Pratibha Tarabadkar

Drama Others

4.3  

Pratibha Tarabadkar

Drama Others

जावे त्याच्या वंशा

जावे त्याच्या वंशा

8 mins
535


 संजना रिक्षातून उतरताच अनुष्काने तिला हात केला. ती संजना साठी गेटच्या बाहेर उभी होती.

'छानच आहे गं तुमचा कॉम्प्लेक्स!'संजना परिसर न्याहाळत म्हणाली.

'हो,well maintained आहे. 'अनुष्काने सहमती दर्शविली. कॉम्प्लेक्स च्या भल्यामोठ्या गेटमधून दोघी आत शिरताना वॉचमन कडील रजिस्टरमध्ये अनुष्काने guest अशी नोंद केली.

सभोवताली उंचच उंच टॉवर्स, मध्यभागी लॉन, एका कडेला कम्युनिटी हॉल दिसत होता.अनुष्काने एका टॉवर मध्ये शिरुन लिफ्ट साठी बटन दाबले.एव्हढेसे अंतर चालतांनाही संजनाला दम लागला होता.त्या लिफ्ट बाहेर पडल्या.अनुष्काने घराची बेल वाजवताक्षणी एका प्रौढ स्त्री ने दार उघडले. 'मम्मी,ही माझी मैत्रीण संजना', अनुष्काने दोघींची ओळख करून दिली.

'नमस्कार', समोर उभ्या असलेल्या अनुष्काच्या सासूबाईंना संजनाने नमस्कार केला.'आणि संजना,या आमच्या मम्मी!'

'अनुष्काच्या लग्नाच्या दिवशी माझ्या मुलाला, सहिष्णूला नेमका ताप आला.त्यामुळे मला येता आलं नाही.मग म्हटलं तुमच्या घरीच प्रत्यक्ष जाऊन भेटू.'संजनाने एक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स अनुष्काच्या हातात दिला.अगं कशाला,'अनुष्का संकोचून म्हणाली.'अशी कशी रिकाम्या हाताने येईन मी? नुकतंच लग्न झालंय तुझं, पहिल्यांदा च घरी आलेय मी तुझ्या, कुछ गिफ्ट तो बनता है ना! बरं अनुज कुठं आहे?'

'अगं तो मित्रांसोबत बाहेर गेलाय.लवकर येतो म्हणालाय.'अनुष्का उत्तरली.'तो बॉक्स उघडून बघ,वीणावादन करणारी सरस्वती आहे त्यात. दिसेल अशी ठेव म्हणजे तुझ्या लक्षात राहिल सतारीचा रियाज करायला.'

अनुष्काच्या सासूबाईंनी हळूच नाक उडवलेले संजनाच्या तीक्ष्ण नजरेने टिपले.

'अनुजला फोन करते लवकर ये म्हणून.अर्ध्या तासात येतो म्हणाला, आता दोन तास झाले तरी आला नाहीय.'अनुष्का घर दाखवतांना अनुजच्या वागण्याने अस्वस्थ झाली होती.'मी त्याला किती वेळा म्हटलं,थांब थोडा वेळ, ओळख करून दिली की जा, पण ऐकलंच नाही त्याने.'

'अगं असू देत.'संजनाने तिला हाताने थांबविले.

 'तुझं घर खूप सुंदर आहे.'दोघी हॉलच्या सोफ्यावर स्थानापन्न झाल्या तेव्हढ्यात अनुष्काच्या सासूबाई गरमागरम बटाटेवडे घेऊन आल्या आणि दोघींच्या हातात प्लेटस् ठेवल्या व हुश्श करीत घाम पुसत समोर बसल्या.

'अहो मम्मी, मी तळले असते वडे, तुम्ही कशाला तळलेत?'अनुष्का विलक्षण संकोचली.

'अनुष्का, मम्मी बघ किती दमल्यात !पुढल्या वेळी पाहुणे आले की सरळ विकत आणत जा पदार्थ, हल्ली सगळं सोपं झालंय !Online order दिली की घरपोच मिळतं सगळं.'संजना अनुष्काला खणखणीत आवाजात म्हणाली तशी मम्मी दचकल्याच! खाणंपिणं उरकून संजना घरी निघाली तोपर्यंत त्या बेडरुम मधून बाहेर आल्याच नाहीत.

'मी गेल्यावर काही बोलल्या नाहीत का गं तुझ्या 'मम्मी'?'संजनाने तोंडात घास कोंबत विचारले. लंच अवरमध्ये दोघी डबा खात होत्या.

'बरं झालं तू बोललीस, अगं मी किती वेळा त्यांना सांगितलं, काहीतरी साधं करू नाहीतर विकत आणू ,पण आपण किती 'एफिशियंट' आहोत ते दाखवायचं होतं ना! नंतरचे सगळे वडे मीच तळले. वरुन मुलींना सगळं आलंच पाहिजे म्हणून ठासून सांगत होत्या.'

'हूंः old wine in new bottle'संजनाच्या या वाक्यावर अनुष्काने प्रश्नार्थक मुद्रा केली तशी संजना म्हणाली,'अगं, मॉडर्न जमान्याप्रमाणे कपडे बदलले,शिक्षण घेऊन मुली पायावर उभ्या राहिल्या पण समाजाची मुलींकडे बघण्याची मानसिकता बदलली का? त्यांच्यावर नोकरीची जबाबदारी टाकतांना घराची जबाबदारी कमी झाली का?तर नाही!मग मुलींना नोकरी आणि घरकाम ही तारेवरची कसरत करावी लागतेय.'

'पण माझ्या सासूबाई ,आई पण नोकरी करीत होत्याच की मग त्यांना कसं काय जमत होतं?'

'त्यांच्या आणि आपल्या नोकरीत पुष्कळ फरक आहे अनुष्का, त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या.आपलं तसं आहे का?आपले प्रोजेक्टस्, टार्गेटस् त्यांना होते का? मला असं मुळीच म्हणायचं नाहीये की त्यांची नोकरी ईझी होती,पण आपल्याइतकी कॉम्प्लिकेटेड ही नव्हती.त्यामुळे त्याची तुलना होऊच शकत नाही.कधी कधी आपलं काम संपतं तेव्हा रात्रीचे नऊ सुद्धा वाजलेले असतात.'अनुष्का संजनाच्या बोलण्यावर विचार करीत होती.लग्नाआधी या गोष्टीचा विचार तिने केलाच नव्हता.

'बेला, तुझ्या आवडीची भाजी आणलीये बघ,'संजनाने बेला ला हाक मारली.'अरे वा,फणसाची भाजी', बेला मिटक्या मारत खाऊ लागली.'बाकी तुझ्या स्वयंपाकाच्या बाईंच्या हाताला चव आहे हं', बेला मुंदडा आणि इतकं शुद्ध मराठी? अनुष्काने आश्चर्याने बेला कडे पाहिले.'अगं आमच्या आजूबाजूला सगळे मराठीच.मग लहानपणापासून मी फक्त आडनावाने मारवाडी आहे.'बेलाने खुलासा केला.'ही संजना,माझी इंजीनियरिंग कॉलेज मधली क्लासमेट.'संजनाने बेला ला विचारले,'तो मागच्या वेळी आलेला मुलगा आवडला का?'बेलाने तोंड वाकडे केले.'एकदम चम्या होता.'

'हा बेलाने नकार दिलेला अडतिसावा मुलगा',संजना अनुष्का कडे वळून म्हणाली.

'काय?'अनुष्काने आश्चर्याने डोळे विस्फारले.'तुझे आई वडील तुला काही बोलत नाहीत?'

बेलाने कपाळाला हात लावला.'अगं घरात पाऊल टाकलं की त्यांची रेकॉर्ड सुरू होते.आमच्या समाजात 32 years is quite late you know! या वयात दो बच्चों की मां होतात असं रोज ऐकते मी!पण मी ठरवलंय, ज्या घरात स्वयंपाका पासून ते सगळ्या वरकामापर्यंत बाई आहे अशाच घरात मी लग्न करून जाणार.एव्हढा demanding job plus घरची कामं मला मुळीच जमणार नाहीत.आणि मलाही super woman बनायची मुळीच इच्छा नाही.'

