्ये उतरतीस लागलेल्या बर्ड फ्लू कंपनीने परत झेप घेतली खरी पण मला नाही वाटत आपल्या एवढी ती मजल मारेल. 


कोव्हीड - (आई आणि बाबांना एकदम नीट निरखून पाहत) तुम्हाला एक वर्ष माझ्याशिवाय लॅब चांगलीच मानवलेली दिसतेय. 


कोव्हीड चे पिताश्री - हो ते आहे पण तुझ्याशिवाय नाही बाळा. काहीही झाले तरी मनुष्य आपल्या पेक्षा वरचढ आहे. त्यास मात द्यायची म्हणलं की स्वतःच्या स्टेजेस वाढवायला लागतात. 


कोव्हीड च्या मातोश्री - आम्ही मागच्या काही दिवसांत एवढे प्रदेश फिरले पण या सारखा प्रदेश लाभायला आपल्यासारख्यांच भाग्यच म्हणायचे. आपल्या अख्खा भावकीला सॅनिटाइझर ने सळो की पळो करून सोडले होते. सगळ्यांना किती भिती वाटत होती माणसाच्या जवळ जायची. आणि आता हे मनुष्य निवांत न घाबरता फिरतेत. आपल्याला आयतं कोलीत सापडलं 


कोव्हीड - अगं आई तु समजते तसं काही नाही चित्र खुप बदलले आहे. मानवाच्या मनाचा ठावठिकाणा धड त्याच्या जवळच्या व्यक्तींना कधी लागत नाही आणि आपण तर पडलो बिना अवयवांचे विषाणू! 


कोव्हीड चे पिताश्री - का रे असं बोलतो? स्वतःला कधी कमी समजायचे नाही. आपण एवढेसे, मानवास डोळ्याला न दिसणारे पण तरी सुद्धा वर्षभर त्याचे जीवन मुश्किल करून ठेवले. जगाची सगळी सुञ आपल्या हातात आहेत. जल्लोषाचा वेळ आहे हा. आणि तु असा विचार करत आहेस. 


कोव्हीड - नाही बाबा. वेळ खुप बदलली आहे. मला आपले आणि आपल्या भावकीचे पुढील भविष्य अंधारात दिसत आहे. मी स्वतःच्या हिमतीवर एवढे मोठे साम्राज्य उभा केले. पृथ्वीवरील एक प्रदेश सोडला नाही जिथे आपल्या अस्तित्वाची छाप सोडली नाही. 


कोव्हीड - मागच्या वेळी वेळ आपल्या बाजूने होती. पण, ती आज मनुष्याच्या बाजूने आहे. आपले नामोनिशाण मिटविण्यासाठी लाॅकडाऊन, वर्क फ्रॉम होम यासारख्या उपाययोजना राबवल्या गेल्या. तेव्हापासून आपल्या अस्तित्वास धोका निर्माण होण्याची सुरूवात झाली. तुम्ही आता अलिकडे बाहेर पडल्याने या गोष्टी तुम्हाला ठाऊक नाहीत 


कोव्हीड च्या मातोश्री - होईल रे बाळा सगळं नीट. चवताळून उठलेल्या हत्ती चे अस्तित्व संपविणे इतके सोपे नाही. आणि आपले अस्तित्व संपविणे त्याहून महाकठीण काम. आपली पुर्ण भावकी संपवायला खुप वर्ष जातील. मनुष्या पेक्षा आपण संख्येने जास्त आहोत. 


कोव्हीड - हो आई तु बोलते ते एकदम बरोबर आहे. प्रश्न संख्येचा नाही एकीचा आहे. आणि उशीरा का होईना पण मानवाने ती दाखवली आहे. सुरुवातीला जेव्हा माणुस बावळटासारखा बिनधास्त होता तेव्हा मला हसायला यायचे पण तो आता बिनधास्त नाही. 


कोव्हीड चे पिताश्री - बिनधास्त नाही तर काय आहे मग? आम्ही इथेवर फुकटात एका माणसामुळेच तर आलो. ते बघ ती माणसे किती तरी जणांनी मास्क घातला नाही. 


कोव्हीड - हो बाबा त्यांच्या निवांतपणे वावरण्याला देखील एक कारण आहे. मला देखील वाटले नव्हते की असे दिवस कधीतरी येतील. आता शाळा, कॉलेज, मॉल, मंदिरे सर्व काही सुरू झाले म्हणून किती आनंदात होतो मी. पहिल्यापेक्षा जास्त कमवू. आयतं घबाड मिळेल आपल्याला. पण परवा एक बातमी ऐकली अनं.... 


कोव्हीड च्या मातोश्री - कसली बातमी बाळा? आम्हाला तर काहीच कल्पना नाही. आम्ही अलिकडेच लॅब मधून बाहेर पडलो आणि त्या नंतर प्रवासच सुरू आहे. आता कुठे पन्नास देश झाले फक्त. 


कोव्हीड - आई आपण मानवास कमी समजून चुक केली. आपण स्वतःवर इतका आत्मविश्वास टाकला की बस्स! मला देखील वाटले नव्हते मानव इतके हुशार असतील. असे वरवरचे काळजी न घेण्याचे नाटक करून आपले अस्तित्व मिटवायला सुरुवात करतील. 


कोव्हीड - बाबा, सगळे फक्त प्रयत्न करीत होते तोवर ठीक होते. पण आता प्रयत्न संपले आणि मानवास फळ लाभले आहे. 


कोव्हीड चे पिताश्री - कळेल अशा भाषेत सांग ना. 


कोव्हीड - बाबा, पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ने वॅक्सिन तयार केली आहे. आणि ती इतकी प्रभावी आहे की काही वर्षांत आपली भावकी पण संपेल. रात्रंदिवस जागून आपल्याला अंधारात ठेवून मानवाने आपल्या विरोधात शस्त्र निर्माण केले. 


कोव्हीड - मला खुप भिती वाटत आहे आता. सगळं अवघड झाले आहे. 


कोव्हीड च्या मातोश्री - हो की खरच! मनात धगधग वाढतेय. पण ती लस असर करायला वेळ लागेल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून जास्त कालावधी. तोपर्यंत निघेल मार्ग. 


कोव्हीड - नाही आई, सुरूवात कधीच झाली आहे. आणि वेळ पण जास्त नाही लागणार. रोज कोट्यावधीने लस पोहोच होतात. आणि त्याला परवानगी देखील मिळाली आहे. मला तर लस नाव ऐकूनच आता घाबरायला होते. 


कोव्हीड चे पिताश्री - (रस्त्यावरून सिरम इन्स्टिटय़ूट च्या लसीचा टँकर निघालेला असतो, त्याला पाहत) बाळ कोव्हीड, कसला मोठा टँकर आहे रे हा? आणि इतक्या ऐटीत कुठे चाललाय? कोणाचा आहे? चल त्यास चिटकून बसू आणि पुढे जाऊ. 


कोव्हीड - (टँकर ला बघत) बाबा हा सिरम इन्स्टिटय़ूट चा टँकर आहे. मेलो आता आपण! मरणाला कुठे चिटकून बसताय? चला पळा इथुन पटकन! 


आणि सर्वजण तेथून सटकून कोणत्या तरी एका कोपर्‍यात भितीने धापा टाकत बसतात.


कोव्हीड चे पिताश्री - नको रे बाबा मला भारतात अजून एक कंपनी! मी जातो आत्ताच इथून. सोबत आणलेल्या गोतावळ्यांना देखील घेऊन जातो! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy