Pandit Warade

Drama

4  

Pandit Warade

Drama

झपाटलेले घर - भाग-७

झपाटलेले घर - भाग-७

5 mins
238


भाग-७


  रामरावांच्या वाड्यासमोर भव्य मंडप टाकलेला होता. एका मोठ्या पातेल्यात इलायची, सुंठ, मीरे, मसाला टाकून घट्ट दुधाचा चहा उकळत होता. बाजूलाच एका मोठ्या चुलीवर कढईमध्ये पोहे परतवले जात होते, तर दुसऱ्या पातेल्यात कढीला कढ येत होता. जो आला त्याच्या हातात पोह्याची प्लेट कढी टाकून दिली जायची. कढी पोहे झाले की, कपभर चहा सेवेसाठी हजरच. परत जाताना प्रत्येकाच्या हातात प्लास्टिकचा *हत्ती* देऊन चिन्ह लक्षात ठेवायची आठवण करून दिली जायची. 


   इकडे आबांकडेही अशाच प्रकारची धामधूम होती. मंडप शामियाना, चहापान सारे काही सुरू होते. मात्र आबांनी या वेळेस नवीन युक्ती शोधून काढली होती. त्यांच्या मळ्यातल्या वाड्यासमोर मोठ्या चुल्ह्यावर एका मोठ्या पातेल्यात मटण शिजत होते. त्याच्या खमंग वासाने सारा परिसर धुंद झाला होता. गावातून ज्वारीच्या भाकरीचे डालगे भरून आणले जात होते. या साऱ्यांच्या जोडीला देशी विदेशीचे बॉक्सच्या बॉक्स रिकामे होत होते. या वासाने कदाचित आजू बाजूच्या भुतांनाही इथे यावेसे वाटत असेल, परंतु इथल्या भुतांच्या समोर यायला त्यांना भीती वाटत असेल. 


  सर्व गावाला मेजवानी मिळत होती. बाकी सर्व निवडणूक बिनविरोध होत असतांना या एकाच जागेसाठी दोन्ही तगडे उमेदवार एकमेकांसमोर होते. गुलाबराव, माणिकराव, बाजीराव इत्यादी सर्व कार्यकर्त्यांनी समेटाचे केलेले प्रयत्न विफल झाले होते, कुणीही माघार घ्यायला तयार नव्हते. बिनविरोध निवडणुकीमुळे शासनाकडून येणाऱ्या मोठ्या रकमेवर गावाला पाणी सोडावे लागले होते. त्या मुळे चिडलेले या वॉर्डातील आणि इतर वॉर्डा तील लोकंसुद्धा दोघांनाही जास्तीत जास्त खर्चात घालण्याचा प्रयत्न करत होते. सारेच जण _*'आम्ही तुमचेच'*_ म्हणत दोघांनाही आश्वासन देत हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते, खर्च करायला भाग पाडत होते. 


   गल्लीगल्लीत प्रत्येक लहान मुलांच्या हातात रामरावांचे *हत्ती* खेळत होते, तर शामरावांची *छत्री* रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जेवण करून घरी जाणाऱ्यांच्या डोक्यावर सावली धरत होती. कुणाचा कल कुणाकडे आहे, काहीच कळत नव्हते. प्रचार थंडावला. मात्र खरे काम तर याच रात्री झाले. दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांची नजर चुकवून एका एका गल्लीत गुपचूप दारूच्या बाटल्या आणि दरडोई ठरलेली रक्कम देऊन येत होते. घेणारेही घेत होते, त्यांना माहीत होते, हीच वेळ आहे लाभ करून घ्यायची नंतर पाच वर्षे हे आपल्या हाती लागणार नाहीत. त्याचा परिणाम काय होणार? हे निकालाच्या दिवशीच कळणार होते. तोपर्यंत दोघेही आपापल्या कार्यकर्त्यांच्या सोबत बसून शाळेत कधीच न केलेल्या गणिताचा अभ्यास करत होते.


   मतदानाच्या दिवशी तर या वॉर्डात अतिशय धामधूम सुरू होती. घरातून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी दोन्ही उमेदवरांच्या पाच पाच रिक्षा धावत होत्या. परंतु मतदारांनी एकाही रिक्षाची मदत स्वीकारली नाही. ते स्वतःच्या पायाने चालत जाऊन मतदान करून येत होते. उमेदवार किंवा त्याचा कुणी कार्यकर्ते भेटलेच तर, 'तुम्हालाच तर केलं मतदान'. असे सांगून वेळ मारून नेत होते. त्यामुळे आबांच्या आणि बापूंच्या गोटात काळजी दिसत होती. दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी झाडून पुसून साऱ्या मतदारांना मतदाना साठी बाहेर काढून मतदान करवून घेतले. लोकांनीही उत्साहाने मतदान केले. त्या दोघांचेही भवितव्य मतपेटीत सील केले, जीव झुरणीला लावला.


    गेल्या चार दिवसाची अस्वस्थता आज थांबणार होती. दोहोंपैकी एक जण हसणार होता तर दुसरा रडणार होता. एकाची जीत होणार होती तर दुसऱ्याची हार. आज एकदाचा सोक्षमोक्ष लागणार होता. म्हणूनच आबा आणि बापू दोघेही तहसीलच्या गावाला आपापल्या कार्यकर्त्यां सहित हजर झाले होते. इकडे गावात आबांच्या मंडपात तरुण कार्यकर्त्यां सोबत सुजीत आणि राधिका तर बापूंच्या तंबूत रमेश त्याच्या काही तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक एक तासाला येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेऊन होते. येणाऱ्या बातमी बरोबर गुलाल उधळला जात होता, फक्त कधी इकडे तर कधी तिकडे एवढाच फरक होता. प्रत्येक फेरी चुरशीची होत होती. एकदा बापू तर एकदा आबा आघाडी घेत होते. शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये लागोपाठ आबांची आघाडी वाढत गेली. बापूंना ही आघाडी तोडणे अशक्य झाले आणि अवघ्या अकरा मतांची आघाडी घेऊन आबा विजयी झाले. मतमोजणी अधिकाऱ्यांनी विजयाची घोषणा केली आणि प्रमाणपत्र दिले.आबांनी लगेच फोन करून घरी कळवले. आबांच्या तंबूत उत्साहाला उधाण आले. आबा, बापू घरी येईपर्यंत ढोल ताशांची व्यवस्था झाली. गुलाल आणलेलाच होता. फटाके, पेढे, हार, तुरे मागवले गेले. आता फक्त आबांच्या यायचा अवकाश होता.


   इकडे बापूंच्या वाड्यावर अवकळा पसरली होती. एकेका घराचा विचार करत होते की, 'कोण कोणत्या घरांनी आपल्याला मदत केली?, कुणी धोका दिला?' हे तर होणारच होते. कुणी हसणार होते तर रडणारच होते. 


   तालुक्याहून घरी यायला आबा, बापूंना बराच उशीर झाला. आल्यावर दोन्हीकडे जमलेल्या कार्यकर्त्यांनी आबांकडे निकालाची विचारपूस केली. सर्व जण प्रत्येक फेरीतले मतदान विचारत होते. कोणत्या फेरीत कोण किती आघाडीवर होते? कोणत्या कोपऱ्यातले किती मतं पडले? याची चवीने चर्चा चालू होती. उद्या चांगलीच जंगी मिरवणूक काढायची, ढोल, ताशे, लेझीम पथक, मोटार सायकली, इत्यादीं सहित मिरवणूक काढायची. बापुची चांगलीच जिरवायची. असे ठरवून उशिराने सर्वजण झोपले.


   दहा दहाच्या दोन रांगांमध्ये मोटर सायकलची रॅली, पाठीमागे ढोल, ताशांचा गजर, रणशिंगे इत्यादी वाद्ये गर्जना करत होते. त्यामागे लेझीम पथक आपली कला दाखवत होते. या सर्वांच्या मागे एका छानपैकी सजवलेल्या बैल गाडीत आबा फेटा बांधून, नवीन पायजमा कुर्ता घालून, उभे दिसत होते. त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांचे खंदे समर्थक उभे होते. मागे राधिका आणि सुजीत सुद्धा गाडीत होते. मोठ्या उत्साहात मिरववणूक हळू हळू पुढे सरकत होती.


   मिरवणूक वाजत गाजत पुढे पुढे जात होती. प्रत्येक घरासमोर मिरवणूक थांबायची. आबा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत गाडीतून खाली उतरायचे, घरात जायचे, तेथील वडीलधाऱ्या मंडळींच्या पायावर झुकून नमस्कार करायचे. त्यांचा आशीर्वाद घ्यायचे. आबांच्या पाठोपाठ राधिका सुजीतही घरात शिरून पायावर डोके टेकवत जात होते. म्हाताऱ्या बायकां कडून आबांपेक्षा या जोडीला मना पासून आशीर्वाद मिळत होता. म्हाताऱ्या म्हणत होत्या, 


   "आबा, जोडी लय झ्याक दिसतीया बघा. आक्सी लक्षुमी नारायणावाणी दिसत्यात दोघं. लवकर बाशिंग बांधाया पाह्यजे. सुखानं नांदा लेकरायनो." असं म्हणत एखादी म्हातारी राधिकेच्या डोक्यावरून हात फिरवून कडाडून आपली बोटे आपल्या डोक्यावर मोडत होती. तेव्हा मात्र राधिका लाजून लालेलाल व्हायची. जवळपास सर्वच घरात आबांपेक्षा या जोडीलाच जास्त आशीर्वाद मिळत होता. राधिका लाजायची परंतु मनातुन खुश व्हायची. 


   मिरवणूक बापूंच्या घरीही आली. आबा गाडीतून उतरले आणि बापूंकडे गेले. दोन पारंपरिक विरोधक एकमेकांच्या गळ्यात गळा घालून भेट घेत होते. राधिका सुजीतही खाली उतरले, त्यांनी रमेशच्या आईच्या, सारजाबाईच्या पायावर डोके टेकवले. "सुखाचा संसार करा लेकरांनो" असं म्हणत त्यांच्याच हातातल्या पेढ्याचा बॉक्स मधून पेढा उचलून त्यांच्या तोंडात घालत सारजाबाई उद्गारल्या. तेव्हा मात्र रमेश खूप जळफळाट झाला. आईकडे रागाचा कटाक्ष टाकत तो तिथून निघून गेला. 


   *पुढे काय होईल? जोडीचा संसार फुलतो? रमेशचा जळफळाट तळतळाटात बदलतो? आबा-बापूंची हात मिळवणी होते की परंपरा सुरूच राहते? काय होईल बघूया पुढच्या भागात. या वेळेस जरा जास्तच उशीर झाला. आता लवकरात लवकर पुढचा भाग टाकण्याचा प्रयत्न करीन.*



*क्रमशः*........


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama