STORYMIRROR

Pandit Warade

Drama Romance Tragedy

3  

Pandit Warade

Drama Romance Tragedy

एक होती कांचन (भाग-२)

एक होती कांचन (भाग-२)

4 mins
528

भाग-२

   पंकज ठीक दहा वाजता ऑफिसमध्ये पोहोचला. आल्या-आल्या सर्व स्टाफनं त्याला उठून अभिवादन केलं. सर्वांचं अभिवादन स्वीकारत सुहास्य वदनानं सर्वांना 'विश्' करत तो आसनावर स्थानापन्न झाला. गेल्या एक वर्षापासून तो या खाजगी कंपनीच्या स्टोअर्स विभाग प्रमुख पदावर काम करत होता.

    टेबलावर ठेवलेली एक एक फाईल पंकज चाळत होता. अधून मधून काही आवश्यक महिती आपल्या सहाय्यकां कडून मागवून घेत होता. सर्व फाईली नजरे खालून घातल्या नंतर त्यानं त्याची दैनंदिन कामकाजाची रूपरेषा असलेली डायरी काढून आजच्या तारखेच्या नोंदीवर नजर टाकली. इतर कामकाजा शिवाय आज आणखी एक जास्तीचं काम होतं, स्टोअर असिस्टंटच्या रिक्त जागा भरण्या साठी त्यानं कंपनी महा व्यवस्थापक श्री. देशमुख यांचेकडे बोलणं केलेलं होतं. अन् त्याची मागणी मंजूर सुद्धा झाली होती. त्या संदर्भातच श्री. देशमुखांनी सर्व विभाग प्रमुखांची मीटिंग बोलावलेली होती.

    "रमेssश, त्यानं आपल्या सहाय्यकास आवाज दिला.

    "यस् सर"

    "रमेश, मी जरा साहेबांकडे जातोय. तास दोन तास लागतील कदाचित्. काही पेपर्सवर माझ्या सह्या लागणार असतील तर पेपर्स घेऊन ये. मी सह्या करून ठेवतो. नंतर मात्र अति महत्वाच्या कामा शिवाय मीटिंग मध्ये डिस्टर्ब करू नकोस. मी अधून मधून फोन करत राहीन. काही आवश्यकता भासल्यास त्या वेळेस मला सांग. ओ के?"

     "ठीक आहे सर."

     रमेशने दोन तीन फाईली समोर आणून ठेवल्या.

     पंकज पेपर्सवर सह्या करत असे पर्यंतच इंटर कॉमची घंटी वाजली. त्यानं रिसिव्हर उचलून कानाला लावला.

   "यस सर. पंकज हिअर."

   "मि. पंकज , आपण अद्याप आपला विभाग सोडलेला दिसत नाही. आम्ही आपली वाट पहात आहोत." पलीकडून महा व्यवस्थापक देशमुखांचा आवाज आला.

   "निघालोय सर." त्यानं रिसिव्हर खाली ठेवला. अन् उठून साहेबांकडे निघाला.

    पंकज साहेबांच्या केबीनमध्ये शिरला, तेव्हा तेथे अगोदरच दोन तीन विभाग प्रमुख बसलेले होते.

     "या मिस्टर पंकज, आम्ही आपलीच वाट केव्हाची प्रतीक्षा करीत आहोत. आज आपणास दोन तीन विभागांच्या साठी सात-आठ असिस्टंट्स घ्यायचे आहेत. त्या साठी काही उमेदवारांना आपण मुलाखतीला बोलावलं आहे. तरी आपण सर्वजण मिळून मुलाखत घ्यावी अन् आपणास योग्य असे सहाय्यक निवडावेत."

  देशमुखांनी सर्वांना इथे बोलावण्याचं कारण स्पष्ट केलं अन् पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा करून दिला.

   मुलाखती सुरू झाल्या. एकेक उमेदवार आत येत होता. आपापली योग्यता सिद्ध करण्या साठी आवश्यक ती कागदपत्रे दाखवित होता. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुचेल तशी उत्तरं देत होता. उमेदवार बरेच आलेले असल्यामुळे मुलाखतीचा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता. मध्यंतरी चहा, बिस्किट्स येऊन गेले. तेवढा वेळ कार्यक्रम थांबला होता.

   चहापाना नंतर पुन्हा मुलाखतीला सुरुवात झाली. पुन्हा एकेक उमेदवार आत येऊन जात होता. एक महिला उमेदवार आत आली अन् .......

    पंकज एकदम दचकलाच. अं? ही कांचन तर नव्हे? छे! छे! ती तर या जगातच नाहीय. मग ती कशी असेल? मला भास तर होत नाही ना? पण ही तर हुबेहूब तशीच दिसते. तोच चेहरा, तोच बांधा, तोच काळा सावळा रंग. अन् ...अरे, हिचं स्मित देखील तेच. अन् हे काय? हिच्या डोळ्यातलं तेज देखील तेच आहे.

    "काय झालं मिस्टर पंकज? काही विशेष?" पंकजच्या गोंधळलेल्या स्थितीचा अंदाज घेण्या साठी देशमुखांचा प्रश्न.

     "अं? सॉरी सर. तसं काही विशेष नाही. इफ यू नेव्हर माईंड. मी जरा फ्रेश होऊन येतो."

     "ओ. के. बी रिलॅक्स." श्री. देशमुखांनी परवानगी दिली.

    पंकज उठून केबिनच्या बाहेर गेला. त्या मुलीचा अर्ज 'स्टोअर असिस्टंट'च्या पदा साठीच असल्या मुळे तिची मुलाखत पंकजलाच घ्यावी लागणार होती. तो तर केबिनच्या बाहेर गेलेला होता. उमेदवाराला, त्यातल्या त्यात स्त्री उमेदवाराला एवढा वेळ ताटकळत ठेवणं योग्य नव्हतं. म्हणून बाकीच्या अधिकाऱ्यांनी साहेबांची परवानगी घेऊन मुलाखत सुरू केली. त्या पदा साठी ठरविलेली पात्रता, प्रमाणपत्रांची पडताळणी केली. तो पर्यंत पंकजही फ्रेश होऊन येऊन बसला.

   "मिस्टर पंकज, आम्ही सर्व प्रमाणपत्रांची पाहणी केलेली आहे. आपणास हे काही प्रश्न विचारायचे असतील तेवढे विचारून घ्या."

     "ओ के थँक्स. हं तर बोला मिस ....."

     "कांचन. मिस कांचन देशपांडे." उमेदवाराचं उत्तर.

      "कांचन?" पुन्हा एकदा पंकजची दांडी उडाली. 'अरे! नावही तेच? मी खरंच सत्य विश्वात आहे ना?'

       महाव्यवस्थापक देशमुख आणि इतर सर्व अधिकाऱ्यांचं लक्ष आपल्या कडे असल्याचं बघून त्यानं स्वतःला सावरलं आणि तो उमेदवार कडे वळला.

    "आपलं शिक्षण किती झालंय?"

    "सर, मी वाणिज्य पदवीधर असून सोबतच 'कमर्शियल असिस्टंट' ची पदविका मिळवलेली आहे." कांचननं न अडखळता उत्तर दिलं आणि प्रमाणपत्रांची फाईल उघडून त्याच्या समोर ठेवली. त्याने त्या प्रमाणपत्रांवर नजर टाकली.

   "आपण ज्या पदासाठी अर्ज केला, त्या पदाचा काही अनुभव वगैरे?" पंकजचा प्रश्न.

   "नो सर, आता पर्यंत तशी संधीच मिळाली नाही सर. पण मला खात्री आहे की, आपण टाकाल ती जबाबदारी मी निश्चित पणे पार पाडू शकेन." कांचनच्या या आत्मविश्वास पूर्वक उत्तराने तो प्रभावित झाला होता.

   "फाईन! यु मे गो नाऊ. आता आपण जाऊ शकता. आमचा निर्णय आपणास लवकरच कळवला जाईल." असं म्हणत त्यानं तिची फाईल परत केली.

   पुन्हा एकदा तेच स्मित करत तिनं सर्वांचा निरोप घेतला. पंकज पुन्हा एकदा तिच्या आत्मविश्वास पूर्वक चाली कडे बघत राहिला.

    "सर, मला वाटतं आता सर्व उमेदवार संपलेले आहेत. आपणा समोर सर्व अर्ज आहेतच. आपण आजच निर्णय घेतला तर....?" मिस्टर कुलकर्णींनी देशमुख साहेबांकडे बघत प्रश्न अर्धवट सोडला.

    "नो! मिस्टर कुलकर्णी, आपण सर्वजण बराच वेळ इथं बसलेले आहात. विभागात काही कामे आपणा साठी अडकून पडलेली असतील. आपण सर्वजण आपापल्या विभागात जाऊन कामं सांभाळा. उद्याचा दिवस सर्व अर्जांवर विचार करा. परवा आपण सर्व फायनल करून टाकू." एवढं सांगून श्री देशमुखांनी मीटिंग संपवली. अन् सर्वजण आपापल्या विभागात परतले.

   पंकज विभागात परतला. परंतु त्याचं मन काही ठिकाणावर नव्हतं. ती सकाळ पासूनच्या एका मागून एक घडणाऱ्या घटना आठवत होता. अन् त्यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्याला त्या घटनांचा अन्वयार्थ काही सापडत नव्हता. ऑफिस मधील राहिलेली कामं त्यानं कशी बशी हाता वेगळी केली. सहाय्यकांना पुढील कामां विषयी आवश्यक त्या सूचना दिल्या. आणि साहेबांची परवानगी घेऊन तो अस्वस्थ मनाने घरी जाण्या साठी रस्त्याला लागला.

क्रमश:



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama