नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस घरी तू जेव्हा
विनय आणि वैदेहीचं लग्न होऊन सहा महिने झाले होते.... दोघेही आता छान एकमेकांसोबत रुळले होते...
दोघांचं लग्न जरी ठरवून असलं तरी दोघांनाही मनपसंत जोडीदार मिळाल्याने ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते... एकमेकांशिवाय ते राहू शकत नव्हते...
सहा महिन्यातच त्यांना एकमेकांची खूप सवय झाली होती... दोघेही इंजिनिअर होते... वेगवेगळ्या कंपनीत नोकरीला होते...
वैदेहीला बऱ्याचदा वर्क फ्रॉम होम करावं लागत असे... त्यामुळे वैदेही आरामात घरकाम आणि नोकरीचे काम सांभाळत असे... विनय तिला जमेल तशी थोडीफार मदत करत असे....
वैदेही तिचे कंपनीचे कामदेखील खूप व्यवस्थित करत असे... त्यामुळे तिची एका नवीन प्रोजेक्टसाठी महिनाभरासाठी जपानमध्ये जाण्यासाठी निवड झाली....
लहानपणापासूनचं वैदेहीच परदेशी जाण्याचं स्वप्न सत्यात उतरलं होतं....
विनय आणि वैदेही तसे एकमेकांना समजून घेणारे होते.... लागलीच त्याने तिला विदेशी जाण्यासाठी मदत करायला सुरुवात केली...
सर्वप्रथम त्याने वैदेहीला भाषा शिकण्यासाठी मदत केली...
वैदेहीचे पासपोर्ट आणि विजाचे सर्व कंपनीच बघणार असल्याने तिला आता फक्त जाण्याची तयारी करावी लागणार होती....
जपानला जाण्याचा दिवस उजाडला... विनय आणि वैदेही दोघांनाही अस्वस्थ वाटायला लागलं.... कसं होणार आपलं...
सहा महिन्यातच ही नात्याची आणि प्रेमाची वीण इतकी घट्ट झाली होती की दोघांना एकमेकांना सोडून राहण्याचा विचार सहन होत नव्हता....
तरी मन घट्ट करून शेवटी एकदाची वैदेही जपानला रवाना झाली....
विनय एअरपोर्टवरून सरळ घरी आला.... घरी आल्या आल्या तो लॉक उघडण्याऐवजी रोजच्या सवयीप्रमाणे बेल वाजवू लागला.... थोड्या वेळात अरे... असं म्हणत त्याचा चेहरा पडला.... दरवाजा उघडून आतमध्ये आल्यावर घरामध्ये त्याला भकास वाटायला लागलं....
घर एकदम खायला उठलं...
संध्याकाळचे जेवण वैदेही करून गेली होती... त्यामुळे तिच्या आठवणीत त्याने कसेबसे जेवण पूर्ण केले...
उर भरून येत होता... रात्रभर या अडांगावरून त्या अडांगावर करत विनयने कशीबशी रात्र काढली....
सकाळी विनयने किचनचा ताबा घेतला....
पण त्याची खूप धांदल उडाली... त्याला काहीच सापडेना.... चहा करायला घेतला... त्याला ना चहाचे पातेले दिसेना ना साखरेचा डब्बा... शोधून शोधून परेशान झाला...
तितक्यात फोनची रिंग वाजली... वैदेहीचा व्हिडिओकॉल होता.... विनयने एकदम आनंदाने फोन उचलला....
लागलीच वैदेहीने चहाचं पातेलं कुठलं?? चहा, साखर कुठे आहे?? दूध कुठे ठेवले?? वगैरे..... त्याने न विचारताच माहिती दिली....
विनयला इतके आश्चर्य वाटले... वैदेहीला मी न सांगता माझी गरज कशी कळाली??
त्यावर वैदेहीने एकदम फिल्मी डायलॉग मारला..... प्यार किया है जनाब, हमारे अंतर्मन ने हमको महसूस कराया की तुमको हमारी जरुरत है!
मग बोलता बोलता वैदेहीने सगळ्या कामांची थोडी बेसिक माहिती दिली....
विनय आता थोडा खूष झाला....
वैदेहीशी बोलल्यामुळे आता थोडा सुखावला....
ड्युटीला जाण्यासाठी तयार होताना देखील विनयची अशीच तारांबळ उडाली... त्याला कुठलेच कपडे बरोबर सापडत नव्हते... जे कपडे सापडले ते प्रेस केलेले नव्हते...
कसंबसं आवरून आता विनय ड्युटीवर गेला तेही थोडं उशिराच...
उशीरा गेल्यामुळे त्याचं कामदेखील उशीरा व्हायला लागलं... थोडी चिडचिडही झाली... लंचब्रेकमध्ये बरोबर विनयला डब्बा मिळाला... वैदेही सगळी व्यवस्था करून गेली होती... विनयला त्याचेदेखील खूप आश्चर्य वाटले... वैदेही आपली किती काळजी करते असं वाटून विनयचे डोळे भरून आले...
संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी करत पहिला दिवस तर कटला...
पण आता संपूर्ण महिना कसा काढायचा...
विनय रोज स्वतःचं मन कशात ना कशात रमावण्याचा प्रयत्न करायचा... कधी लग्नाचा अल्बम बघून तर कधी लॅपटॉपवर फोटो बघून मन रमवत असे... पण त्याला त्याचा एकटेपणा जीवघेणा वाटायला लागला होता.....
त्याने थोडे दिवस त्याच्या आई-वडिलांनादेखील बोलावून घेतले पण गावी त्यांनाही काम असल्याने ते जास्त दिवस राहू शकले नाही...
विनय रोज दिनदर्शिकेवर दिवस मोजत असे... एक संपला की तो त्यावर फुली मारत असे...
घरातील फुलझाडेदेखील वैदेहीच्या नसण्याने जणू कोमेजून गेली होती....
सर्व घर जणू एक उदासीनतेचे प्रतीकच वाटायला लागलं....
विनयला रोज त्या गाण्याची आठवण होई...
"नसतेस घरी तू जेव्हा..... दिल तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे... संसार फाटका होतो...”
कसा बसा महिना संपला..... वैदेही येणार होती... विनय वैदेहीला एअरपोर्टवर घ्यायला गेला तेही तासभर आधीच....... हा एक तास देखील त्याला एका महिन्याइतकाच त्रास देत होता....
वैदेही येते ना येते तोच त्याने तिला मिठी मारली.. मला पुन्हा सोडून जाऊ नकोस.... मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय असं म्हणून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या....
हे झालं नवीन जोडप्याबद्दल...
पण बायकोवर कितीही विनोद होत असतील तरी प्रत्येक नवऱ्याची स्थिती बायको काही दिवसांसाठी माहेरी गेली की अशीच होते....
"नसतेस घरी तू जेव्हा... जीव तुटका तुटका होतो... जगण्याचे विरती धागे.... संसार फाटका होतो.....”
हो ना??