एक होती कांचन-३
एक होती कांचन-३
(भाग-३)
पंकज ऑफिसला निघून गेला. परंतु सुनंदाच्या मनात संशयाचं भूत सोडून गेला. आज सकाळ पासूनच्या त्याच्या वर्तणुकीनं ती अस्वस्थ झाली होती. डोक्यात संशयाचा किडा वळवळत होता. तिला काहीच सुचत नव्हतं. कुठलंही काम मना सारखं होत नव्हतं. कामात हवा तसा वेग येत नव्हता. कसं तरी रखडत रखडत तिनं घरकाम उरकलं अन् पलंगावर जाऊन बसली.
मन रमविण्यासाठी तिनं एक पुस्तक हाती घेतलं. पुस्तक वाचतांना सुद्धा तिचं लक्ष ठिकाणावर नव्हतं. तिचं मन वाचनात रमेना. म्हणून मग तिनं टी व्ही सुरू केला. टी व्ही वर कुठली तरी मालिका सुरू होती. त्या मालिकेतील नायक नायिका यांच्यात कुरबुर सुरू होती. त्या कुरबुरीचं कारण सुद्धा एक स्त्रीच होती. नायकाच्या ऑफिस मधील नायकाची सेक्रेटरी. एक दिवस त्या सेक्रेटरीचा फोटो त्याच्या खिशात आलेला असतो. तो त्या नायिकेला सापडतो आणि तिथूनच त्यांच्यात कलह सुरू होतो.
आपणच त्या मालिकेतील नायिका आहोत असा भास सुनंदाला झाला. आपलीच कथा या मालिकेत मांडली जात आहे असं तिला वाटलं. तिनं तावातावानं टी व्ही बंद केला.
ती पंकजच्या आजच्या वागण्यावर विचार करू लागली. त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. या तीन वर्षाच्या काळात पंकज असा वागतांना तिला कधीच दिसला नव्हता. त्यानं आजपर्यंत तिला भरपूर सुख, भरपूर प्रेम दिलं होतं. कुठलीही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली नव्हती.
'मग आजच असं का व्हावं? यांनी मला पूर्ण पणे का कळू देऊ नये? तो फोटो कुणाचा असेल? कोण असेल ती स्त्री? माझ्या पेक्षा सुंदर दिसत असेल का? नक्कीच काही तरी भानगड असेल. म्हणून तर यांनी तो फोटो माझ्या पासून लपवून ठेवला असावा! नाही तर तो फोटो नक्कीच मला दाखविला असता. सकाळी नाही का मी 'काय झालं?' म्हणून विचारलं, तर फक्त आठवण झाली म्हणून सांगितलं. व कुणाची ते नाही सांगितलं.'
सुनंदा विचार करीत होती. अन् विचार करता करता तिचा आणखीच संशय वाढत चालला होता.
तेवढ्यात बेल वाजली. तिनं स्वतःला सावरलं आणि दार उघडलं. दारात पंकज उभा होता.
"आज लवकर आलात? बरं वाटत नाही का?" तिचा चिंतायुक्त प्रश्न.
"नाही सुनंदा, आज जरा अस्वस्थ वाटत होतं. कामात मनच लागत नव्हतं. म्हणून जरा लवकर आलोय." त्याचं उत्तर.
"का? काय झालं? मी आज सकाळ पासून बघतेय, आपण आज उदास दिसत आहात. काय, झालं तरी काय तुम्हाला? काय दुःख आहे ते मला नाही का सांगणार? मी आपली अर्धांगिनी ना? मग एकमेकाला सुख दुःखा मध्ये साथ द्यायलाच पाहिजे. आम्ही फक्त सुखात वाटेकरी व्हायचं अन् दुःख मात्र एकट्यानं झेलायचं हे योग्य नाही. तुम्ही दुखत असतांना मला सुख लाभणं शक्य नाही."
"नाही सुनंदा, तू मनाला एवढं लावून घेऊ नकोस आणि एवढी चिंतीतही होऊ नकोस. काहीही झालेलं नाहीय मला. मी तुला सांगणारच होतो. पण सकाळी ऑफिसला जाण्याचा घाईमध्ये सांगू शकलो नाही. सकाळी कागदपत्र पाहतांना कांचनचा फोटो सापडला. कांचनच्या आठवणीनं मी एकदम भूतकाळात शिरलो. आठवणींच्या गर्तेतून सुटण्याचा भरपूर प्रयत्न करूनही मी असफल राहिलो. काही केल्या कांचन डोळ्या समोरून जाईना. ऑफिस मध्ये गेलो तर तेथेही तिनं माझी पाठ सोडली नाही." त्यानं ऑफिस मधील मुलाखतीचा वृत्तांत तिला सांगितला.
कांचनच्या आठवणीनं सुनंदाच्या हृदयात दुःखाचा सागर उचंबळून आला. केव्हातरी बांध फुटून महापूर येईल अशी परिस्थिती होती. पंकजचीही स्थिती काही वेगळी नव्हती. त्यामुळं सुनंदानंच निर्धारपूर्वक स्वतःला सावरलं. आणि पंकजला धीर देत म्हणाली,
"अहो, पण एवढं हळवं होऊन कसं चालेल? कांचन केवळ माझी बहिण नव्हती, तर प्राणप्रिय मैत्रीणही होती ती. मला काय कमी वेदना होत असतील? एकमेकींच्या हातात हात घालून खेळत खेळत, एकमेकींची सुखदुःखं वाटून घेत, आम्ही लहानच्या मोठ्या झालो. आमचं एकमेकींवर एवढं जीवापाड प्रेम की माझ्या पायात काटा रुतला तर तिच्या डोळ्यात पाणी यावं. ती आजारी पडली तर मी रात्रीच्या रात्री जागून काढाव्यात. ओल्या कपड्यानिशी तासन् तास देवघरातल्या देवांना पाण्यात घालून बसावं. कुठलंही काम करण्यामध्ये स्पर्धा असायची आम्हा दोघींची. आणि प्रत्येक वेळेस मी मागं पडायची. अन् ती केव्हाच पुढं निघून जायची. मी केवळ एकदाच तिच्या पुढं जाऊ शकले. लग्नाच्या बाबतीत मी तिच्या निघून गेले. मात्र तिनं या अपयशाचा बदला अशा रीतीनं घेतला. मला अर्ध्या रस्त्यावर एकाकी सोडून दूर निघून गेली. खूप दूर. तिच्या मृत्यूचं दुःख माझ्या एवढं कुणालाही झालं नसेल. अहो, तुम्ही होतात म्हणून तरी मी सवर शकले. तुम्ही या लतेला वृक्षासारखा आधार दिला नसता तर ही लता केव्हाच उन्मळून पडली असती. ती केव्हाच उभी राहू शकली नसती." सुनंदाच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
पंकजच्या अन् सुनंदाच्या डोळ्यांना धारा लागलेल्या होत्या. सावरायचं कुणी? कुणाला? पंकजनं तिला जवळ घेतलं. फुटलेल्या बांधाला यावर घालण्याचे प्रयत्न व्यर्थ होते. बाहेर सुद्धा सरीवर सरी कोसळत होत्या.
पावसाचा जोर ओसरत चालला तसं आकाश निरभ्र होत चाललं. आता पाऊस पूर्णपणे थांबला होता. पाणी वहायचं तेवढं वाहून गेलं. परंतु वातावरण एवढ्या लवकर कोरडं होणं शक्यच नव्हतं.
दोघंही जागे वरून उठले. बेसिन मध्ये वॉश घेतला. फ्रेश होऊन पंकज बैठकीत जाऊन बसला. सुनंदा स्वयंपाक घरात शिरली. काही झालं तरी दैनंदिन कामं थांबणार थोडीच होती?
थोड्या वेळानं सुनंदानं स्वयंपाक तयार झाला असल्याची वर्दी दिली. आणि डायनिंग टेबलवर पानं वाढली. पोटात भूक लागलेली असून सुद्धा जेवण जात नव्हतं. यंत्रवत ताटातील घास उचलून तोंडाच्या मार्गानं पोटात ढकलत होते. मन ठिकाणावर कुठे होतं? कसं तरी जड अंतकरणानं, एका शब्दानंही एकमेकांशी न बोलता, दोघांनीही जेवण उरकलं आणि बिछाना गाठला.
दोन दोन तास गप्पागोष्टींमध्ये रमणारं हे जोडपं. त्यांना गप्पां साठी कुठलाही विषय चालत असे. पंकजच्या ऑफिस मधील गमती जमती असोत की बाजारात खरेदी करतांनाचे तिला आलेले अनुभव असोत.गप्पांच्या ओघात रंगवून, खुलवून सांगितले जायचे किंवा भविष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी काय काय करता येईल? यावरील चर्चा करतांना वेळ केव्हा निघून जाई आणि डोळा केव्हा लागे याचा दोघांनाही पत्ता लागत नसे.
आज मात्र दोघंही चैतन्य हरवलेल्या शिळे प्रमाणे अंथरुणावर पडलेली होती. शरीराला विश्रांतीची आवश्यकता असूनही झोप येत नव्हती. जबरदस्तीनं डोळे झाकून का कुठे झोप येते? त्यासाठी मन सुद्धा स्वस्थ हवं ना? त्यांच्या डोळ्यासमोर सारखी कांचन उभी रहात होती. डोळ्या समोरून त्यांच्या बालपणीच्या आठवणी, त्यांचं बालपण, शिक्षण, कांचनची शालेय शिक्षणासाठी लाभलेली साथ, इत्यादी घटना एखाद्या चलचित्राप्रमाणे सरकत होत्या.
**** *क्रमशः** **

