Vaishnavi Kulkarni

Drama

3  

Vaishnavi Kulkarni

Drama

काय हवं संसाराला?

काय हवं संसाराला?

7 mins
345


संसार... संसार म्हणजे नक्की काय ? लग्न ? घर सांभाळणं ? मुलं जन्माला घालून त्यांना वाढवणं ? नवऱ्याने नोकरी करणं आणि बायकोने घर सांभाळणं ? की दोघांनी नोकरी करणं आणि घरातल्या इतर व्यक्ती म्हणजे आज्जी आजोबा वगैरे मंडळींनी मुलांना सांभाळणं ? नक्की काय आवश्यकता असते या संसाराला ? काय हवं असतं दोघांच्या संसाराला ?गडगंज पैसा? टोलेजंग वाडा? डोळे दिपवणारे दागिने?.... नाही.....संसाराला हवी असते ती एकमेकांची साथ , एकमेकांवरील अढळ विश्वास आणि कधीही न आटणारा एकमेकांच्या प्रेमाचा निर्मळ झरा....

अवखळ , निर्मळ खळाळत्या झऱ्यासारखी , अखंड बडबडी आणि घरातली शेंडेफळ असणारी जाई देसाई..

 नावाप्रमाणेच अतिशय टवटवीत , सदा हसतमुख , सगळ्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारी आणि केवळ घरातीलच नव्हे तर ओळखी पाळखीच्या सगळ्यांच्या मैफिलीचा प्राण असणारी जाई... सावळा रंग , खांद्यापर्यंत कापलेले केस , थोडीशी चिडकी पण हसताक्षणीच गालावर खोलवर गोड खळी पडणारी आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगला पाहिजे अशी खुशालचेंडू वृत्ती असणारी जाई सगळ्यांचीच खूप लाडकी होती , विशेषत: बाबांची. घरात शेंडेफळ असल्याने काम करायला अजिबात न आवडणारी परंतु एकदा का काम करायला सुरुवात केली की ते काम मन लावून तडीस नेणारी...


    कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती जाई. तिच्या मित्र मैत्रिणींचा खूप मोठ्ठा ग्रुप होता. त्यात मुलं कमी आणि मुलीच जास्त होत्या. पण हळूहळू त्याही कमी व्हायला लागल्या होत्या. का ? अहो का काय ? लग्न ठरत चालली होती ना सगळ्या मुलींची ! कॉलेजचे शेवटचे वर्ष आटोपले की मुलींच्या डोक्यावर मंगल अक्षता टाकून त्यांची रवानगी करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे जाईच्या आई वडिलांनी सुद्धा ठरवले. जाईच्या वडिलांच्या म्हणजेच प्रशांतरावांच्या जिवलग मित्राने जाई साठी खूप छान स्थळ आणले होते. जवळच्याच शहरातील मुलगा होता. दिसायला देखणा , कॉर्पोरेटमध्ये नोकरी असलेला आणि स्वभावाने अतिशय मनमिळावू असा कार्तिक देशपांडे. घरी त्याचे आई वडील आजी, धाकटा भाऊ वगैरे मंडळी होती. देशपांडे मंडळी अतिशय धार्मिक आणि सात्विक वृत्तीची होती. त्यामुळे प्रशांतराव आणि ऋतुजा ताई म्हणजे जाईच्या आईला देखील हे स्थळ बघावे असे वाटत होते. 


      परंतु जाईला मात्र इतक्यात लग्नच करायचे नव्हते. अहो , नुकतच तिचं बी कॉम होत आलं होतं. त्यामुळे तिला पुढे एम कॉम होऊन नोकरी करण्याची इच्छा होती. पण ग्रॅज्यूएट झालेल्या मुलींच्या लग्नाचा ट्रेंडच आला होता ना , मग जाई तरी कशी सुटणार त्या ट्रेण्ड मधून ? मामाच्या गावी दिवाळीच्या सुट्टीत ती गेली असताना हा विषय निघालाच. 


 त्यावर तिची मामी म्हणाली " अगं लगेच कुठे उद्या तुला मंडपात गौरीहर पुजायला बसवणार आहोत ? आत्ता कुठे पहिलं स्थळ आलं आहे. पसंत नाही पडलं तरी बघता करता दोनेक वर्ष जातील."

      

इति जाई : " आणि जर त्यांना मी पसंत पडले किंवा मला तो आवडला तर " 

मामी : मग त्यांना सांगू आपण की मुलीला पुढे शिकू द्या , नोकरी करू द्या म्हणून. 

    पण या उत्तराने समाधान होईल ती जाई कसली ? बराच वेळ सगळ्यांसोबत भवती न भवती चर्चा झाली तरी सगळ्यांची गाडी मुलगा बघून घ्यायला काय हरकत आहे यावरच अडली होती. शेवटी बिचारी जाई रडायला लागली हो... धाय मोकलून नाही पण हमसून हमसून...शेवटी तिच्या आज्जीने तिला जवळ घेऊन समजवण्यास सुरुवात केली. 


" जाई , अगं बाळा, आमच्या वेळी तर पार लहानपणी लग्न होत होती. आमच्या लग्नात तुझे आजोबा होते १८ वर्षांचे तर मी होते ११ वर्षांची. जेमतेम इयत्ता शिकलेले मी पण तेव्हा आई वडीलांसमोर ब्र काढायची मुभा नव्हती आम्हाला. पण त्यावेळेस आमच्या आई वडिलांनी हाच विचार करून आम्हाला बोहल्यावर चढवलं की सगळ्या गोष्टी योग्य वेळेत पार पडल्या तर आयुष्य लवकर मार्गी लागतं. आणि आज बघ बर , तुझे आजोबा पण रिटायर्ड आयुष्य किती छान जगतायेत , तुझे दोन्ही मामा चांगली नोकरी करतायेत , लग्न देखील झाली त्यांची वेळेत , लेकरं लवकर झाली. सगळं कसं सुरळीत सुरू आहे. तुझंही असंच सगळं वेळेत पार पडावं म्हणून आम्ही म्हणतो आहोत बाळा...

      शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर जाई एकदाची मुलाला म्हणजे कार्तिकला भेटण्यासाठी तयार झाली. ठरलेल्या दिवशी , ठरलेल्या वेळेत देसाई कुटुंबीय देशपांड्यांच्या घरी दाखल झाले. घर कसलं? बंगलाच होता तो मोठ्ठा...गुलाब , मोगरा , चांदणी , प्राजक्त , जास्वंद यांच्या सुगंधाने दरवळणारं अंगण , तुळशीजवळ रेखाटलेली सुबक रांगोळी....पाहताक्षणी जाईला मुलाच्या आधी त्याचं घरच आवडून गेलं. तिच्या चेहऱ्यावर उमललेलं स्मित बघून आईबाबांच्या मनात कुठेतरी आशेची चिमणी चिवचिव करू लागली. 

       

        आत येऊन बसल्यानंतर ओळख परिचय, जुजबी गप्पा झाल्या आणि मग कार्तिकच्या आईने त्याला बोलावणे धाडले. कार्तिक बाहेर येतोय म्हटल्यावर जाईला ऐन थंडीच्या मोसमात सुद्धा प्रचंड घाम फुटला. आतापर्यंत देशपांडे कुटुंबीयांसोबत लाघवी हसून बोलणारी जाई आता मात्र चांगलीच दडपणाखाली आली होती. त्यामुळे तिने भीती आणि संकोचाने जी मान झाली घातली ती पार कार्तिक बाहेर येऊन बसला तरी वर केली नाही. केवळ त्याच्या वडिलांनी त्याची ओळख जाईसोबत करून दिली तेव्हाच काय ते एक नजर त्याच्याकडे जाईने पाहिले. दोघांना एकांतात बोलण्यासाठी पाठवल्यानंतर जाईने कार्तिककडे व्यवस्थित पाहिले. कालपर्यंत मुलगा बघायचा नाही या गोष्टीवरून आकांडतांडव करणारी जाई.....आज मात्र कार्तिककडे एकटक बघतच राहिली. गोरापान आणि अतिशय देखणा असणारा , बोलण्यात नम्रता परंतु तितकाच आत्मविश्वास असणारा , तिच्याबद्दल चौकशी करताना अतिशय आत्मीयतेने बोलणारा कार्तिक जाईला चक्क आवडला आणि आपली जाई देखील देशपांडे कुटुंबाला पहिल्याच भेटीत पसंत पडली. 


     सगळ्यांच्या पसंतीनुसार जाई आणि कार्तिकचे शुभमंगल एकदाचे ठरले.फक्त जाईची कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा एकदा पार पडली की मग दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ असे सर्वानुमते ठरले. देसाई मंडळी तर प्रचंड खुष होती. इतका संस्कारी , यशस्वी तरीही पाय जमिनीवर ठेवून असणारा मुलगा त्यांना जावई म्हणून मिळणार होता म्हणून सगळ्यांना जाईच्या भाग्याचे खूप कौतुक वाटले तर दुसरीकडे माणसांची आवड असलेली , सदा हसतमुख आणि जिच्या चेहऱ्याकडे पाहताच प्रसन्नतेची गारेगार झुळूक सर्वांगावर लहरून जावी अशी जाई सून म्हणून घरात येणार म्हणून देशपांडे कुटुंबीय सुद्धा हरखून गेले. ठरलेल्या सुमुहूर्तावर कार्तिक आणि जाई एकमेकांच्या प्रेमपाशात बद्ध होऊन पतीपत्नीच्या गोड बंधनात अडकले. देसाई कुटुंबातील अखेरचे आणि देशपांडे कुटुंबातील हे पहिलेच लग्न धूमधडाक्यात पार पडले आणि देसायांच्या अंगणात मुक्त चिवचिवाट करणारी ही चिमणी देशपांड्यांच्या अंगणात आपले नवे घरटे निर्माण करण्यास सज्ज झाली होती.  

     

    जाई अखंड बडबडी होती तर सोज्वळ असा कार्तिक थोडासा मितभाषी होता. तरीदेखील दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. रोज सकाळी लवकर उठून झाडलोट , सडा रांगोळी , स्नानादि कर्मे उरकून ती स्वयंपाक बनवायला घेत असे. सगळ्यांचा चहा , नाष्टा वगैरे भराभर बनवून , कार्तिकचे जेवण आटोपून ती हसतमुखाने त्याला निरोप देत असे आणि तो ऑफिसला गेला की मग घरच्या बागेतील फुले गोळा करणे , त्यांचा छानपैकी हार बनवणे , झाडांना पाणी घालणे , कधीकधी कार्तिकच्या आज्जीसोबत गप्पा मारत बसणे ह्यात जाईचा वेळ मस्त निघून जाई. मग जेवण वगैरे आटोपून थोडी वामकुक्षी झाली की संध्याकाळी स्वतःचे आवरून ती कार्तिकची वाट बघत बसे. कार्तिकला सकाळी ऑफिसला निघताना निरोप देताना जी जाई दिसायची तीच प्रसन्न आणि टवटवीत अशी जाई त्याला संध्याकाळी घरी आल्यानंतर देखील दिसायची. त्यामुळे हसतमुखाने केवळ नवऱ्याचेच नव्हे तर आल्या गेल्या प्रत्येकाचे स्वागत करणाऱ्या आपल्या या प्रेमळ जाईवर कार्तिक खूप खुश होता. 


  वर्षभरात देशपांड्यांच्या घरात चिमुकली पावलं अवतरली आणि कार्तिक - जाईच्या संसाराला सलीलच्या रूपाने पूर्णत्व लाभले. कार्तिकच्या भावानंतर म्हणजेच कौशलनंतर तब्बल 26 वर्षांनी घराण्यात आलेला , आईचा सावळा रंग आणि बाबाची चेहरेपट्टी घेऊन जन्माला आलेला सलील सगळ्यांचाच अतिशय लाडका होता. संपूर्ण घर त्याच्या बाललीलांमध्ये,बोबड्या बोलांमध्ये रंगून जायचे.


सगळ्या बाजूंनी समृद्धी घरात आली आहे म्हटलं तरी आयुष्यातील सगळेच दिवस सारखे असतात होय ? सुखसरींच्या अखंड बरसातीनंतर कधी ना कधी प्रखर उष्णतेचा झोत सहन करत पुढे चालत राहावेच लागते. आनंदाच्या शितलहरी झेलून झाल्या की परीक्षेचा वर्षाव सोसत , त्याला तोंड देत संसाराची नौका हाकत राहावीच लागते. 

    सलील आता ५ वर्षांचा झाला होता. सगळे काही सुरळीत सुरू असताना कोरोना आला आणि सगळ्यांच्या आयुष्याच्या रुळावर सुसाट धावणाऱ्या गाड्यांना करकचून ब्रेक लागावा तसेच झाले. ऑफिसमध्ये जाऊन मान मोडेपर्यंत काम करणारी सगळी चाकरमानी मंडळी आता घरातून ऑफिसचा गाडा हाकु लागली. ऑफिसमध्ये तरी एकवेळ काम करण्याला मर्यादा होत्या. परंतु घरी ? घरी तर जेव्हा बॉसला वाटेल तेव्हा तो कर्मचाऱ्यांना ऑनलाईन यायला भाग पाडत असे. कालपर्यंत मिळणारा पूर्ण पगार आता अर्ध्यावर आला होता. त्यामुळे बरीच काटकसर करावी लागत होती. परंतु अशा परिस्थितीत देखील जाई आणि कार्तिक अतिशय आनंदाने संसार करत होते. अशातच सलीलचा वाढदिवस आला. वाढदिवस असूनदेखील घरी मात्र कुणालाही बोलावण्याची मुभा नव्हती. त्यामुळे कार्तिकने सगळ्यांसाठी एक गुगल मीटिंग आयोजित केली. आजपर्यंत वाढदिवसानिमित्त आपल्या घरी जमलेला काका ,मावश्या, आत्या यांचा गोतावळा बघण्याची सवय असलेल्या सलीलला एकसुरात "हॅप्पी बर्थडे टू यू " म्हणणाऱ्या सगळे काका काकू , मावश्या , आत्या , ताई दादा यांना लॅपटॉप वर बघून सुद्धा खूप गम्मत वाटली होती. 

     

     परंतु नियतीला कार्तिक - जाईच्या संसारातील हा सुख सोहळा बहुधा बघवला गेला नसावा. कारण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच कार्तिकला मेल आला तो त्याला कंपनीतून टर्मिनेट अर्थात कमी केल्याचा. कोविड मुळे कंपनीचं प्रोडक्शन , विक्री ,नफा सगळ्याच गोष्टी शून्यावर आल्या होत्या. त्यामुळे कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्तिकच्या दुर्दैवाने त्याची वर्णी कपात केलेल्या लोकांमध्ये लागली होती.जाई आणि कार्तिकचं अवघं विश्वच यामुळे हादरून गेलं. देशपांडे आणि देसाई कुटुंबासाठी देखील हा खूप मोठा धक्का होता की एवढा हुशार , मेहनती , महत्त्वाकांक्षी आणि आभाळाएवढी मोठ्ठी स्वप्न असणारा कार्तिक आज केवळ एक सुशिक्षित बेरोजगार बनून राहिला होता.


    अनेक प्रश्न जाई आणि कार्तिकच्या पुढे आता आ वासून उभे होते..सगळ्यात पाहिला प्रश्न होता तो सलीलच्या शिक्षणाचा. सलीलला खूप शिकवून त्याच्या पायांवर भक्कम उभं करण्याची स्वप्नं तर एक आईबाप म्हणून जाई कार्तिक वर होतीच परंतु त्याला एक यशस्वी आणि जबाबदार नागरिक बनवण्याची देखील जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु आता उत्पन्नाचे साधन दुरावले म्हटल्यानंतर काय करणार होते कार्तिक आणि जाई ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama