STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Drama

3  

shubham gawade Jadhav

Drama

जावई बापू

जावई बापू

9 mins
2.4K


    नाटक लिहिण्याचा हा माझा पाहिलाच प्रयत्न. आवडलं तर नक्कीच आपला अभिप्राय मला आपण कमेंट्स च्या साहाय्याने कळवा.

            आपण या नाटकात पाहणार आहोत की जावई आणि मुलीचे सासू सासरे कसे मुलीला हुंड्यासाठी छळत असतात . तसे पाहायला गेलं तर हुंडा ही पद्धतच चुकीचे आहे. पण आपली मुलगी नांदत्या घरी सुखी असावी यासाठी आयुष्यभर दिवसरात्र एक करून आईबापानी कमावलेली कमाई हा जावई नावाचा प्राणी निर्लज्जपणे घेतो किंवा तोंडाने मागतोही. बिचारे आईवडील मुलीच्या काळजीपोटी देऊनही टाकतात पण अशा लोकांची हाव काही केल्या शांत होत नाही. यांना लग्नानंतर देखील पैशांची हाव शांत बसू देत नाही आणि तिथून पुढे सुरु होतो तो सुनेचा अमानुषपणे छळ . वेगवेगळ्या गोष्टींची मुलीच्या आईवडिलांकडे मागणी करायची आणि पूर्ण न झाल्यास तिला माहेरी पाठवण्याची धमकी , तिझा छळ , मारहाण देखील होते . मुलगी आईबापाचा विचार करते आणि शेवटी आत्महत्या नावाच्या प्रकाराला बळी पडते . तर अशाच एका हुंडा मागणाऱ्या जावयाची कहाणी स्पष्ट करणार हे नाटक .

टीप - नाटक थोडं अगोदरच्या काळातलं दाखवलं आहे . ज्या काळी लोकांकडे गाड्या नव्हत्या , मोबाइल फोन नव्हते .

      थोड्याच दिवसांपूर्वी सदा अण्णांनी मुलीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिल होतं . मुलीचा संसार सुखाचा जावा यासाठी रिनपाणी ( कर्ज ) काढून त्यांनी सगळ्यांना वस्तू दिल्या होत्या शिवाय ऐपतीनुसार जावयाला सोनं-नाणं ही केल होतं . आता अण्णा बिनघोर झालं होतं असं सगळ्यांना वाटत होतं पण अण्णा सारखं काळजी करायचं शेवटी बाप तो बापच . सगळी अण्णाला समजावून सांगत होती की , तुम्ही बिनघोर राहा . मुलीचं एकदम बेस झालय बघा . अण्णा हे ऐकून थोडे सुखावले जायचे पण एकांतात सारखी काळजी करायचे .

       एक दिवस तांबडं फुटताच बैलगाडीच्या बैलाच्या गळ्यातल्या घाट्यांचा आवाज आला . अण्णा चौकातल्या म्होरीत चूल भरत होतं . गाडीचा आवाज ऐकताच आवरून वाड्याच्या दारापुढे आले . बघतात तर काय जावई मुलीला घेऊन स्वतः आलं होतं .

सदा अण्णा पुढं होतं गाडीजवळ जातात आणि त्यांच्या पोरीला गाडीतलं सामान काढायला मदत करतात . जावई

बैलगाडीत पुढे बसलेला असतो . अण्णा आता त्याच्याकडे जातात .

अण्णा - राम राम जावई बापू . सोडा की बैल आन या खाली .

अण्णा घरगडी रामाला आवाज देतात .

अण्णा - रामा ए रामा जरा बाहीर ये आणि गाडीची बैल सोड बघू आदी . जावई बापू आणि हौसा आली बघ .

जावई बापू आलेत हा शब्द ऐकताच घरातल्या लोकांची धावपळ सुरु झाली जणूकाही प्रत्यक्षात देवच त्यांच्या घरी आले आहेत . अण्णांची बायको , सुन आणि मुलगा यांची धांदल उडाली . जावई तसाच बैलगाडीच्या तोंडाशी कासरा हातात घेऊन बसला होता .

अण्णा - अहो उतरा की खाली .आरं ए राम्या .

रामा - आलो अण्णा आलो .

अण्णा - आवं उतरा की जावई बापू . काय झालं ?

