इण्डियन फ़िल्म्स- 1.10
इण्डियन फ़िल्म्स- 1.10


लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
1.10
माझं प्रेम...
ही त्या उन्हाळ्याची गोष्ट आहे, जेव्हा मी आणि तान्या पद्गरदेत्स्काया कम्पाऊण्डमधे एकत्र हिंडायचो आणि तान्या मला सील-मासा (अस्ताव्यस्त, बोजड मुलाला सील-मासा म्हणून चिडवतात- अनु.) म्हणायची, आणि हे बघून खूप हसायची की मला सील-माशासारखे असण्याबद्दल आश्चर्य वाटतं.
एका संध्याकाळी आम्ही लग्न करायचं ठरवलं. हे तर स्पष्टच होतं की आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आम्हाला हे सुद्धा नक्की माहीत होतं की आमचे आई-वडील या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. कारण असं आहे की, माझी मम्मा शहरातल्या एका इन्स्टीट्यूटमध्ये लिटरेचरची टीचर होती आणि म्हणून तान्याचे मम्मा-पापा तिला ’बुद्धिजीवी’ म्हणून शिव्या द्यायचे. या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे – हे तर मला कळत नव्हतं, पण मला एवढं नक्की माहीत होतं की तान्याचे आई-वडील माझ्या मम्माशी दोस्ती करण्याऐवजी स्वतःला गळफास लावून घेतील. माझे पापा पण तान्याच्या आई-वडिलांबद्दल अशा-अशा गोष्टी सांगायचे, ज्यांना साधारण पुस्तकात लिहिता येत नाही, आणि कळत नव्हतं की ते मम्माची बाजू घेताहेत, की त्यांनासुद्धा तान्याचे आई-वडील आवडत नाही.
म्हणजे, आमच्यासमोर फक्त एकच मार्ग होता. घरातून पळून जाण्याचा.
मला आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बागेत एक गुप्त ठिकाण माहीत होतं, जोपर्यंत हिवाळा सुरू नाही होत, आम्ही तिथे राहू शकत होतो. पुढचं पुढे बघता येईल.
“तर, तान्” मी आपल्या वाग्दत्त वधूला विचारलं, “तू माझ्याबरोबर नेहमीसाठी राहायला तयार आहेस का – सुखातही आणि दुःखातही?”
“ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही,” तान्या पद्गरदेत्स्कायाने गंभीरपणे उत्तर दिलं. आणि आम्ही निघालो.
आम्ही त्या गुप्त ठिकाणावर पोचलो, आणि लगेच पाऊस सुरू झाला. विजा कडकडू लागल्या, जमीन हलू लागली, कदाचित भीतीमुळे असेल किंवा आनंदामुळे सुद्धा असेल. आणि आम्ही एकमेकाला चिकटून बसलो होतो, एका मोठ्या खुंटावर जे एका झाडाला करवतीने कापल्यावर शिल्लक उरलं होतं किंवा कदाचित झाडंच तसं तुटलं होतं.
“तान्,” मी म्हटलं, “तू समजून घे की तुझ्यासाठी मी माझ्या जीवनाचं बलिदानसुद्धा द्यायला तयार आहे!”
“ते ठीक आहे रे, पण, जर तू आपल्या जीवनाचं बलिदान दिलं तर माझ्याकडे कोण लक्ष देईल? माझंतर आता तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नाहीये!”
“अगं, नाही, मी लक्ष ठेवीनच, पण खरंच, जर गरज पडली तर जीवनाचे बलिदानसुद्धा देईन!”
“ऐक,” तान्याने जोरदार आवाजात म्हटले, “तू एकदम मूर्ख आहेस! तुला फक्त जीवनाचं बलिदान द्यायचीच तलफ़ आली आहे, पण कशासाठी – याला तू महत्व देत नाहीये!”
“खरं आहे,” मी पटकन सहमती दाखवली. “मग नाही देणार बलिदान. चौऱ्याण्णव वर्षे जगेन, पणजी-आजी सारखा, आणि जोपर्यंत सगळ्यांची अंतक्रिया करत नाही, तोपर्यंत नाही मरणार.”
“आता कसं बोलला,” तान्या हसली.
थोडा वेळ आम्ही, एखाद्या फालतू फिल्मच्या नायक-नायिकेसारखे, एकमेकाच्या पाठीला पाठ टेकून, चुपचाप, पिसाट पावसात भिजत बसलो होतो.
मग तान्याने म्हटले,
“ऐक, मला थोडी थंडी वाजतेय.”
“आणि मला पण,” मी म्हटलं.
आम्ही आणखी थोडा वेळ चुपचाप राहिलो.”
“अगदी असेच?” तान्याने विचारलं.
“ऐक तान्, चल प्रॉमिस करूं या की आजपासून बरोब्बर तेरा वर्षानंतर, जेव्हा आपण अठरा वर्षाचे झालेले असू, तेव्हा आपण ठीक याच जागेवर भेटू, रजिस्ट्रेशन ऑफ़िसमध्ये जाऊ आणि तेव्हा अगदी पक्कं लग्न करू, पण आत्ता, आपल्याला जावं लागेल – घरी जाऊ या.”
“जाऊ दे, हे काही ठीक नाही झालं,” तान्याने उत्तर दिलं. “एक ताससुद्धां एकमेकांसोबत नाही घालवला...” आणि तिला पटकन राग आल्यासारखं वाटलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं,
“तसं, तू बरोबरच म्हणतोय, शंकाच नाही. पण तेरा वर्षांने – एक्ज़ेक्ट्ली अगदी याच जागेवर?”
“शिलेदाराचे प्रॉमिस,” माझ्या तोंडातून निघून गेलं, आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की ‘शिलेदार’ म्हणजे कोण असतात...
वादळ अजूनही तसंच बेफाम होतं, आणि आम्ही, अगदी ओले चिंब आणि प्रसन्न मनाने आपआपल्या घराकडे निघालो. आणि जेव्हा मी आपल्या क्वार्टरची घंटी वाजवली, तर क्षणभरासाठी मला भिती वाटून गेली : मी तर बरोब्बर तेरा वर्षांने त्या ठिकाणी पोहोचून जाईन, जिथे आम्ही आत्ता गेलो होतो – मी प्रॉमिस पण केलं आहे, पण जर एवढ्या वर्षांत तान्या सगळं विसरून गेली तर?...
पण मी लगेच याबद्दल विचार करणं बंद केलं, कारण मम्माने दार उघडलं आणि सांगितलं की तिच्या जवळ माझ्यासाठी एक सरप्राइज़ आहे : तिने माझ्यासाठी टॉय-ट्रेन विकत आणली आहे, मी कित्ती दिवसापासून या टॉय-ट्रेनचे स्वप्न पाहत होतो. हो, आणि तान्यासुद्धां काहीच विसरणार नाही! तिने आतापर्यंत एकदा तरी मला धोका दिला आहे का? नाही. म्हणजेच, आमच्या मीटिंगबद्दल काळजी करण्याची काही गरज नाहीये!