Rajesh Sabale

Drama Others

3  

Rajesh Sabale

Drama Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

24 mins
1.2K


कॉलेज संपलं होतं. कामाच्या शोधात भटकंती सुरु होती. मध्येच वहिनी सोबत दोन रुपये रोजने कामावर जात होतो. काय करणार नोकरी कधी मिळेल याचा काही योग्य दिवस किंवा तारीख पक्की नव्हती, मग हाताला मिळेल ते पोटासाठी करायचं. 

आज गुरुवार आठवड्याचा बाजाराचा दिवस होता. आठवडाभर काम केल्याची मजुरी मिळणार म्हणून मी आणि वहिनी जुन्या एसटी स्टँडवर मालकाची वाट पहात उभा होतो. मालक आला तर, मजुरीचे पैसे मिळणार होते. नंतर बाजार आणि मग घर. हेच ते जीवन. लोक जीवन कशाला म्हणतात माहित नाही, आमचं तर हेच जीवन होतं. बराच वेळ वाट पाहून झाली. मजुरीचे पैसे देणारा मालक काही आला नाही. आणि त्यावेळी अशी काही सोय नव्हती की, फोन करून तुम्ही कुठे आहात, कधी येणार अशी चौकशी सुद्धा माणूस आतासारखी करू शकत नव्हता. जे काही होईल ते समोरासमोर.

 तेवढ्यात एक एसटी येऊन पुढ्यात थांबली, अन गाडीतून ओळखीची व्यक्ती उतरल्यासारखे वाटले. कोण बरं असावं? माणूस तर, ओळखीचा वाटतो, पण ओळख पोहचत नव्हती. जरा सात आठ वर्षापूर्वीचा आठवून पाहिलं आणि मग आठवलं.....

मी इयत्ता आठवीत असताना आम्हाला संस्कृत शिकवायला जे शिक्षक होते तेच हे असावेत, म्हणून जरा पुढं झालो आणि म्हटलं सर!..

 ‘इकडं कुठं लई दिवसानं दिसताय कुठून येन झालं’ मी एका दमात सर्व विचारून टाकलं. 

असं अचानक आपल्याला कोण विचारताय म्हटल्यावर, माणूस जरा दचकतो. थोडंसं दचकून त्यांनी 

‘तू कोण? मी ओळखलं नाही बाळ.’ उत्तर आलं. 

आता शिक्षक म्हटल्यावर असंख्य मूलं रोज यांच्या समोर येतात त्यातून कोणा-कोणाची नाव ते आठवणीत ठेवणार म्हणा. आणि ते ही खरं आहे. जसं जसं वय वाढत जात तसं तसं माणसाच्या चेहरेपट्टीत ही फरक पडत जातो. डोक्याचे केस काळ्याचे पांढरे होतात. कधी चष्मा तर, कधी हातात काठी येते. आणि आपल्या चेहऱ्याचा नूर बदलत जातो. अगदी तसच झाल होत. असो.

ओळखलं तर झाली होती. म्हटल्यावर मी काय करतोय हे ओघाने आलच. मी ही निसंकोचपणे सांगून टाकले. 

‘नोकरीचा शोध सुरु आहे. बघू कुठं तरी होईल काम.’

‘कुठं तरी कशाला माझ्या शाळेत कला शिक्षकाची जागा आहे. येतोस का?’ सर म्हणाले.

आता बोला आपण मागतो एक डोळा, अन देव देतो दोन डोळे. असं म्हटल्यावर मी, इकडचा तिकडचा विचार न करता होकार दिला. कुठं आणि कसं यायचं विचारून घेतलं. ते ही त्यांनी काही अधे-वेढे न घेता सांगितल्यावर सर आपल्या नियोजित कामासाठी निघून गेले. मी आणि वहिनी आमचा रोजनदारीचे पैसे देणारा आला नाही, म्हणून परत आल्यापाऊली माघारी आपल्या माघारी फिरलो.

मनात आनंद होता, पण पैसे न मिळायचं दुःख ही होतं. पैसे नाहीत म्हणजे बाजार नाही अन बाजार नाही म्हणजे मग खायचं काय?

साराच गुंता कोणतंच काम सरळ का होत नाही हे मला ४०/५० वर्षांपासून आजही न सुटलेलं कोड जसाच्या, तसेच आहे. त्यात काहीच बदल झाला नाही. फक्त तेंव्हा तरुण होतो. आता वय झालं इतकाच काय हो फरक.

आता घरी काय सांगायचं? आधी नोकरीच सांगावं की, मजुरीच्या पैशाचं. जाऊ दे वहिनी काय ते पाहिलं... असं म्हणून मी, आपला गप्प होतो. वहिनीच्या मनात होत, मी आनंदाची बातमी सांगावी अन मग पैशाचं पाहू... आता बाजार म्हटलं की, लहान मुलानंसाठी पर्वणी काही तरी, खाऊ येणार आणि तो आपलयाला मिळणार, पण आज असं झालं नाही. मुलांनी आल्याबरोबर बाजारचीपाटी उघडून पाहिली. पाटीत काहीच नाही. मग काय नेहमीसारखं आपलं रडगाणं सुरु झालं.

हे काय आम्हाला नवं नाही. असं वर्षातून किती तरी वेळा होतं. शेवटी न राहून वहिनीने माझ्या नोकरीची बातमी सांगितली अन घराचा नूर बदलला, आणि झाली वादाला सुरुवात. चर्चेला हे उधाण आलं. नको नकोत ते प्रश्न आणि उत्तर. माणसं नको त्या बाबत फारच चर्चा का करतात हेही न उंलगडणार कोड आहे. ज्या बाबत पोट तिडकीन बोलायचं तिथं गप्प असतात आणि जिथं काही गरज नसते तिथं अगदी नको तेवढं बोलतात. बरं बोलतात तरी काय?

कोण हे शिक्षक! त्यांनी कशी शाळा काढली. इथं शिक्षक होते ना? मग तिकडं कधी गेले. काय खरं अन काय खोटं काही कळेना. बस झालं कोणी कुठं जायचं नाही. आपल्याकडं पैसे नाहीत. मिळेलं तेंव्हा मिळेल नोकरी उगाच का गावोगाव फिरत बसायचं. नाही मिळाली नोकरी, तर मोल मजुरी करून शेती करू. आता बस झालं. घरातील सर्वांचच एक मत झालं.

 आता आली का पंचायत काय करावं बरं? मनात विचार आला. हे काम वहिनी बरोबर करणार. आता वहिनीला सांगून पाहू... लागली गोळी तर लागली नाही तर, शेत अन नांगर तर, आहेच सोबतीला. प्रयत्न करायला काय हरकत आहे. 

संध्याकाळी स्वयंपाक करण्यासाठी सरपण लागते. गावाकडे सरपण कसले तर बाभळीच्या कट्या असलेल्या वाळलेल्या फांद्या. सरपणासाठी लागतात. त्या तोडण्यासाठी वहिनी घराबाहेर येते, हे मला चांगलं माहित होत. बस झालं काम.

मी, संध्याकाळची घरच्या अंगणात उंबराच्या झाड जवळच वहिनीची वाट पाहात बसलो होतो. अगदी मनात ठरल्याप्रमाणे घडून आलं. वहिनीने सरपणासाठी काट्या तोडायला हातात कुऱ्हाड घेतली अन घरामागील बांधावर आली. मी, तिच्या पाठोपाठ घराच्या मागील बांधावर आली. वहिनीला माझी चाहूल लागली होतीचं. मग मीच म्हणालो. 

‘काय केलं तू? आता झालं मनासारखं!!! कशाला सांगितलंस नोकरीच. जरा तोंड बंद ठेवलं असत, तर काय बिघडलं असत का? पण नाही. तुम्ही बायका ना?’ 

‘काय झालं कवा तरी सांगायच व्हतं ना? मंग!!!’ वहिनी एकदम अंगावरच आली. मग माझी ही अवसान गळून पडलं, आणि दबक्या आवाजात म्हणालो.

‘अगं पण ती वेळ चुकीची होती ना. कधी कळायचं कोण जाणे.’ माझं वाक्य पूर होत न होत तोच वहिनी गर्जली. 

‘बरं बरं तुम्हास्नी कळतंय नव्ह सारं, मंग पूर झालं. लई मघा धरून कोकलताय मंग सोताच सांगा की, उगा कशापायी आम्हासनी तोंडघशी पाडताय’. 

‘जावू दे गं आता मी काय सांगतो ते ऐक’. मी तर बदलापुरला जाणार पण घरात भांडण नको म्हणून, तू काय ते बघ कस सांगायचं. शेत काय कुठं पळून जात नाही, अन कोण खांडून बी नेणार नाही. काम झालं तर, ठीक नाही तर, तेच करायच आहे ना? वहिनीला ही गोष्ट मनापासुन पटली होती तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मी म्हटलं 

‘मग आता. आपल काम झालं. आता आणखी काय. आता काम झालं. आपला बदलापूर झिंदाबाद!!!

   १२ मे १९७६ चा तो दिवस. माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता, घरातील लोकांना कोण समजावून सांगणार, हा प्रश्न वहिनीने चुटकीसरसा सोडवला होता. काय म्हणाली माहिती आहे.

    घरात दिवे लागणीची वेळ झाली होती. वहिनी चुलीजवळ जेवण बनविण्यासाठी पुढ्यात काठवट (काठवट म्हणजे पसरट लाकडी भांडे.) घेवून बसली. आणि पिशवीतील पीठ काठवठीमध्ये घेता घेता मनातल आवाज इतरांना जाईल अशा बेतान पुट-पुटू लागली. 

आपल्या घरात एका बी माणसाचं डोसकं ठिकाण्यावर नाय. काय झालंय कुणाल ठावं. मला तर, बया काय समजणं झालंय. तीच हे चिड-चिड करणार बोलणं एकूण काकू ( काकू म्हणजे आमची आई. आम्ही घरात आईला काकू आणि बापाला आप्पा असे म्हणत होतो) म्हणाली. 

‘काय झालं गं उगाच काही तरी कटकट करतेस काय झालं. कुणाची डोसकी फिरल्यात गं.’ ‘ कुठं कुणाची मी कुठं काय म्हणते.’ वहिनीने आपलं पालूपद सुरु केलं. बोलणं वाढत गेलं. तसं वहिनीने 

‘आपल्या अख्या घरात कोण एवढं शिकलं हाय का? जो तो उठ तो अन हात पायाला दोर बांधून झ्या झ्या करत गावभर हुंदडत्यात, शेत काय कोण डोक्यावर घेऊन जातंय का? काही नाही मिळालं तर शेवटी मातीच उपसायची ना? पण मी म्हणते एक डाव पोराचं ऐकलं तर काय एवढं आभाळ कोसळणार हाय का? नाय झालं काम तर परत येईल का नाय. पण न इचरता पळून गेला तर मंग मला बोल लावा यचा नाय हो सांगून ठेवते? मंग मला इचार नका हो!!!’ वहिनीच्या बोलण्याचा असर हळू हळू घरातील मंडळींवर होत होता. मी आपला उताणा पडून सारं ऐकत होतो. वहिनीची किट पिट चालूच होती. 

   ‘वा वा काय काम केल आपण वहिनीबाय’. वहिनीची मात्र अपसूक लागू पडली, अन नाही हो करता करता अखेर २५/-रुपये बिदगी घेऊन बदलापूरला जाण्याचा निर्णयावर घरच्या सर्वांचे एकमत झाले. 

आज १४ मे १९७६ पहिल्यांदाच नोकरीसाठी घराबाहेर पडलो होतो. पुढील सारे मला आठवीत शिकविणाऱ्या सरांवर अवलंबून होतं. आता घरा बाहेरची वाट तर धरली होती. आर नाही, तर पार. जे काय होईल त्याला मी स्वतःच जबाबदार होतो. यात दोष कुणाचाच नव्हता. 

एसटीन आता गावं सोडला तसा मी ही सोडला होता. गावाकडीची हिरवीगार शेतमळे झाड आता हळूहळू मागे सरकू लागली होती. वाऱ्याच्या वेगानं एसटी धावत होती. आणि गावाकडच्या आठवणी धूसर होवून, आता शहराकडील शहराकडील ओढ लागली होती....मनात अनेक कल्पनाचे इमले उभे राहात आणि काही क्षणात पुन्हा मोडून पडत होते...

 माळशेज घाट आता जवळ आला होता. मनात अनंत विचार दाटले होते. मुंबईच नाव ऐकून होतो, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी कधी पाहिली नाही. कधी लहान असताना आई-बाबा बरोबर गेलो असेल तेंव्हा पहिली असेलही, आता आठवत नाही. लहानपणी काय सारं सारखंच वाटतं. उन्हाळा असल्यानं रानं रखरखीत झाली होती. गवताचं वाळून कोळ झालेलं. जनावराच्या तोंडातही काडी येणार नाही, पण मी मात्र उनाड पोरांसारखा चोरून चोरून गाडीच्या तावदानातून निसर्ग सरकताना पाहत होतो. ज्या रस्त्यानं जातोय त्याच रस्त्यानं परत पाऊली यावं लागलं तर, आपली नाच की, होणार? देव करो अन असं न हो ओ. 

