एक भयानक रात्र
एक भयानक रात्र
रायबा शहरातून गावाकडे निघाला होता. बऱ्याच दिवसांनी त्याला गावाकडची आठवण झाली होती म्हणून सरळ बस धरली अन निघाला त्याचा अंदाज होता की बस 4 वाजेपर्यंत बस स्टॅन्ड ला पोहचल कारण त्याच गाव तिथून पुढे 6 - 7 km होत. तिथून पुढ त्याला कसलंच वाहन भेटणार नव्हतं पायीच गावापर्यंत जावं लागणार होत. त्याचं गाव खूप सुंदर होत डोंगरांच्या कुशीत बसलेलं, गावाच्या तिन्ही बाजूनं घनदाट जंगल आणि उरलेल्या एका बाजूला संथ वाहणारी नदी कोणाचही मन आकर्षित करून घेणार सुंदर, हिरवंगार असं गाव.
रायबा म्हणजे एक 60-65 वर्षांचा वयस्कर पण वयस्कर जरी असला तरी अंगात मात्र कमालीची ताकद, पिळदार शरीर, आकडेदार पांढऱ्या पिकलेल्या मिश्या, सदरा कोपरी आणि धोतर नेसणारा, सतत पान खाल्याने लाल जीभ आणि ओठ असलेला एक गावाकडचा वृद्ध. जो कामधंद्यामुळे शहरात स्थित झालेला. गावाकडे वडिलोपार्जित जमीन होती,जुने मित्रमंडळी आणि पाहुणे-रावळे त्यांच्या भेटीसाठी गावाकडे निघाला होता.
रायबानं बांधलेला अंदाज चुकला बस पंक्चर झाल्यान 4 ऐवजी 6 ला पोहोचली. रायबा आता चांगलाच वैतागला होता कारण त्याला एकट्यालाच पुढचा प्रवास करायचा होता. त्याला नको वाटत होत पण गावाकडची ओढ वेगळीच असतें त्यापुढे कितीही मोठं संकट असलं तरी मग त्याची परवा नसते. मनात निर्धार करून तो निघाला काहीही झालं तरी जायचंच गावाकडे मग कितीही उशीर होऊ देत. जुन्या चालीरितींचा निर्भीड ठरवलं अन् गावाच्या दिशेने झपाझप पावल टाकू लागला.बऱ्याच दिवसांनी गावाकडे निघाला होता.
थोड्याच वेळात अंधार पडला. आकाश निरभ्र दिसत होत मध्ये मध्ये चांदण्या लुकलुकत होत्या. पाऊस पडून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत माजल होत. त्यात किर्रकिर्र..... करणारे किडे लपून आवाज करत होते. मातीची पाऊलवाट जराशी ओलसर वाटत होती. गार वारा अंगाशी झोंबत होता. सताड मोकळ माळरान एखाद्या आईच्या कुशीत दिवसभर हुंदडून बारिक मूल निपचित पडाव तस वाटत होत.मोकळ्या रानात वारा हुंदाडत होता. झपाझप पाऊल तो उचलत होता. आता गावाच्या बाजूच जंगल त्या चमचमणाऱ्या प्रकाशात अंधुकसं दिसत होत.
तो आता गावापासून 2-3 किमी अंतरावर होता. रायबा जरी निर्भीड असला तरी त्याने खूप साऱ्या भयानक गोष्टी या घनदाट जंगलाविषयी ऐकल्या होत्या. जसजसं जंगल जवळ येत होत त्याची भीती अन काळजाचे ठोके वाढत होते कारण त्याने ऐकलेल्या गोष्टी खूपच भयानक होत्या. आता आपला रागात घेतलेला निर्णय चुकला तरं नाही ना असं त्याला वाटू लागलं पण गावाकडची ओढही त्याला थांबू द्यायना. बघू... काय होईल ते होईल असं म्हणून त्याने जंगलातल्या पाऊल वाटेवर चालायला सुरुवात केली. मनात भीती तर होतीच. त्यात जंगल घनदाट असल्याने बरेच हिंस्त्र प्राणी, पक्षी राहत होते त्यांचे ते चित्रविचित्र आवाज त्याच्या भीतीत आणखी भर पाडत होते. धोतराचा सोगा हातात घेऊन जेवढ्या वेगानं चालता येईल तेवढ्या वेगानं तो चालत होता. अचानक त्याच्या आज्जीनं त्याला लहान असताना सांगितलेली भुताची गोष्ट मनात येऊन गेली ती भूत कशी त्या माणसाला त्रास देतात आणि मग खाऊन टाकतात. गावकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीही डोळ्यासमोर तरळू लागल्या. या गोष्टी मुद्दामच मनात येत आहेत आपल्याला घाबरवायला असं वाटू लागलं. कितीही ठरवलं तरी मनात विचार येताच होते. त्याच्या पोटात भीतीचा डोंब उसळला जात होता.
अचानक समोर पांढरी आकृती हलल्यासारखी वाटली आता अंगातले त्राण गेल्यासारखं झालं, दरारून घाम फुटला, पाऊल जड झाली, विचार करण्याची ताकद हरवल्यासारखं भासू लागलं, तोंडातून शब्दचं फुटंनासा झाला. हळूहळू ती आकृती आपल्या दिशेने सरसावत आहे हे त्याला जाणवू लागलं. रायबा जागीच खिळून राहिला त्याला काय करावं हेच समजत नव्हतं. पळणार तरी कसा, वयाची साठी पूर्ण केली होती, काळजाचे ठोके वाढतच होते... ती आकृती आता हळूहळू स्पष्ट दिसू लागली होती. बलदंड शरीर, उंची 7 फूट, गोरागोरा चेहरा, रायबासारखाच पोशाख मात्र डोक्यावर टोपी होती. चुलीतल्या अंगाऱ्यासारखा लाल ठिपका तोंडासमोर होता. जसा वाऱ्याचा वेग वाढल तसा तो आणखी लाल होत होता. रायबाला काही काही सुचत नव्हतं. आता त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट दिसला तसा रायबाच्या जीवात जीव आला. त्याला जरा हायस वाटलं. ती आकृती म्हणजे त्याचा बालमित्र भीम्या होता. भीमा आणि रायबा एकत्र खेळून मोठे झालेले अगदी जिवलग मित्रा. रायबा आता पुरता चेकाळला आता त्याची भीती कुठच्या कुठे पळाली.
रायबा भीमाला म्हणाला, "भीम्या इकडं कुठं रं?" त्याचं काहीच उत्तर नाही. भीमानं पाठ रायबाकडं करून चालायला सुरुवात केली तसं रायबाही त्याच्या पाठीमागे चालायला लागला. रायबा त्याची विचारपूस करत होता पण भीमा त्याला काहीच उत्तर देत नव्हता. रायबा ओरडला "आर भीम्या बोल की लेका.... कवर रागवणार... नाही जमलं तू आजारी असताना भेटायला... मग आता एवढा रागवणार का?" तरी भीमाच उत्तर नाही. तो आपला तोंडातून धूर काढत पुढे झपाझप चालत होता. रायबाला वाटलं भीमा नाराज आहे म्हणून रायबाही गप्प झाला. दोघेही मुकाट्याने चालत होते. आता गाव काही अंतरच राहिलं होतं. गावाची येस दिसू लागली होती. तसा रायबा बोलला, "भीम्या आरं तू का एकलाच असा भुतासारखा हिंडतोय या जंगलानी? डोस्कं बिस्कं फिरलंय का काय तुझं माहिती न्हवं तुला ही जंगल किती खोडील हाय ते?" भीमा तरीही शांत आता मात्र रायबाचा पारा चढला. रायबा कडाडला जा नगो बोलूस म्या भी न्हाय बोलणार तुझ्यात आणि वेगाने त्याच्यापुढे निघून गेला. थोडा पुढे गेला आणि वळून पाहिलं तशी मनात शंका आली याच तोंड एवढं पांढरंफटक का पडलंया?.. बरं मरु द्या त्योच बोलना आपण तरी का विचाराव. आता गावाची येस आली रायबानं येस वलांडताना पाहिलं तर भीमा पाठीमागंच होता. वाटलं येईल पाठोपाठ उद्या सकाळी भेटून घालवू त्याचा रुसवा. रायबा झपाझप पाऊल उचलून येस वलांडून पुढे गेला. येशीला लागूनच शंकराचं मंदिर होतं. येस येताच भीमा थांबला. भीमाचं घर पहिलं आणि मग रायबाचं होतं. त्या दोघांच्या घरात अगदी कासराभराचं अंतर होत. रायबा स्वतःच्या जुन्या वाड्याजवळ गेला आणि मागे वळून पाहिलं तर त्याला कोणच दिसलं नाही. त्याला वाटलं रायबा घरात गेला असंल.
रायबा वाड्यात गेला तसा सगळेच त्याची वाट पाहत होते. त्याचा मोठा भाऊ शिवा म्हणाला "आरं रायबा किती उशीर? आन जंगलातून एकटा आलास व्हय रं" रायबा बोलला ''दादा ते जाऊ दे आता वैतागलोय पुरा. "पहिलं जेवायला वाढ मग आराम कर. मग उद्या निवांत बोलू. जेवणं वगैरे उरकली अंगणात अंथरूणं पडली अन् थोड्याच वेळात सगळेच झोपी गेले.
सकाळ झाली. रायबाला कालचं सगळं आठवलं. लगबगीनं आवरलं आणि तडक निघाला भीमाच्या घराकडं. दरवाज्यातूनच आवाज दिला, "ओ वहिनी आणि घरात शिरला." घरात शिरताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, दरारून घाम फुटला, अंगावर शहारे उभा राहिले, दातखिळी बसल्यासारख झालं, अंगातील त्राण निघून गेल्यागत झालं, विचार करण्याची क्षमताच राहिली नाही असं भासली... अन् नजर रोखली होती समोर हार घालून टांगलेल्या भीमाच्या फोटोवर.
भीमा रायबाला सुखरूप घरापर्यंत पोचवायला आला होता. भीमाचं निधन होऊन सहा महिने झाले होते.

