कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
पाच वर्षांचा अनिश खूप रडत होता..
मला देखील त्याचं रडणं म्हणजे एक प्रकारचा आक्रोश वाटत होता.... पण मी फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकत होते... जमेल तितकं त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते...
परिस्थितीने त्याला इतकं समजूतदार बनवलं होतं की चॉकलेट आणि बिस्किटांनी त्याला काहीच फरक पडला नव्हता... त्याला त्याची आई हे जग सोडून गेली हे समजले होते...
मी दवाखान्यातील सर्व कागदपत्रे पूर्ण केली आणि अनिशच्या आईचे शव बेवारस म्हणून पुढील प्रक्रियेसाठी पोलीस घेऊन गेले...
अनिश आता एकटा उरला होता... त्याच्या पालनपोषणासाठी त्याला आता बालसुधारगृहात ठेवण्याचा पर्याय पोलिसांनी निवडला होता.... त्यासाठी अनिशला न्यायालयात हजर करण्यासाठी नेले होते...
अनिशचा तो गोंडस चेहरा आणि त्याने त्याची आई उषा हे जग सोडून गेली म्हणून केलेला आक्रोश... माझ्या नजरेसमोरून काही जातच नव्हते...
पण काय करणार त्याच्या आईने काही उचललेल्या पावलांमुळे आता अनिशला एकाकी जीवन जगावे लागणार होते...
काय झाले होते असे??
उषाची कथा दवाखान्यात सर्वांना माहिती झाली होती...
उषाला एका ऑटोवाल्याने खूप सिरीयस झाली म्हणून आणून टाकली होती... तिला आणि अनिशला सोडून तो निघून गेलेला होता......
उषाच्या सर्व तपासण्या केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये तिला एड्स कॉम्प्लेक्स झाल्याचे निष्पन्न झाले होते....
खरंतर उषाला तिचा आजार माहिती होता... पण जेव्हा ती दवाखान्यात आणली होती तेव्हा ती शुद्धीवर नव्हती... आजारीही होती आणि बहुदा दोन ते तीन दिवसापांसून तिने काही खाल्लेलं नसावं....
उषाचा मुलगा अनिश इतका गोंडस होता की त्याला दवाखान्यातील आजूबाजूचे रुग्णाचे नातेवाईक देखील खायला देत असत.. तसेच दवाखान्यातील कर्मचारी आणि डॉक्टरसुद्धा त्याचा खूप लाड करत असत.... त्याचे बोबडे बोल आणि त्याचा समजूतदारपणा सर्वांनाच आवडला होता...
कुणीतरी त्याला घालण्यासाठी आपल्या घरातील जुने पण चांगले कपडे देखील दिले होते... दवाखान्यात आलं की कुठलाही कर्मचारी किंवा डॉक्टर त्याला भेटल्याशिवाय जात नसे...
उषा दिसायला खूप देखणी होती...तिचे लग्न होऊन अंदाजे आता सात-आठ वर्ष झाले असतील...
उषाला खूप सासुरवास होता... सासू खूप छळ करत असे आणि तिचा नवराही तिच्या सासूच्या आज्ञेबाहेर नव्हता... कधी कधी खूप मारहाण करत असे..... तिला इच्छा नसतानाही शेतात मोलमजुरी करायला पाठवत असे....
उषाच्या माहेरचे लोकदेखील तिला समजून घेत नसत.... आधार देत नसत... त्यांना वाटे एकदाचं लग्न झालं आहे ना... मग आता आमची जबाबदारी संपली....
उषा देखणी असल्याने ती जिथे मोलमजुरी करण्यासाठी जात होती... त्या शेतमालकाने विकासने उषावर प्रेमाचं जाळं टाकायला सुरुवात केली...
विकास खरं तर खूप लफडेबाज होता... अशाप्रकारची संधी तो सहजासहजी सोडत नसे...
