Pandit Warade

Drama Inspirational

3  

Pandit Warade

Drama Inspirational

एक होती कांचन-७

एक होती कांचन-७

5 mins
168


    पंकज आणि कांचन दोघंही एसएससी परीक्षेत पास झाले. सर्वांना आनंद झाला. त्यातल्या त्यात पंकजचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत तो चांगल्या पैकी गुण मिळवून बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आला होता. कांचन देखील 50 टक्के गुण मिळवून पास झाली होती. कांचन मात्र मनोमन पंकजचे आभार मानत होती. त्याच्या सहकार्या मुळेच तर ती पास झाली होती. आठवी नववी पर्यंत काठावर पास होणारी मुलगी द्वितीय श्रेणीत पास झाली होती. आणि म्हणूनच त्याचं सर्व श्रेय ती पंकजला देत होती. त्यांनं दररोज शाळेतून आल्या नंतर तिच्या कडून न चुकता गृहपाठ करून घेतला होता. अभ्यास करतांना तिला आलेल्या समस्या सोडविल्या होत्या. तिचा न आवडणारा विषय गणित. तो विषय ही तिच्याकडून पक्का करून घेतला होता. प्रारंभी केवळ तो सांगतोय म्हणून ती गणित सोडवायची. तीच कांचन नंतर हसत-खेळत, आवडीने गणित सोडवू लागली होती. त्याने तिच्या साठी घेतलेले कष्टच केवळ आज यशाच्या रूपाने तिच्या समोर उभे होते. त्यामुळे त्याच्या वरील तिचं प्रेम आणखी दृढ होत गेलं. स्त्रीसुलभ भावनांमुळं तिनं त्याच्या जवळ प्रेमा विषयी चुकून एक शब्दही काढला नाही.

     पुढील शिक्षणासाठी पंकजची व्यवस्था शहरात झाली होती. तो आता शहरातील एका वाचनालयात अर्धवेळ नोकरी करून शिक्षण घेत होता. स्वतःच्या पायावर उभा राहून शिक्षण घेत होता. कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय.

      इकडे कांचनचं शिक्षण बंद झालं खेड्यांमध्ये मुलींचे विवाह लवकरच होतात. कांचनच्याही लग्ना बद्दल एक-दोनदा विषय निघाला होता. तेव्हा पंकजनंच मध्यस्थी केली होती. 'गावात एस एस सी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. कमीत कमी एसएससी तर होऊ द्या तिला.' असं म्हणून त्यानं मामांना विनंती केली होती. आणि मामांनीही त्यांच्या विनंतीला मान दिला होता.

      कांचन एस एस सी उत्तीर्ण झाली आणि तिच्या लग्ना विषयी जोरदार हालचाली सुरू झाल्या. आपल्या तोडीचं स्थळ बघण्यासाठी भीमराव पाटलांच्या पायाला चक्रं लागली. आज इथे तर उद्या तिथे अशी त्यांची भ्रमंती सुरू होती.

     मनासारखं स्थळ काही मिळत नव्हतं. एखादं स्थळ पसंत पडायचं. तर मुलाला मुलगी पसंत नसायची. काही ठिकाणी हुंड्याच्या अवास्तव मागणी व्हायची. असंच एक वर्ष निघून गेलं. परंतु लग्न काही जमलं नाही.

   एक दिवस संध्याकाळी सर्व जण जेवण करून गप्पा मारत बसले होते भीमराव पाटील चिंताग्रस्त दिसत होते काळजीने एकदम म्हातारी दिसू लागले होते बाजीरावांना त्यांच्या चेहऱ्याकडे बघवेना. म्हणून त्यांनी विषय काढला,

   "आबा, आपण एवढ्या ठिकाणी फिरतोय. परंतु कुठे काही ठाव लागेना. कसं व्हायचं या पोरीचं?"

     "हं!" आबा उसासा टाकत उत्तरले. "काय करावं काही कळत नाही. या पोरी पायी खाल्लेली भाकरी अंगी लागत नाही. हिचं बाशिंगबळ असेल तर जमेल ना?" आबांचा वैतागलेला सूर चेहऱ्यावरील चिंतेचे जाळे घट्ट करून गेला.

   "आबा, माझं ऐकाल का थोडं? बाजीरावांनी भीत भीतच विचारलं. त्यांना आबांचा रागीट स्वभाव माहित होता.

  "तू आणखी काय सांगणार आहेस? सांग. मी आता काहीही ऐकायला तयार आहे. तुला काही योग्य मार्ग सुचवत आला तर बघ."

     "मुलगा आपल्या बघण्यातलाच आहे. सुंदर आणि सुस्वभावी आहे. शिवाय देण्या घेण्याचा काही प्रश्न येणार नाही. आपण जे देऊ स्वखुशीने स्वीकारील. आपल्या शब्दाच्या बाहेर नाही तो."

     "हे बघ माझं डोकं आधीच ठिकाणावर नाही. वेड लागायची पाळी आली या पोरीच्या पायी. त्यात तू आणखी आडवळणाने बोलून डोक्याला ताण देऊ नकोस माझ्या. काय मनात असेल ते स्पष्ट सांगून टाक एकदाचं."