'ही वाट बघतेय अशा अटी मान्य करणारा एखादा राजकुमार पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येईल म्हणून!'संजनाने बेला ला कोपरखळी दिली.

'ए हॅलो, मी मुळीच घाई करणार नाहीये लग्नाची!मला तुझ्यासारखी वाट लावून नाही घ्यायची स्वतः ची.अनुष्का तुला माहितीये,ही संजना ब्युटी क्वीन होती आमच्या कॉलेजची.'

'काय?'अनुष्का तीन ताड उडाली.समोर बसलेली थुलथुलीत शरिराची,ओघळलेल्या चेहऱ्याची,अकाली पिकलेल्या केसांची,बी.पी.आणि थायरॉईड च्या गोळ्या घेणारी संजना आणि ब्युटी क्वीन?

अनुष्काच्या चेहऱ्यावर विस्मय उमटला.'विश्वास बसत नाही ना?'बेलाने विचारले.'संजना,तुझा पूर्वीचा फोटो दाखव जरा!'

संजनाने जरा अनिच्छेनेच वॉलपेपर म्हणून ठेवलेला मोबाईल मधील फोटो दाखविला आणि अनुष्काने आश्चर्याने आ वासला.

'बघितलंस किती सुंदर होती संजना! लग्न करून जुंपून घेतलं स्वतः ला.घर, संसार, नोकरी...काम काम आणि काम.अती ताणामुळे संपूर्ण प्रेग्नन्सी बेडरेस्ट घ्यावी लागली होती हिला.'

संजना संथपणे घास चावत बसली होती.बेला फटकळ आहे पण काय चुकीचं सांगतेय?सत्यच तर आहे.आपलं लग्न झाल्या झाल्या सासूबाईंना कामं उरकेनात आणि बाईच्या हातचं जेवण रुचेना.मग काय संजना होतीच!.घरातील कामं करुन ऑफिसला जायचं आणि परत आल्यावर पुन्हा घरकामाला जुंपून घ्यायचं.नोकरी करतो तरी संसाराकडे दुर्लक्ष करीत नाही हे सिद्ध करण्याची धडपड.नाहीतरी पुरूषांनी मदत करायची 'पद्धत' आहे कुठे ? त्यांनी फक्त आणि फक्त नोकरी करायची.संजनाने सुस्कारा टाकला.

मनातला सल दूर सारण्यासाठी तिने अनुष्काला विचारले,'उद्या तुझ्या आईचा वाढदिवस आहे ना,मग काय गिफ्ट घेतलंस तिच्यासाठी?'तशी अनुष्काचा चेहरा खुलला.तिने सॅक मधून एक पिशवी काढली.आतमधील कांथा साडी संजना समोर धरली.'ए वॉव, काय सुंदर साडी आहे गं,संजनाने साडीवरुन हात फिरवला.'आवडली?'अनुष्काने उत्तेजित होत विचारले.'अगं आईला पुष्कळ दिवसांपासून घ्यायची इच्छा होती मग म्हटलं आपणच तिला वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून देऊ.मम्मींना पण खूप आवडली ही साडी.'

'तू तुझ्या सासूला ही साडी दाखवलीस?'संजनाने दचकून विचारले.

'सत्यानाश'बेलाने कपाळावर हात मारला.'हिला जरा ट्रेनिंग दे सासरी कसं वागायचं ते,'बेला संजनाला म्हणाली आणि तिथून निघून गेली.

ऑफिसमधून घरी आल्यावर आधी अंघोळ करायची अनुष्काला सवय.पण आज तिला कंटाळा आला होता.अंघोळ न करता फ्रेश होऊन तिने कपडे बदलले आणि ती बेडरुम मधून बाहेर येणार तोच मम्मी, पप्पा आणि अनुज आपल्या विषयीच बोलत आहेत हे लक्षात आल्यावर दरवाजा अर्धवट उघडा ठेवून ती कान देवून ऐकू लागली.

'एव्हढी महागाची साडी द्यायची काय गरज आहे म्हणते मी,'मम्मी तावातावाने बोलत होत्या.'साधा वाढदिवस तर आहे.'

'मला पण बोलावलंय त्यांनी,'अनुज कंटाळलेल्या सुरात म्हणाला.'इतकं बोअर होतं ना त्यांच्याकडे, तिच्या बाबांशी काय बोलायचं तेच कळत नाही.'अनुष्का थक्क झाली.माझ्या आईवडीलांबरोबर थोडा वेळ घालवणं याला कठीण जातं आणि मी याच्या मम्मी पप्पांबरोबर कशी रहात असेन याचा कधी विचार केलाय का ह्याने?

'अरे‌ नको जाऊस इतका कंटाळा येत असेल तर! काहीतरी कारण काढून टाळ.'मम्मींनी अनुजला सल्ला दिला.

'व्वा, असं तू म्हणतेस?' पप्पा मम्मींना म्हणाले.'जेव्हा मी तुझ्या माहेरी यायला टाळायचो तेव्हा तर तुझ्या नाकावर राग यायचा.'

'राग येणारच ना!'मम्मी ठसक्यात बोलल्या.'आमचे अण्णा किती स्मार्ट होते.अनुष्काचे बाबा म्हणजे', मम्मी हळू आवाजात काहीतरी कुजबुजल्या आणि अनुज आणि पप्पांनी हसत एकमेकांना टाळ्या दिल्या.अनुष्का उदासपणे बेडवर बसून राहिली.स्वतःच्या आई वडिलांची टिंगल केलेली कुठल्या मुलीला आवडेल?

'जास्त काम असल्याने ‌वाढदिवसाला येऊ शकत नाही' अशा अनुजच्या मेसेजला तिने‌ ताबडतोब ओके असा रिप्लाय दिला.

'अरे वा,आज खोबऱ्याच्या वड्या'म्हणत सर्व जण अनुष्काच्या डब्यावर तुटून पडले.

'आईने‌ जावईबापूंसाठी पाठविल्या होत्या वाटतं'संजनाने वडी तोंडात कोंबत विचारले.'तुला कसं कळलं?'अनुष्काने‌ आश्चर्याने विचारले तशी संजनाने डायलॉग मारला,'जानी जिस स्कूलमें तुम अभी अभी आए हो उसके हम सिनियर स्टुडंट हैं.'

सगळेजण कामात गर्क असतांनाच अचानक स्क्रीन वर ऑफिस ची email झळकली.'पुढच्या शनिवारी Rainbow water resort वर one day picnic ठरली आहे तरी कोण कोण येणार आहे त्यांची यादी आपापल्या team leader कडे द्यावी.'

सगळीकडे चैतन्याची लहर पसरली.पूर्ण महिनाभर कामाचा पिट्ट्या पडला होता त्यावर असा काहीतरी उतारा हवा होताच.त्यामुळे लंच टाईम मध्ये सगळ्यांच्या तोंडी ‌हाच विषय होता.

फिमेल स्टाफचे नकळत दोन ग्रुप्स पडले होते.एक married आणि दुसरा unmarried मुलींचा.

'पुढच्या शनिवारी मला नाही वाटत येणं जमेलसं.'शिवानी पडेल आवाजात म्हणाली.'विहंगची टेस्ट आहे Mondayला.त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही मागच्या महिनाभरात.त्याची तयारी करुन घ्यायची आहे.'

'अगं पण तुझा नवरा करुन घेईल की त्याचा अभ्यास!'

'तो?'कपाळाला हात लावत शिवानी म्हणाली.'विहंगला शेजारी अभ्यासाला बसवून कानात इयरफोन घालून नेटफ्लीक्सवरचे सिनेमे बघत बसतो.शेवटी मलाच विहंगला दामटून दुमटून बसवावं लागतं अभ्यासाला.'

'आमच्या घरी कसलीशी पूजा आहे रविवारी.त्याची तयारी करायला घरी रहायचं आहे.सासूबाईंनी आधीच बजावलं आहे.'साक्षी पडेल आवाजात म्हणाली.

'त्यांचा कुलदीपक नाही का करणार स्वतः च्या घरच्या पूजेची तयारी?'

