झपाटलेले घर - भाग १०
झपाटलेले घर - भाग १०
पावसाळ्याचे दिवस असूनही कॉलेजमधले वातावरण अगदीच तापलेले होते. कारणही तसेच होते, आज प्रथमतःच सचिव पदावरच्या व्यक्तीने आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली होती. परंपरेने चालत आलेल्या काही गोष्टी बदलून घटनेच्या चौकटीत असलेले सचिव पदाचे अधिकार, हक्क वापरायचे राधिकेने ठरवले होते. निमित्त होते, सहलीला जायचे, सहलीचे ठिकाण ठरवायचे. आजवर अध्यक्ष सांगायचे त्या ठिकाणी जायचे, अध्यक्ष सांगेल ते ठरवायचे. अध्यक्षांच्या मना प्रमाणे सचिवा कडून प्रस्ताव लिहून घेऊन तो पास करून घ्यायचा. आज प्रथमतःच अध्यक्षांच्या मनाविरुद्ध राधिकेने बंड पुकारले होते. त्यामुळे अध्यक्षांचा इगो दुखावला गेला होता. त्यांनी मग सचिवांच्या निलंबनाची कारवाई करायचे ठरविले, पण राधिका काही कच्च्या गुरुची शिष्या नव्हती, वडील राजकारणी असल्या मुळे बालपणा पासूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेले होते. तिनेही अविश्वास ठरावाचे शस्त्र बाहेर काढले. _'सचिव पदावर एक महिला आहे, आणि तिचे सर्वांशी संबंध चांगले आहे, त्यामुळे ठराव आपल्या विरोधात जाऊ शकतो'._ हे सर्व माहीत असल्या मुळेच अध्यक्षांना माघार घेऊन राधिकेच्या त्या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागली होती.
राधिकेचा प्रस्ताव मान्य झाला. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघायला जायचे ठरले. तिच्या बाजू कडील मित्र मैत्रिणी खुश झाले. त्यांनी कॉलेजच्या सभागृहात चांगलाच जल्लोष केला. नाच गाणेही झाले. राधिकेने पार्टी दिली.
सहलीचा दिवस उजाडला. सहलीला जाणारे सर्व जण सकाळी लवकरच सभागृहात जमा झाले. दोन बस मधून सर्व जण जाणार होते. एक बस राधिकेच्या नेतृत्वात जाणार, तिला रमेश मदत करणार आणि दुसरी बस सांभाळण्याची जबाबदारी सुजीत कडे सोपवली गेली. ठरल्या प्रमाणे सकाळी साडेसात वाजता बसेस निघाल्या. रमेशने मनोमन ठरवल्या प्रमाणे गीता सुजीतच्या गाडीत आणि रमेश राधिकेच्या गाडीत, अशी व्यवस्था झाली होती. बस निघाल्या. मुलामुलींनी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी गाण्याच्या भेंड्या, अंताक्षरी खेळायला सुरुवात केली.
सुजीतच्या गाडीत सोबत करत असलेली गीता अगदी निवांतपणे सुजीतच्या शेजारी बसलेली होती. एक तरुणी शेजारी असूनही सुजीत मात्र शांत बसून होता. खूप काही इच्छा असूनही गीता मागच्या अनुभवामुळे बोलत नव्हती. तर इतर मुले, मुली काय म्हणतील या विचारांनी सुजीत बोलत नव्हता. दोघेही वरवर शांत वाटत असले तरी आत मात्र खळबळ माजलेली होती. शेवटी सर्वजण गाण्याच्या खेळात रमलेले बघून सुजीतनेच बोलायला सुरुवात केली,
"माफ कर गीता, त्या दिवशी जरा फटकूनच बोललो तुला मी. काय करू? लोक अपवादाला भ्यावेच लागते ना. आणि ध्यानी मनी नसतांना अचानक पणे आलेली तुझी ही ऑफर स्वीकारायला मनाची तयारी तरी कशी व्हावी?"
"अरे, असू दे. तुझा हाच सडेतोडपणा मनाला भावला माझ्या. या वयात मनाला कमलपत्रवत निर्लेप ठेवणं काही एवढं सोपं नाही. ते तू साध्य केलंस. माझं मलाच खूप वाईट वाटलं त्या दिवशी. वाटलं, उगाच एका ध्येयनिष्ठ तरुणाच्या ध्येय मार्गात अडथळा बनू पहात आहोत की काय? रात्रभर झोपू शकले नाही मी त्या दिवशी. पुन्हा पुन्हा तुझे बोलणे कानात घुमत होते. एका ऋषितुल्य माणसाच्या साधनेत बाधा आणण्याचे पातक घडणार होते माझ्या हातून. म्हणूनच निघून गेले होते तेथून." गीता खरे किती अन लटके किती बोलत होती हे केवळ आणि केवळ तिचे तिलाच माहीत होते.
"अगं, तुझ्या सारखी मेनका समोर आल्यावर विश्वमित्रां सारख्या ऋषींचा तपोभंग होतो तर मी काय एक सामान्य खेडेगावातून आलेला तरुण. कुटुंबातील संस्कारांमुळे मी तसा वागलो." सुजीत सांगत होता, गीता ऐकत होती आणि आणखीच प्रभावित होत होती.
गाड्या चौका घाटात आल्यावर म्हसोबा देवस्थाना जवळ नाश्त्या साठी थांबल्या. जोरदार पाऊस पडून गेलेला, त्या मुळे तेथील हिरव्यागार, झाडी वेलींनी, विविधरंगी,गंध सुगंधी फुलांनी नटलेल्या डोंगरा वरून कोसळणारे पाण्याचे प्रवाह, सकाळच्या कोवळ्या उन्हात आल्हाद दायक दिसत होते. मध्येच दाट अशा झाडीतून येणारा मोरांचा आवाज, झऱ्याच्या पाण्याचा खळखळाट, कोल्ह्यांची कोल्हेकुई, चिमण्यांचा चिवचिवाट, हे सर्व निसर्ग संगीत मनाला मोहित करत होते. कुणाच्या आतला चित्रकार, कवी, लेखक, जागा होऊन निसर्ग संगीताचा आस्वाद घेऊ पहात होता. सर्वांनी सोबत आणलेल्या कांदा पोह्याचा आस्वाद घेत निसर्ग सौंदर्याचे रसपान केले, पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला.
"राधिका, आपण बाजी जिंकलो. मी तर खूप खुश झालोय आज." रमेश राधिके जवळ येण्याचे निमित्त शोधत बोलला.
"हे सारे केवळ तुझ्या मुळेच शक्य झाले. तू माझ्या बाजूने, माझ्या पाठीशी उभा राहिलास म्हणून मलाही बळ मिळाले. अशीच साथ नेहमी साठी मिळाली तर? किती छान होईल?" राधिका त्याला खुश करत बोलली.
"अगं, तुझी इच्छा असेल तर आपण नेहमी साठीच एकत्र राहू. आपली दोघांची शक्ती एकत्र झाली तर आपण आपल्या गावाचा पण चांगला विकास करू." रमेशने भविष्याचे स्वप्न दाखवले.
"बघूया! भविष्यात आपल्या हातून काय काय घडते ते. खूप काही आहे मनात पण ते पूर्णत्वास जाईल तेव्हा खरे. आपण एकत्रपणे काम केले तर नक्कीच चांगले काही तरी घडू शकेल. आशावादी असायला काय हरकत आहे." राधिकाही त्याला नाराज न करता गोलमाल बोलत होती.
सिल्लोड, गोळेगाव ओलांडून व्ह्यू पॉईंटच्या जवळ आल्यावर बसेस थांबवल्या. हसत खेळत सर्वजण खाली उतरले. व्ह्यू पॉईंट वरून एखाद्या अल्लड बलिके प्रमाणे उंडारणारा वाघिरा नदीचा खळखळता प्रवाह बघितला. अजिंठ्याचे डोंगर, डोंगरातील लेण्यांच्या प्रतिकृती बघितल्या. चहा, नाश्ता घेऊन बसेस पुन्हा मार्गस्थ झाल्या.
लेणीच्या काही ठराविक अंतरावर असलेल्या स्थानकात बस थांबल्या, सर्वजण खाली उतरले. येथून पुढे पुरातत्व खात्याच्या विशेष बसेसनेच जावे लागणार होते. सारेच लेणी कडे जाणाऱ्या विशेष बसेस मध्ये बसून लेण्या बघायला गेले.
जागतिक वारसास्थान असलेल्या अजिंठा लेण्या पाहतांना सर्वजण अगदीच मंत्रमुग्ध झाले होते. भगवान गौतम बुद्धांच्या पूर्व जन्मावर आधारित कथा सांगणारे कोरीव शिल्प असलेल्या पहिल्या लेणीत बुद्धाच्या विविध मुद्रा, दरबार, पद्मपाणी इ. चित्रे कोरलेली दिसतात. बुद्धांची आई महामाया शुद्धोधनास स्वप्न सांगत असलेले दृश्य असलेली दुसरी लेणी बघितली. तर नवव्या लेणीतील चैत्या मध्ये कोरलेला अर्ध वर्तुळाकार स्तूप, दहाव्या लेणीत धम्म लिपीत कोरलेले पाली भाषेतील लेख बघत सर्वजण आनंद घेत होते.
१६ क्रमांकाच्या लेणीत बुद्धांच्या जीवनातील घटनांसोबत कथक्कली नृत्याचे दृश्येही चित्रित केलेली आहेत. भगवान गौतमांच्या जीवनातील प्रसंग, राहुल आणि यशोधरेकडे भिक्षा मागत असलेला प्रसंग, १७ नंबरच्या लेणीत बघितले. एका नंतर एक सर्व लेण्या पाहून सर्व मंडळी परत त्यांच्या बसेसकडे आले. कोरीव शिल्पावर चर्चा करत सारे बसमध्ये आपापल्या जागेवर बसले. आणि बसेस परतीच्या मार्गावर निघाल्या.
अजिंठा गाव आल्यावर कुणाला तरी पारोच्या समाधीची आठवण झाली आणि गाड्या पुन्हा एकदा थांबल्या. गावातील एका व्यक्तीला सोबत घेऊन ही मंडळी पारोच्या समाधी जवळ आली. पोलीस स्टेशनच्या जवळच एका दुर्लक्षित जागेवर एक थडगे बांधलेले होते, ज्यावर लिहिलेले होते,
*टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो व्हू डाईड २३ मे १८५६.*
"हीच ती *पारोची समाधी*." थडग्याकडे बोट दाखवत गावातील व्यक्ती सांगू लागली, "आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून *अजिंठा लेण्यांना* जगासमोर मांडणारा चित्रकार *रॉबर्ट गिल* याला लेणीच्या आरेखनासाठी ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पाठवले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतांना रॉबर्ट गिलची ओळख स्थानिक आदिवासी तरुणी *पारो* सोबत झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. बहुतेक हे जगातील पहिलेच आंतरराष्ट्रीय प्रेम प्रकरण असावे. अजिंठा गावातून लेणी परिसरात जाऊन लेण्यांचे चित्र तयार करणे त्या काळी फार जिकिरीचे आणि मेहनतीचे असे काम होते. घनदाट जंगल, रानटी पशूंचा वावर, डोंगर, दऱ्या, काट्याकुट्यांचा रस्ता, अपुरी साधन संपत्ती या मुळे एक एक चित्र तयार व्हायला महिनो न महिने लागायचे. रॉबर्ट गिलला चित्र निर्मितीच्या कामात पारोची खूप मदत झाली. देश, धर्म, जात, समाज परंपरा, या सर्वांची बंधने झुगारून पारो रॉबर्टला जीव तोडून मदत करत होती. १८४५ ते १८५६ या जेमतेम अकरा वर्षाच्या *रॉबर्ट-पारो* च्या प्रेम कहाणीचा शेवट मात्र दुःखद झाला. त्या काळी भारतात आलेल्या प्लेगच्या साथीने पारोला रॉबर्ट पासून अलग केले. तो काळा दिवस होता, २३ मे १८५६. रॉबर्ट अतिशय दुःखी झाला. तिच्या प्रेमा खातर त्याने तिची समाधी बांधली आणि आपल्या प्रेम कहाणीला अमर केले." गावातील व्यक्ती सांगत होती आणि सर्वजण स्तब्ध होऊन ऐकत होते.
_*'प्रेम असावे तर असे'*_ दगडात कोरलेल्या लेणी प्रमाणेच प्रत्येकाच्या हृदयात ही प्रेमकथा कोरली गेली होती. रमेश- राधिका, सुजीत-गीता, तसेच सहलीच्या दिवस भराच्या सहवासात एकत्र आलेल्या अनेक जोडप्यांची अवस्था जवळपास सारखीच होती. सारे भारावलेल्या अंतःकरणाने आपापल्या जागेवर बसले. बस औरंगाबादच्या रस्त्याला लागल्या. जागतिक वारसा असलेल्या लेण्या, भगवान गौतम बुद्धांच्या जीवन चरित्राची कथा, जगा वेगळी प्रेम कहाणी, तिची वेगळी अनुभूती ऊरात घेऊन सर्वजण परत फिरले होते.
(क्रमशः)

