Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Manda Khandare

Drama Inspirational


4  

Manda Khandare

Drama Inspirational


जीवनाचे गीत गा रे!

जीवनाचे गीत गा रे!

5 mins 416 5 mins 416

"अरे! किती हा पसारा करून ठेवलाय, रोजच्या वस्तू वापरून झाल्या की पूर्ववत त्याच जागेवर का नाही ठेवत तुम्ही? नाही मिळाले काही तर मग आहेच मम्मा. घर भर पसारा करणारे तुम्ही तिघे आणि आवरणारी मी एकटी, कुठे कुठे लक्ष द्यायचे मी...”


माझी बडबड ऐकून पांघरुणातून डोके वर काढत केतकी म्हणाली, "मम्मा, अगं चिल्ल न यार... किती त्रास करून घेते. मी आवरते ना नंतर, आता दोन दिवस सुटीच आहे ना!" तिने परत पांघरून तोंडावर घेतले.


"काय तुम्ही आज-कालची मुलं? शिस्त म्हणून काही नाहीच."


ते तसेच सोडून मी मुलाच्या रूममधे गेले तर तिथे तर अगदी भूकंप येऊन गेला की काय, असे बघता क्षणी वाटले. काय ती अस्ताव्यस्त पडलेली पुस्तके, कपड़े, टॉवेल, पांघरुण अर्धे बेडवर अर्धे खाली आणि मुलगा आपले हेडफोन लावून फोनमधे गुंग झालेला !..मी काय बोलते आहे यावर काहीच लक्ष नाही. त्याचे हेडफोन काढून घेतले तर म्हणतो, "ए मम्मा, दोन दिवस सुटी आहे गं, करतो अभ्यास नंतर..."


कर तुझ्या मनाने म्हणत, त्रागा करत बाहेर पडले. म्हटले यांना सांगावे जरा समज द्यायला... पण कसले काय? साहेब तर छान सोफ्यावर पाय पसरून निवांत टीव्ही बघत बसले होते व मी काही म्हणायच्या आत त्यांनीच म्हटलं, "अगं, कशाला उगाच मुलांच्या मागे लागते, करू दे त्यांच्या मनाने काय करताहेत ते... दोन दिवस सुटी आहे तर मस्त एन्जॉय करु दे त्यांना आणि मला ही..."


मला भयंकर राग आला मी ओरडतच म्हटले, "दिवसभर त्या जुन्या क्रिकेटच्या मॅचेस बघण्यात कसले आले हो एन्जॉयमेंट? मला तर कळतच नाही तुमच्या सर्वांच्या एन्जॉय करण्याच्या व्याख्या... टीव्ही आणि तो मोबाईल तोंडासमोर ठेवून कसले एन्जॉय करताय तुम्ही लोक?? अरे सुटी आहे तर आपल्या घरातील लोकांबरोबर बोलायचे, खेळायचे, आपले प्रॉब्लेम्स शेअर करायचे, डिसकस करायचे तर ते नाही...

शी बाबा तुम्ही लोक ना !!"


मी वैतागून किचनमधे गेली आणि रागातच मेथीची जुडी हातात घेतली, त्या भाजीला बघून म्हणाले... "एवढीशी ही जुडी आणि भाव बघा कसले आकाशाला भिडले हिचे... आपले शेत असते तर...”


वाक्य संपते न संपते तोच माझ्या चेहऱ्याचे भाव बदलले आणि आनंदातच फोन घेऊन बाल्कनीत गेले, आणि स्नेहाला म्हणजे लहान बहिणीला फोन लावला. एका शहरात असून किती किती दिवस भेट होत नव्हती आमची! फोन उचलताच कळले तिच्याही घरी माझ्याच घरासारखी सकाळ झाली आहे. म्हणून मग मला सुचलेली कल्पना तिला सांगितली.


