गुंतता हदय हे!! (पर्व १) भाग ४
गुंतता हदय हे!! (पर्व १) भाग ४


आर्याने फोनमधला मेसेज बघितला त्यात लिहिले होते,
"गुड मॉर्निंग!!"
ती स्वतःशीच पुटपुटली, "फक्त गुड मॉर्निंग!!"
मग तिने पण रिटर्न गुड मॉर्निंग मेसेज सेंड केला..
तर समोरून अनिशने फक्त एक स्माईली सेंड केला..
"बस इतकंच..." आर्या थोडीशी हिरमुसली..
इतक्यात तिचं लक्ष घड्याळाकडे गेले.. ती पटकन आवरून ऑफिसला पळाली.
स्निग्धाला बरं नसल्यामुळे ती आज ऑफिसला येऊ शकणार नव्हती.. मग काय आर्या एकटीच ऑफिसला निघाली..
आज रोजच्यापेक्षा थोडी लवकरच आर्या ऑफिसला पोहचली.. सगळे सहकारी आपापल्या वेळेनुसार ऑफिसमध्ये येत होते.. आर्या कॉफी घेण्यासाठी तिच्या ऑफीसच्या कँटीनमध्ये गेली.. तर तिथे समीर एकटाच कॉफी पीत बसलेला होता. त्याच्या लॅपटॉप वर काहीतरी काम करत..
तसे तर आर्याचं समिरशी जास्त जमायचं नाही.. जमणार पण कसं, समीर बघावे तेव्हा ऑफिसमधल्या मुलींच्या घोळक्यात!!
त्यात स्निग्धा पण त्याच्यावर फिदा.. म्हणून का कोणास ठाऊक आर्याला तो अजिबात आवडत नसे..
पण आज त्याला एकटे बघून असेल की काय माहीत, पण आर्याला त्याच्याशी बोलावसं वाटत होतं..
पण नंतर तिने विचार केला, "नको बाबा, मी स्वतः हाक मारली तर उगाच चण्याच्या झाडावर चढेल. जाऊ देत..." आणि ती दुसऱ्या एका टेबलवर बसून मोबाइल चाळत कॉफी पीत बसली..
इतक्यात, समीरचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि लागलीच त्याने आर्याला हाक मारली व चेष्टेने म्हणाला, "अरे आज तू एकटीच, तुझी GF कुठेय? I mean स्निग्धा? सदानकदा तुझ्या अवतीभवतीच असते. म्हणून विचारलं..."
आर्याने रागात त्याच्याकडे बघितले.. पण त्याच्याशी नजरानजर होताच तिचा राग का कोण जाणे एकदम निवळला.
ती म्हणाली, "स्निग्धाला बरं नाही आहे, म्हणून ती नाही आली. पण आज तू इतक्या लवकर?"
चक्क आर्या आपल्याशी बोलत आहे याचा आधी समीरला विश्वासच बसत नव्हता.. पण त्याने स्वतःला सावरलं..
आणि म्हणाला, "अगं, आज एका क्लायंटबरोबर मीटिंग आहे.. म्हणून थोडे preparation साठी लवकर आलो.. जाईन आता ५-१० मिनिटात."
तो पुढे म्हणाला, "आज कधी नव्हे ते, तू पण तर लवकर आलीयेस. काही खास कारण? तुझी पण मीटिंग वगैरे??"
"तसे काही नाही. Any way you carry on. मी निघते.. मला भरपूर काम आहे.. पुन्हा बोलू bye..." असे बोलून आर्या कँटीनमधून निघून गेली..
आजचा दिवस रोजच्यापेक्षा खूपच बोर होता स्निग्धा नव्हती ना!!
ती असली की, नेहमी ऑफिसमध्ये आवाज,गोंधळ असायचाच..
तोपर्यंत दुपारही झाली.. तिला लंच एकट्याने करायलाही बोरं झालं होतं. पण भूकही लागली होती म्हणून ती लंचसाठी कँटीनमध्ये निघाली......
इतक्यात तिला शेखर म्हणजेच तिच्या बॉसचा फोन आला आणि त्याने तिला केबिनमध्ये तातडीने बोलवले.
आर्याने लंचबॉक्स पुन्हा आत ठेवला आणि ती शेखरच्या कॅबिनमध्ये गेली.
शेखरने आर्याच्या हातात एका नवीन प्रोजेक्टची फाईल दिली आणि या प्रोजेक्टचा इंचार्ज तिला बनविले पण तिला या प्रोजेक्टमध्ये समीर मदत करेल.. हेही सांगितले.
आर्याला खूपच आनंद झाला.. कारण हा तिचा पहिला असा प्रोजेक्ट होता जिथे ती इंचार्ज होती.. म्हणजे या प्रोजेक्टसंबंधीचे सगळे निर्णय ती घेणार होती..
पण या आनंदावर काही सेकंदातच विरजन पडले, जेव्हा तिला कळले की हा प्रोजेक्ट तिला समीरबरोबर करायचा आहे.
"झाले म्हणजे पुन्हा सगळं क्रेडिट हाच घेऊन जाणार..." आर्या मनात पुटपुटली.
तेवढ्यात समीर पण तिथे आला व त्याने शेखर आणि आर्याला आजच्या मीटिंगचे प्रोजेक्टबद्दलचे डिटेल्स दिले.. आणि लंच नंतर त्यावर डिस्कशन करू असे सांगितले. समीर आणि आर्या दोघेही आपापल्या डेस्ककडे निघाले..
हो, तुम्ही एकदम बरोबर विचार केलात!!
ती आजची सकाळची मीटिंग त्याच प्रोजेक्ट संबंधात होती.. जिथे समीर गेला होता..
आर्या स्वतःच्या डेस्कजवळ आली, इतक्यात तिचे लक्ष समीरकडे गेले.. तोही तिलाच बघत होता.. त्याने तिला छानशी स्माईल दिली..
आर्याला काहीच कळत नव्हते की, नक्की काय चाललंय!!
ती बॉटलमधले पाणी घटाघटा प्यायली आणि विचार करत मनातच म्हणाली, "आज स्निग्धा काय नाही आली तर काय काय घडले ऑफिसमध्ये आणि तो प्रोजेक्ट?? त्याबद्दल सगळं जर समीरला माहीत आहे तर मग मी त्या प्रोजेक्टची इंचार्ज कशी? बापरे, डोक्याचा भुगा होईल आता. जाऊ देत.. आधी लंच करू मग बघू."
असे बोलून ती कँटीनमध्ये लंचसाठी गेली..
तर तिथे समीर पण तिला जॉईन झाला लंचसाठी..
तिला समीरशी काय बोलावे हे सुचत नव्हते..
समीरलाही हे कळले..
मग काय त्यानेच बोलणे सुरू केले आणि आर्याला comfortable केले..
कधी नव्हे ते आज दोघेही एकत्र लंच करत खूप बोलले..
आर्याचे समीरबद्दल खूप सारे गैरसमज झालेले ते सगळे हळूहळू क्लिअर होत होते..
त्यांनतर त्यांची प्रोजेक्ट संबंधात शेखरबरोबरसुद्धा मीटिंग झाली आणि खूप साऱ्या महत्वाच्या माहितीवर ही चर्चा झाली..
आज आर्याला दुपारनंतर फोन बघायची पण फुरसत नव्हती.. ती घरी सुद्धा उशिरा आली.. आणि अजून काही दिवस तिला असाच उशीर होईल असेही तिने घरी सांगितले.. आणि सरळ झोपी गेली..
दुसऱ्या दिवशी तिने सकाळीच स्निग्धाला फोन केला.. तर तिच्या आईने मेसेज दिला की, स्निग्धा अजून तरी ३-४ दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही.
मग काय आजपण आर्या एकटीच ऑफिसमध्ये निघाली.. आज तिला ऑफिसमध्ये बोर होण्याचं कारणच नव्हतं, ते कारण म्हणजे तिचा प्रोजेक्ट पार्टनर, समीर पटवर्धन.. नाव जसे डॅशिंग, तसाच तो सुद्धा... कोणीही मुलगी बघताक्षणीच प्रेमात पडेल असा..
आर्या समीरबरोबरचं काम खूपच एन्जॉय करत होती.. तो खूपच हुशार होता.. म्हणूनच तर तो अस्मिता pvt ltd चा टॉप एम्प्लॉयी होता.. प्रोजेक्टचं काम अजून तरी २-३ दिवस चालणार होते.. शेखरने त्याच्यासाठी एक वेगळी केबिनही त्या दोघांना दिली होती.. त्यामुळे दोघांचा कॉफीपासून ते जेवणापर्यंतचा सगळा वेळ तिथेच जात होता..
पण यामुळे ऑफिसमध्ये त्यांची चर्चा खूपच गरम होती.. ऑफीसमधल्या मुली तर आर्यावर खुपच जळफळत होत्या.. आर्यालाही हे कळत होते.. पण आर्याला त्याची काहीच फिकर नव्हती.. तिला फक्त तिचं काम परफेक्ट व्हावे असे वाटत होते.
पण ही झाली आर्याची बाजू पण आपल्या समीरचं काय?? ते तरी विचार करा..
समीर तर आर्यावर तिला पाहिलेल्या पहिल्या दिवसापासून फिदा होता.. पण आर्याशी कधी मोकळेपणाने बोलायची संधी त्याला मिळालीच नव्हती..
नेहमी ती स्निग्धा अगदी ग्लूसारखी चिकटून बसलेली असे आर्याशी.. मग बोलणार पण कधी.. म्हणून त्याने शेखरला राजी करून आर्याला या प्रोजेक्टचं इंचार्ज बनवायला सांगितले होते..
सगळे काही त्याच्या प्लॅननुसारच सुरू होते.. आणि सोने पे सुहागा म्हणजे स्निग्धा आजारी पडली त्यामुळे त्याला या ३-४ दिवसात आर्याच्या अजून जवळ जायला मिळाले होते.
तसेच, तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आर्याला मागणीही घालणार होता.. मग आर्याचं उत्तर काहीही असो.. त्याला त्याची फिकर नव्हती.. पण तो अजून हे प्रेम मनात लपवून ठेवू शकत नव्हता..
इथे अनिशला समजत नव्हते की, आर्याला काय झालाय?
कारण न चुकता तो रोज आर्याला 'गुड मॉर्निंग' हा मेसेज सेंड करत होता.. पहिला दिवस सोडला तर तिने नंतर त्याच्या मेसेजला रिप्लायही केला नव्हता.. म्हणून त्याने आज तिला फोन करायचं ठरवले..
पण फोन करून बोलणार तरी काय?
त्याच्याकडे ठोस असे कारण ही नव्हते.. तो विचार करू लागला..
समीर आणि आर्या खूपच आनंदित होते.. आज त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज होणार होते.. ठरल्याप्रमाणे प्रेझेन्टेशन खूपच छान पार पडले.. क्लायंटलाही हे काम खूपच आवडलं.. त्यामुळे शेखरसुद्धा या दोघांवर खूपच खुश होता. तसेच सगळ्या स्टाफनेही दोघांचे फारच कौतुक केले.
आर्याला खूपच भरून आले. कारण हे तिचे स्वतःचं असं पहिलं प्रोजेक्ट होतं.. समीर जरी मदतीला असला तरी सगळ्यात जास्त मेहनत ही आर्याची होती..
इतक्यात शेखरने समीरला इशारा केला आणि समीरने ही तो ओळखला.. तो आता आर्याला काही बोलणारच होता की..
अचानक आर्याचा फोन वाजला.
आर्याने फोनच्या स्क्रीनवर बघितले तर तो फोन अनिशचा होता...
क्रमश: