झपाटलेले घर - भाग ९
झपाटलेले घर - भाग ९
राधिका विद्यार्थी संसदेत सचिव झाली. मात्र सुजीत आपला अभ्यास सांभाळून राधिकेचेही काम करायला मदत करत होता. राजकारण्याची मुलगी, एकटीच महिला प्रतिनिधी कॉलेज मध्ये निवडून आलेली, त्या मुळे राधिकेचा चांगलाच भाव वाढला होता. तिच्याकडे मुला मुलींची वर्दळ वाढली होती. कुणाचे काम करण्या सारखे आहे? ते कसे करून घ्यायचे? या अशा गोष्टीं साठी ती सुजीतचा सल्ला घेऊ लागली. कॉलेज मधील आपली काही कामे करून घेण्या साठी सुजीत कडेच जाणे विद्यार्थ्यांना सोपे वाटू लागले.
विद्यार्थी विद्यार्थिनींचा सुजीत भोवती गराडा बघून रमेश मनात खुश झाला. मनात असूनही राधिके सोबत जवळीक साधायला सुजीतमुळे जमत नव्हते. सुजीत जसा गराड्यात गुंतू लागला तसे रमेशने राधिकेसोबत जवळीक साधायला सुरुवात केली. छोटेमोठे कारण काढून तो तिच्या आजूबाजूला राहू लागला, संवाद साधू लागला. सुजीत जास्तीत जास्त गुंतून राहावा यासाठी त्याने गीताला, त्याच्या मैत्रिणीला साधन बनवले. गीता सुजीतच्या जवळ जवळ राहू लागली.
"सुजीत, थोडा वेळ आहे का? मला थोडंस बोलायचं होतं." सुजीतला एकटे गाठून गीता म्हणाली.
"बोल ना. काही काम आहे का राधिकेकडे? असेल तर सांग. करण्यायोग्य असेल तर लगेच करायला सांगतो तिला." सुजीत निरागस मनाने बोलला.
"तिच्याकडे नाही. माझे तुझ्याकडेच काम आहे. करशील?" गीता नजरेत नजर मिळवत रोखून म्हणाली आणि मधाळ हसली.
तिच्या नजरेतल्या मादकतेला नजरअंदाज करत तो म्हणाला, "मी खाजगी काम करायला इथला वेळ वापरत नाही. कॉलेजचा अभ्यासही असतो मला. तो सोडून इतर कामात घालवायला वेळ शिल्लक नाही माझ्या कडे. राधिकेकडे काम असल्यास सांग, लगेच करायला सांगतो."
"असं रे काय करतोस? कॉलेजचे दिवस काय असे केवळ अभ्यास करण्यासाठी असतात का?" अतिशय लडिवाळ मुरका घेत गीता म्हणाली.
"मग कशासाठी असतात?" तिच्या लाडिक मुरक्यातला मादक भाव कळूनही शक्य तितकी निरागसता दाखवत सुजीत विचारता झाला .
"तेही मीच सांगू का? अरे, काही मजाही करशील की नाही? जीवनात आनंद घेण्यासाठी एका सुंदर जोडीदाराची गरज असते म्हटलं." तिचा लाडिकपणा आणखीच वाढला.
"माझा जोडीदार मी निवडलेला आहे. त्याची चिंता तू कशाला करतेस? माझे मी बघून घेईल." सुजीत आपल्या ठिकाणी ठाम होता.
"राधिके संदर्भात बोलतोस ना? तिचे वडील, आबा तिचा हात तुझ्या हातात देतील असे वाटते तुला? गावातील नंबर एकची धनाढ्य आसामी. त्यांच्या एकुलत्या एक मुली साठी तोला मोलाचा जावई बघतील. मी सारी चौकशी केलीय. ते तर त्यांच्या बरोबरीच्या श्रीमंत तरुणाला शोधत फिरत आहेत. अशी खात्रीशीर माहिती माझ्याकडे आहे. माझा जीव तुझ्यात घुटमळतो आहे. तुझ्या सारखा हँडसम जोडीदार मिळाला तर या जीवाचेही सोने होईल. किती छानशी जोडी जमेल आपली? याचा कधी तरी विचार केलास? विचार करून बघ जरा. येते मी." असे म्हणत लटक्या रागात पाय आपटत गीता निघून गेली. ती गेली आणि सुजीतने आपले डोके पुस्तकात घातले.
सुजीत पुस्तक वाचत होता पण अक्षर स्पष्ट दिसतच नव्हते. राहून राहून गीताचे शब्द त्याला डिवचत होते. 'खरंच गीता म्हणते तसे तर होणार नाही ना? आबा देतील राधिकेचा हात आपल्या हाती? की तोलामोलाचा जावई शोधतील? गीताने आपल्या विषयी बरीच माहिती गोळा केलेली दिसतेय. तिचे मन आपल्यावर जडलेले दिसतेय. तिला असे नाराज करून नाही चालायचं. तिची समजूत घातलीच पाहिजे.' असा विचार करत तो मन पुस्तकात लावण्याचा प्रयत्न करत होता.
_'काय हरकत आहे थोडीशी मौजमजा केली तर? गीता फार काही वाईट नाही. दिसायला ती सुंदर आहे, बोलायलाही मनमोकळी आहे, तिने स्वतःहून ऑफर केलीय. काही काळ, काही क्षण तिच्या सहवासात घालवलेत तर काय मोठा डोंगर कोसळणार आहे?'_ तारुण्य सुलभ भावनेने त्याचे मन गीताच्या सभोवती गिरक्या घेऊ लागले होते. दुसऱ्या दिवशी थोडा का होईना तिला वेळ द्यायचे निश्चित करूनच तो निवांत झोपू शकला.
इकडे रमेश राधिके सोबत जवळीक साधण्या साठी सुजितला तिच्या पासून दूर नेण्याची दिलेली कामगिरी गीता कशी पार पाडते, यावर बारकाईने लक्ष ठेऊन होता. गीताने सुजीतची भेट घेतल्याचे तिने त्याला सांगितले, तसा तो खूप खुश झाला होता.
"काय म्हणाला मग सुजीत?" गीताला भेटीचा वृत्तांत विचारत त्याने प्रश्न केला.
"अरे, जरा अवघडच वाटतंय हे प्रकरण. लई जुनाट, बुरसटलेल्या विचारांचा पगडा दिसतो त्याच्या मनावर. कॉलेज मध्ये फक्त अभ्यासच करायला पाहिजे म्हणत होता. मला तर अवघड कामगिरी वाटत्येय ही." गीता सांगत होती.
"अगं, काळजी करु नकोस, तुझ्या सारख्या स्त्री सौंदर्याला विश्वमित्रा सारखे भले भले तत्वज्ञ, तपस्वी भुलले, तिथे या सुजीतची काय बिशाद? त्याच्या तारुण्य सुलभ भावना त्याला तुझा विचार करायला नक्कीच लावील." रमेशने असे म्हणताच गीताने एक लाडिक मुरका मारत विचारले,
"खरंच एवढी सुंदर दिसते मी?"
"अगं, रंभा, उर्वशी सारख्या अप्सराही फिक्या पडतील तुझ्या समोर. समजलीस काय स्वतःला तू? हा रमेश अशा तशा सौंदर्यावर भाळेल असं कसं वाटलं तुला?" रमेश गीताला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होता. गीताला समजत नव्हते अशातला भाग नव्हता, पण समजूनही उगाच निरागस भाव दाखवत तीही रमेशला झुलवत होती. तिचे अंतर्मन सुजीतच्या शब्दांनी प्रभावित झाले होते.
' _सुजीत रूपाने जसा सुंदर तसाच विचारांनीही सुंदर आहे. संसाराचा सारीपाट मांडण्या करिता सुजीत सारखा दुसरा जोडीदार शोधून सापडणार नाही. काही तरी करून त्याला राधिके पासून दूर करावंच लागेल. रमेशने अगदीच योग्य कामगिरी सोपवलीय आपल्यावर. गुरुची विद्या गुरूलाच शिकवावी लागेल, असं दिसतंय'._ गीता विचार करत होती.
रमेश, सुजीत, गीता या तिघांच्याही विचारांचा केंद्रबिंदू असलेली राधिका मात्र वेगळ्याच विश्वात रममाण झालेली होती. आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेल्या विद्यार्थी संसदेच्या यशाने ती फुलून गेलेली होती. अभ्यास, करियर इत्यादी पेक्षा तिला राजकारण जवळचं वाटायला लागलं होतं. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींची समस्या सोडवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होती. त्यातच ती आनंद अनुभवत होती. त्यामुळे आजू बाजूला आपल्या विषयी काय काय शिजतंय याची तिला अजिबात चिंता वाटंत नव्हती. लग्न, संसार हे विषय चुकूनही तिच्या डोक्यात शिरत नव्हते. तिच्या डोक्यात एकच होते, राजकारणात आपण रमेश मुळे टिकून आहोत, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन राजकारणात पाया भक्कम करायचा. त्यासाठी त्याला जास्तीतजास्त काळ जवळ ठेवायचे, त्याला खुश ठेवायचे. तिने आता राजकारणातले संभाषण कौशल्य चांगलेच आत्मसात केले होते. त्यात स्त्रीसुलभ मितभाषी स्वभावाचाही उपयोग होत होता.
जगात प्रत्येक जण समोर आलेल्या घटनेला लाभदायी करून घेण्याचाच विचार करत असतो, नाही का? त्याला राधिका, रमेश, गीता, सुजीत हे तरी कसे अपवाद ठरतील?
(क्रमशः)

