डॉक्टर राजेशचे घर
डॉक्टर राजेशचे घर
"डॉक्टर राजेशला कोकणात येऊन दोन आठवडे उलटले होते. दिवस बरे चालले होते. राजेशचा बराचसा वेळ इस्पितळातच जात असे. आठवड्या पूर्वीचा तो म्हतार्याचा अनुभव सोडला तर दिवस तसे सामान्यच गेले होते. आणि एका रात्री...
राजेश रात्री साडे नऊ वाजता इस्पितळातून घरी आला. जेवण गरम करून त्याने खाऊन घेतले. नेहमी प्रमाणे राजेश जेऊन झाल्यावर घरासमोरील अंगणात फेऱ्या मारत होता. त्या दिवशी अमावस्या होती. बाहेर काळाकुट अंधार पसरला होता. दूरवरून अधून मधून कुत्र्याचे रडणे कोल्हेकुई ऐकू येत होती. दूरच्या घरांमधील मिणमिणते दिवे दिसत होते.
राजेशला राहायला मिळालेले घर फार मोठे प्रशस्त होते. घराबाहेर अंगण. अंगणात एक आंब्याचे झाड त्याला कच्या कैरयाही लगडल्या होत्या. दोन मजली मोठाले असे घर होते. तसे पाहता राजेश एकटाच तेथे राहत होता. एकट्यासाठी त्याने खालील मजल्याच्या दोन खोल्या वापरात घेतल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या आतूनच एक जिना होता. वरच्या खोल्या सर्व बंद होत्या. राजेश कडे त्या खोल्यांची चावी होती पण वापरत नसल्याने त्याने त्या बंदच ठेवल्या होत्या.
रात्रीचे अकरा वाजून गेले होते. राजेश अंगणातून घरात आला आणि सर्व दार खिडक्या बंद करून घेतल्या. त्याच्या खोलीत जाऊन तो थोड्या वेळातच झोपी गेला.
साधारण मध्य रात्रीचे अडीज वाजले असतील. राजेश गाढ झोपेत होता आणि अचानक क्र्रर्र्रर्र क्र्रर्र्रर्र असा आवाज सुरु झाला. रात्रीची भयाण शांतता त्या विचित्र आवाजाने भंग झाली.
क्र्रर्र्रर्र... क्र्रर्र्रर्र... क्र्रर्र्रर्र.... आवाज सतत चालू होता. हळू हळू त्या आवाजाने राजेशची झोप मोड होऊ लागली. राजेशची झोप मोड झाली आणि तो अंथरुणात उठून बसला. त्या आवाजाची तीव्रता आता वाढली होती. राजेशला शंका आली कोणीतरी घराच्या आत आले आहे आणि जिन्यावरून चालत आहे. राजेश घामाने थबथबला होता. हृदयाचिः धडधड वाढत होती. राजेश लक्षपूर्वक ऐकू लागला त्या आवाजात अस्वस्थता आणि चाल्बिचलता होती. कोणीतरी जिन्यावरून खाली उतरत होते पुन्हा वर चढत होते. पुन्हा खाली पुन्हा वर... अशा काहीसा अंदाज राजेशला येत होता. खोलीचे दार राजेशने बंद करून घेतले होते. त्या दारा समोरच तो जिना होता. राजेश ला एका क्षणी वाटले उठून दार उघडून पाहावे कोण आहे ते. पण मनात एक अनामिक भीती उसळत होती. कदाचित यात त्याच्या जीवालाही धोका होता. काय करावे आणि काय नाही अशा अवस्थेत राजेश बसून होता. बाहेरचा आवाज संथपणे पण चालूच होता.
शेवटी राजेश जागेवरून उठला. रात्रीचे तीन वाजले होते. सर्वात आधी राजेशने खोलीतील दिवा सुरु केला. अर्धवट उघडी असलेली खिडकी त्याने पूर्ण उघडली. बाहेरचा थंडगार वारा घरात शिरला. दूरवर काळामिट्ट अंधार पसरला होता.
राजेश हळू हळू खोलीच्या दारापाशी आला. कडी काढून त्याने मागचा पुढचा विचार न करता झटक्यात दार पुढे लोटले, पण सावध पणे. तत्क्षणी तो आवाज तेथून नाहीसा झाला. समोर जिन्यावर राजेशची सावध-भीतीयुक्त नजर रोखली होती पण जिना रिकामा होता तेथे कोणीच नव्हते. राजेशने घरातील दिवे लावले. जिना चढून वरती जाण्याचा धीर राजेशला होत नव्हता. घरात एक प्रकारची मरण शांतता पसरली होती. बाहेर दूरवरून कोल्हेकुई आणि कुत्र्यांचे रडणे चालू होते. राजेश थोडावेळ दिवानघरात बसून राहिला.
काही वेळ गेल्यानंतर राजेश त्याच्या खोलीत येऊन बिछान्यावर अडवा झाला. समोर जिना दिसत होता. बराच वेळ राजेशला झोप लागली नाही. पहाटे कधीतरी राजेशचा डोळा लागला आणि तो झोपी गेला.
सकाळ झाल्यावर राजेश उठला. यंत्रवतपणे त्याने आपली तयारी उरकून घेतली आणि इस्पितळात निघून गेला. रात्री घडलेला प्रकार तो विसरला नव्हता पण कामात त्याने स्वतःला गुंतवून घेतले.
पुढचे काही दिवस अगदी सामान्य गेले. राजेशला तो आवाज पुन्हा ऐकू आला नाही, आणि राजेश हळू हळू तो प्रसंग विसरूहि लागला होता.