 
;
विकासने उषाच्या घरातील वातावरणाची संपूर्ण माहिती काढून घेतली.... आणि मुद्दामच विकास उषाची खूप काळजी करण्याचा दिखावा करत असे...
उषाला खरोखरच अशा आधाराची गरज होती.... लवकरच ती विकासच्या प्रेमात पडली... आणि एक दिवस..... एक दिवस उषा विकासचा हात धरून पळून गेली... त्याच दरम्यान उषा गरोदर राहिली होती....
विकास आणि उषा आता सोबत राहू लागले होते... तिच्या माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी आमच्यासाठी उषा मेली असे आता ठरवूनच टाकले होते....
इकडे विकास तसा खूप लफडेबाज असूनही उषाने त्याच्यावर इतके प्रेम केले की तिच्या प्रेमासमोर तो देखील बदलला होता.... उषाची खरोखरच काळजी घ्यायला लागला होता....
पण सगळ्याच गोष्टी अशा घडत असताना विकास सारखा सारखा आजारी पडायला लागला.... त्याला सारखं सारखं दवाखान्यात भरती करावं लागू लागलं....
संपूर्ण तपासण्या केल्या गेल्या.... आणि विकासला एचआयव्हीची लागण झाली हे समजले.... ते कळाल्यावर उषाची तपासणी केली.... ती देखील एचआयव्ही पॉजिटीव्ह निघाली...
अजून अनिशचा जन्म झाला नव्हता.... डॉक्टर आणि एचआयव्ही काैन्सेलर यांनी उषाला गरोदरपणातील आणि प्रसूतीच्या वेळेसची विशेष काळजी घेण्यास सांगितली जेणेकरून या आजाराची लागण उषाच्या होणाऱ्या बाळाला होणार नाही......
अनिशचा जन्म झाला... त्या वेळेस उषाने व्यवस्थित औषधोपचार घेतले.... व्यवस्थित काळजी घेतली त्यामुळे एचआयव्हीची बाधा अनिशला झाली नाही....
उषा सर्व काळजी घेत असे पण लोकलज्जेस्तव विकास आणि उषा व्यवस्थित उपचार घेत नसत.... नियमित तपासण्या करत नसत त्यामूळे लवकरच विकासला एड्स बिमारी झाली.... आता त्याची रोगप्रतिकार शक्ती साथ देत नव्हती... आणि एक दिवस विकास... उषा आणि अनिशला सोडून देवाघरी निघून गेला....
उषा पुन्हा मोलमजुरी करून दोघांचा उदरनिर्वाह करत असे... पण विकासच्या जाण्याने ती मानसिकदृष्ट्या खचली होती...
शारीरिकदृष्टया तिलादेखील एड्सची बिमारी झाली होती... त्यात उषाला त्वचेची बिमारी झाली, त्या नंतर तिचं वजन एकदम कमी झालं. सारखा ताप यायला लागला... आणि तिला काहीच करता येत नव्हते...
एक दिवस उपाशी राहून ती रस्त्यावर बेशुद्ध पडली होती आणि तिच्याजवळ गोंधळलेला अनिश.. फारच विदारक दृश्य होते ते...... एका ऑटोरिक्षावाल्याने माणुसकी म्हणून तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते...
दवाखान्यात उषाचे औषध उपचार करण्यात आले... ती शुद्धीवर आली.... तिच्याजवळ कुणी नातेवाईक नसल्याने पोलिसांना कळवण्यात आले होते...
दवाखान्यात आता सर्वच जण उषाची आणि अनिशची काळजी घेत होते... अनिशच्या लाघवी, प्रेमळ, हुशार स्वभावामुळे आणि बोबड्या बोलामुळे तो सगळ्यांचा आवडता झाला होता...
उषा दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर फक्त महिनाभर जगली... आणि आता अनिशला त्याची जगण्याची लढाई मात्र एकट्यानेच लढावी लागणार होती.....
(सत्य घटनेवर आधारीत)