घाटातील नागमोडी वळण वळणावर पुन्हा आपलं काही चुकलं तर नाही ना? असं राहून राहून वाटायचं. एकदाचा गाडीनं घाट पार केला अन कल्याणच्या दिशेनं वाकडी तुकडी वळण घेत गर्द झाडीतून गाडी धावत होती अन माझं मनं तिच्याही पुढं कोस दोन कोस धावत होत. 

एकदाच कल्याण आलं. गाडीतले प्रवाशी आपापल्या पिशव्या घेऊन इच्छित स्थळी रवाना झाले, पण मला अजून बदलापूरची गाडी शोधायची होती. इथून रेल्वे होती, पण नीट माहिती नसल्याने मी, एसटीने जाण पसंद केलं. चौकशी केल्यावर कळलं की, कल्याण ते बोरडपाडा एसटी बदलापूर मार्गे जाते म्हणून मग मी, त्याच गाडीनं जाणं पसंद केलं. आता फक्त बदलापूर एवढंच डोक्यात होत.

झालं वेगळंच बदलापुरला उतरलो तर लोक म्हणतात हे कुळगाव आहे. मग बदलापूर कुठं गेलं. तर ते म्हणे अजून पुढे आहे. काय गंमत आहे. स्टेशन बदलापूर आणि गाव कुळगाव. काय अजब प्रकार हा. आता कसं शोधायचं बरं. मग मी, पत्ता लिहिलेला कागद हाती घेतला अन स्टेशनच्या बाहेर एका पोलिसाला विचारलं हा पत्ता जरा सांगता का? अन मग माझा मार्ग मार्गी लागला. 

    ज्या रस्त्याने गाडी आली त्याच रस्त्याने मागे गेलो तेंव्हा कुठं बेलवली अन मांजर्ली गाव मिळालं. त्य्ब्रोब्र सर ही मिळाले जरा हायसं वाटलं. नंतर गप्पा गोष्टी झाल्या पाणी प्यालो आणि मग सरांनी शाळा दाखविली. उन्हाळ्याची सुट्टी असल्यानं शाळा बंद होती. शाळा गावातल्या रस्त्या लगतच होती. आता राहण्याचा प्रश्न होता.

   एवढं सार शोध शोध करता करता संध्याकाळ झाली. मग शाळेचे अध्यक्ष, लिपिक, आणि शिपाई यांची भेट घडवून आणली. एका घरात सरांचाच नातेवाईकांकडे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. 

    पगार ठरला १००/-रुपये प्रति महिना अन जेवणाचे महिना रुपये ९०/- झाली का पंचायत. आता आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखं झालं, पण आता काही दिवस तरी तोंडाला कुलूप लावणं गरजेचं होतं. लगेच परत घरी जाण म्हणजे...आपली उरली सुरली सर्व जाणार होती. म्हणून मी गप्प राहूनच पसंद केलं. बाकी शिक्षक मंडळी काय करतात ते पाहून मगच काय ते ठरवावं असं मनात ठरवलं. अन बैलासारखी मान हलवून सरांना होकार दिला. नंतर राहण्यासाठी मला लिपिकाच्या खोलीचा मार्ग दाखविला जो जेवणाचे घर सोडून तिसरे होते. चला म्हणजे जेवण आणि झोपणे तरी जवळ जवळ आहे. नाही तर, रात्रीच कस हो. एक गोष्ट मनासरखी घडली म्हणून मी, मनोमन देवाचे आभार मानले. 

    माझी व्यवस्था करून सर, निघून गेले. थोड्या वेळाने लिपीक अन मी, बाहेर गणेश मंदिर होते तिथं गेलो. एकमेकांची विचार पूस केली. जरा मनाला बरं वाटलं. पण काही क्षणात आपण फसलो गेलो याची पूर्ण पूर जणीव झाली. 

त्याच काय झालं ही शाळा होती विनाअनुदानित. दुसरं म्हणजे इथं आणलेला सर्व कर्मचारी वर्ग मला ज्यानी आणलं त्याच व्यक्तीं आणलेले होते, असेच इथल्या प्रत्येकाला वेग-वेगळी करणे सांगुण नोकरीसाठी आणले होते. मुळात आम्ही अर्व्च परिस्थितीचे शिकार झलो होतो. हे जेंव्हा त्या नवीन लिपिकांनी मला सांगितलं. तेंव्हा तर, माझ्या पायाखालची जमीन सरकली. अन ज्या माणसानं मला इथं आणलं, त्यांनीच लिपिक आणि इथल्या सर्व शिक्षकवृन्दास आणले आहे याची खात्री झाली. नुसत्या खानावळीवरून मला थोडा अंदाज आला होता, पण आता खात्री झालं होती. म्हणतात ना, आडला नारायण धरी .....

    आता शाळा सुरु होण्यासाठी अजून महिना होता. तरी मला शाळेत का आणलं याचा थोडा थोडा अंदाज येऊ लागला होता. शाळेचा लिपिक तसा दोन ठिकाणी काम करीत होता. एक म्हणजे जे शाळेचे प्रमुखही होते आणि अध्यक्ष ही होते. त्यांची बदलापूर स्टेशन रोडला स्वतःची इमारत होते, आणि त्यातच त्यांचे हार्डवेअरचे दुकान होते. हे लिपिक दुकानाचे लिखापढीचे काम करून, शाळेच्या लिपिकाच ही काम करीत असत. ते ही माझ्या वयाचेच होते. त्यामुळे आमचं तशी लवकर मैत्री झाली.

    हळूहळू मला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या. ज्यांनी शाळेत नोकरी देतो म्हणून आणलं तसं अनेकांना आणलं आणि जर त्याचं आणि आणलेल्या मांसाच काही कारणांनी पटल नाही तर, एका रात्रीत काही वेळा हकलूनही दिलं असं ही कानावर आलं, पण पूर्ण खात्री केल्याशिवाय बोलायचं कशाला, आता शाळा सुरु होण्याअगोदर महिनाभर आधी का आणलं असावं? याचा विचार करू लागलो. इथं एक ही शिक्षक नाही. शाळा बंद आहे. मी रात्रभर खूप विचार केला. लिपिकालाही विचासरलं. त्यांनाही काहीच माहित नाही असं म्हणाले. सकाळी काय ते पाहू असा साधा सरळ विचार करीत कधी झोप लागली देव जाणे. 

    सकाळी मात्र साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. शाळेत नवीन मुलं नाव नोंदणीसाठी येतील त्यांची नाव नोंदणी करावी. त्यासाठी गणेश मंदिर जवळच्या वर्ग निवडला होता. या वर्गात बसून मी, मुलांची नाव नोंदणी करायची यासाठी मला लवकर बोलावले होते असे मला सरांनी सांगितले, आणि ते आपल्या कामाला निघून गेले. 

    कसा बसा महिना संपत आला. अधून मधून सर येऊन जायचे, शिक्षकांच्या बाबत बोलायचे पण मी, तेवढं मनावर घेतलं नाही. 

   शाळा सूरु होण्यासाठी दोन दिवस बाकी असतानाच शिक्षक मंडळी हजर झाली, अन मला जरा हायस वाटलं. महिनाभर एकटाच भुतासारखा वर्गात बसायचो पण आता बरेच शिक्षक सोबत असल्याने दिवस मजेत जाणार असे वाटले, पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. त्याच कारण ही तसेच होतं.

   पुढे असं कळलं की, या शाळेत माझ्या अगोदर एक कलाशिक्षक असताना यांनी मला का आणलं? कारण एका शाळेत मुलांच्या संख्ये प्रमाणे एक कलाशिक्षक असणे पटण्यासारखे होत. मग मी, कशासाठी हा प्रश्न माझ्याप्रमाणे शाळा प्रमुखांना आणि सर्व शिक्षकांना पडला होता. सर्व शिक्षक आपापसात बोलायचे. माझ्यासमोर मात्र कोणी बोलत नव्हतं, कुजबुज मात्र ऐकू येत होती. तेंव्हा मीच एकदा पुढाकार घेऊन सर्वाना बोलतं केलं, आणि सारी पोटातील खदखद बाहेर आली. 

   मला पहिला प्रश्न आला. 

‘तुम्ही यांना कुठं भेटलात यांना? आमच्यावर नजर ठेवायची कशी हे सांगितले असणार? शाळेतून कोण कसा पळून जातो? सिनेमा कोण पाहत? असे नाना प्रश्न समोर आले,’ हे मला माहित असल्याने खरं काय हे ही समजलं. म्हणजे हा माणूस शिकलेल्या लोकांच्या मजबुरीचा कसा फायदा घेतो हे समजून आलं. थोडक्यात या सरांचा कोणावरच विश्वास नाही. हेच यातून सिद्ध होते. 

   मला जे वाटलं तसेच झालं. मी आल्यामुळं पहिल्या कला शिक्षकाची नोकरी जाणार हे नक्की होतं, पण त्या सरांना याची चाहूल अगोदरच लागली होती असं म्हणतात, म्हणून त्यांनी अगोदरच दुसऱ्या नोकरीची व्यवस्था केली होती.

   खर पाहतामाझ्या आधीचे कला शिक्षक हे  संचालकांचे नातलग आहेत असं ही समजलं. आता बोला. जो माणूस आपल्या नात्याच्या माणसाला एवढा त्रास देतो तिथं इतरांचे काय? असा त्यांचा दबदबा निर्माण झाला होता.ते ही तसे काही कच्या गुरुंचे चेला नव्हते. नातलग संचालक काय चीज आहे हे या कला शिक्षकाला माहित होत. ते ही तसे इतरांना पुरून उरतील अशी असामी होती. हे सर्वांचाच बाबत घडेल असं नाही ना? म्हणजे सावध राहणे ही काळाची गरज आहे. हे मात्र खरं. त्यांनी या बाबत अगोदरच मुख्याध्यापकांना सांगितलं होतं, म्हणून तर सर्व माझ्या सोबत हसत खेळत बोलत होते. हे सर्व शिक्षक नम्रपणे एकमेकाशी खेळीमेळीने वागत होते. आपली सुख दुःख समजून घेत होते. हे ही मला जाणवले. 

एक गोष्ट नक्की होती की, सर्व समदुखी असल्याने या साऱ्या गोष्टीपासून त्यांनी मलाही सावध करून ठेवले होते. आपल्याप्रमाणे मी ही कसा फसलो आहे, हेच मला ते सुचवत होते. याची खात्री मला झाली. आणि ही नोकरी खात्री देणारी नाही. हे मला आता कळून आले, आणि काही दिवसात सर्व गोष्टीची खात्री झाली. 

    एक दिवस रात्री साडेदहा वाजता संचालकांणी मला आपल्या घरी बोलाविल्याचा निरोप घेऊन शाळेचा शिपाई आला. आज असं काही होईल याची खात्री होतीच, पण एवढ्या लवकर होईल असं वाटलं नाही. काय झालं होतं. आज अध्यक्षांच्या मुलाला शाळेच्या मैदानावर कवायत करताना माझ्याकडून शिक्षा झाली होती. याचं भांडवल हा माणूस करील अशी किंचित कल्पना होती. पण इतक्या लवकर घडून येईल असं वाटलं नाही. हे असं काही तरी होईल, असं काही शिक्षकांचं म्हणणं होतं. आता यांनी का बोलावलं हे संचालकांच्या घरी गेल्याशिवाय कळणार कसं. 

   जेवण झाल्यावर लिपिक आणि मी, रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान संचालकांच्या घरी पोहोचलो. एकंदर सर्व वातावरण पाहता प्रकरण गंभीर आहे, याची खात्री झाली, म्हणून आपण शांतपणे काही माहित नसल्यासारखं वागत होतो. 

   बोलाविल्या प्रमाणे मी आणि शाळेचे लिपिक त्यांच्या घरी गेलो. आणि

‘नमस्कार सर!!!’ मी, माझी बाजू शेफ केली, पण समोरून नीट प्रतिसाद आला नाही. बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तसा प्रश्नांचा भडिमार सुरु झाला. 

‘किती दिवस झाले नोकरीत येऊन? लगेच रंग उधळणे सुरु झालं? तुम्ही स्वतःला शाळेचे मालक समजता की काय? आज काय केलंय ते माहित आहे की, मी सांगू? एवढ्या मोठ्या माणसाच्या मुलाला शिक्षा करताना थोडा विचार करायचा होता? उद्या तुम्ही माझ्या मुलाला सुद्धा .......

    मी, मध्येच आडवत म्हणालो, 

‘ सर, एक मी शिक्षक आहे. तेंव्हा मी कसं वागावं आणि कोणाला काय शिक्षा करायची हे चांगलं जाणतो. तेवढी बुद्धी देवाण मला दिली आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या मुलाचा, ही शाळा आहे. इथं कोणाचा मुलगा किंवा मुलगी शिकते याचा काही संबंध येत नाही. तेंव्हा इथं चूक केली, म्हणजे थोडी फार शिक्षा ही होणारच. शाळेतल्या शिक्षकाने शिक्षा करताना हा मुलगा किंवा मुलगी कोणाची आहे, असा विचार करायचा नसतो. जर प्रत्येक मुलांच्या पालकांच्या लहान-मोठेपणाचा हिशेब करत बसलो ना तर, मुलं माझा मामा करतील. अन शाळेतील मुलांमध्ये काय मेसेज जाईल सर? शाळेतील प्रत्येक मुलं मला इतर मुलासारखंच आहे. हा अध्यक्षांचा, हा संचालकांचा, कोण सरपंचाचा, कोण गरिबांचा, कोण श्रीमंतांचा असा शिक्षकाने विचार करायचा नसतो. अन जो असं करतो त्याला मी, शिक्षक मानत नाही!!! या उपर आपली मर्जी. आपण जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे.’ 

    ‘अरे वा. म्हणजे मला तुमचा वेगळा विचार करावा लागेल. तुम्हाला माहित नाही. मी, एका रात्रीत दहा नवीन शिक्षक आणू शकतो. निघा तुम्ही!!!’ 

    रस्त्याने जाताना शाळेचे लिपिक म्हणाले. ‘बधितलं सर? हा माणूस कसं बोलतो ते. असं बोलतो की, जसं काही सर्व याचंच आहे. आ हो आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला, आपण या बसा. काही विचार पूस करावी, आणि मग काय झालं? ते विचारावं माझ्या कानावर जे काय आलं त्याबद्दल आपल्याला विचारायचं होतं. तस्स काहीच घडल नाही.’ लगेच मी कोण आहे. आणि दुसरा कसा चुकीचा आहे. हे सांगायला ते विसरले नाहीत.’ 

     हा सारा प्रकार होणार हे शाळेच्या लिपिकाला माहीत होते. त्यामुळं तिथून बाहेर पडल्याबरोबर लिपिक सर म्हणाले.  

‘जाऊ द्या हो सर, काही विचार करु नका. शेठजी चांगले आहेत. ते नक्की समजून घेतली. यांचं नेहमीचंच आहे हे’. लिपिक माझी समजूत काढीत होते. मी लिपिकच हे बोलणं गप्प ऐकत होतो. 

     आजचा दिवस मला बरा गेला नाही. या विचाराने मला रात्री कधी झोप लागली हे कळलं नाही. मी हे उगाच बोललो असं वाटलं खरं पण देवाच्या मनात वेगळंच असत असं म्हणतात. 

     सकाळी मी, विचार करीत गणेश मंदिराजवळ उभा होतो आज शाळेत जावं की, नाही. या विचारात असतांना समोरून सकाळीच आताच नव्यान मित्र झालेले तांबे सर येताना दिसले. त्यांच्या हातात पेपर होता. मला पाहून थोड हसले आणि म्हणाले 

‘सर, तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. आज सकाळी सकाळी पेपर घेतला. आणि म्हंटल जरा जाहिरात पाहावी तर काय? तुमच्याच विषयाची बातमी दिसली. मनात म्हटलं चला एक काम तर, झालं.’ 

‘आ रे वा म्हणजे हसत येताना तुम्हाला मी 'पाहिलं, पण तुम्ही का हसत होता ते आता कळलं. तुम्हाला काय वाटलं. तांबे सर म्हणाले. 

‘काय नाही हो. नाय नाय काही तरी, झाली सर! बोलाना सर.’

 मी, गप्प होतो. तेवढ्यात शाळेचे लिपिक धापाटाकत आले. 

‘मी काय घाबरलो सर, मला वाटलं रागा रागाने’ आणि मध्येच तांबे सरांकडे पाहून थांबले. ही गोष्ट तांबे सरांच्या नजरेतून चुकली नाही. त्यांनी प्रति पेंशन केलाच. 

‘काय झालं मला शंका होतीच काही तरी झाल्याशिवाय सर असे सकाळी एकटे बाहेर पडत नाहीत. 

आता काय घडले ते सारं तांबे सरांना सांगणं भाग होत. सारा प्रकार कथन करून झाल्यावर सर म्हणाले. 

‘ही बातमी बघा आणि निघा लवकर आजच मुलाखतीसाठी बोलाविले आहे. काही विचार करू नका. आता वेळ घालवू नका ताबडतोब निघा बाकी संध्याकाळी बोलू काही कुणासला सांगू नका. मी मुख्याध्यापकांना समजावून सांगतो काळजी करू नका. हे एक दिवस होणार होतच, फक्त तुमच्या बाबतीत लवकर घडलं एवढंच.’

 मी मंदिराच्या पायरीवर उभा राहून हे सारं ऐकत होतो आणि पहात ही होतो. 

‘घ्या हा पेपर आज काळव्याला कला शिक्षकाची मुलाखत आहे. जा जाऊन या. शाळा अनुदानित आहे. इथल्या शाळेच काय खरं नाही? कधी मान्यता मिळेल काही खरं नाही हो.’ 

    आता या गोष्टीला काय आपण काय म्हणणार. रात्री काय घडलं, आणि सकाळी काय ऐकतोय, म्हणजे देवाच्या मनात वेगळंच आहे. मी, आणि लिपिकाने पेपर वाचून खात्री करून घेतली. त्यांचा रेल्वे पास घेऊन मी, कळवा गाठलं. मनात म्हटलं पुढचं पुढं पाहू. 

   कळवा हायस्कुलची मुलाखत चांगली झाली. तासाभरात प्राचार्यांनी माझी निवड झाल्याचे कळविले. माझ्या आनंदाला काही पारा वारा उरला नाही. 

    रात्रीचा प्रसंग अजून मी, विसरलो नव्हतो. त्यामुळे जे झालं त्याबद्दल मी, नियतीचा खूप खूप आभारी आहे. यावरून मी एक धडा घेतला की, कोणी काहीही म्हणो जगात अज्ञात काही तरी शक्ती आहे. जी आपल्या मनोवेदना जनते आणि ऐकत असते. याची प्रचिती आली. ही काही ऐकीव किंवा मन्घ्द्न गोष्ट नाही. हे सत्य आहे. यावर काही लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. मी मागेपुढे काही विचार न करता कळवा हायस्कुलची नोकरी मनोमन स्वीकारली. आणि ऑर्डर घेऊन त्या अदृश्य विधात्याचे लाख लाख आभार मनात बदलापूर गाठलं. 

    या नोकरी मिळविण्याच्या आणि मुलाखती दरम्यान आज अजून एक गोष्ट धाडली होती. माझी नेमणूक झाली खरी, पण कळवा हायस्कुलच्या प्राचार्यांनी आजपासून तुम्ही हजेरीपत्रकावर सही करा असं सांगितलं. आता पूर्वीच्या शाळेत कस सांगायचं.  

 तेंव्हा असे फोन बिन अशी काही व्यवस्था नव्हती. त्यांना सांगितल्याशिवाय नोकरीसाठी हो म्हणावं की, नाही काही कळेना. मी गप्प उभा असलेला पाहून प्राचार्य म्हणाले 

‘काय झालं सर, सही नाही केली, काही अडचन आहे का?’ मी, हो म्हणालो 

‘काय अडचण आहे.’ तसं नाही पण मी सध्या मी एका शाळेत काम करतो आहे त्यांना सांगायला पाहिजे असं वाटत’

 ‘हो हो असं आहे काय. बरं मला सांगा तुम्ही काम करीत असलेली शाळा मान्यताप्राप्त आहे काय?’ मी, नाही म्हणालो. 

‘नाही ना? मग कसला विचार करता आपली शाळा मान्यता प्राप्त आहे. करा सही आणि घरी गेल्यावर सावकाश सांगा काही होणार नाही.’ 

सरांच्या सांगण्यावरून मी हजेरी पत्रकावर सही केली. विजय काय असतो, तो मनोमन अनुभवला. तरी, दुसरा प्रकार त्या दिवशी न कळत का होईना घडलाच. बदलापूरवरून येताना मी, लिपिकांचा रेल्वे पास वापरला होता. आता परत जाताना तरी, मी तिकीट काढायला हवे होते, तसं झालं नाही जाताना मी, कळव्याच्या खाडी ब्रीजवरून पायी ठाण्याला आलो, आणि रेल्वे ब्रीजवरून खाली येताना टिसीने मला पकडले. मी, खरं काय ते सांगितले आणि फसलो. पास विचारला. मी ही खरं खरं सांगून टाकलं, की, हा पास माझा नाही. 

   मग काय माझ्या हातातील सर्टिफिकेटची सुरळी एका टिसीने घेतली. अन एकां माझं मानगूट पकडलं. आता दंडाची रक्कम (पैसे) भरा, पैसे भरणार कसे. खिशात पैसे तर पाहिजेत भरायला. 

    रात्रीच्या भांडणात आणि पेपरच्या जाहिरातीच्या गोंधळात माझ्याजवळ पैसे नाहीत हे विसरून गेलो होतो. आता टिसीला पटवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. टीसी लोक काही एकेनातं पावती घ्या आणि जा म्हणाले.... त्यांची बरोबर होत. मी, या आधी रेल्वे प्रवास केला नाही. म्हणून त्यातली काहीच माहिती नाही. पण हे तीसिला कसं सांगणार? काय कराव काही सुचेना.  

   मी, गावावरून आलोय आजच मला नोकरी मिळाली. मला रेल्वेची काही माहिती नाही. असं सारं सांगून झालं. पण कोणालाच माझं म्हणणं खरं वाटल नाही.. मला रडायला आलं एवढं सर्व चांगलं झालं आणि हे काय नवीन घडलं. मला काहीच कळेना. देव पण कसा आहे पहा. एका बाजूने आनंद देतो, आणि लगेच तो हिराहून ही घेतो. आता खरं पाहिलं तर मी, खरच हे जाणून बुजून करीत नव्हतो पण, दुसऱ्याचा पास चालत नाही हे मला आज पर्यंत सांगितले नाही आणि तशी वेळ या महिन्या भरात कधी आली नाही, म्हणण्यापेक्षा मी कधी रेल्वेने प्रवास केलाच नव्हता. हे माहित असत तर, तिकीट काढले असते. पण हे मला माहित आहे. या टी सी मंडळींना कोण संगणार होत.

   मला काही कळेना. आता या अनोळखी ठिकाणी माझं असं कोणी ओळखीचं ही नाही. कोणाला निरोप देण्याची सोय नाही अन त्यावेळी फोनची व्यवस्थाही नव्हती. आता रडत बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. 

    टिसीने मला एका खोलीत नेलं. तिथं ही परत तेच प्रश्न आणि उत्तर मला तर, या गोष्टीचा कंटाळा आला होता. उत्तर तर देणं भाग होत. 

   साहेब मी, काय म्हणतो ते जरा समजून तर घ्या ओ. मी, गयावया करून जीवतोडून सांगत होतो. 

   ‘हं बोला काय सांगणार तुम्ही?’ मी, बोलू लागलो. माझी सर्व कागदपत्र तुमच्या जवळ आहेत, आणि आज माझा नोकरीचा पहिला दिवस आहे. आता मला सांगा, मी का खोटं का सांगेन. माझे खिसे पहा काही मिळालं तर’ घ्या पण मला सोडा साहेब. 

   ‘काय झालं कोण जाणे. माझे खिसे तपासून झाले. नंतर म्हणाले इथं कोणाकडे राहता?’

आता आली का पंचायत. काय सांगणार होतो मी, माझी तर, बोलताच बंद झाली. आता मी, काय लायकीचा आहे हे ही शाळेला कळणार. 

‘काय ओ? मी काय विचारतोय?’ साहेब म्हणाले. 

काय सांगू साहेब नोकरी करण्यासाठी घरच्या लोकांचा रोष पत्करून बदलापूरला शाळेत आलो होतो, पण आज कळवा हायस्कुलची जाहिरात वाचली म्हणून मुलाखतीसाठी आलो होतो. हे असं झालं साहेब. मला खरंच काही माहित नाही हो आणि तुम्ही म्हणता कुठं राहतो. आता कसं सांगू मी, कुठं राहतो ते. 

‘आता कसे जाणार’. साहेब म्हणाले. 

कसा म्हणजे रेल्वेने, पण तुम्ही सोडलं तर जाईन कसा तरी. नाही तर बसतो इथंच. आता काय सारं तुमच्याच हाती आहे सर.’ ‘माझे सर्व पेपर तुमच्या जवळ आहेत. घरी जाऊन तरी काय करणार’. 

;आ रे वा म्हणजे तुम्ही तर, गुरुजी. काय पोरांना असच शिकवणार काय? तरी वाटलंच तुम्ही गुरुजी असणार? किती बोलता. जरा गप्प बस की, इथं एक केस नाही. पाहातायना कसे कसे लोक थापा मारतात ते.’

 मी, गप्प बसून राहिलो. जे होईल ते होईल. काय करणार होतो. पैसे असते तर भरले असते. आता नाहीच तर भरू कसे, आणि दुसरा पर्याय नाही.

मनात आलं मी, उगाच लिपीकांचा पास आणला. पास आणला नसता तरी, मग इथं कसा आलो असतो. कस ही केलं असत तरी, आज मी, इथंच आलो असतो. मी मनातल्या मनात असं कसं झालं आपलं काय चुकलं याचाच विचार करीत होतो. आणि पलीकडच्या टेबलावर टीसी लोकांची इतर बिन तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांची चौकशी चालू होती. 

बऱ्याच वेळाने साहेब म्हणाले. 

‘पुन्हा असले प्रताप करू नका काय? या आता. आणि आता जाताना तरी तिकीट काढून जा.’

 हे काय बोलतात, मी म्हटलं जाऊ देत. उगा वाद नको. माझ्याकडे पैसे नाहीत हे याना माहित असून ते मला म्हणतात जाताना तिकीट काढून जा. आता नाही जमलं तर, पायी जाइन पण तुमच्या रेल्वेत पाय ठेवणार नाही. असं मनात पुट-पुटत बाहेर आलो. आणि पुन्हा कळवा हायस्कुलचा रस्ता धरला.

शाळा सुटली होती. शाळेचे शिपाई तेवढे होते. शाळेच्या शिपाई मामाला पाहून मला रडूच कोसळलं. माझं रडगाणं पहिल्यापासून सुरु केलं. सकाळी मुलाखतीच्या वेळी त्यांनी मला पाहिलं होत आणि एवढ्या ओळखीवर मी, माझी कहाणी शिपायाला सांगत होतो. उद्या मी, तुमचे पैसे परत करीन पण, आज मला बदलापूरला जाण्याऐवढे पैसे दिले तर मी, आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही. असं म्हणून मी रडू लागलो. काय करणार नाईलाज होता ना.

कळवा शाळेचा शिपाई तसा वयाने मोठा होता. लिंबाजी त्यांचं नाव. त्याला माझी द्या आली. देव पावला म्हणायचं दुसरं काय. लोक म्हणतात देव नाही. मलाही कधी तो दिसला नाही, पण देवच कोणाच्या ना कोणाच्या रुपात आपल्याला जागो जागी भेटत असतो. याच दखल आपण कधीच घेत नाही. मला शाळेच्या शिपायाने दहा रुपये दिले. ते कशाच्या विश्वासावर कोणी सांगेल काय? तो काळ तीस चाळीस वर्षांपूर्वी रेल्वेचे तिकीट तसे कमी होते. पण लिपिकांने दिलेल्या पासमुळे सारा गुंता झाला होता. बिचाऱ्या शिपायाला माझी दया आली. मी त्याचे उकार आजही विसरलो नाही. 

मला नोकरी मिळाली होती, त्याचा आनंद तर होताच, पण राहण्याची व्यवस्था कशी करणार. शाळेची नोकरी सोडल्यावर राहण्याची व्यवस्था वेगळी करावी लागणार हे तर नक्की होते. 

मी, आल्या बरोबर पहिला लिपिकांना भेटलो. रेल्वेची गोष्ट एकूण तर, ते हसतच राहिले आणि वरती स्वारी म्हणून मला म्हणाले ,

‘असू द्या काही हरकत नाही हा एक नवा अनुभव तुमच्या गाठीशी राहील. हे सुद्धा उदया पर्वा हे असं घडलं असत, ते लगेच आज घडलं उलट बरं झालं म्हणा.’  

सर्व हकीकत सांगुण झाल्यावर आणि राहण्याच्या खोली बाबत ही बोलणे केले. त्यावर लिपिक म्हणाले. 

‘संबंधित शाळेचे अध्यक्ष याबाबत काय तो निर्णय घेतील. तुम्ही कशाला चिंता करता. ज्या खोलीमध्ये आपण राहतो त्या सर्व खोल्या साहेबांच्या आहेत. जर काही निर्णय घ्यायचा ते साहेब घेतील. तुम्ही अजिबात विचार करू नका.’ 

लिपिकांनी सांगितल्यावर माझ्याही मनाची खात्री झाली. आपण उगाच एखाद्या गोष्टीचा मोठा बाऊ करतो.

मी आणि लिपिक संध्याकाळी शाळेच्या अध्यक्षांना भेटलो. लिपिकांनी सारं कसं सविस्तर साहेबाना सांगितलं. आणि उत्तराची अपेक्षा करीत बसलो. कारण दुपारी तीन वाजता घरी आल्यावर मला काही काम नाही. तर मी, आपल्या शाळेत पगार न घेता काम करतील. असं लिपिकांनी सांगितल्यावर साहेब म्हणाले. 

‘मग तर चांगलंच आहे की, आता तुम्ही कुठं राहता तिथंच राहा. काय. काही काळजी करू नका. जस चाललंय तस चालू द्या मी पाहीन काय करायचं ते.’ अ

अन तसेच झाले. अध्यक्ष म्हणाले दुपारी तीन साडेतीन नंतर सर मानधन न घेता तीन चार तास शिकविण्याचे काम करणार आहेत. मग आपल्या खोलीत राहण्यासाठी माझी हरकत नाही.

माझ्या राहण्याचा प्रश्न तर निकाली निघाला. सकाळी कळवा आणि दुपारी तीनसाडे तीनला बदलापूर म्हणजे मांजर्ली शाळा असं माझं आता रोजच काम सुरु होत. दोन्ही गोष्टी जमण्यासारख्या होत्या त्यामुळे दिवस मजेत चालले होते. विरोधक होते पण, अध्यक्षांच्या समोर जाणार कसे. कारण मी शिकविण्याचा पगार घेत नाही, मग तक्रार काय करणार.

असे करता करता एक वर्ष संपलं. मी, कळवा शाळेत मुलांच्या कलात्मक गुणांची वाढ व्हावी म्हणून शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी मुलाची विनामूल्य वेगळे तास घेऊन प्रॅक्टिस घेऊ लागलो. मुलेही त्यात जादा रस घेऊ लागली. म्हणून सायन्स शिक्षकांच्या मदतीने कला आणि विज्ञान असा एक संघ तयार केला. 

आता मुलांना आपले गुण-कौशल्य दाखविण्याची नामी संधी मिळाली. शाळेचे वातावरण बदलू लागले. त्यामुळे पालकामध्येही शाळेत नवीन काही बदल दिसायला लागले होते. वार्षिक स्नेहसंमेलन ही आम्ही थाटात पार पाडले. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे राष्ट्रीय सण ही चांगले दमदारपणे साजरे केले. शाळेत नवं चैतन्य पसरत असताना. मला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत नोकरीची संधी चालून आली.

काय झालं १९७६ च्या दिवाळी सुटीत मी गावी आलो होतो. आता गावी आल्यावर काम काय,  गावात जायचं, मित्र मंडळींना भेटायच, गप्पा गोष्टी करा घरी येऊन काही शेतीच्या कामात मदत करा. बस दुसरं काम काय. 

असच एकदा डोक्याचे केस वाढले होते म्हणून केस कापण्यासाठी केश कर्तनालयात बसलो होतो. तिथं माझा अकरावीत असतानाच जुना मित्र भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पाच्या नादात नोकरीचा विषय निघाला. अन ओघा-ओघानं तू कुठं नोकरी करतोस, मी कुठं नोकरी करतो यावर चर्चा रंगात आली असताना, 

‘अरे यावर्षी आमच्या मुंबई महापालिकेत भरती आहे. तू अर्ज केलास काय? मित्राने प्रश्न केला.’

‘ मी नाही म्हणालो.’

‘अरे रे काय माणूस आहेस. मुंबईत राहतो आणि मुंबईची माहिती नाही.’ बिचारा मित्राने हळहळ व्यक्त केली. त्याच्या मनात काही तरी शिजत आहे हे मला जाणवत होतं. 

केस कापुन झाल्यावर मित्र म्हणाला 

‘तू आता माझ्या बरोबर आमच्या घरी चल. 

‘मी म्हटलं कशाला आता संध्याकाळ झाली. तुझ्या घरी आल्यावर मला माझ्या घरी जायला रात्र होईल.’ 

नाही हो करता करता मित्र म्हणाला. 

‘तुला एक सांगू का? काय झालंय माझ्या मोठ्या बंधूने त्याच्या बायकोसाठी म्हणजे माझ्या वहिनीसाठी मुंबई महापालिकेचा भरतीचा फार्म आणला आहे, पण भरला नाही. तो असाच वाया जाणार त्याचा वापर तू कर काय? आणि शेतात ऊस तोडणी सुरु आहे. तर, ऊस पण खाऊन होईल आणि तुझी फार्मसाठी मुंबईची चक्कर वाचेल. चल चल आता वेळ नको कधी दवडू नकोस.’

मित्राच्या घरी गेलो. शेतात बसून ऊसावर चांगला ताव मारला. नंतर फॉर्म घेऊन गावातच एका शिक्षकाकडून छान भरून घेतला. तसाच घरी न आणता पोस्टाच्या पेटित टाकला. 

 उन्हाळ्याची सुट्टी संपली जो तो आपापल्या शाळेत रुजू झाले. दिवस मजेत जात होते. आता काही चिंता नव्हती. त्यांतर पावसाळ्याचे दिवस ही मजेत गेले. सहामाही परीक्षा झाली. दिवाळीची सुट्टी म्हणून सर्व आपापल्या घरी गेली. आणि याच दिवाळीच्या सुट्टीत मला मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात मुलाखतीसाठीचे पत्र आले. 

आता बदलापूर सोडून घाटकोपरला राहत होतो तिथं हे पत्र येऊन पडलं. आता आपणास कोड पडलं अडेल मी घाटकोपरला कसा तर, एक वर्षभर बदलापुरला राहून नोकरी केली अधिक वाद वाढू नये म्हणून मी, माझी सोय माझ्या एका नातेवाईक कुटुंबाकडे करून घेतली होती. त्यामुळे सध्या मी, घाटकोपर ते कळवा असा प्रवास करीत होतो. तर सांगायचं मुद्दा असा की, मुंबई शिक्षण विभागाचे पत्र आले, पण ते आमच्या नातेवाईक माणसांनी कुठं ठेवल हेच त्यांना आठवेना. आता ते तर नेमकं काय होत तेही कळेना झाली का पुन्हा पंचायत. 

    दिवाळीची सुट्टी संपली होती. म्हणून एक दिवस लवकर मुंबईस आलो. त्यात हे पत्र आल्याचं कळलं. बरं पत्र आलं इतपर्यंत ठीक पण ते पत्र कुठं ठेवलं ते कोणासलाच सांगता येईना. मग काय दिवाळी अगोदर केली सफाई पत्राच्या निमित्ताने पुन्हा सुरु झाली. रात्री बारा एक वाजेपर्यंत वस्तूंची हलवा हळवं करताना एका जुन्या पत्र्याच्या कपटाखाली बंद पाकीट सापडलं. पाहतो तर काय? मुंबई शिक्षण विभागाचे मुलाखतीसाठी बोलावणं आलेलं, आणि ते ही लगेच म्हणजे परवा. म्हणजे एक दिवस शाळेत आणि दुसरा दिवस मुलाखतीचा आता रजा कशी मिळणार बरं पुन्हा गोची झाली. आता पुन्हा तेच शाळेत सांगावं कसं ही नोकरी तर कायम स्वरूपी होती. मग सोडायची का? तर त्यावेळीं मुंबई महानगरपालिकेत पगार इथल्या पेक्षा जास्त होता. आणि आपलं विषय पूर्ण वेळा शिकविण्यासाठी तिथं मिळणार होता. त्याचे आणखी जमेची बाजू म्हणजे प्रवास वाचणार होता. इथं मी एकटाच कला शिक्षक होतो तर तिथं हजारोने कला शिक्षक काम करीत होते. आपल्या कलेला उत्तेजन मिळेल ही भावना मनात घर करू होतीच. आणि अनेकांनी मधल्या काळात तसे मला सांगितले ही होते. या उत्सुकते पोटी मी, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात नोकरी करावी असे मनात ठरवले होते. आता चालून आलेली संधीं कशी सोडणार. त्यासाठी विशेष असे काही प्रयत्न करावे लागणार नव्हते. फक्त मुलाखत देऊन आपली कागद पत्रे देणे एव्हढेच काम होते. आणि मला सहज शक्य होतं. मी, एक दिवस शाळेत गेलो. आणि दुसऱ्या दिवशी मुलाखतीसाठी गेलो. त्यात माझे सिलेक्शन झाले., आणि १ डिसेंबर १९७७ पासून मी, मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कला विभागात कला अध्यापक म्हणून सेवेत रुजू झालो.

अशा रितीने पुन्हा कळवा हायस्कुल सोडून मी, मुंबई मनपा शिक्षण विभागात कला अध्यापक म्हणून सेवेत रुजू झालो. आणि ३८ वर्षे सात महिने सेवा करून ३० जून २०१३ रोजी सेवानिवृत्त झालो. सेवा काळात मला मनपाचे अनेक छोटे मोठे मन सन्मान प्राप्त झाले. तसेच माझ्या शैक्षणिक कामामुळे मुंबई महापालिकेच्या कला विभागाचे नाव जागतिकस्तरावर पोहचले याचा मला विशेष आनंद आहे. विशेष म्हणजे मी ज्या हालकीत शिक्षण घेतले त्याच परिस्थितीशी सामना करीत अनेक गरीब पालकांची मुल मनपा शाळेत शिकतात त्यांच्यात मी अधिक रममाण झालो. या निरागस मुलां-माणसात मला सेवा करायला मिळाली त्यामुळे मला माझे जग अधिक जवळून न्याहळत आले. याचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. आपले जीवन एका रंगभूमीवरच्या क्लाकारासारखे असते. रंग भूमी वरचा नट जसा आपली भूमिक पात्रवाईज बदलतो तस आपल्याला बदलावं लागते. आणि समोर येईल त्या परिस्थितीशी तसं जुळवून घ्यावं लागतं. तर आणि तरच आपण यशस्वी होतो हे मात्र नक्की...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama