"अशी असावी सासू "
"अशी असावी सासू "


पार्वतीचं नुकतंच सीझर झालं होतं...
पार्वती अजून ग्लानीतच होती...
पार्वतीचं हे दुसऱ्यांदा सीझर झालं होतं... तीला मुलगी झाली होती.... आधीची सुद्धा तिला मुलगी होती...
साहजिकच पार्वती दुसऱ्या वेळेस मुलाची अपेक्षा करत होती... पण मुलगी झाली आहे हे कळताच ती खूप दुःखी झाली होती.... आणि मग भुलेखाली असताना ती सतत बरळत होती....
पार्वतीचे पॅरामीटर्स सगळे नॉर्मल होते... त्यामुळे आ तिच्यासोबत असलेल्या तिच्या नातेवाईकांना पार्वतीची जास्त काळजी घ्या असे सांगितले... नाहीतर विनाकारण bp किंवा काही मानसिक त्रास होऊ शकतो अशी कल्पनाही दिली.....
तितक्यात तिच्या जवळ असलेली एक मध्यमवयीन लुगडे नेसलेली स्त्री गंगाबाई आमच्या जवळ आली... पार्वतीच्या तब्बेतीची विचारपूस करायला लागली....
मी गंगाबाईना सर्व काही व्यवस्थित सांगून पार्वतीची काळजी घेण्यास सांगितले.. व तिथून निघून गेले...
तासाभरानंतर मी जेव्हा पुन्हा राऊंडसाठी आले तेव्हा गंगाबाई पार्वती जवळ बसून होती.
गंगाबाई पार्वतीकडे बारकाईने लक्ष देत होती... तिच्या हालचाली टिपत होती... बाळालादूध पाजण्यासाठी अगदीच व्यवस्थित पोझीशन देत होती....
पार्वती सोबत दुसरे कुणी नव्हते. अगदीच तिची युरीन बॅग पण गंगाबाईने रिकामी केली होती... पार्वतीला ब्लीडींग तर होत नाही ना हे देखील ती सारखं पार्वतीला विचारत होती.... तिथल्या सरव्हन्टला सांगून तीने व्यवस्थित पॅड देखील बदलले....तिच्या इंजेक्शन आणि बाकी उपचाराची माहीती घेत होती...
गंगाबाई पार्वतीला समजावत होती... मला त्यांचं संभाषण ऐकायचं होतं म्हणून मी त्यांच्या नकळत त्यांच्या दिशेने मी माझे कान टवकारले....
गंगाबाई. : हे बघ पार्वती मुलगा असो का मुलगी हे काही आपल्या हातचं नाही... मुलगाच काय देतो... जे आपल्या नशिबात आहे ते आनंदाने मान्य करावे... तिचं तू तितक्याच आनंदाने स्वागत कर जितकं तू ऋतुजाच्या वेळेस केलं होतं...
आणि जिथं मी तूला म्हणते की हिचा पण आनंदाने स्वीकार कर तिथं बाकीच्या लोकांची पर्वा कशाला करतेस.... तूला कोण काय म्हणणार...
मी न राहवून बोलले गंगाबाई पण तिच्या सासरच्यांना लागेल की वारसदार !.... ते तर पार्वतीला म्हणतीलच ना...
हे ऐकून मात्र पार्वती आणि गंगाबाई खूप हसले .... पार्वतीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसायला लागला... पार्वती मला म्हणाली! मॅडम ह्या माझ्या सासूबाई आहेत....
मी :काय?? सासूबाई अगं पार्वती मी अगदी तूझ्या ऍडमिशन पासून गंगाबाईची धावपळ बघत आहे... मला बिलकुलच वाटलं नाही की त्या तूझ्या सासूबाई असतील म्हणून... त्या अगदीच आई असल्यासारखी तुझी काळजी घेत आहेत....
आपल्या जवळपास सगळ्याच रुग्णांसोबत त्यांच्या माहेरचे लोकं असतात एक तर आई, नाहीतर मावशी, काकू नाहीतर आजी...
गंगाबाई :मॅडम मला मुलगी नाही.... दोन्ही मुलंच त्याच्यामुळे दोन्ही सुना ह्या माझ्या मुलीच आहेत...
मी कधीच मुलगी किंवा सून असा विचार करत नाही... देवाने चांगलं आयुष्य दिलं आहे ते प्रेमाने जगलं पाहिजे ना...
जिथं मुलगा किंवा मुलगी मीच फरक करत नाही तिथे माझ्या या लेकींनी ताण का घ्यावा...
अन मॅडम मी खूप नशीबवान आहे की माझ्या या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत... एकोप्याने राहतात... आमची काळजी घेतात... मग मी पण इतकं केलं तर काय वाईट आहे... मला मुलगी असती तर मी असंच केलं असतं ना....
मी :खरंच खूप छान वाटलं ऐकून... म्हणावं वाटलं अशी असावी सासू....
पणअसं फार कमी बघायला भेटतं...बऱ्याच सासू सुनेला मुलगी म्हणतात पण वागताना ती सूनच असते...
हेच जर सगळ्या स्त्रियांनी आत्मसात केले तर सासू आणि सून या नात्याला वेगळ्या नजरेने बघितल्या जाईल... हो ना??
लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा