Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Nilesh Jadhav

Horror


4  

Nilesh Jadhav

Horror


कड्यावरचं भूत...

कड्यावरचं भूत...

5 mins 315 5 mins 315

आमचं गाव पुण्याच्या नैऋत्य बाजूला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि राजगड तोरणा सारखे अभेद्य किल्ले व निसर्गाने परिपुर्ण असलेल्या वेल्हे तालुक्यात आहे. दोन दिवसांची सुट्टी असल्यामुळे मी गावाला आलो होतो. पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर आल्यामुळे गावाला वरचेवर जाणं होतच असतं. शिमग्याचा सण नुकताच होऊन गेला होता. रणरण करणारं ऊन अंगाची लाही करत होतं. दुपारची वेळ होती म्हणून मी दारात बसलो होतो. दारातून माझी नजर डोंगरात असणाऱ्या कड्याकडे गेली. कडा म्हणजे धबधबा. उन्हाळा असल्यामुळे कड्याला पाणी नसणार हे सहाजिकच आहे म्हणा. पण पावसाळ्यात मात्र कड्याचं सौंदर्य केवळ अवर्णनीय असंच असतं. लांबून दिसणाऱ्या कड्याच्या पोटात एक दिवळी सारखा आकार स्पष्ट दिसतो. ती दिवळीच असावी या बद्दल शंका नाही कारण त्या दिवळीला अनुसरून गावात एक दंतकथा आहे ती म्हणजे अशी की गोरे लोक मागे लागले की लोक त्या दिवळीत जाऊन लपून बसत असत. गोरे लोक म्हणजे इंग्रज. त्याच कड्याला अनुसरून आणखी एक दंतकथा अशी आहे की त्या कड्यावरून मांगोजी बुवा नावाच्या इसमाने जीव दिला होता. त्याचं भूत अजूनही तिथे वावरत असतं वगैरे वगैरे..

      कड्याकडे बघत असतानाच माझ्या डोक्यात एक सनक आली आणि मी ताडकन उठलो. आज ती दिवळी बघायचीच असा मनोमन निश्चय करून मी आणखी माझ्यासारख्याच फिरायची आवड असणाऱ्या तिघांना घेऊन डोंगराची वाट धरली. तेवढ्यासाठी खूप विनवण्या कराव्या लागल्या हेही तितकंच खरं. मुकाई देवीचं दर्शन घ्यायचं आणि डोंगर फिरून खाली यायचं इतकंच त्यांना सांगितलं होतं. कड्याखाली जायचंय हे मी अजिबात सांगितलं नव्हतं. ऊन रखरख करत होतं. झाडांची पानगळ होऊन गेली होती. पुढच्या दऱ्याच्या बाजूने मुकाईच्या ओहळेकडे जाताना आंबा, जांभूळ यांसारखी सदाहरित झाडेच हिरवीगार दिसत होती. डोंगर वणवा लागून गेल्यामुळे काळा कुळकुळीत दिसत होता. त्यातल्या त्यात करवंदाची झाडे फुललेली दिसत होती. मधूनच येणारी वावटळ पाचोळा आणि जळालेल्या गवताची राख उडवत होती. समोर लांबवर दिसणारे राजगड आणि किल्ले तोरणा आपल्या कणखरतेची आणि तितक्याच गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभे होते. फॉरेस्ट मधून जरी चालत असलो तरी पानगळ झाल्यामुळे ऊन सरळ झाडांच्या आत घुसत होतं. भर उन्हाळ्यातही डोळ्यांना सुखावणारा निसर्ग देखावा मनाला आणखी उल्हसित करत होता.

      एकदाचं आम्ही मुकाईचं ठाण असलेल्या ठिकाणी पोहचलो. देवीचं दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ बसून आम्ही सरळ कड्याच्या दिशेने तिरप्या जाणाऱ्या गुरांच्या वाटेने चालू लागलो. अर्थात पुढे जाऊन कड्याच्या ओहळेने खाली उतरू असं मीच त्यांना सांगितलं होतं. दोन ओहळी पालटून गेल्यानंतर आम्ही कड्याच्या ओहळी पाशी असलेल्या मोठया धशिपाशी येऊन पोहचलो. आम्ही बरोबर मधोमध होतो त्यामुळे कड्याच्या पोटात असलेली दिवळी दिसणं थोडं अवघडच होतं. वरच्या अंगाने जाऊन कड्यावर पोहचलो असतो मग तिकडून खडवीने सरळ घरी जावं लागलं असतं. उतरायचं असेल तर इथूनच याच दांडाने खाली उतरावं लागणार होतं. पण मला तर दिवळी बघायची होती म्हणून धशीने थोडं पुढं जाऊन पावसाळ्यात कड्यावरून कोसळणारं पाणी जिथे पडतं तिथे उतरावं लागणार होतं. 

"ये चला कड्यात उतरून आपण दिवळी बघू" आनंदाने डोळे विस्फारून मी बोललो.

"येडा झालास का मी नाय बाबा येणार" मोठयाने ओरडत गण्या म्हणाला

मी का म्हणून विचारायच्या आधीच विण्या सांगू लागला की कड्यात भूत आहे नको जायला. 

विण्याच्या या बोलण्यावर हसतच मी म्हणालो "भूत बित काय नसतं रं..!" 

बराच वेळ झाला तरी कड्यात उतरायला कोणीच तयार होत नव्हतं शेवटी त्यांना वरच थांबायला सांगून मी धशीच्या बाजूने वाट काढत कड्याखाली उतरायला सुरुवात केली. माझ्या सोबत दोन गोष्टी होत्या ते म्हणजे दिवळी बघण्याची तीव्र इच्छा आणि जवानीचं सळसळतं रक्त...

      खाली उतरून गेल्यावर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कड्याखाली पडलेला मोठा खड्डा दिसत होता. डोक्याच्या उंचीचे मोठाले दगड आणि दाट करवंदाची झाडे होती. कड्याच्या एकदम कुशीत असल्याने उन्हाचा मागमूसही नव्हता. दिवळी पाणी जिथे पडतं तिथून दोन-तीन वाव आत असेल. पावसाळ्यात पाण्याच्या मागे असणाऱ्या कड्याच्या पोटात कोरलेल्या त्या दिवळीत आरामात बसता येत असेल याचा अंदाज येत होता. मला मात्र दाट झाडी मुळे दिवळी दिसत नव्हती. आजूबाजूच्या झाडांमुळे मी उभा असलेली जागा सहजासहजी दिसणे कठीणच होतं. दिवळी बघायचीच या हेतूने मी कड्याच्या पोटात वाट काढत आत शिरलो. किडयांची किरकिर चालूच होती. मधूनच एखादी टिटवी टीवटीव करत एकदम निरव असलेल्या शांततेचा भंग करत होती. भर उन्हाळ्यातही ती जागा एकदम शितल होती. माझं लक्ष वर गेलं तसा एखाद्या काळ्याकुट्ट ब्रह्मराक्षसासारखा आभाळाला गवसणी घालणारा कडा अंगावर येऊन आपण त्याखाली दबून जातो की काय या विचारानेच माझा थरकाप झाला. इतक्यात अचानक माझ्या शेजारी कोणीतरी उभं आहे असा क्षणभर मला भास झाला. अंगाला शिवून गेलेल्या त्या हळूवार वाऱ्याच्या झुळकीबरोबर अंगावर काटा उभा राहिला. मला दरदरून घाम फुटला होता. दिवळी पहाण्याचा विचार मी तसाच ठेवत मागे फिरलो. आणि पोरं थांबली होती त्याठिकाणी जाऊन पोहचलो. 

"बघितली का रं दिवळी..?" गण्याच्या या बोलण्यावर मी चटकन म्हणालो "नाही रं लय अडचण आहे बाबा तिथं" 

पुढे जास्त काही न बोलता मी पोरांना घरी चला म्हणालो. कड्याच्या ओहळीने आम्ही खाली उतरलो आणि घरी गेलो. रात्र होत आली तरी माझ्या शेजारी कोण येऊन उभं राहिलं असावं याचाच विचार मनात येत होता.

       कड्याच्या खाली उतरल्यावर काय झालं या बद्दल मी चकार शब्दही कुणापाशी बोलला नाही. उन्हाळ्यात त्यावेळी गावाकडे पाण्याच्या गैरसोयीमुळे बरेच लोक हे गावात न रहाता शेतावर बांधलेल्या वाड्यावर जाऊन रहायचे आम्हीसुद्धा शेतातल्या वाड्यात रहायला आलो होतो. रात्र झाल्यावर मी जेऊन पटकन झोपी गेलो. खूप दिवसानंतर डोंगराची तंगडतोड केल्यामुळे थकवा जाणवत होता. त्यामुळे झोप कधी लागली ते कळलंच नाही. साधारण पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी मी उठलो आणि बाहेर गेलो. वाडा शेतात असल्यामुळे लाईट अजिबात नव्हती आणि त्यातून लांबलांब पर्यंत दुसरं घर दिसत नव्हतं. दिसत होता तो फक्त अंधार. मधूनच एखादा सरडा वाळलेल्या पाचोळ्यातून पुढे सरकत होता. लांब-लांब असलेल्या वाड्यावरची कुत्री जोरजोरात एकमेकांना साद घालत भुंकत होती. अचानक मला दुपारच्या त्या कड्यावरच्या हालचालीची जाणीव झाली तितक्यात कोणीतरी माझ्या तोंडावरून हात फिरवला असा मला भास झाला. लांब नखं आणि एकदम रखरखीत असलेला तो कुरूप हात मला आजही आठवला तरीही अंगावर शहारा उभा रहातो. अर्थात तोही एक भासच होता म्हणा. मी पटकन अंथरुणात शिरलो. थोड्या वेळाने मला थंडी वाजून आली होती. मला सारखी त्या कड्यावरच्या हालचालींची आणि मघाच्या हाताची आठवण होत होती. सकाळ झाली तेंव्हा तापाने अंग फणफन करत होते. दोन दिवसांची सुट्टी आता आठ दिवस इतकी लांबली होती. कड्यावरचा किस्सा सांगितल्यानंतर घरातल्या लोकांची बोलणी खावी लागली ते वेगळंच.

     आजही दारातून कड्याकडे नजर जाते तेंव्हा त्या देवडीचा विचार मनात डोकावून जातो. भीती तर वाटतेच पण ती दिवळी पहाण्याची उत्सुकता आजही मेलेली नाही. बघू कधी संधी मिळाली तर परत एकदा नक्कीच भेट देईल म्हणतोय......


Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Jadhav

Similar marathi story from Horror