भास की वास्तव
भास की वास्तव
आज शंतनू दवाखान्याच्या पायरीवरती बसून खूप गहन विषयात मग्न होता. रिपोर्ट हातात घेऊन शून्य नजरेने तो त्याच्याकडे पाहत होता. त्याची विचारशक्ती पूर्णपणे थांबली होती. त्याच्या आजाराचं नेमकं निदान शहरातल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्येही मिळालं नाही म्हणून तो खजील झाला होता. आपला प्रत्येक प्रयत्न निरर्थक ठरत आहे आणि आपण आपल्या आजाराचं निदान करायला प्रत्येकवेळी अपयशी ठरत आहोत याची काळजी त्याला खात होती. शरीराने मजबूत असणारा शंतनू पण विचाराच्या काहुराने खूप गोंधळून गेला होता. तो त्याच्याच विचारात गुंतलेला असताना अचानक त्याची शांतता भंग करणारा एक आवाज त्याच्या पडला, " ओ साहेब तुम्हाला डॉक्टर आनंद साहेबांनी बोलावलं आहे काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत " असं म्हणून तो तिथून निघून गेला. शंतनू उठून लगेच डॉक्टर आनंदच्या ओपीडी कडे निघाला. दरवाजा लावलेला होता. त्याने दरवाजा वाजवला, आतून आवाज आला, " येस..... कंमिंग, अरे या या मिस्टर शंतनू " हे बघा तुमच्या रिपोर्टवरून तुमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही अस दिसून येत आहे.पहिल्यांदा आम्हाला वाटलं की हा आमचा टेकनिकल प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा चेकिंग केलं पण त्यातही रिपोर्ट क्लिअर असल्याच दाखवत आहे. हे ऐकून शंतनू चांगलाच तापला आणि डॉक्टर आनंदला म्हणाला, " मग डॉक्टर आनंद मी खोटं बोलत आहे की मला पैसे घालायची हौस आहे." का मी वेडा आहे? डॉक्टर आनंद त्याचा राग शांत करत म्हणाले, "शंतनू अरे तसं नाही रे ". पण... ! शंतनू चांगलाच पेटला होता, पण.. पण काय? डॉक्टर आनंद त्याचा राग शांत करत म्हणाले, " हे बघ अगोदर खाली बसून घे आणि शांत हो "
शंतनूला समजलं की आपण विनाकारण यांच्यावरती रागावत आहोत आणि प्रत्येकाला जीवदान देणारा आणि पृथ्वीलोकावरती मानल जाणारं देवाचं रूप म्हणजे डॉक्टर ते माझ्याशी खोटं कशाला बोलतील आणि मला खोटं तरी का? सांगतील. माझे दुष्मन थोडीच आहेत ते. आता त्याचा राग शांत झाला आणि तो निमूटपणे डॉक्टरांच्या समोर बसला.
डॉक्टर आनंद - हे बघ शंतनू मी भरपूर जणांकडून ऐकलं आहे की तुला पुस्तकांची खूप आवड आहे आणि तू अगदी १० - १० तास पुस्तकं वाचण्यात दंग राहतोस तेही ब्रेक न घेता.
शंतनू - हो हे खरंय पण त्याचा इथे काय संबंध?
डॉक्टर आनंद - कोणत्या प्रकारची पुस्तकं जास्त वाचतो तू ?
शंतनू - हॉरर बुक जास्त आवडतात मला. पण यावरून काय सिद्ध होतय
डॉक्टर आनंद - हे बघ कस असतं आपण दिवसभर ज्या वातावरणात राहतो किंवा ज्या गोष्टींचा जास्त विचार करतो त्याच गोष्टींची स्वप्नही आपल्याला पडतात. अगदी आपला मूडही तसाच होतो.
शंतनू - हे बघा डॉक्टर हे खरही असल पण माझं स्वप्न खरं देखील होतय.
डॉक्टर आनंद - अरे हा योगायोगही असू शकतो.
शंतनू - किती वेळा? जास्तीत जास्त दोन, तीन किंवा फार फार तर चार. पण हे रोजचंच झालय.
डॉक्टर मी नाही सहन करू शकत हे. तुम्हाला समोरच्या माणसाचा मृत्यू समजतोय मृत्यू आणि हे माहीत असूनही मी काहीच करू शकत नाही. हतबल होतोय निसर्गाच्या किंवा नियतीच्या पुढे जाऊ नाही शकत. काय काय हाल होतात माझे मलाच माहीत आहे.
डॉक्टर आनंद - अरे हे तुझे भास आहेत. दुसरं काही नाही. तू मानसिक त्रासांचा शिकार झालाय बाकी काही नाही.
शंतनू - असं काहीच नाही डॉक्टर. तुम्ही नाही समजू शकत.
एखाद्याला माहीत नाही उद्या आपण मरणार आहोत आज अगदी आनंदात तो असतो आणि अचानक कोणत्यातरी कारणाने मारतो. त्याचं कुटुंब उघड्यावर पडत. हे नाही सहन होतं मला.
डॉक्टर आनंद - हे बघ आपल्याकडस उद्या एक मोठे स्पेशालिस्ट येणार आहेत. माईंड थेरपिस्ट माझं त्यांच्याशी बोलणं झालय.
मी तुझ्याबद्दल त्यांच्याशी बोललो आहे. उद्या तुला यायला जमेल ना?
शंतनू - हो नक्कीच. जमेल ना म्हणजे?
डॉक्टर आनंद - ओके मग ये उद्या सकाळी ९:३० ला.
शंतनू - ओके.
शंतनू तिथून निघून घराकडे जातो. शंतनू एक मध्यम वर्गीय मुलगा. ज्याचं वय २८-३० च्या दरम्यान असेल. पुस्तकं वाचण्याचा त्याला खूप छंद. तासंतास तो त्यात डुंबून जायचा त्याला सूर्य कधीच त्याची ड्युटी संपून मावळला हे देखील समजत नव्हतं. नव्या युगाच्या विचारसरणीचा, अंधश्रद्धेला थारा न देणारा युवक. त्याला हॉरर पुस्तकं जास्त आवडायची. मिस्टेरीयस काही असलं की त्याला चैनच पडत नसायची.शरीरही धडधाकट मजबूत, निडर पण अलीकडे अलीकडे प्रत्येकाकडे संशयी नजरेने बघायचा. असं तक लावून पाहायचा की समोरच्याला भीती वाटायची आणि तो त्याच्यापासून दूर राहायचा.
त्याची नजर बदलली होती कारण त्याला आजकाल अचानक स्वप्न पडायची त्यात तो अनोळख्या व्यक्तीचा मृत्यू झालेला पाहायचा. त्याला पहिल्यांदा वाटलं की हा भास आहे आपण खूप हॉरर बुक वाचतो त्याचा हा परिणाम असावा. त्याने त्यानंतर बुक वाचायचं कमी केलं पण काहीच उपयोग नाही झाला. त्याने त्याच्या मित्रमैत्रिणींना ही याबद्दल सांगायचा प्रयत्न केला पण सगळ्यांनी त्याला समजून घेण्याऐवजी वेड्यात काढल. त्याने भरपूर दवाखान्यात प्रयत्न केले पण त्याला कोणताच आजार किंवा साध
ं आजाराचं लक्षण सुद्धा नव्हतं. त्याला काहीच समजत नव्हतं. काय कराव?, कुठं जावं? प्रत्येकजण दुसरा डॉक्टर सजेस्ट करत होता.
तो काही लोकांना अलर्ट ही करायचा पण नियतीच्या खेळापुढे कोणाचंच काहीही चालत नाही. सांगून देखील मृत्यूच्या खाईत आपणहून ते जात होते आणि भयानक सत्याला सामोरे जात होते. त्याला हे नको होतं कारण आपल्या जवळच्या लोकांना मारताना पाहून काळीज किती तरफडत हे त्याने जवळून अनुभवलं होतं. कित्येक दिवस ते स्वप्न पडू नयेत म्हणून झोपत देखील नव्हता कारण पुन्हा कोणाचा मृत्यू त्याला नको होता. माणूस आपला असो की परका तो जेव्हा जातो तेव्हाच त्याची किंमत कळते. हृदय हेलावून टाकणार आणि त्रिकालबाधित सत्य म्हणजे मरण. त्याला सामोरे गेल्याशिवाय पर्यायच नाही. मग तो कुठेही असो, कोणीही असो आणि कसाही असो.
तो खूप प्रयत्न करत होतय की ते तो थांबवायचा पण जे होयच ते होयचंच. आता शेवटचा पर्याय म्हणून त्या माईंड थेरपिस्टला उद्या भेटून शेवटचा सोक्ष मोक्ष तो लावणार होता कारण एकही पेशंट त्याच्याकडून निदान न घेता गेलाय असं झालच नव्हतं. निदान त्याच्याकडे तरी याचं उत्तर असल असं त्याला वाटलं आणि त्याचा कधी डोळा लागला त्याला समजलच नाही.
अचानक खडबडून त्याला जाग आली. त्याला दरारून घाम फुटला होता. हातपाय थरथर कापत होते. पुन्हा स्वप्न... डोळे लालबुंद झाले होते कारण त्याला सकाळी, ओ साहेब म्हणून आवाज दिला होतय त्याचा मृत्यू त्याने पाहिला होता. तो अगदी शांत गरीब घरातला दिसणारा आणि प्रामाणिकपणे स्वतःचं काम करणारा कंपाउंडर होता. आता काळाने त्याच्यावरती घाला घालायचं ठरवलं होतं. रात्रभर विचाराने त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही कधी सूर्य पुन्हा ड्युटीवर आला त्याला समजलच नाही.
आवरून तो दवाखान्याकडे निघाला. दवाखान्याच्या गेटसमोर दिसताच त्याला तो आवाज देणारा आणि स्वप्नात मृत्यू पाहिलेला माणूस दिसला. तो त्याच्याकडेच पाहून हसत होता. काय साहेब? आजही बरं नाही का तुम्हाला? हा प्रश्न ऐकून तो खजील झाला. अगदी निःशब्द च. त्याला काय बोलाव कळतच नव्हतं. तो धावत धावत डॉक्टर आनंदकडे. धाडकन दरवाज्या उघडून आत गेला आणि डॉक्टर आनंद तुमचा तो कंपाउंडर सखा काल ज्याला तुम्ही मला बोलावण्यासाठी पाठवलं होतं तो... तो... तो.
डॉक्टर आनंद - हा त्याच काय? त्याची नाईट शिफ्ट होती तो घरी गेला.
शंतनू - अहो त्याचा मृत्यू पहिला मी.
डॉक्टर आनंद - शंतनू शांत हो शांत हो. बस खाली बस पहिला.
शंतनू - ही वेळ बसायची नाही डॉक्टर.
त्याला आडवा. मरल तो. त्याचा अपघात होणार आहे. प्लिज ऐका माझं. मी पाया पडतो.
डॉक्टर आनंद - शांत. काही होत नाही. हे बघ तुझे डॉक्टर आले आहेत. मी ओळख करून देतो हे बघ. हे आहेत डॉक्टर प्रशांत.
शंतनू - हो पण. तो सखा. तो मारणार आहे. वाचवा त्याला
डॉक्टर प्रशांत - शंतनू शांत खाली बस. काही होतं नाही. पाणी घे. पी आणि शांत हो
दोन्ही डॉक्टर मिळून काहीतरी बोलत होते. त्यांचं बोलणं झालं. ते दोघेही मिळून शंतनू कडे आले आणि म्हणाले आपल्याला काही बेसिक चेकअप करायचं आहे. आपण सुरुवात करू. त्यांनी त्याला चेक केलं पण त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. रिपोर्ट अगदी क्लिअर होता. डॉक्टर प्रशांत विचारात पडले की हे इम्पॉसिबल आहे. हा वागत आहे त्याप्रमाणे काहीतरी मिस्टेक हवी होती. पण काहीच नाही.
डॉक्टरांनी त्याला पुन्हा चेक केलं पुन्हा तेच. त्याची मेंटल चेकिंग सुद्धा झाली त्यातही तो पास. डॉक्टर प्रशांतही आता विचारात पडले पण डॉक्टर आनंद त्यांना सांगत होते की हे भासच आहेत.
तेवढ्यात ओपीडीतला फोन खणाणून वाजला आणि दुसरा कंपाउंडर पायाखालची जमीन सरकल्यासारखा झाला. त्याचं तोंड वासलेलं होतं.
डॉक्टर आनंदने त्याला आवाज दिला रामा काय झाल? असा भूत बनून का उभाय?
रामा - डॉक्टर सुखाचा अपघात झालाय आणि तो जागीच गेला.
शंतनू - बघा मी म्हणालो होतो ना. तुम्ही ऐकलं नाही. थांबवलं असतं तर नसतं झालं हे.
डॉक्टर प्रशांत आणि आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली.
विश्वास बसत नव्हता पण ते खरच होतं. थोड्याच वेळात ऍम्ब्युलन्स मध्ये सखाला घालून आणलं होतं ते प्रेत होतं कायमसाठी अबोल झालेल्या सखाच. डॉक्टर प्रशांतला हेच समजत नव्हतं ते दवाखान्यातून निघून जाणाऱ्या शांतनूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. त्यांना कसल्यातरी भयानक संकटाची चाहूल लागली होती. आजुबाजुला भयाण शांतता पसरली होती ती वादळापूर्वीची शांतता होती. तो जाणारा मनुष्य कोणी साधारण नव्हता हे त्यांना समजलं. आजपर्यंत अगणित केस सॉल्व केलेला डॉक्टरांचा डॉक्टर प्रशांत दातखिळी बसल्यासारखा शांत उभा होता. समोर सखाचा मृतदेह रक्ताने माखलेला त्याचे सखे सोबती आक्रोश करत किंचाळत होते आणि डॉक्टर प्रशांत महान माईंड थेरपिस्ट अवाक होऊन फक्त पाहत होता.