जावयाचा तंबूरा फुगलेला असतो . घरातून तो हौसाला भांडून घेऊन आलेला असतो . हौसा कधीच आत गेलेली असती . तिझा तो बारीक चेहरा तिझ्या आईच्या म्हणजे आक्काच्या नजरेतून सुटत नाही . हौसा येते अशी आतल्या खोलीत जाते आणि रडायला लागते .इकडे अण्णा जावई नावाच्या प्राण्याची विनवणी करत असतात . कसाबसा जावयाला बैलगाडीतून खाली उतरवतात आणि रामा गाडीची बैल सोडतो आणि झाडाखाली बांधतो . अण्णाला यातला काहीच प्रकार समजत नाही .

जावई - मामा मला लवकर निघायचंय बघा . म्या काय लय येळ थांबणार नाही .

अण्णा - आवं कसली घाई करतायसा . निवांत जावा . मस्त कोंबडी कापतो खा आन मग जा .

कोंबडीच नाव घेताच हावपड्या जावयाच्या तोंडाला पाणी सुटत पण उगाच आव आणून तो नाही म्हणतो .

जावई - नगो कोंबडी . मला लवकर जायचं हाय . काम हायती लय .

अण्णा - आव लग्न झाल्यास पहिल्यांदा आलायत . जरा पाहुणचार घिऊन जावा . म्या काय तुम्हाला तसं जाऊ देणार नाही बघा .

जावयाला तर कोंबडीसाठी थांबायचच असतं . त्यात अण्णांचा आग्रह त्याला कारण सापडलं .

अण्णा - रामा जा आत घरात सांग की आज कोंबडीचा बेत हाय म्हणून .

तेवढ्यात अण्णांचा मुलगा विश्वास तांब्या भरून घेऊन येतो . आपली बहीण मघाशी आत आल्यावर रडली म्हणजे नक्कीच जावई भांडला असल म्हणून त्याचा पाहिलाच पारा हालला होता . रागारागात तो पाऊल टाकीत अण्णा आणि जावयाच्या जवळ आला .

विश्वसराव - राम राम दाजी .

फुगीर जावई त्याच्या राम राम चं उत्तर ही देत नाही मग तर विश्वासचा पारा आणखीनच वर चढतो . उत्तर न दिलेलं पाहून अण्णाला आता काळजी वाटू लागली .

तिकडे हौसा का रडती म्हणून अण्णांची सुंदर सुमित्रा आत गेलेली असतें .

अण्णा - ही घ्या पाणी आणि हातपाय धून घ्या .

आगं ए ऐकलं का ? जरा चहा टाका . जावई बापू थकून आल्यात .

आक्का - मघाशीच टाकलाय बघा .हौसा आत आली तवा .

विश्वासराव रागाने तिरकट नजरेने जावयाकडे पाहत होते .

अण्णा - मग जावई बापू . लय तरास न्हाई ना व झाला येताना .

अण्णाचा घरगडी रामा जरा चेष्टेखोर असतो .

रामा - आव अण्णा आपलं रस्त त्यांच्याकडच्या रस्त्यापक्षा चांगलं हाईत .

याच्या या उत्तराने जावयाला जरा राग येतो आणि तो त्याच्याकडे पाहून त्याचा राग व्यक्त करतो . रामाने दिलेल्या उत्तराने विश्वास जरा खुश होतो .

अण्णा - रामा तू शांत बस .मधी मधी नगो बोलू . बसायला टाक बघ .

रामा - व्हय जी .

अण्णा - मग जावई बापू अचानक येणं केलसा . कळवलं नाही आगुदर .

जावई - आलो आसाच . हौसाला लय आठवण येत होती .

(तो खोटंच सांगून देतो .)

आक्का - चहा घेताय ना .

विश्वास - हा द्या ना .

अण्णा चमकून विश्वास कड बघतात त्यांना समजतच नाही काय चाललय नेमक .आक्का अण्णाला हळूच इशारा करतात आणि आत बोलवतात . अण्णा आत जाताच त्यांची बोलणी सुरु होतात .

आक्का- आव हौसा रडती .

अण्णा - का ? काय झालं ?

आक्का - सांगना झाली बघा . तुम्हीच इचारा एक डाव .

अण्णा - हौशे ए हौशे .

अण्णाचा आवाज ऐकताच हौसा आणखी रडायला सुरुवात करते . अण्णा तिला शांत करतात आणि काय झालं ते नीट सांग असं बोलतात .

अण्णा - काय झालं ?

हौसा - अण्णा . हे आणखी पैसे आन म्हणत्यात तुझ्या बापाकडून . सासू आन सासरा बी भांडत्यात माझ्यासंग पैशासाठी . काहीच काम करत नाहीत हे . मामी ( सासू ) बसून असतात . मामंजी पण नुस्त्या बिड्या वडतात आन नुसतं ट

ोमणे देतात .तुझ्या बापानी हे नाय का शिकवलं ते नाय का शिकवलं . आन हे तर पितात बी .

हौसा न दम घेता सगळं सांगत होती आनी मधून मधून हुंदका पण देत होती .


अण्णा ऐकून आश्चर्यचकित होतात . अण्णांच्या डोळ्याच्या कडा पाणवत्यात .लग्नाला आपण भरपूर खरच केला . वस्तू ना वस्तू दिली . तळहाताच्या फोडप्रमाणं जपलेली पोरगी दिली .कधी डोळ्यात टिपूस येऊ दिल नाही आणि आज ह्यो दिवस त्यो बी इतक्या दिवसांनी .पाठीमागून आलेल्या विश्वासाने हे ऐकलं आता त्याची तळपायाची आगं मस्तकात जाते . तो माघुनच एक शिवी हासडतो , आईचं बेणं ह्याच्या . त्याचा आवाज ऐकून अण्णा माघ बघतात .रागावलेल्या विश्वासला शांत बसायला सांगतात .अण्णा सगळ्यांना निमूटपणे राहायला सांगतात जणू काही झालच नाही .आक्काला जेवण बनवायला सांगतात .अण्णा व्हरांड्यात येतात .जावयाचा चहा पिऊन झालेला असतो .रामानेही हा प्रसंग ऐकलेलं असतो त्यालाही खूप राग येतो .


अण्णा- झाला का ? चहा पिऊन . बसा जेवण होईल तवर आपण गप्पा मारू .

मग आमचं इवाई कस हायतं . तब्येत काय म्हणतेय त्यांची ? आनी यिन बाई काय करत्यात .

जावई - झ्याक हाय बघा एकदम .

तेवढ्यात रामा हळूच आवाजात पुटपुटतो .

रामा - त्यांला काय धाड भरली ? खात्यात पित्यात आन लेकराला तरास देत्यात .

त्याचा अस्पष्ट आवाज जावयाच्या कानावर जातो .पण तो काय बोलला हे नाही कळलं मात्र आपल्यालाच काहीतरी उत्तर दिल हे समजल .अण्णा डोळ्यांनी रामाला शांत बसायला सांगतात .

विश्वासराव - मग न्याहरी करूनच जाणार असताल .

हा खोचक प्रश्न ऐकून तो जरा ओशाळला .पण तसे न दाखवता ताठपणे बोलू लागला .

जावई - तसा जाणारच होतो .

पुन्हा रामा पुटपुटतो .

रामा- जायचं ना मग .

पुन्हा जावई रागाने त्याच्याकडे पाहतो .

जावई- अण्णांनी थांबवलं . कोंबडी कापतो म्हणले .लय आग्रह केला तवा थांबलो .

पुन्हा रामा .

रामा - म्हंजी हावपड कोंबडी साठी थांबलय तर . लाळ गाळं .

जावई खूप रागारागाने पाहत होता .त्याला आता समजलं की सगळ्यांना माहिती झालं असावं की आपण हित का ? आलं आहे .

विश्वासराव - आमच्या हौसाला नीट संभाळताय ना ?

विश्वासाने मुद्द्यालाच हात घातला . विश्वास एकदम धाड ची धाड पैलवान . दंडाच्या बेडक्या फुगलेल्या .त्याला पाहून जावई जरा घाबरायचाच.

जावई - म्हंजी . म्हणायचंय काय तुम्हाला ?

अण्णा ही आता पवित्र्यात आले .

अण्णा - आव . काय लागत होतं तर आम्हाला कळवायचं पोरीला कशाला तरास द्यायचा .

आता जावई सगळ्यांच्या प्रश्नांनी ओशाळ्यासारखा झाला.

जावई - म्हंजी .

त्याला काय बोलावे समजतच नव्हतं .

विश्वास - तुम्ही पैक मागताय पुन्यांदा . सासू सासर बी भांडत्यात .

अण्णा - आन कधीपासून प्यायला लागलात .आम्हाला तर कसलंच व्यसन करत नाही म्हणून सांगितलं .

विश्वास - काये ही ?

जावई पुरता गरबडला .

जावई - नाही मामा मी अजिबात पेत नाही आन कवा पैक माघितलं . काय बी संगीतीय हौसा .

अण्णा - माझ्या पोरीला आम्ही खोटं बोलायचं नाही शिकिवलं जावई बापू .आम्ही काय म्हणून कमी केल नाही तुम्हाला . कापडं , सोनं नाणं , बैलगाडी , बैलजोडी , सोन्यासारखी पोर .

रामा परत पुटपुटला .

रामा - घ्या सगळं आन द्या हाकून .आपली पोर आपण सांभाळू .

तो अस्पष्टच बोलत होता .

जावई - आव आसं काय बी नाय

विश्वास - मग कसंय ?

अण्णा विश्वासला शांत हो म्हणून सांगितलं .

अण्णा - आसं नसतं जावई बापू .तुम्हाला बी एक बहीण हाये .

जावई - आव मामा म्या म्हणतोय न काहीच नाही झालं .

विश्वास पुन्हा चिडून .

विश्वास - मग हौसा का रडतीय .

जावई- आव मेव्हण नवरा बायकुची थोडीफार होत्यातच . आन घर तिथं भांड्याला भांड लागतच की .

अण्णा - हा .पण मग पैस कशासाठी लागत्यात तुम्हाला .

सांगा .आम्ही देतो की .पण पोरीला का त्रास देताय .

जावई - नाही मामा . नाही असं काही .

विश्वास - सासू सासर पण भांडत्यात .

जावई - एवढं तेवढं होतच की सासू सुनच

अण्णा - किती पैसं लागत्यात सांगा . देऊ जाताना

जावई - कसलं पैक मला नाही पाहिजी . आपलं जेवतो आन हौसाला घेऊन जातो परत घरला .

रामा - ज्यावाण बिवान काय नाय द्या तसच हाकलून .गाडी बैल बी आपलीच हायीत .

अण्णा - आमची पोर आम्हाला जड नाही जावई बापू .आम्ही आयुष्यभर म्हणलं तरी सांभाळू . आम्ही एवढं सगळं पोरीच्या सुखासाठी केलय आन तिलाच सुख न्हाय .

जावई - आव तसे काय नाय अण्णा . तिला इचारा म्या कधी हात सुद्धा उगारला नाय .

विश्वास - कधी प्रयत्न बी करू नगा .

जावई शांत झाला. त्याची चांगलीच अक्कल ठिकाणावर आली होती .

अण्णा - हे बघा जावई बापू . इथून पुढं पोरीला काय बी तरास झाला तर तुमचं काय बी खरं नाय .

जावई - आव मामा एवढी बार माफ करा .पुन्यांदा नाय असं होणार .

अण्णा - आमची पोरगी आम्ही माघारी तर आणूच पण दिलेल्या वस्तू आन कापडासकट सगळं घेऊन येऊ .

विश्वास - आन प्याल्यालं समजल तर हात पाय मोडीन आन एका जाग्यावर बसायला लावीन आयुष्यभर .

विश्वासाने चांगलाच हाग्या दम भरला .जावई आता निःशब्दच झाला. त्याचे खाड्कन डोळेच उघडले .

अण्णा - तुमच्या बहिणीला असा तरास कुणी दिला तर तुम्हाला कस वाटलं

जावई शांत बसला होता .तोंडातून एक शब्दही नाही .

विश्वास - आसं वागणं शोभा न्हाय देत दाजी तुम्हाला .

अण्णा - बरं झालं ते झालं . इथून पुढं काय लागलं ति आम्हाला मागत जा .पोरीला तरास होता कामा नये .

जावई - मला काहीच नाही लागत मामा .

आतून जेवण तयार झाल्याचा आवाज येतो .दरवाज्यातून नवऱ्याची होणारी खरडपट्टी पाहून हौसा खुश होतं होती . मनोमन आनंद होतं होता की आपला भाऊ आणि आपले वडिल आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत . जावयाची त्यांनी कसलीच गय केली नव्हती . जावई मान खाली घालून अपराध्यासारखा बसला होता .त्याचे डोळे उघडले होते .आपल्यालाही एक बहीण आहे आपण असे वागणे चूक आहे हे त्याला मनोमन पटले होते .

       हुंडा घेऊ नका आणि देऊही नका. हा कायद्याने गुन्हा आहे आपली लेक म्हणून सुनेला सांभाळा. आपली लेक तशी तीही असतें.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama