जबाबदार कोण??
जबाबदार कोण??


एका सहा वर्षाच्या मुलीला आमच्या स्त्री रोग विभागात तपासण्यासाठी आणले....
खरं तर ती बालरोग विभागात ऍडमिट होती... तिला ताप येत होता.... औषधांना हवा तसा ती प्रतिसाद देत नव्हती... सोबतच तिला लघवीच्या जागी खाज येते आहे अशी तक्रार होती....
तिचं नाव ताई, ताईला माझ्याकडे आणलं... ती घाबरून जोरजोरात रडायला लागली.... नशिबाने माझ्याकडे त्या दिवशी चॉकोलेट होते.... मी शांत करण्यासाठी तिला ते दिले...
चॉकलेट पाहून ती खूप खूष झाली... तिचं रडणं थांबलं... मग मी तिला विश्वासात घेतलं... मी तिला सांगितलं, मला फक्त बघू दे (inspectin).. तूला कसलाही त्रास होणार नाही...
तिने मला रीतसर नियमाप्रमाणे तपासणी करू दिली.... तिच्या सोबत तिची आज्जी हजर होती...
मी inspect केले असता तिच्या योनीला खूप भयंकर इन्फेक्शन झाले होते... सगळा भाग लालसर झालेला होता..... त्याच्या बाजूने पू देखील तयार झाला होता.... तिच्यावर व्यवस्थित उपचार सुरु केले गेले...
मी ताईच्या आज्जीला विचारलं, तिला कधीपासून असा त्रास होतो?
त्यांना काही माहिती नव्हते... मग त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला त्यांना मी म्हणाले की, तुम्हाला माहिती का अशाप्रकारचे इन्फेक्शन कशामुळे होतात?
ती आज्जी माझ्याकडे गोंधळून बघायला लागली.....
मी विचारले... तुमच्या नातीवर कुणी काही जोर जबरदस्ती केली का?? आज्जीने नकारात्मक मान हलवली... पण ती आज्जी घाबरली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे तेच भाव मी टिपले.... मग मी त्यांचा पिच्छाच धरला....
पण आज्जी ती भली खमकी होती... ताईवर कुणी बलात्कार करतंय हे मान्य करायला तयार नव्हती... मग मी ताईला विचारलं... आधी ताई काहीच सांगत नव्हती... मग मी तिला म्हणाले तू खरं सांगितलं तर मी तुला अजून एक चॉकलेट देईल.....
तेव्हा ताईने सांगितले की..... शेजारचा एक मोठा माणूस येऊन तिच्या गुप्तांगांना हात लावायचा..... अत्याचार करायचा... खूप त्रास व्हायचा.... मी खूप रडायचे आणि ओरडायचे तर तो तिला म्हणायचा की कुणाला सांगशील तर मी तुला खूप मारेल... ताईने हे पण सांगितले की तो आज्जी-आजोबा असतानाही घरी यायचा......
मी आज्जीकडे थोडं रागातच पाहिलं.... तर ती आज्जी मला म्हणते कशी, तुम्ही पण त्या मुलीचं काय ऐकता... लहान आहे ती.. तुमच्या चॉकोलेटमुळे ती काहीपण सांगत आहे...
आता मात्र आज्जीचे बोलणे मला चांगलेच खटकले....
मी त्यांना म्हणाले, ही काही साधी केस नाही... पोलिसांना कळवावे लागेल...
ती आज्जी मग विनंती करायला लागली.... म्हणायला लागली, कृपा करून पोलिसांना नका सांगू.....
नियमानुसार मी पोलिसांना कळवले.... पोलीस त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी आले....
तेव्हा कळाले की ताईचे आई-वडील मोलमजुरी करतात.... आणि मजुरीसाठी ते दोघेही दुसऱ्या गावी गेले आहेत.... ताईचे हाल होऊ नये म्हणून त्यांनी तिला तिच्या आज्जी-आजोबांकडे ठेवले आहे....
मग हळूच पोलिसांनी (lady police )ताईला प्रश्न विचारायला सुरुवात केली.... आधी ती घाबरून काही बोलेना पण मग मी तिला सांगितलं... बेटा तू घाबरू नकोस या काकूपण तुला चॉकलेट देतील....
मग ताई पून्हा बोलायला लागली, शेजारचे काका येतात... तिने ज्या पद्धतीने वर्णन करून सांगितले तिच्यावर अधून मधून नियमित बलात्कार होत असे....
माझे आज्जी-आजोबा जरी घरी असले तरी त्या काकांना काही म्हणत नाहीत....
बाप रे ते ऐकून तर माझ्या अंगाला काटा आला.... वाटलं काय आयुष्य आहे....
पोलिसांनी मग रागातच तिच्या आज्जीला विचारले?? काय हो काय म्हणत आहे तुमची नात...
ती आज्जी म्हणायला लागली, तो माणूस आम्हाला धमकावतो... मारून टाकेन म्हणतो....
मला तर खरं काही समजत नव्हतं.... इतकी विकृती?? किती घाणेरडा प्रकार?? असं जगणं असू शकतं?? काय दोष त्या इवल्याशा ताईचा??
या सर्व गोष्टींना कोण जबाबदार?? परिस्थिती?? ताईचे आई-वडील?? ताईचे आज्जी-आजोबा??
त्या नराधमावर केस झाली... त्याला शिक्षा झाली....
पण खरं सांगा त्याला शिक्षा मिळाल्याने प्रश्न सुटला का हो?? भलेही कायद्याच्या बाबतीत तिला न्याय मिळाला असेल पण तिचं बालपण त्याचं काय??