किती सहज म्हणालीस गं...
किती सहज म्हणालीस गं...
किती सहज म्हणालीस गं ...कसं करू रे तुझ्याशी लग्न ?....तुझं ठरलेलंच होत सारं काही .. फक्त तू खॊटं- खोटं. प्रेम व्यक्त केलं एवढंच ...चूक तुझी नव्हतीच मुळी मीच तुझ्या प्रेमात आंधळा झालो होतो. तुझ्या सौंदर्यानं भुरळ पाडली म्हणावं तर असंही नाही. मी फक्त प्रेम केलं होत तुझ्या सुंदर मनावर, विचारावर , तुझ्या वागण्या बोलण्यातून मला भावला होता सडेतोडपणा, तुझं धाडस, तूझा प्रेमळ स्वभाव , समजून घेण्याची ... आपुलकीची नातं निभावनायची हातोटी . परिस्थितीशी दोन हात करण्याची हातोटी ... पण माझंही थोडं चुकलंच म्हणा .. मी प्रेम केलं तुझ्यावर .. सारं जगणं उधळून आणि तू फक्त दिखाऊ .. खोटं खोटं व्यवहारी जगात विकाऊ ... मी गृहीत धरलं तुला हीच माझी मोठी चूक होती . तू म्हणालीस ना ... माझा विश्वास आहे रे तुझ्यावर हे ही मला बरं वाटावं म्हणून ... प्रेम हे ठरवून होत नाही ग .. ते आपसूकच , नकळत होत . एखादी कळी अलगद उमलावी व तीचं फुल व्हावं तशी असते प्रेम होण्याची प्रक्रिया .. हळुवार मनाचे तार छेडले जातात अन एखादं सुमधुर गाणं गायकाच्या मुखातून उमटावं आणि श्रोत्यांनी मंत्रमुग्ध व्हावं अशी असते प्रेमीयुगलाची ती मनोभूमिका ...तू प्रेम केलंस पण हातचं राखून .. फारसं न गमावता .. तुझ्या आईवडिलांचा विरोधही मावळला असता ग पण तू धीर धरावया हवा होता, सोबत करावयास हवी होती. आपण सोडवला असता आयुष्याचा गुंता. पण तूझा माझ्यावर, माझ्या कर्तृतृत्वावर विश्वास नव्हता हेच खरं. हाच तार फरक होता आपल्या दोघांमधला . तू ठरलीस पक्की व्यवहारवादी अन मी आदर्शवादी .. आदर्शवादाच्या गप्पा मारणं, लिहून बोलणं फार सोप्प असत ग पण त्या आदर्शवादाला व्यवहारवादाची योग्य सांगड घालणं आवश्यक असत. व्यवहारवादाचा आदर्शवादाशी सुवर्णमध्य साधने अवघड असले तरी अशक्य मात्र कधीच नसते. तू म्हणालीस होतीस कृतीशिवाय स्वप्नाना अर्थच नसतो हे तर मलाही पटल होत नाही कोण म्हणत ? तुझे आई बाबा तयारही झाले असते पण तू मला समजून घेतलं नाहीस आणि घाई घाईने निर्णय घेतलास. एरवी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारी तू हा एवढा मोठा निर्णय घेताना मात्र आईवडिलांवर सोडून मोकळी झालीस. याचच नवल वाटतं तू असंही म्हणाली होतीस की स्त्री म्हणजे गुलामच, तिच्या मनाचा विचार कोण करणार ? कुठल्याही खाटकाच्या दारात बांधलं तिथं जावं गप्पगुमान ... अग विसरलीस.. गुलामाला तो गुलाम आहे याची जाणीव करून दिली तर तो पेटून उठेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ते ... बुद्धिवादी कुणाचाही गुलाम नसतो गं हे मी तुला सांगावं ? जाऊ दे ना सोड नकोच त्या जीवघेण्या आठवणी .. गेलीस जशी जीवनातून तशा तुझ्या आठवणीही घेऊन जा सोबत मुळासकट उपटून .. -ह्दयाच्या खोल कप्प्यातील. कर मला मुक्त खऱ्या अर्थाने त्या मायावी पाशातून ...पण एक नंबरची हट्टी , नाहीच ऐकणार तू ... तुझ्या आठवणीची शिदोरी घेऊनच मला प्रवास करावा लागणार बहुदा.. उंच आकाशात भरारी मारण्यासाठी .. फिनिक्स होऊन राखेतून उडण्यासाठी ध्येयपथाच्या दिशेने...खूप साऱ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी पुन्हा नव्याने ...