Pandit Warade

Drama Romance Tragedy

2.6  

Pandit Warade

Drama Romance Tragedy

एक होती कांचन-१

एक होती कांचन-१

5 mins
658


कांचन (भाग-१)

        'कांचन, तू हे काय करून बसलीस? तुझ्या दृष्टीनं जरी हा मार्ग योग्य दिसत असला तरी त्यातून काय साध्य होणार? याचा सारासार विचार तू करायला हवा होतास. तुझ्या या प्रायश्चितातून कुणाचेही डोळे उघडणार नाहीत. अजूनही तुझ्यासारख्या असंख्य कांचन या समाज प्रवृत्तीच्या बळी जातच राहतील. त्यात काहीही सुधारणा होण्याची चिन्हं मला तरी सध्या दिसत नाहीत.'

         'कांचन, तुझ्या हातून जो अपराध घडला, तो काही फार मोठा अक्षम्य असा अपराध नव्हता. हां! तुझ्या सुसंकृत मनाला तो रुचला नाही हे मलाही मान्य आहे. तसा तो कोणत्याही संस्कारी मनाला न पटणारा, न भावणारा असाच गुन्हा आहे. परंतु त्यासाठी एवढं मोठ्ठं प्रायश्चित नक्कीच नसावं'

         'मनुष्यप्राणी हाच मुळी चुकांचा पुतळा आहे. जीवनाच्या खडतर अशा रस्त्यावरून चालतांना पाय घसरला तर त्यात नवल ते काय? पण तो घसरलेला पाय जेवढा लवकर सावरता येईल तेवढं चांगलं असतं. लहान मूल बघ. लचकत, थरथरत चालत असतं, चालता चालता पडतं, उठून पुन्हा चालायला लागतं. झाडं-झुडूपं बघ, निसर्गाच्या कृपा छत्राखाली लहानाचं मोठ्ठं होतांना अनेक संकटं डोक्यावर झेलतात. अनेक वादळ-वारे अंगावर घेतांना कुठं फांद्या तुटतात, तर कुठं शेंडाच तुटून पडतो. तरी ते झाड, ते झुडूप काही मरत नाही. ते पुन्हा नव्या जोमानं, नव्या उमेदीनं, डौलात उभं राहतं. अगदी तशाच पद्धतीनं मनुष्य प्राण्याला सुद्धा जीवनाचा खडतर रस्ता पार करावाच लागतो. जीवन ही एक तारेवरची कसरत आहे. प्रत्येक जण त्या कसरतीत यशस्वी होईलच असं नाही. काहीजण तारेवरून पडतात सुद्धा. पण त्याच तारेवर पुन्हा तीच कसरत करावी लागते.'

         'तारुण्य हे एक जीवनाच्या रस्त्यावरील धोकादायक वळण आहे. या वळणावरून ज्या गाड्या व्यवस्थितपणे पुढे जातात त्याच गाड्या पुढचा रस्ता योग्य तऱ्हेनं पार करू शकतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुण तरुणींना फार जपून वागावं लागत. तरीही काही तरुण तरुणी चुकल्या शिवाय रहात नाहीत. तो त्यांचा दोष नसतो, तो त्या परिस्थितीचा, नैसर्गिक भावनेचा दोष असतो. समाजाच्या दृष्टीनं हा एक कलंक आहे हे खरंच आहे. परंतु त्यासाठी एवढ्या कठोर प्रायश्चिताची नक्कीच आवश्यकता नव्हती. ती चूक का घडली याचा थोडा तरी विचार तू करायला पाहिजे होतास.'

         कांचन, तू ज्या गोष्टीचा बाऊ करून हा निर्णय घेतलास, ती गोष्ट तर आज या समाज जीवनात सहज प्रवृत्तीच बनून राहिली आहे! ज्या बदनामीला घाबरून तू हे पाऊल उचललेस, ती तुझी बदनामी व्हायची टळली काय? उलट जी गोष्ट तुम्हा दोघा तिघांनाच माहीत होती, ती तुझ्या या कृतीनं जग जाहीर झाली! ही गोष्ट सहज टाळता आली असती. वेळेवर योग्य पाऊल गेलं पाहिजे होतं. पण इथं सर्वांचंच दुर्लक्ष झालं, म्हणूनच असं घडलं. तुझ्या त्या एवढ्याश्या चुकीमुळं तुझ्या आईवडिलांना, तसंच इतर आप्त स्वकीयांना काय त्रास होतोय? किती यातना होताहेत? याची कल्पना करण्याचंही तुला कारण उरलेलं नाही. तू तर या त्रासातून स्वतःची मुक्तता करून घेतलीस. परंतू जातांना आमचा थोडातरी विचार करायला हवा होतास.

         समाज आता म्हणत असेल, 'बरं झालं, पापकर्माचं फळ मिळालं'. कदाचित आई वडील सुद्धा हाच विचार करत असतील पण कधीतरी संतती विरह सतावत असेलच की. कधीकाळी मातृहृदय प्रेमानं उचंबळून येत असेलच. शेवटी मरण हे अटळ असतं, अपरिहार्य असतं. पण म्हणून काय अशा पद्धतीनं मारायचं?

         "अहो, ऐकलत का?" या सुनंदाच्या आवाजानं पंकज भानावर आला. सुनंदानं, पंकजच्या पत्नीनं आतापर्यंत तीन चार वेळेस आवाज दिला परंतु पंकजचं लक्ष कुठं ठिकाणावर होतं? तो एका वेगळ्याच भावविश्वात जाऊन पोहोचला होता. एका महत्वाच्या कागदपत्रासाठी त्यानं गाठोड्यातून जुन्या फायली काढल्या होत्या. मात्र आपण कश्यासाठी एवढी सर्व कागदपत्र उसकटली याचंच भान त्याला राहिलं नव्हतं. कागदपत्र चाळतांना त्याला एक धागा असा सापडला की तो सर्व कामधंदा विसरून त्या धाग्याला पकडून वेगळ्या विश्वात जाऊन पोहोचला.

         दोन तीन वेळेस आवाज देऊनही पंकजचा काही प्रतिसाद येईना म्हणून सुनंदानं बाहेर डोकावून बघितलं, तर त्याच्या हातात त्याच्या हातात कुणातरी सुंदर तरुणीचा फोटो होता. पंकज त्या फोटोतील तरुणीशी काहीतरी बोलत असावा असं वाटत होतं. अधून मधून त्याच्या डोळ्यातून आसवंही गळतामना दिसत होती.

      सुनंदा एकदम दचकली. लग्ना नंतर देखील आपला पती एखाद्या सुंदरीच्या प्रेमात सापडला की काय? कोण असेल ती तरुणी? आपलं लग्न झालं आहे तरी त्यांनी दुसऱ्या स्त्रीकडं का बघावं? माझ्यात काय कमी आहे? की मी त्यांना आवडली नाही? लग्नात म्हणे कुणीच त्यांना विश्वासात घेतलं नव्हतं. घरातील वडीलधाऱ्यांनी सांगितलं आणि त्यांनी आपल्याशी लग्न केलं. यांचं लग्नागोदरच एखाद्या कॉलेज कुमारीवर प्रेम तर जडलं नसेल? प्रेमाच्या आणा भाका तर झाल्या नसतील?'

        प्रश्नव्यूहातून सुटण्याचा प्रयत्न करीत सुनंदा आणखीच गुरफटून जात होती.

        'नाही, मी यांच्यासोबत तीन वर्षांपासून संसार करते आहे. आज पर्यंत यांना एवढं उदास कधीही बघितलं नाही. यांनी कुठलीही गोष्ट माझ्या पासून लपवून ठेवलेली मला आठवत नाही. आज कुठली आठवण एवढी अस्वस्थ करत असेल त्यांना? माझा यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. कदाचित कुठलं तरी दुःख त्यांनी मनातच ठेवलं असेल अन् आज या जुन्या गाठोड्यातून त्या दुःख रूपी काळ सर्पानं त्यांच्या स्वप्नील मनाला दंश केला असेल. मनातील जखमेची खपली निघाली असेल. बघावं तरी नेमकं काय आहे ते.'

      "अहो, ऐकलंत का मी काय म्हणत्येय ते?" सुनंदाने पुन्हा एकदा आवाज दिला.

       "अं? काय? मला काही म्हणालीस सुनंदा?" पंकजचा गोंधळलेल्या स्थितीतला प्रतिप्रश्न.

       "अहो, तुम्हाला काही होतंय का? बरं वाटत नाही का?"

       "नाही, नाही. तसं काही नाही." पंकज आता थोडा सावरला होता.

       "मी कितीदा आवाज दिला. परंतु तुमचा काहीच प्रतिसाद नाही. म्हणून म्हटलं बरं वाटत नाही की काय?"

        "नाही. जरा जुन्या आठवणीत डुंबून गेलो होतो. त्यामुळंच कदाचित तुझा आवाज ऐकला नसेल."

        "अहो, पण तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना? की आज जायचं नाही?"

         "अगं हो! बरी आठवण काढून दिलीस. उशीर झाला असता बघ. नऊ वाजत आले. मी एक महत्वाचा कागद शोधत होतो. तो कागद बघतो तोपर्यंत तू डबा तयार करून ठेव. पाणी तापवून ठेव."

       "ठीक आहे. पाणी तयार ठेवलेलं आहे. डबा सुद्धा तयार झाल्या सारखाच आहे. तुम्हीच लवकर आटपा."

        असे म्हणत सुनंदा स्वयंपाक घरात निघून गेली. त्यानं पुन्हा गाठोड्यात डोकं खुपसलं. पाच दहा मिनिटातच त्याला हवा तो कागद सापडला. त्यानं ते गाठोडं व्यवस्थित बांधून ठेवलं. कांचनचा फोटो मात्र एका वही मध्ये ठेऊन वही दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवली.

       "सुनंदा, अगं आटोपलं का?"

       "होय हो. बाथरूम मध्ये पाणी काढून ठेवलेलं आहे. तुम्ही स्नान करून घ्या. तोवर मी डबा भरून ठेवते."

        पंधरा वीस मिनिटातच पंकज डबा घेऊन ऑफिसला निघून गेला.

       

क्रमशः.........२



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama