जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी
शरयू वेळेवर घरी ये आज एक मुलगा तुला पाहायला येणार आहे, शरयूची आई तिला सांगत होती.
आई ऑफिस सुटल्यावरच येणार ना आणि आज येणारा मुलगा त्याला मी पसंत पडेन का?
शरयू अगं आधीच नकारघंटा वाजवू नये. जरा पॉॅझिटीव्ह बोलत जा, आई म्हणाली.
हम्म... येते मी, म्हणत शरयू निघाली.
आई विचारात पडली, कसे होणार या मुलीचे? हिच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा बघता आजच्या स्थळाकडून तरी होकार मिळेल का? आधीच लग्नाचे वय निघून चालले आहे. योग्य वयात लग्न झाले तर पुढे काही अडचणी येणार नाहीत. शरयू एमबीए झालेली हुशार मुलगी होती. एका नावाजलेल्या कंपनीत ती मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होती. त्यामुळे लग्नाबद्दल तिच्या काही अपेक्षा होत्या. तिला तिचे करियर पण करायचे होते आणि नोकरी तर ती कायम करणार होती.
आई-वडिलांची एकुलती मुलगी असल्यामुळे पुढे जाऊन तिला त्यांचा सांभाळ पण करावा लागणार होता. तिला लहानपणापासूनच मुलासारखं वाढवलं होतं. त्यामुळे ती धाडसी आणि स्वावलंबी बनली होती. तिला तिचे अधिकार - हक्क याची जाणीव होती. केवळ ती मुलगी आहे म्हणून तिने कोणत्याही गोष्टीत तडजोड केली नव्हती. स्त्री - पुरुष समानतेच्या काळात ती सहानुभूती वर जगणारी नव्हती. पण आईला काळजी वाटत होती, तिची काळजी ही योग्य होती.
संध्याकाळी शरयू वेळेवर घरी आली. तिचे आवरून झाले तेव्हा तिला पाहायला येणारा मुलगा त्याचे आई-वडीलही आले. मुलाचे वडील रिटायर झाले होते. आई गृहिणी होती आणि मुलगा आयटी कंपनीत जॉब करत होता. शरयू चहा आणि नाष्टा घेऊन आली. मुलाने काही प्रश्न तिला विचारले.
त्याचे विचारून झाले तसे शरयू म्हणाली मलाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे.
हो विचारा तो म्हणाला.
शरयू म्हणाली, मी लग्नानंतर नोकरी कायम करेन. मला माझी स्पेस तुम्ही दिली पाहिजे घरातले काम मी जमेल तसे करेन. माझा येणारा पगार हा पूर्णपणे माझा असेल तो कसा आणि कुठे खर्च करायचा हेदेखील मीच ठरवेन. घरातील कोणतेही निर्णय दोघांनी एकत्र घेणे. माझे काम हे मार्केटिंगचे असल्यामुळे मला बाहेरगावीही जावे लागते. मूल जन्माला कधी घालायचे याचाही निर्णय हा फक्त आपल्या दोघांचा असेल. आणि या सर्व अटी तुम्हाला मान्य असतील मी पसंत असेल तर अजून काही बाबी स्पष्ट बोलणे योग्य ठरेल.
तसा मुलगा म्हणाला, म्हणजे अजूनही काही तुमच्या अटी आहेत?
हो, कसं आहे ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं आजच्या काळात मानून डोळेझाक करून लग्न करणं मला मान्य नाही. आपण निवडलेला जोडीदार आपल्याला योग्य आहे की नाही हे तपासून पाहणे पण गरजेचे आहे.
तो तिला थांबवत म्हणाला, नेमके काय म्हणायचे तुम्हाला मिस शरयू?
ती म्हणाली, लग्ना आधी दोघांचे रक्त गट तपासणे, एचआयव्ही टेस्ट करून घेणे. तसेच अजून काही अनुवंशिक आजार आहेत का हे पाहणेही गरजेचे आहे. एकमेकांना पुरेसा वेळ देणं एकत्र राहायचं की विभक्त हे ठरवणं शक्यतो तुझी काम तूच करणं, गरज असेल तेव्हा मला कामात मदत करणं आणि मी जसे तुमच्या आई-वडिलांकडे लक्ष देईन तसेच उद्या वेळ आली तर माझ्या आई-वडिलांचा सांभाळही मीच करणार.
मुलाच्या आईच्या कपाळावर या अटी ऐकूनच आठ्या पडल्या होत्या. ओके आम्ही कळवतो आमचा निर्णय असे म्हणून पाहुणे निघून गेले.
पाहुणे गेल्यानंतर आई म्हणाली, या मुलाला पण बहुतेक तुझ्या अटी नाही आवडल्या. शरयू तुझ्या अटी मान्य करणारा कोणी भेटेल की नाही देव जाणे.
शरयू म्हणाली, आई अगं जगावेगळ्या किंवा विचित्र अटी नाहीत माझ्या. मला समजून घेणारा माझी स्पेस जपणारा जोडीदार हवा आहे ना की माझे हक्क- अधिकार डावलनारा! आज तू पाहतेस ना आई हुंड्यासाठी मुलीला सासरी त्रास दिला जातो, गर्भात मुलगी असेल तर तिच्या मनाविरुद्ध गर्भपात केला जातो, शिकलेली मुलगी असली तरी घर आणि मुलाचा सांभाळ या नावाखाली तिला नोकरी करू दिली जात नाही. खेड्यात तर स्त्रीपुरुष समानता फक्त कागदावरच शिल्लक आहे. आज 21व्या शतकातही स्त्रीला तिचे हक्क-अधिकार मिळत नाहीत यासाठी तिला लढा द्यावा लागत आहे. मी नुसते शिक्षण एके शिक्षण नाही केले मला स्वयंपाकही उत्तम येतो. पण गरज असेल तेव्हा मी घरीही थांबायला तयार आहे. बाकी या माझ्या अटी अगदी संयुक्तिक आहेत. आई कोणीतरी असेलच ना ज्याला माझे म्हणणे पटेल.
हो शरयू तू बरोबर आहे. मी कायम तुझ्यासोबत आहे.
थँक्यू आई, म्हणत शरयू आईच्या गळ्यात पडली.
आजच्या मुलींना लग्न करताना केवळ श्रीमंत नवरा नकोय. तर ज्याच्याशी आपले विचार जुळतील, आपल्या नोकरी अथवा शिक्षणाशी जो सहमत होईल, त्यासाठी तो आणि त्याचे कुटुंबिय प्रोत्साहन देतील, अशा जोडीदाराच्या शोधात मुली आहेत. त्यासाठी स्वत: मोठ्या पदावर काम करत असतानाही आपल्यापेक्षा कमी पगार असणारा जोडीदार निवडण्यात त्या कमीपणा मानत नाहीत. किंबहुना खूप मोठ्या पदावर काम करीत असणाऱ्या कितीतरी मुलींचे नवरे हे समर्थपणे घर सांभाळत आहेत. त्यात त्या मुलांना किंवा त्या मुलींना कसलाही कमीपणा वाटत नाही. मुलींना अजूनही ही ‘स्पेस’ मागून घ्यावी लागतेय. मात्र ‘स्पेस’ची अपेक्षा धरणाऱ्या मुलींना आपल्यापेक्षा शिक्षण, नोकरी पैसा यात सरस जोडीदारच हवा आहे. मुलांनी मात्र मुलींचं बाहेर जाणं, बाहेर रमणं, स्वतंत्रपणे कमावणं मान्य केलंय कदाचित. पण, ‘बायको’ची परंपरागत व्याख्या आणि त्यातून आलेली अपेक्षांची चौकट मोडवत नाहीय.
लग्न ही अत्यंत तरल, हळूवार आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट असते प्रत्येकाच्याच आयुष्यातील. लग्नामुळे दोन मनांसह दोन कुटुंबांची सुंदर नात्यामध्ये बांधणी होत असते. ही नाती अशा अपेक्षांच्या व्यापारात गोवली जाऊ नयेत. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत साथ देणे अतिशय आवश्यक आहे. आक्षेपार्ह आणि आंधळ्या अपेक्षांचा मापदंड लावून लग्न करणाऱ्यांनी, समोरच्याकडे आधी माणूस म्हणून बघणे शिकायला हवे. आर्थिक बाबतीत मुलांसह मुलींनीही स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे, त्याचबरोबर घरकामांमध्ये मुलानेही मदत करायला हवी, हेही प्रत्येक घरात रुजवले गेले पाहिजे