'छे, त्याने तर केव्हाच declare केलंय, शनिवारी कुठली तरी महत्वाची मॅच आहे आणि तो दिवसभर टी.व्ही.समोरुन हलणार नाहीये म्हणून.'

राधिका गप्प गप्प होती,disturb दिसत होती.

 'राधिका', तिच्या डोळ्यांसमोर हात हलवताच ती भानावर आली.'मी नाही येऊ शकणार picnicला.'सर्वांच्या प्रश्नार्थक मुद्रा बघून तिने खुलासा केला,'माझी त्या दिवशी वकिलांकडे अपॉइंटमेंट आहे.मी आणि ऋत्विक डिव्होर्स घेतोय.'सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स पसरला.'माझ्या वडिलांची अचानक बायपास करायची ठरली.इतकी मोठी रक्कम कमी वेळात उभी करणं शक्य नव्हतं म्हणून मी त्यांना माझ्या सेव्हिंगमधले पैसे दिले ते माझ्या नवऱ्याला, ऋत्विक ला अजिबात आवडले नाही.तो अतिशय संतापला.मग काय,भांडाभांडी वादावादी.त्यातून हे प्रकरण इतके चिघळले की आता आम्ही डिव्होर्स घेणार आहोत.पप्पांना हे अजिबात माहीत नाही ते बरंय नाही तर बिचाऱ्यांचा हार्ट फेल ‌होईल.'

राधिकाचं बोलणं ऐकून सगळ्याजणी निःशब्द झाल्या.प्रत्येकीच्या मनात एकच विचार घोळत होता, ज्या आई-वडिलांनी खस्ता खाऊन वाढवलं,शिक्षण देऊन पायावर उभं केलं त्यांच्यासाठी खर्च करण्याचा मुलींना काहीच अधिकार नाही?

 तिकडे unmarried मुलींच्या ग्रुपमध्ये वेगळेच डिस्कशन चालू होते.

'ए डार्क रंगाचा ड्रेस घालायला हवा म्हणजे भिजल्यावर अंग दिसणार नाही.'

'तो पवन गुप्ता नको यायला यार,कसा आधाशासारखा बघत असतो मुलींकडे!'

'ओ शिट, त्या दिवशी मोहित बरोबर मूव्हीला जाणार आहे मी!'छांदसी ओरडली.' इतके दिवस रिलेशनशिप मध्ये आहात तर लग्न का नाही करत तुम्ही?

' मला लग्न इतक्यात नाही करायचं . ममी पपा ऐकायलाच तयार नाहीत. माझं लग्न एकदाचं करुन दिलं की सुटले असं वाटतंय ‌त्यांना.पण मला घरची जबाबदारी, कामं, ॲडजस्टमेंट जमेल की नाही याची भीती वाटते यार!'

'त्या दिवसात माझे पिरीयडस् आहेत.'मुग्धा हिरमुसली होती.

तिकडे मुलांच्या ग्रुपमध्ये असल्या डिस्कशनला थाराच नव्हता.त्यांना काय एक टी-शर्ट, जीन्स मध्ये रिसॉर्टला जायचं, भिजताना एखादा जुना टी-शर्ट आणि बर्म्युडा चढवला की झालं.

आणि घरच्या अडचणी म्हणता,त्या सोडविण्यासाठी आई किंवा बायको आहेत की!त्यांचे डिस्कशन वेगळ्याच विषयावर चालले होते.दारु कुठली आणावी?ती आणायची जबाबदारी कोण घेणार? जेवताना बटर चिकन की बिर्याणी?इ.इ.

पिकनिकची जबाबदारी घेतलेल्या तपन मुखर्जी ने विचारले,कोण कोण येणार आहे?साऱ्या मुलांचे हात वर गेले.

तपन मुलींच्या ग्रुपमध्ये आला आणि त्याने तोच प्रश्न मुलींना विचारला.फक्त चार जणींचाच होकार आहे हे पाहून तो चकीत झाला.

'Why so less number?'त्याने विचारले.

'जावे त्याच्या वंशा', संजना उत्तरली.काहीच न कळल्याने तपन मुखर्जी संजना कडे आश्चर्याने पहात राहिला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama