एक भेट ...
एक भेट ...


ऑफिसात आज तिला पाहिलं आणि मनातुन आवाज आला ही आपल्या स्वप्नात रंगत असलेल्या मैत्रिणी सारखीच आहे. तसाच लिक्ट कडे चालत गेलो. तिनेच आवाज दिला या मी लिफ्ट थांबवली आहे मी जरा पटापट पाय टाकत लिफ्ट मध्ये पोहोचलो आणि तिच्याकडे बघून एक स्मित हास्य केलं आणि धन्यवाद दिले.
नाव विचारण्याची हिम्मत काही झाली नाही. तिच्या पुढ्यात उभा असताना पाठून कुजबुज आवाज येत होता. एखादी मुलगी हळू आवाजात फोन वर बोलत असली म्हणजे तिचा तो मित्रच असावा असा गैरसमज नक्की असतो. असाच काही माझ्यासोबत घडलं. मनात लाडू फुटला होता. पण काही क्षणात त्याची बुंदी झाली.
योगायोगाने ती मैत्रीण माझ्याच टीम मध्ये आली. तीच नाव जाणून घेण्याची आतुरता लागली होती. राहूनच मी तीला विचारलं नाव काय आहे तुझं ???
"अमृता" तिने नाव सांगितले. छान वाटलं नाव ऐकून. तिचा आवाज खूपच गोड होता. बघता बघता जवळीक वाढली. आणि दररोज ऑफिस मध्ये एकमेकांना भेटण्याची ओढ लागत असायची. ती माझ्या समोरच्या डेस्क वर बसते. मी नकळत अमृताला चोरून चोरून बघतो. ती सुद्धा मला त्याच नजरेने बघत असते पण कधी त्याच्या पुढे बोलणं होतच नाही. ती कदाचित वाट बघत असावी.
आज मीच पुढाकार घेऊन तिला विचारलं. ऑफिस नंतर कॉफी पिण्यासाठी जाऊयात का???.
तिने होकारार्थी मान डोलावली. माझ्या आनंद गगनात मावेनासा झाला होता.
ऑफिस सुटल्यानंतर मी लवकर निघालो. संध्याकाळी ६ वाजताची वेळ ठरली. घरी पोहचून तयारीला लागलो. कोणते शर्ट घालू कोणती पॅन्ट घालू हाच विचार करत बेड वर पडलो होतो.
कॉफी शॉप मध्ये पोचल्यानंतर तिची वाट बघत होतो. तेवढ्यात ती समोरून चालत आली. अंगावर हिरव्या रंगांची चोळी आणि घागरा , दाव्याखांद्यावर सोनेरी रंगाचा दुपट्टा, कानात मोर पंख, आणि उजव्या हातात मोबाईल. अमृता खुपच सुंदर दिसत होती. आजवर इतकी सुंदर तिला दिसताना मी कधी पहिलच नव्हतं. ती येऊन समोर बसली काही वेळ असाच निघून गेला. मी कॉफी ऑर्डर केली. कॉफी आली पण दोघेही गप्पच. राहून मीच सुरवात केली कसा होता आजचा दिवस ???
तिने उत्तर दिलं खुप छान आहे आजचा दिवस!!!
का???? मी मुद्दाम विचारलं
सहा महिने झाले आपण एकमेकांना सतत बघतोय बोलतोय पण कुणी हिम्मत करतच नाही. पण अखेर तु पुढाकार घेतलास आणि कॉफी साठी विचारलस. अमृताने उत्तर दिलं.
कॉफी पिल्यानंतर फेरफटका मारावा म्हणून आम्ही गाडीने निघालो आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याशी थांबलो. आणि गाडी रस्त्याच्या बाजूला लावून बाहेरील वातावरणात आलो आणि गाडीच्या मागे उभा राहून निसर्गाचा आनंद घेत होतो. अमृता सुद्धा शेजारीच उभी होती. रस्त्याने गाड्यांची जास्त वर्दळ नव्हती. म्हणून तिने राहूनच हातात हात दिला आणि शांत उभी होती. अचानक गाडी धडकल्याचा आवाज आला. आणि बघतो तर काय???
६ वाजले होते अमृता फोन वर फोन करत होती. बेडवर पडल्या पडल्या माझा डोळा लागला होता.