गावाकडची दिवाळी
गावाकडची दिवाळी
गावाकडची ती मेहनती माणसं सकाळीच हा उत्साह घेऊनच शेतात भात कापणीसाठी निघायची. मुलांना सुट्टी असायची. बांबूच्या काठ्यांचा आकाश कंदील बनवायला आठ दिवस लागायचे. खळ्यात दांडीला अडकवून त्यात निरांजन ठेवले की रात्री सुंदर असा आकाश कंदील दिसायचा.
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या..
लक्ष्मण कुणाचा..आईबापाचा..
दे माई खोब-याची वाटी..
वाघाच्या पाठीत घाली काठी..!
हे बालगीत आठवलं की जाणीव होते दिवाळीची. दिवाळी हा एक आगळा वेगळा सण.. ज्याची आतुरता अगदी महिनाभर अगोदर असते. खरी दिवाळी आमच्या गावाकडची. तेव्हा दिवाळीत पाऊस नसायचा. गणपतीला आणलेले उरलेले फटाके दिवाळीसाठी उत्सवाला बांधून राखून ठेवले जात असत. पहिल्या आंघोळीला घरातली ज्येष्ठ मंडळी लवकर उठून आंघोळ करून ‘कारेट’ फोडायची मग मुलांना उठवायची. व्हायनात कुटलेले फॉव आणि फुटी चाय हा स्पेशल फराळ होता. त्यावेळी पहाटे प्रचंड थंडी असायची. ओल्या अंगाने कारेट फोडायचं.
पहिल्या आंघोळी दिवशी घर शेणाने सारवून रांगोळी काढली जायची. एवढय़ा थंडीत उठून आंघोळी करायची जीवावर यायचे. न्हाणीत पाणी कडकडीत तापलेले असायचे. माडाची चुडता आणि सुकी लाकडे जळत असताना जसजशी आंघोळ व्हायची, तशी घरातली माणसं मडक्यात पाणी ओतायची. कारेट फोडून ‘गोविंदा रे गोपाळा.. यशोदेच्या तान्ह्या बाळा’ बोलले जाते. गावाकडची ती मेहनती माणसं सकाळीच हा उत्साह घेऊनच शेतात भात कापणीसाठी निघायची. बांबूच्या काठय़ांचा आकाश कंदील बनवायला आठ दिवस लागायचे. खळ्यात दांडीला अडकवून त्यात निरांजन ठेवले की रात्री सुंदर असा आकाश कंदील दिसायचा. कुणी बोट पण बनवायचे. गावाकडच्या दिवाळीत फराळ मुंबईकर पाठवायचे. डब्यातून पण लाडू गावी बनवले जात होते. करंज्या वगैरे करायला तेव्हा वेळच नसायचा. कारण भातकापणीची घाई आणि पावसाचा लपंडाव असायचा.
सगळी आवराआवर करताना त्रेधातिरपीट व्हायची. पैसे मोजकेच असायचे. पगारदारांचा पगार व बोनस झाला की, कपडे खरेदी व्हायची एवढेच, पण शेती-भाती करणा-या कुटुंबात मोठी खरेदी नव्हती. भाऊबीजेला बहिणीला साडी आणि भावासाठी बहीण शर्टपीस-पँटपीस अथवा रेडिमेड शर्ट घ्यायचे. गुरांच्या वाडय़ात शेणाने वाडा बनवून कारेट अर्धी कापून छोटय़ा कपडय़ांची खोळ बनवून गौळणी बनविल्या जायच्या. त्यांची पूजा केली जायची. वाडी-उपार करून मग जेवणाचा कार्यक्रम असायचा. बटाटा-वाटाण्याची उसळ आणि गोडीडाळ हे सुग्रास जेवण असायचे. भात कापून झालेल्या कोप-यात भाताच्या काडीच्या पुढचा भाग कापून बॅटरी बनवली जात होती. मोठय़ा भागात कापडाच्या बॉलने लगोरी हा खेळ खेळला जायचा.
या सा-या आठवणीच आहेत. चार दिवस दिवाळीचे संपले की, पुन्हा आपला कारभार सुरू. ‘चार दिस चेडवाकडे मुंबयक जावन येतय’ असं म्हणून गेलेला शेतकरी येताना मात्र लाडू-करंज्या आणून अगदी कुटुंबात आनंद साजरा करतो.