जवळच शंभर किलोमीटरवर काकांनी शेत घेतले होते गेल्या वर्षभरापासून ते बोलवत होते, पण मुलांची शाळा, कॉलेज, यांचे ऑफिस, माझी शाळा यामुळे कधी वेळच नाही मिळाला. स्नेहा मात्र जाऊन आली होती. आल्यानंतर ती जे वर्णन करायची त्याने मन भारावून जायचे. आज जाण्याचा मुहूर्त निघाला म्हणायचे.


मी तिला म्हटले,"कुणाला सांगायचे नाही कुठे जात आहोत ते... त्यांना सरप्राईज देऊयात. मुलांना त्यांच्याच भाषेत सांगू, बाबांनो, वीकेंड एन्जॉय करायला जातो आहोत किंवा आउटिंगसाठी जात आहोत. बघ कसे पटापट तयार होतील. दोन दिवसांचे कपडे, काही थोडे सामान लवकर गाडीमधे टाक आणि निघ लवकर, कारण तुलाच ती काकांची शेती कुठे आहे ते माहित आहे. तुझी गाडी पुढे राहणार आणि आमच्या मागे, आमच्या म्हणजे, मी माझ्या नणंदेलाही सांगते व तिलाही सोबत घेते... छान फॅमिली गेट-टुगेदर होईल.” २ तासांनी नाक्यावर भेटायचे ठरवून मी फोन कट केला.


मुलांना सांगितले आपण आउटिंगसाठी जाणार आहोत, दोन दिवस सुटी आहे म्हणून आपण वीकेंड एन्जॉय करायला जाणार आहोत... मुले तर उडालीच एकदम आनंदने नाचू लागली. "मम्मा, कुठे जाणार आहोत सांग ना लवकर?"


मी म्हटले, "ते मात्र सरप्राईज आहे, तुम्हाला खूप एन्जॉय करायला मिळेल, खूप आवडणार आहे तुम्हाला, चला लवकर तयार व्हा..."


यांनी विचारले, “काय गं कुठे जायचे?”


मी म्हटले, “तुम्हालाही सरप्राईज आहे, जा लवकर तयार व्हा.”


दोन तासातच आमची गाडी नाक्यावर आली, स्नेहाची गाडी आलेली होतीच. त्या सर्वांना बघून तर मुले आनंदने नाचायला लागली. तोच नणंदेचीही गाडी आली. मग मुलांबरोबर इतरांनासुद्धा आश्चर्य वाटले, पण सरप्राईज ते सरप्राईजच ठेवत आम्ही पुढे निघाले.


दोन तास प्रवास करून आमच्या गाड्या हिरव्यागार दोन शेतांच्या मधून काकांच्या घरासमोर थांबल्या. काकांना सकाळीच कळले होते म्हणून सर्वच स्वागताला हजर होते. काकांचा मुलगा, सुन आणि त्यांची मुलेदेखील आलेली होती. मुले तर कावरी-बावरी शेताकडे बघत होती. कधी पुस्तकातून डोके वर करून खरा निसर्ग बघितलाच नव्हता त्यांनी. पुस्तकात कॉटन प्लांट वाचले होते त्याचे चित्र बघितले होते पण खराखुरा कापूस कसा असतो, तो शेतात, त्या रोपट्यावर त्या झाडावर कसा दिसतो त्याला पांढरे सोने का म्हणतात याची कल्पना मात्र मुलांना नव्हती. केळीची बाग बघून एकमेकांना आवाज देत... हातांनी ती छोटी छोटी केळी स्पर्श करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आणि आश्चर्य दिसत होते हे मी माझ्या नजरेने अचूक टिपत होते. फुलांची बाग बघून मुली तर अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. हे फूल बघू की त्यावरचे ते फुलपाखरू बघू असे त्यांचे झाले होते. मुलांच्या या लीला बघत मी गुंग झाले होते.


काका म्हणाले, "पोरी, तुझ्यामुळे आज आपण सर्व इथे जमलो बघ.”


नणंदबाई पण म्हणाल्या, "हो वहिनी, तुमच्यामुळे बघा मुलं किती खुश आहेत. निसर्गाचा अनुभव घेत आहेत, नाहीतर घरात असले की तो फोन आणि लॅपटॉप घेऊन नुसते शांत न बोलता बसतात. खूप छान कल्पना सुचली तुम्हाला वीकेंड साजरा करण्याची...”


काकांचा नातू मुलांना घेवून बाजूच्या शेतात गेला. तिथे ज्वारीची छोटी छोटी कणसं लागली होती तर मुलींना घेवून काकांची नात गेली होती. मुलींना तुरीच्या शेंगांचे फार नवल वाटले. पालक, मेथी, कोथिंबीर, वांगी, टॉमॅटो सर्व कसे हात लावून मुली बघत होत्या. वालाच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगांचे मांडव बघितले तेव्हा मला काही स्वस्थ बसवेना.


ते सर्व हिरवेगार शेत बघून मला बालकवींची कविता आठवली-

हिरवे हिरवे गार गालिचे

हरीत तृणाच्या मखमलीचे

त्या सुंदर मखमलीवरती

फुलराणीही खेळत होती


आज सर्व मुली मला या कवितेतील फुलरणीसमच भासत होत्या.

तहान भूक हरवून मुलं निसर्गाचा आस्वाद घेत होती.


आमची जेवणे सायंकाळीच झाली. काकांनी काही लाकडं एकत्रित करून सर्व मुलांना बाहेर अंगणात बोलावले. लाकडं बघून मुलांना कळले आता बोनफायर करणार... मग काय दुधात साखरच पडली की... मुले नाचायलाच लागली. आम्ही बायकाही आवरून बाहेर आलो.


काकांचा मुलगा म्हणाला, "आपण आज हुरडा पार्टी करूया...” मुलांना केवळ पार्टी शब्द समजला आणि एकच जल्लोष झाला, पार्टी... पार्टी.. पार्टी...


काकांनी, काकूंनी, त्यांच्या मुलांनी खूप गोष्टी सांगितल्या, त्यांचे शेतीतील अनुभव सांगितले, आपण जे अन्न वाया घालवतो त्यामागे शेतकऱ्याची किती मेहनत असते, कष्ट असतात हे पटवून सांगितले. मुलांनी काकांना तेव्हाच प्रॉमिस केले की यानंतर अन्न असे वाया जाऊ देणार नाही किंवा उष्टेही सोडणार नाही. छान गप्पा, गोष्टी, गाणे म्हणत रात्रीचे दोन कसे वाजले कुणाला कळलेच नाही. 


सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने मुले लवकर जागेसुद्धा झालीत. त्यांनी अशी फ्रेश सकाळ केवळ टीव्हीमधे किंवा एखाद्या ग्रामीण दर्शन करून देणाऱ्या चित्रपटामधेच बघितली होती. मुलांच्या खेळात मोठेही सामिल होत गेले व सकाळची दुपार झाली व तेव्हा आम्ही बायकांनी आवरायला घेतले. गाडीमधे समान ठेवताना बघून मुलांनी अक्षरशः रडापडा सुरू केला. आज नाही जायचे उद्याला जाऊ म्हणून... पण उद्या शाळा, कॉलेज, ऑफिस होते. पाय निघत नव्हता व पुन्हा येऊ म्हणून निघालो खरे पण मुलांचे मन मात्र तिथेच राहून गेले जणू...


हे क्षण प्रत्येकाने आपल्या मनात जपून ठेवले होते. मी मात्र खूप भरून पावले होते, तृप्त झाले होते. ही एक अविस्मरणीय भेट देऊन. गाडीमधे गाणे सुरु होते-


हिरवा निसर्ग हा भवतीने

जीवन सफल कर मस्तीने

मन सरगम छेडा रे,

जीवनाचे गीत गा रे,

गीत गा रे, धुंद व्हा रे


Rate this content
Log in

More marathi story from Manda Khandare

Similar marathi story from Drama