     "पंकज कसा वाटतो तुम्हाला?" बाजीरावांनी हळूच पाण्यात खडा टाकून त्यांच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

    पंकजचं नाव ऐकताच कांचनचे कान टवकारले गेले. ती भांडे घासत होती भांडी घासतांना, या दोघांची चर्चा, भांड्यांचा आवाज होणार नाही याची काळजी घेत ती ऐकू लागली. पंकजच्या आठवणीनं तिचा मनमयुर थयथया नाचू लागला. अंग शहारून आलं. रोमांचित झालं. सनई चौघड्यांच्या मंगल ध्वनी कानी घुमू लागले. बाशिंग बांधलेल्या अवस्थेत पंकजला डोळ्यासमोर उभा करून एकटक नजरेनं बघू लागले. अप्पांच्या प्रश्नावरील आबांची प्रतिक्रिया ऐकण्या साठी तिचे प्राण कानात गोळा झाले.

  "ठीक आहे." उसासा टाकत आबा उत्तरले.

     'म्हणजे? आबांनी होकार दिला तर? माझ्या मनातील राजकुमार आबांना पसंत आहे असं वाटतं.' किती आनंद झाला कांचनच्या मनाला?

   "मग मी अक्का जवळ बोलणं काढू?" बाजीरावांनी उतावळ्या स्वरात विचारलं.

   "थांब जरा. इतक्यातच नको. अजून काही मी थकलो नाही. अजून एक दोन स्थळं आहेत माझ्या लक्षात. तिकडे जाऊन बघू या. जमल्यास ठीकच आहे. नाही तर बघू पुढं काय करता येईल ते?"

     आबांच्या मनात पंकज विषयी, त्याच्या आर्थिक परिस्थिती विषयी थोडी नाराजी होती. तरी पण ते हातचं राखून बोलत होते. ' न जाणो उद्या पंकज सोबतच लग्न लावावे लागले तर?' असाही विचार मनात असावा.

     त्यांच्या उत्तरावर सर्वजण सर्वजण नाराज झाले. कांचन तर थिजल्यासारखी झाली. आबांना झालं तरी काय? एकुलती एक मुलगी असूनही. माझ्या लग्ना संबंधीचा निर्णय घेताना मला का विचारीत नाहीत? माझा विचार का घेत नाहीत? अप्पांनी असं काय वावगं सांगितलं? तिचं बंडखोर मन विचार करू लागलं. बाजीराव सुद्धा आपल्या बोलण्यावरील प्रतिकूल प्रतिक्रिया ऐकून नाराज झाले. उठून झोपण्यासाठी निघून गेले. एक एक जण हळुहळु उठून गेले. अनिच्छेनेच कांचननंही अंथरुणावर अंग टाकलं.

   कांचननं अंथरुणावर अंग तर टाकलं. परंतु निद्रादेवीची आराधना करूनही निद्रादेवी प्रसन्न होईना. 'बाबांनी कशामुळे पंकजचा विषय झटकला? केवळ त्याच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून? आर्थिक श्रीमंतीपेक्षा तो मनानं कितीतरी श्रीमंत आहे. हे आबांना कळतकसं नाही? इकडे तिकडे एखाद्या धनिकाच्या गळ्यात बांधतांना वाटेल तेवढा पैसा हुंडा म्हणून दिल्यापेक्षा तोच पैसा जर पंकजला पूरविला तर तो सुद्धा त्यांच्याबरोबर येऊन बसेल. पण त्यांना हे सांगावं कुणी? माझ्या लग्नाच्या गोष्टींमध्ये मी जर काही बोलले तर आबांना ते मुळीच खपणार नाही. तेव्हा आपण न बोललेलं बरं. नाहीतर आणखी डोक्यात राख घालून घ्यायचे.'

    असं मनाशी म्हणत ती बळेच डोळे झाकून पडून राहीली.

    जवळपास प्रत्येक लग्नसराई मध्ये तोच तो एक कलमी कार्यक्रम असायचा. मुलगी दाखविण्याचा. तिला या कार्यक्रमाचा खूप अनुभव आला होता कांचनला. पाहुणे आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य कसं करावं? त्यांना पाणी देण्यासाठी कसं जावं? त्यांच्या समोर कशा पद्धतीने बसायचं इत्यादी सर्व गोष्टी आता तिला पाठ झाल्या होत्या. का नाही होणार? प्रत्येक वेळेस तोच विषय तीच वधू परीक्षा. कुठून तरी एखादा फॅशनेबल पोशाखातील तरुण पकडून आणायचा. आणि त्याच्या सरबराई मध्ये कुटुंबातील सर्वांना परेशान करून सोडायचं. कांचनला प्रत्येक वेळी त्याच त्या वधू परीक्षेचा मनस्वी कंटाळा आला होता. परंतु करणार काय? 'आलीया भोगाशी' म्हणत ती सजून-धजून त्या तरुणाच्या समोर जाई. समोरच्या तरुणाला बघून पंकजशी तुलना करू लागे. पंकजच्या तुलनेत तिला प्रत्येक नवरा मुलगा डावाच वाटायचा. आणि ती हिरमुसली व्हायची. केवळ 'एक जुनी बाहुली नव्या वेस्टनात' सजविल्या प्रमाणे ती निर्विकार चेहऱ्याने उभी राहायची. तिचा तो काळा रंग, निस्तेज, सपाट चेहरा बघून नवरा मुलगा निघून जायचा.

    असेच दिवसा मागून दिवस निघून गेले. बाजीराव सुद्धा कांचनच्या लग्ना विषयी बोलायचं टाळू लागले. कांचन पुरता पंकजचा विषय त्यांनी बंद करून टाकला होता. आता सुनंदाही लग्नाला आली होती. काही झालं तरी लग्न वेळेवर झालंच पाहिजे कितीही खर्च आला तरी मागे सरायचं नाही. आणि ते 'कांचन च्या ऐवजी सुनंदा पंकज ची जोडी कशी जमेल?' याचा विचार करू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama