हव्यास
हव्यास
घुसमट-६ हव्यास
"आरं, पाह्यतोस काय असा? धर तिला आन् पाड उताणी. लय माजल्यावनी कराया लागलीय. मरायचं म्हंती तर मरू दे. वत हा डबा तिच्या डोस्क्यावर आन् लाव काडी." रखमानं आपल्या एकुलत्या एक सुनेला, इंदूला घट्ट पकडून धरलेले होते. नेमकाच बाहेरून आलेला तिचा मुलगा, चंद्रकांत हे सारे दृश्य आश्चर्य चकित होऊन बघत उभा होता.
"आरं, बाईल येड्या, तुह्या कानात काय बोळं खुपसलं का काय म्हंत्ये म्या. आयकायला येतं का न्हाई कायी?" सुटका करण्यासाठी झटका देत असलेल्या इंदूला आपल्या गुडघ्याने दाबून धरत रखमा चंदूला बोलली.
"अगं आये, काय करतीस काय ह्ये? काहून मारतीस तिला? तिला मारून ज्येलात सडत बसायचं हाय काय तुला?" आईच्या तावडीतून आपल्या बायकोला सोडवत चंदू म्हणाला.
त्यानं बायकोला सोडवलं म्हणून रखमाचा तिळपापड झाला होता. मागच्या घटनेचा अत्यंत वाईट असा अनुभव त्याच्या गाठीशी होता.
चंद्रकांत आणि त्याची आई रखमा दोघंच रहात होते. सखाराम पंत, चंदूचे वडील पंधरा वर्षां पूर्वीच कॅन्सरच्या आजाराने वारले होते. त्यांच्या आजारावर पाण्या सारखा पैसा खर्च झाला होता. चार पैकी तीन एकर शेती विकावी लागली होती. घरातली सर्व मायपुंजीही संपली होती. चंदूला घेऊन रखमाला घर सांभाळणे क्रमप्राप्त होते. चंदूचं शिक्षण, कपडा लत्ता, घराचा खर्च, लग्न कार्ये, औषध पाणी इत्यादी सर्व भागवता भागवता रखमाच्या नाकी नऊ येत होतं. जवळ पैसे नसतील तर कसे हाल होतात हे ती स्वतः अनुभवत होती. शेती ठोक्याने देऊन ती लोकांच्या शेतात रोजमजुरी करू लागली होती. कधी कधी अर्ध पोटी राहून पैसा जमा करत होती. घरखर्च भागवून, चंदूच्या शिक्षणा साठी खर्च करत होती. पण बापाचा आधार सुटलेला चंदू फार काही शिकलाच नाही. सातवी आठवी मधूनच तो घरी बसला होता. तो आता आई सोबत रोज मजूरी करू लागला होता. दोघे मिळून बऱ्या पैकी पैसा मिळवायला लागले होते. शेवटच्या क्षणी काही जवळ असावं म्हणून रखमा पैसा धरून होती. मात्र तिची पैशाची हाव वाढतच गेली होती. आता तर तिला त्या पैशाचं व्यसन लागल्या सारखंच झालं होतं. जास्तीतजास्त पैसा कसा अन् कोणत्या मार्गाने मिळवता येईल? याकडे तिचे लक्ष लागून राहिले होते.
चंदू आता बऱ्या पैकी शेतीकामात तरबेज झाला होता म्हणून तिने जमीन घरी करायला घेतली होती. पहिल्याच वर्षी तिला निसर्गाची चांगली साथ लाभली होती. जवळ पास एक लाखाचा कापूस झाला होता. आंतरपीक म्हणून घेतलेल्या उडीद मुगाने घरी लागतील एवढ्या डाळी आणि वर्षभर खायला पुरेल एवढे धान्य घरात आले होते. बाहेर रोजमजुरी सुरूच होती. चंदू वयात आला तसा तिच्या डोक्यात त्याच्या लग्नाचा विचार सुरू झाला होता.
दूरच्या नात्या मधील एक मुलगी सांगून आली तेव्हा रखमानं सपशेल लोळून घेतलं होतं. 'मह्या कडं खर्च करायला पैसा न्हाई. लय मोठा थाटमाट करण्यापक्षा, लग्नाकरता अवाढव्य खर्च करण्यापक्षा तीन लाख हुंडा द्या आन् मुला मुलीच्या अंगावर काही किडुक मिडुक घाला. चार चौघांच्या साक्षीने साध्या पद्धतीने लग्न लावून द्या.' ती पाहुण्यांना म्हणाली होती. पाहुण्यांनाही ते पटलं होतं. त्यांनी तिच्या घर संसारा साठी लागणारे भांडे वगैरे घेऊन दिले होते, तीन लाखांच्या ऐवजी दोन लाख हुंडा कबूल केला होता. मात्र सोने, भांडे, यावर बराच खर्च झाल्यामुळे एक लाख रुपये द्यायचे बाकी राहिलेले होते. ठरल्या प्रमाणे पाच पंचवीस पाहुणे सोबत घेऊन लग्न लावून सून, निर्मला घरात आणली होती.
निर्मलाचं एक वर्ष अतिशय कोडकौतुकात, आनंदात गेलं होतं. या वर्षभरात राहिलेला हुंडा, एक लाख रुपये येणार होते ते आलेच नव्हते. रखमानं त्याविषयी चुकूनही 'ब्र'शब्द काढला नव्हता. मात्र मनातल्या मनात तो वसूल करण्याची योजना आखून ठेवली होती. तिला हुंडा व्याजा साहित वसूल करायचा होता. चंदू आणि निर्मलाचे जवळ पास दहा तोळे सोन्याचे दागिने घरात होते, ते ढापायचे होते. आणि एक दिवस ती भयंकर घटना घडली होती.
चंद्रकांत नेहमीप्रमाणे न्याहारी करून शेतात कामाला गेलेला होता. निर्मळ आणि रखमा दोघींनीही घरातली कामे उरकून जेवणं केले होते. थोडासा आराम करावा म्हणून रखमा सुनेला म्हणत होती, .....
"निर्मला, बईस बाई उलीसक. काम रोजचंच हाय. त्ये का चुकतं व्हय? हेल्याला दसरा कधी चुकला का? आगं, बाईच्या जातीला सदा न कदा काम जणू काय पाचवीला पुजल्यालंच आसतं." रखमा प्रेमाने सुनेला म्हणत होती.
"आई, एवढी सैपाक घरातली झाडझूड करून येते." निर्मलानं उत्तर दिलं.
"बरं बरं! घे झाडून. तव्हर म्या परसाकडीला जाऊन येत्ये." असं म्हणत रखमा डबा घेऊन बाहेर निघून गेली.
निर्मला स्वयंपाक घरातलं काम आटोपून समोरच्या ओसरीत येऊन बसली. तेवढ्यात रखमाही आली. तिनं पायावर पाणी घेतलं. तोंडात पाणी घेऊन चूळ भरली. हातपाय पुसत पुसत सरळ किचन मध्ये गेली. पुन्हा काहीतरी आठवल्या सारखं करत लगेच बाहेर आली. दोघी सासू सुना गप्पा मारायला बसल्या.
"निर्मला, तुह्या बापाचं काय चालू हाय गं? काय निरुप न्हाई ना बातमी न्हाई?" रखमा म्हणाली.
"त्याह्यची लय परेशानी सुरू हाय म्हणत्यात. श्येतात काय बी पिकलं न्हाय. पेरणीत घेतल्यालं कर
्ज डोस्क्यावर तसंच हाय. हुंड्याचे पैसे द्यायचे राह्यल्याचं लय वंगाळ वाटतं, आसं म्हणत हुत्ये." निर्मला म्हणाली.
"आगं, त्याह्यला सांग, काय फिकीर करू नका म्हणा. पैसे काय आजचे ऊंद्या येतीलच. सध्या न्हाई दिलं तरी चालंल म्हणा." रखमा म्हणत होती. तेवढ्यात खालच्या आळीतली सखू आली.
"या वं सखूबाय. बसा." रखमा म्हणाली.
"काय चालल्या गप्पा सासू सुनाह्यच्या? लय ईचारानं बसल्यात. जणू माय लेकीच." सखू बुड टेकवत म्हणाली.
"म्हणलं तं मायलेकीच नव्हं काय? आपल्या पदरात कुठं लेक हाय? जी आली तीच आपली लेक म्हणायची. न्हाई का?" रखमा आज भलतीच मूडमध्ये दिसत होती. तेवढ्यात आणखी दोघी तिघी तिथं आल्या. निर्मलानं त्यांना पाणी दिलं.
"निर्मला, च्या ठिव बरं बाई चार पाच कप." रखमानं सांगितलं तशी निर्मला उठून स्वयंपाक घरात गेली. एक पातेलं घेतलं. त्यात पाच कप पाणी घातलं. दोन कप दूध घातलं. साखरेचा डबा काढला. सहा चमचे साखर घातली आणि पातेलं गॅस शेगडीवर ठेवलं. लायटर घेऊन गॅस पेटवता क्षणीच एकदम भडक उडाला. ती शक्य तितक्या जोरात किंचाळली. तशी रखमा, सखू आणि इतर बायका किचनमध्ये पळाल्या. किचनमध्ये निर्मला पूर्णपणे भाजली होती. तिच्या अंगावरचे संपूर्ण कपडे जळाले होते. रखमानं ओरडतच तिला कवटाळलं. रखमाच्याही अंगाला भाजलं. सर्व बायकांनी निर्मलाला बाहेर काढलं, तिच्या अंगावर थंड पाणी ओतलं. घरातली एक साडी पटकन तिच्या अंगावर कशीतरी गुंडाळली. तोवर दारात खूप गर्दी झाली होती. कुणी तरी पोलिसात फोन केला. आवाज करतच दारात पोलीस गाडी, रुग्णवाहिका येऊन उभी राहिली.
पोलिसांनी तिथे जमलेल्यांचा जवाब घेतला. निर्मलाच्या आई वडिलांना फोन लावून ही दुर्घटना कळवली. त्यांना पोलीस स्टेशनला यायला सांगून पंचनामा पूर्ण केला आणि अपघात ग्रस्त जळका देह रुग्णवाहिकेत टाकून जवळच्या हॉस्पिटलला पाठवला.
दवाखान्यात डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पटापट उपचार सुरू केले. चार तासांनी निर्मला शुद्धीवर आली. डॉक्टरांनी पुन्हा एकदा पोलिसांना कळवले. पोलीस येई पर्यंत निर्मलाचे आई वडील सुद्धा दवाखान्यात आले. त्यांना पाहताच विहिणबाईच्या गळ्यात पडून रखमानं हंबरडाच फोडला. तिचे प्रेम नाटकी आहे हे देवाच्या देवालाही कळले नाही.
पोलीस आले, डॉक्टरांच्या परवानगीने निर्मलाच्या आई वडिलांसमोर तिचा जवाब घेतला. 'गॅसच्या भडक्यानेच भाजल्या'चे तिने सांगितले. आई वडिलांनीही या संदर्भात 'आमची काही तक्रार नसल्याचे आणि तो केवळ एक अपघात असावा' असे मत नोंदवले.
पोलिसांनी घरी जाऊन पुन्हा एकदा गॅस सिलेंडरची तपासणी केली. सिलेंडर मधील गॅस संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. सिलेंडरची नळी शेगडीच्या पाईपजवळ किंचितशी चिरलेली दिसली. गॅस लिकेज झाल्याने ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षण नोंदवण्यात आले. तेवढयात दवाखान्यातून डॉक्टरांचा फोन आला म्हणून पथक परत दवाखान्यात गेले. तेथे निर्मलाची प्रकृती परत चिंताजनक झालेली होती.
खूप प्रयत्न करूनही डॉक्टर निर्मलाला वाचवू शकले नाही. तिची प्राणज्योत मालवली. तिथे एकच गदारोळ झाला. त्या गदरोळातच पोलिसांनी त्यांचे सारे सोपस्कार पार पाडले. बऱ्याच वेळानंतर रडारड थांबवून अंतिम संस्कारा साठी निर्मलाच्या आई वडिलांच्या सहमतीने चंदू आणि रखमाच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. निर्मला अशा तऱ्हेने (घडवून आणलेल्या?) अपघातात मरण पावली. तिच्या जळत्या चिते सोबतच पुन्हा एक योजना रखमाच्या डोक्यात जन्म घेत होती हे कुणालाच कळले नाही. मात्र एक दिवस ती झोपेमध्येच आपण आपली पाठ थोपटून घेत बरळली, 'कसं डोस्कं चालिवलं? या कानाची त्या कानाला खबर नाही झाली. आता पुढच्या येळला दुसरंच काय तरी काढावं लागंल.' चंदूनं हे ऐकलं. तो अपघात नसून घात होता याबद्धल त्याची खात्री झाली.
पुन्हा जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आईला बोलून दाखवले, ..
"कशाला पुन्हा एका पोरीचं आयुष्य बरबाद करायचं? मला आता लगीनच करायचं न्हाई." चंदू बोलला.
परंतु आई रखमाच्या आग्रहा खातर चंदू परत एकदा बोहल्यावर चढला. अग्नीला प्रदक्षिणा घालून इंदू चंदूची पत्नी म्हणून या घरात आली. 'हाच अग्नी एक दिवस आपल्या जीवावर उठेल' हे तरी कुठे तिला ठाऊक होते? निर्मला सारखंच एक वर्ष सुखात गेलं. इंदूला दिवसही गेले. परंतु रखमाला तो वंशाचा दिवा की पणती एवढ्यात नकोशी वाटत होती. तिने इंदुचा छळ करायला सुरुवात केली. मात्र इंदू निर्मला सारखी सहन करणारी नव्हती. ती उलटून बोलू लागली. रखमाला ते सहन झाले नाही. आणि आज त्या कुरबुरीचे रूपांतर अशा कडाक्याच्या भांडणात, धराधरीत झाले. निर्मला प्रमाणेच इंदूलाही जाळून जाळून मारण्याचा बेत चंदूमुळे फसला. 'ती उलटून बोलल्याचा राग आल्याचं' असं सांगून तिनं चंदूची मनधरणी केली.
आता त्या घरात तिघेजण राहू लागले. परंतु तिघेही अबोल, निर्जीव बाहुल्यां प्रमाणे वावरु लागले. मनाची घुसमट मोकळी करायला कुणालाच आता जागा राहिली नव्हती. नाही म्हणायला इंदू सारं झालं गेलं विसरून त्या पोटातल्या बाळाकडे लक्ष देत होती. एकांतात त्याच्याशी बोलत होती, झाली घटना विसरू पहात होती.