अनवाणी
अनवाणी


आज बरोबर एक वर्ष झाले होते... मोहितचा अनवाणी राहण्याचा प्रवास आज संपला होता..... मोहितला चक्क त्याच्या गावाच्या (तालुक्याच्या )आमदाराने त्याला बक्षीस म्हणून बूट दिले होते.... आणि मोहितने ते मानाने स्वीकारली होते ....
18 वर्षाच्या मोहित वर्षभर अगदी उन्हाळा,हिवाळा आणि पावसाळा... घर असो वा कॉलेज सगळीकडेच तो अनवाणी फिरत असे...
मोहितच्या तश्या राहण्याला सगळे लोक विक्षिप्त नजरेने बघत असत.... त्याची चेष्टा करत असत.... पण मोहितला कश्याचीही तमा नव्हती ... तो लोकांकडे दुर्लक्ष करत असे.... पण त्याचा एक शुभचिंतक मित्र होता" राजेश " त्याला राहवले नाही....
राजेश ने मोहीतला अनवाणी राहण्याचे कारण विचारले....
मोहीतने राजेशला सांगायला सुरुवात केली... राजेश माझे बाबा हे उत्तम धावपटू🏃 होते... अगदीच लहानपणापासून.... ते प्रत्येक स्पर्धेत भाग घेत आणि स्पर्धा जिंकत असत.... ते देखील कुठल्याही प्रकारचा बूट न वापरता अनवाणी पळत असत...
रस्त्यातील दगडं आणि काटे जणू त्यांचे मित्रच झाले होते... ते अगदी जिल्हास्तरीय, राज्य स्पर्धेत धावले होते आणि त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.... पण या संसारसागरात त्यांच्या धावण्याला ते विसरले होते...
मागील वर्षी माझे बाबा आपल्या महाराष्ट्राकडून धावणार होते.... जर त्यात त्यांना सुवर्णपदक मिळाले असते तर ते आपल्या देशासाठीच्या स्पर्धेसाठी पात्र झाले असते... ही स्पर्धा खास प्रौढांसाठी होती..... आणि अश्या प्रकारची स्पर्धा देशासाठी म्हणून पहिल्यांदाच ठेवली गेली होती...
माझ्या बाबांनी त्या स्पर्धेची अगदी जय्यत तयारी केली होती... दिवस रात्र एक करून खूप मेहनत घेतली होती... हे सगळं माझे बाबा त्यांची नोकरी सांभाळून करत असत....
त्यांच्या सरावाच्या वेळा देखील नोकरीमुळे बांधल्या गेल्या होत्या... त्यांचा दिनक्रम पहाटे चार वाजल्यापासून सुरु होत असे. त्यांचे आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न होते...माझ्या बाबांची तयारी आता पूर्ण झाली होती.... त्यांना आपण निवड स्पर्धा जिंकू असा आत्मविश्वास वाटायला लागला होता.... एक दिवस सकाळी अंधार
ात धावत असताना एका मेटॅडोरने त्यांना धडक दिली.... ते वाचले पण त्यांचे पाय निकामी झाले.. माझ्या बाबांचे स्वप्न जागेवरच राहीले....
अपघातानंर माझे बाबा पार बदलून गेले... कारण त्यांची शारीरिक हानी तर झाली होती पण त्यामुळे ते मानसिक आजारी देखील झाले होते... माझे बाबा कोणाशीच बोलत नसत... एका कोपऱ्यात बसून तासनतास आपल्या बक्षिसांना न्याहाळत असत...
आम्ही घरातील सर्व मंडळी त्यांना होणारे दुःख पाहत होतो... त्यांना काय त्रास होत आहे याची जाणीव आम्हाला होती... आम्ही मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत होतो.... पण काही करू शकत नव्हतो...
पण एक दिवस मी वर्तमानपत्रात माझ्या वयोगटासाठी धावण्याच्या स्पर्धेची जाहिरात बघितली आणि त्या स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह दाखवला...
त्याचा सकारात्मक परिणाम माझ्या बाबांवर झाला....माझे अबोल झालेले बाबा आता बोलायला लागले होते... मला हळूहळू मार्गदर्शन करायला लागले होते..
त्यांचा उत्साह बघून मग मीच शपथ घेतली की जोपर्यंत आपल्या जिल्ह्यातर्फे धावून मी राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळवणार नाही तोपर्यंत मी चप्पल बूट काही घालणार नाही... अनवाणी राहील.... जेणेकरून मला होणाऱ्या रस्त्यावरील दगडांच्या किंवा काट्यांचे स्पर्श मला काय साध्य करायचं आहे ते वेळोवेळी आठवण करून देतील....
सुरुवातीला मला खूप अवघड गेले ... पण नंतर मी जो रोजचा सराव करायचो तेव्हा माझे बाबा मला मार्गदर्शन करायचे... त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि उत्साह दिसायचा... त्याने मी माझ्या जखमा विसरून जायचो आणि मला धावा काढण्यासाठी आणखी हुरूप यायचा....
आता मात्र राजेश मोहीतकडे एका वेगळ्या आदरणीय नजरेने बघायला लागला... आणि मोहीतला म्हणाला तू तूझे आणि तूझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण कर.... लोकांचे काय?? उद्या हेच लोक तूझे कौतुक करतील...
पुढे मोहीतने आपला नियमित सराव सुरु ठेवला... आणि अनवाणीच धावून त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक 🥇मिळवले....
आणि आज त्याच्या कौतुकाच्या सोहळ्याला त्यांच्या तालुक्याच्या आमदाराने मोहीतला आपल्या स्वहस्ते बक्षीस म्हणून बूट दिले...