कातर वेळ
कातर वेळ
संध्याकाळचे सात वाजले होते. लगेच अंधार होणार होता. गावची सीमारेषा अजून बरीच दूर होती. झपझप पावले टाकत मी चाललो होतो. काळोख पडायच्या आत मला गावी पोहचायचे होते. रस्त्यावर तसेच घरीसुद्धा विजेची सोय नव्हती. गाव माझं असलं तरी बऱ्याच वर्षांनी मी गावी जात होतो. घरी कोणीच राहत नव्हते. खरं म्हणजे दिवसा ढवळ्या गावी पोहोचायचे होते. पण, रेल्वेच्या दिरंगाईमुळे उशीर झाला होता. पायी चालत असताना मनात लहानपणच्या आठवणी येत होत्या. पिंपळाच्या झाडाखालून चालत असताना पाय जड झाले. भितीने अंगावर काटाही आला. तरीही मी झपझप चालू लागलो. माझ्याच पावलांच्या आवाजाने मागून कोणी तरी येत असल्याचा भास होत होता. पण, मागे वळुन पाहण्याची हिंमत होत नव्हती. रामरक्षा म्हणत मी चालू लागलो. शेवटी गावच्या सीमारेषेचे घर नजरेस पडले, तेव्हा कुठे हायसे वाटले. तुकारामाचे घर हे आमच्या गावची सीमारेषा. त्याच्या घरातला मिणमिणता प्रकाश बघितल्यावर माझ्या जीवात जीव आला व मी माझा बेत बदलला. आता अशा कातर वेळी माझ्या घरी जाण्यापेक्षा तुकारामाच्या घरी जावे व त्याच्या घरातील कुणाला तरी बरोबर घेऊनच पुढे जावे असा, विचार करत असतानाच मी तुकारामाच्या घराजवळ आलो.
त्या अंधुक अशा प्रकाशात मी तुकारामला बरोबर ओळखले. तो घरासमोर एका खाटल्यावर विडी फुंकत बसला होता. मी जवळ गेलो. त्याच्या पाया पडलो व म्हटले, "काय तुकाराम बापू बरं आहे ना?" पण, तुकारामने मला प्रतिउत्तर दिले नाही. मी म्हटले, "मला ओळखले नाही का? अहो, मी आनंदबाबचा रमेश. मुंबईला असतो ना?"
"हां हां." लगेच तुकारामला माझी ओळख पटली. "या या मुंबईवाले. आता किती मोठा झालास! सगळे बरे आहेत ना रे? अगं, दिवा घेऊन बाहेर ये. रम्या आला बघ." लगेच तुकारामाची बायको, मोठी मुलगी, मुलगा सगळी घरातली अंगणात जमली. त्या अंधुक प्रकाशात सर्वांनी माझी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.
त्या अंधुक प्रकाशात मी तुकारामाच्या मुलीकडे, नेहाकडे पाहिले. तिनेही किंचीत हसून ओळख पटल्याची जाणीव करुन दिली. तुकारामच्या खाटल्यावर मी स्थानापन्न झालो. नेहाने लगेच पाण्याचा लोटा व गुळ आणले. माझे गावी येण्याचे कारण मी तुकारामला सांगितले. आमच्या घराची जुनी कागदपत्रे गोळा करुन मला लगेच दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने परत जायचे होते. रात्री तिथल्या माझ्या घरी जाऊन कागदपत्रांचा शोध करणे जरूरी होते. तुकाराम म्हणाला, "अरे वेड्या, आता काळोखात काय करणार तू? आता रहा इथेच. उद्या सकाळी लवकर उठून जा." पण, मी हट्टालाच पेटलो. तुम्ही मला कंदील द्या. माझ्याकडे बॅटरी सुद्धा आहे. जाईन मी. हवं तर तुमच्याकडे जेवून जाईन. नंतर रात्रभर शोधाशोध करीन." माझ्या अशा बोलण्याने त्याचा नाईलाज झाला. त्याने जेवण भरभर करायला सांगितले. मी हात-पाय धुवून घेतले व सखाराम, तुकारामचा धाकटा भाऊ त्याच्याबरोबर गप्पा मारत बसलो.
आठ-साडेआठच्या दरम्यान जेवणे उरकुन मी, सखाराम व नेहा माझ्या घरी जायला निघालो. तसे घर जवळच होते, पण रात्र अंधारी, आणि वाट काटेकुटेरी व अरुंद होती. सखाराम व नेहा भरभर चालत होते पण मी मात्र जपून पाऊल टाकत होतो. जरा कडेला सरकलो तर काटा पायात रूतत होता, चपलेऐवजी पायात बूट असते तर बरे झाले असते असे वाटायला लागले. मी सखारामचा हात धरुनच चालत होतो. शेवटी पोचलो एकदाचे. दाराचे कुलूप काढायला बराच वेळ लागला पण सखारामच्या मदतीने ते उघडले. दार उघडताच, वटवाघळांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. नेहाने कंदिलाची वात मोठी केली. मी बॅटरीचा प्रका
श घरभर टाकला व घर निरखून घेतले. कुबट वासाबरोबर कोळ्यांची जाळी घरभर पसरली होती. नेहाने देवघरात लगेच समई लावली व हळुहळु घर तेजोमय होऊ लागले. त्याचबरोबर माझ्या जुन्या आठवणींना उजाळा येऊ लागला. माझे बालपण मी याच घरात घालवले होते. लहानपणचे ते खेळणे, बागडणे, ते भातुकलीचे खेळ. झरझर सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या. माझ्यासारखेच नेहाला सुद्धा वाटले असावे कारण तिचा चेहराच तसे सांगत होता. तेवढ्यात सखाराम म्हणाला, “रम्या आठवतं कां रे? लहानपणचे दिवस, ते भातुकलीचे खेळ, तुझं आणि नेहाचं नवरा-बायको होणे, किती मस्त होते ना ते दिवस! वेडाच मी. खरंच खरोखरच्या आयुष्यात असं झालं असतं तर आज नेहापुढे हा प्रसंग आला नसता." "म्हणजे रे?" मी म्हटले. "अरे, तू विचारले नाहीस की नेहा माहेरी का? तुमची दोघांची मैत्री मला माहीत होती. पण दादापुढे कुणाचे काही चालत नव्हते. दादांनी नेहाचे लग्न समीरशी लावले. समीर चांगला शिकलेला सवरलेला होता. पण लग्न होऊन आठ दिवस सुद्धा झाले नव्हते मोटरसायकलच्या अॅक्सीडेंटने समीरला काळाने ओढून नेले. सासरच्या लोकांनी नेहाचा पायगुण वाईट ठरवला व तिला माहेरी पाठवले. गेली दोन वर्षे नेहा माहेरीच आहे. नियतीपुढे आपले काही चालत नाही हेच खरे."
सखारामकडून हे सगळे ऐकून मी स्तब्ध झालो. खूप वाईट वाटले.
ट्रंकेतले कागदपत्र शोधत असताना मनात विचार आला, मी अजून नेहावर प्रेम करतो. तिचंही माझ्यावर असेल का? मी नेहाकडे पाहिले. बहुदा तिच्याही मनात माझ्यासारखेच विचार आले असावे, माझ्याकडे पाहुन तिने एक गोड स्मित दिले. तेवढ्यात सखाराम मला म्हणाला, "रम्या त्यावेळी मीच पुढाकार घ्यायला पाहिजे होता. माझंच चुकलं. दादा ओरडतील म्हणून मुग गिळून बसलो. तुमचं दोघांचं प्रेम मला माहीत होतं. नेहाची केविलवाणी नजर मला बरंच काही सांगत होती. तुला पत्र पाठवून तरी तिच्या लग्नाची गोष्ट कळवायला हवी होती. दादांचा धाक होता, म्हणून गप्प बसलो. चुकलेच ते. पण, नेहा, रम्या, आता तुम्हाला मी सरळच विचारतो. लग्नाच्या गाठी देवानेच बांधलेल्या असतात. तुमचं जर अजूनही एकमेकांवर प्रेम असेल तर मी आता दादांशी बोलायला तयार आहे. तुमचा निर्णय मला सांगा. आणि मला खात्री आहे दादा आता नाही म्हणणार नाहीत.”
माझ्या मनातलेच सखाराम बोलला. मी नेहाकडे पाहिले. लाजेने तिचा चेहरा लाल झाला होता. मी नजरेनेच तिला विचारले व तिनेही नजरेनेच संमती दर्शविली. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी कडकडुन सखारामाला मिठी मारली व म्हटले, "सख्या, एवढं सगळं माहित होतं मग का रे आमचा अंत पाहिलास."
"चल रम्या, अजून वेळ गेली नाही. आता आपण दादांची परवानगी घेऊ." असे त्याने म्हटल्यावर मी ट्रंकेतले कागदपत्राचे गाठोडे घेतले अन् आम्ही परतलो. आता दादाची संमती घेऊन नेहाशी लग्न करायचे असे आमचे ठरले. माझा व नेहाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
अप्पा आणि आई गेल्यावर गावाशी नातेच तुटले होते. म्हणून मी घर विकण्याच्या निर्णयाने कागदपत्रं गोळा करायला आलो होतो. गावचा संबध तोडणार होतो. पण आता माझं गावाशी नव्याने नाते जोडले जाणार होते. मला माझ्या घराबद्दल खूप आत्मियता वाटली. गावही मला माझं वाटू लागलं. घराची कागदपत्र गोळा केली तरी घर विकण्याचा विचार मी मनातून काढून टाकला. मनात नवीन उत्साह घेऊन मी, नेहा व सखाराम मध्यरात्री घरी परतलो. उद्याचा दिवस एक नवी दिशा घेऊन माझ्या व नेहाच्या आयुष्यात येणार याची खात्रीच होती.
समाप्त