shubham gawade Jadhav

Others

2  

shubham gawade Jadhav

Others

एक थेंब पावसाचा....

एक थेंब पावसाचा....

2 mins
95


आकाशात काळे ढग जमले होते. वाऱ्यानेही जोर धरला होता. झाडे त्या वाऱ्याच्या तालावर डोलत होती.गाई-गुरे, पक्षी, माणसं घराकडे धाव घेत होते.कोकीळ तिच्या मंजुळ आवाजाने पावसाच्या येण्याचा इशारा देत होती. सगळीकडे लगबग सुरु झाली होती.मुंग्या अतिशय वेगाने उंचवटा गाठत होत्या.तप्त झालेली नी फाटलेली धरती आ वासून कित्येक दिवस वाट पाहत होती.आता तिझा कित्येक दिवसांचा विरह थांबणार होता.ती आपल्या अजस्त्र हातांनी पावसाला स्वतःच्या मिठीत घेण्यास आतुर झाली होती.

      सगळ शांत असणार वातावरण क्षणात विस्कळीत झालं होत. अचानक जमलेल्या ढगांनी एकमेकांवर आदळून एखादया जंगलाच्या सिंहगर्जनेने सगळे जंगल हादरवून टाकावं तसं सगळा आसमंत हादरवून सोडला होता. दोन प्रचंड मोठ्या बैलांची टक्कर व्हावी तसा त्यांचा एकमेकांवर आदळून आवाज होत होता.मल्ल आता षड्डू ठोकून मैदानात उतरले होते. झुंज थोड्याच वेळात सुरु होणार होती.

      हिरवागार शालूचा आहेर घेऊन पाऊस धरतीला सजवायला येणार होता.ती शाल अंगावर घेऊन धरती स्वतःचं रूप बदलणार होती. इतक्या दिवस तेज उतरलेली धरती तेजाळून गेली होती.तिझा सगळा नूर पालटून गेला होता. मातीचा सुगंध दाही दिशांना उधळण करत होता. एखादी महागडी अत्तराची कुपी उघडावी आणि त्यातून मंत्रमुग्ध करणारा सुगंध तसा या धरतीचा गंध वाऱ्यासोबत धाव घेत होता. गार गार वारा सुखावत होता. झाडांच्या पानाची सळसळ स्वागत गीत गात होती.

      मोराने आपल्या आवाजाने पावसाला पडण्याची अनुमती दिली. पिसारा पसरवून तोही पावसाच्या स्वागत सोहळ्यात सामील झाला. वारा आणखी थंड झाला आणि अचानक एक टपोरा थेंब धरतीवरती पडला. तप्त तव्यावर पाण्याचा थेंब पडावा नी तो चूरकन वाजून बाष्प होऊन गायब व्हावा तसं तप्त झालेल्या जमिनीवर थेंब पडताच तो बाष्प होऊन उडून गेला असं भासल पण धरतीने त्याला स्वतःत सामावून घेतलं होत. आता एकामाघून एक थेंब पडू लागला तशी धरती आणि आकाश रंग पालटू लागले. त्यांची ती भेट युगानुयुगे कोणीतरी अडवून धरली होती आणि अथक प्रयत्नानंतर ती झाली होती असं भासत होत.भेटीच्या आनंदाने पाऊस जोरात बरसून धरतीत सामावण्याचा प्रयत्न करत होता.तो सोहळा खरच पाहावा तितका कमीच होता.


Rate this content
Log in