इवलीशी चिमणी
इवलीशी चिमणी


जीवनाच्या वाटेवर काही माणसं अशी भेट्तात की त्यांचा थोडासा सहवासही खूप काही शिकवून जातो. माझ्या सुदैवाने अशी माणसं मला पावलोपावली भेटत गेली. तसं पाहिलं तर जी माणसं हवीहवीशी वाटतात त्यांच सहवास लाभत नाही, जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही. हा अनुभव कमी जास्त फरकाने सगळ्यांनाच येतो. एवढं मात्र खात्रीने सांगता येईल की, काही नाती अशी असतात की ते रक्ताची नसली तरी जिव्हाळ्याची असतात आणि अतूटही; कारण त्यात स्वार्थाचा लवलेशही नसतो. एखादं लहान मुलं अनोळखी व्यक्तीलाही गोड स्मित देतं अगदी (आपलं माणुस, परकं माणुस असा भेदभाव करण्याचं शहाणपण आलेलं नसतं). निरागस नातं असतं. ते नातं दिवसेंदिवस वृद्गधिंगत होत जातं. कारण ते नातं स्वार्थाने बरबटलेलं नसतं. एक विशिष्ट अस अंतर ठेवल तर ते टिकवणं फार अवघड नसतं. तसं पाहीलं तर क्षणिक भेटीतही असं अतूट नात केंव्हाही, कुठेही निर्माण होवू शकतं. नाहीतर आख्ख आयुष्य शेजारी असलेल्या दोन कारकूनांना एकमेकांच्या असण्या-नसण्याने काय फरक पडतो? नातं असतं दोन सुंदर मनाचं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं रेशमीबंधन. एकाला काटा टोचला तर दुस-याला वेदना होणं. समोरच्याचं दुःख पाहून याचेच डोळे भरून येणं. निसर्गानं शिकवलेलं जणू जीवनगाणं. झाड्राची परोपकारिता, दुधाचे वात्सल्य, सागराची विशालता; धीरगंभीर होवून सर्व नद्यांना आपल्यात सामावून घेणं.
इवलीशी चिमणी अंगणी माझ्या आली. टिपायचे होते तोवर टिपले दोन-चार दाणे. अंगणी रमतारमता घरट्यात माझ्या नकळत विसावली. आधार शोधायला आली, आणि जणू माझाच आधार झाली. नियती अनं नशिबाला तर केंव्हाच पुरुन उरली. जन्मजात शहाणपण, नातं कसं निभावावं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण. कधी रुसवा नाही की नाही भांडण. क्षणिक अबोल की सर्वकाही पूर्वपदावर. इवलिशी चिमणी अंगणी माझ्या आली. रमली, दमली कधी कधी थोडंसं भांड्ली. कधी झाली माझी आई. कधी माझ्या बाळाची हो ताई. कधी कर्तव्यकठोर बाप माझा झाली. मायेची माऊली, सांजची सावली. चंदनापरी झिजली, दिव्यापरी तेजाळली. प्रेमाची भुकेली पण प्रेमच वाटून गेली. घरटं माझं सावरताना कधी भांबावली तर कधी अबोल पण कर्तव्य कधीच नाही विसरली.आली तशी अचानक गेलीही अचानक. पण तीन बुकं न शिकताही बहिणाबाई झाली. पंखास माझ्या बळ देऊन गेली. जगण्यास माझ्या आली उभारी. ती नसती तर काय झालं असतं आयुष्याचं?
आली तशी अचानक भुर्रकन उडून गेली. इवलीशी चिमणी अंगणी माझ्या आली.