स्वप्न नगरीचा राजा
स्वप्न नगरीचा राजा
चल चल आवर पटा पट!!!! - स्वराताई...
काय झालं? झोपू दे ना मला!!!! - नितीन...
अरे दादा उठ बाबा बघ काय करत आहेत.
बाबांनी सगळं सामान इकडे तिकडे पसारा मांडला होता. मला नक्की कळत नव्हतं काय चालू आहे ते. मी डोळे चोळत अंथरुणात बसलो, बाबांना बघत. नक्की करत काय आहेत बाबा???
मी नितीन वय वर्ष ७ इयत्ता २ री (ब) जिल्हा परिषद शाळेत शिकतो. स्वराताई माझी मोठी बहीण इयत्ता ५ वीमध्ये शिकते, माझ्याच शाळेत आणि विठ्ठल माझे बाबा महार, गावात कुठं जनावर मृत पावलं किंवा कुठं गटार तुंबली की गावकरी बाबांना प्राधान्य द्यायचे.
फाटके पिवळे धोतर आणि मळकटलेला मातीच्या रंगाचा सदरा, पायात चप्पल नावाची गोष्ट कधी मिळाली नाही, टाचांना भल्या मोठ्या मोठ्या चिरा पडलेल्या आणि सतत कुणाकडे तरी काहीतरी काम मिळेल अशी आशा ठेवणारे माझे बाबा. असं आमचे तिघा जणांचे कुटुंब. आई काळाच्या ओघात केव्हा निघून गेली. काही कल्पना नाही कधी गेली, कशी गेली, कुठे गेली, पण बाबा दररोज सांगतात...
आभाळात ती चांदणी दिसते का? जी खूप जास्त लखलखते, तीच तुझी आई. कायम तुला बघत असते.
बाबा!!! आई रात्र झाली की का दिसते? दिवसभर मला बघायलासुद्धा येत नाही. मी एकटाच असतो दिवसभर. माझ्यासोबत कुणी बोलतसुद्धा नाही. स्वराताई पण तिच्या मैत्रिणींच्या सोबत खेळत असते. मला खेळायला कुणी घेतसुद्धा नाही.
काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे आणि या वर्षी मी बाबांना सांगणार आहे, आपल्या घरी बाप्पा घेऊन या म्हणून पण बाप्पाला आणले की, बसवायचे कुठे मी एकटाच विचार करत होतो!!
नारळाच्या झावळ्यांनी बनवलेलं जेमतेम १० X १० चं माझं घर असावं आणि त्यात शेणाने सारवलेलं. घरात एकही टेबल नाही. घरात देव्हारा नाही. एक छायाचित्र खराब झालेला फोटो होता, त्यात कोणते देव होते हेही कळत नव्हते. पाण्याने त्यातील चित्र पुसट झाले होते. मी बाबांना नेहमी म्हणायचो, बाबा हे कोणते देव बाप्पा आहेत.
तेव्हा बाबा उत्तर द्यायचे, हे गणपती बाप्पा आहेत.
आता गणपती बाप्पा कोण हे कुणाला माहीत नसेल... लहानपणापासून प्रत्येकाला माहीत असतं, गणपती बाप्पा कोण आहेत. जेव्हा पण गणपती येतात तेव्हा असा काही जल्लोष प्रत्येक घरा घरामध्ये असतो की सगळीकडे एक मन प्रसन्न करणारं वातावरण निर्माण झालेलं असतं. सगळीकडे सुगंधी अगरबत्तीचा सुगंध आणि गाण्यांच्या जल्लोषात सर्व गणेश जयंती साजरी करत असतात आणि यावर्षी मीसुद्धा बाबांना आग्रह करणार आणि गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार.
मी-बाबा आपल्या घरी गणपती बाप्पा घेऊन या ना?????? मला बाप्पा बरोबर खेळायचं आहे!!!! माया अक्का बोलते, बाप्पाला घेऊन आला की बाप्पाला सांग तू, तुझ्या आईला बोलवून आणेल.
स्वरा माझी ताई आणि आई दोन्ही सकाळी उठल्यापासून मला कपडे घालून, नाष्टा चारून, डब्बा बनवून देऊन, माझ्या शाळेत सोडेपर्यंत स्वराताई नुसती माझी "आई" झालेली असते. ताईने कधी मला आईची कमतरता भासू दिली नाही, पण शेजारील मुलांच्या आई बघून मला आई पाहिजे असायची. पण ताई मला तिच्या पोटच्या मुलासारखी सांभाळत होती. ताईने कधीच मला रडवलं नाही. पण जेव्हा केव्हा मी राडायचो तेव्हा ताई मला खुदकन हसवायची जसं की तिला माझ्या प्रत्येक गोष्टीचं गुपित ठाऊक होतं. बाबांना माहीत होतं आपला मुलगा हट्टी आहे.
बाबा घेऊन या ना बाप्पा ला… स्वराताई बाबांना सांग ना मला बाप्पा पाहिजे!!!
म्हणून त्यांनी होकारार्थी मान डोलावली. पण बाबांना माहीत होतं, आपली परिस्थिती खूप बिकट. त्यात गणपती येणार म्हटल्यावर खर्च आला. खिशात जेमतेम ५ रुपये आणि पावसाने लावलेली छतावरून गळती. अशा गळतीमध्ये बाप्पा कसे घेऊन येणार, पण कदाचित बाबांचीसुद्धा इच्छा होती की बाप्पा घेऊन यायचेच यावेळी.
सकाळी सकाळी सरपंचाच्या माणसाने निरोप आणला, विठ्ठल!! चल सरपंचांनी बोलावलंय.
सरपंचांनी २ रुपयांच्या बोलीवर बाबांना एक एकर शेतीत लावणीकरिता बोलावलं पैसे कमी होते, पण बाबांना सध्या पैसे पाहिजे होते. दोन्ही मुलांच्या अपेक्षा २ रुपयांच्यासाठी एक एकर शेती लावत होते आणि आम्ही दोघे आनंदाने भरून आलो होतो.
स्वराताई समजूतदार आणि हुशार होती. तिला बाबांचं दुःख, त्रास, वेदना कळून येत होत्या. दररोज बाबा एक वेळ जेवून आम्हाला दोन वेळ पुरेल असं वागत होते. स्वराताई सतत माझी समजूत काढत असायची. पण मी बालिश वृत्तीचा असल्यामुळे मला फारसे काही कळत नसायचे.
लवकरच गणेश चतुर्थी जवळ येत होती. बाबानी संपूर्ण घरात शेणाने सावरले होते. स्वराताईने बाबांना खूप मदत केली होती. पण अजूनही काही तयारी झाली नव्हती. बाबांना त्यांच्या समाजातील काही लोक आवडे लावत होते की महार गणपतीची पूजा करत नाहीत. पण बाबांनीसुद्धा हट्ट धरला होता, यावेळी कितीही अडचणी आल्या तरी गणरायाचे आगमन करायचेच.
शेवटी तो दिवस आलाच. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि मी आणि स्वराताई घरीच होतो. बाबांनी स्वराताईला सांगितले की, मी गणरायाची मूर्ती आणायला जातोय आणि बाबा निघून गेले.
स्वराताईने प्रसादाची उत्तम सोय केली. शिरा बनवला होता आणि मी आतुर झालो होतो की बाबा कधी येतील. मी सतत स्वराताईला विचारत होतो, ताई बाबा कधी येतील???
स्वराताई सतत मला सांगत होती, नितुबाळा येतील बाबा लवकरच येतील.
मी आज नवीन शर्ट घातला होता. बाबांनी मागच्या वर्षी दिवाळीला घेतला होता आणि शाळेची चड्डी आणि पावडर लावून तयार होतो. पण बाबा काही येईना. सकाळची दुपार झाली. शिरा पूर्ण थंड झाला होता. मला भूकसुद्धा लागली होती. पण स्वराताईने सांगितले होते की, जोवर बाप्पा येऊन जेवत नाही तोवर आपण उपास करायचा असतो. सात वर्षाच्या मुलाला उपास वगैरे काय माहीत असणार???
इतक्यात, बाबा आले!!! बाबा आले!!!
मी इतका खुश झालो की माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण बाबांच्या हातात मूर्ती काही दिसेना. बाबांच्या हातात एक चौकोनी वस्तू वर्तमानपत्रात गुंडाळून घेऊन येत होते. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तयार झाला होता. तेवढ्यात बाबा दारात आले. स्वराताईने बाबांच्या पायावर पाणी ओतले आणि त्यांना घरात घेतले.
मी उड्या मारत होतो. स्वराताई म्हणाली, अरे थांब थांब.
बाबा मुर्ती कुठे आहे??? बाबा, सांगा ना बाबा????
अरे राजा, मूर्ती नाही मिळाली, बाबांनी उत्तर दिले... म्हणून मी गणरायाचे छायाचित्र आणलं आहे. आपल्या देव्हाऱ्यात जे बाप्पा आहेत ते खराब झाले आहेत ना, म्हणून मग मी हे घेऊन आलो.
मी पूर्णपणे नाराज झालो होतो. सर्वांच्या घरात मोठमोठ्या गणरायाच्या मूर्ती पाहून मला वाटले बाबासुद्धा एखादी मोठी मूर्ती घेऊन येतील. पण बाबांनी मला दिलेला शब्द पाळला नाही.
बाबांनी आणि मी अगदी मूर्तीची जशी तशी त्या छायाचित्राची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर आरती सुरू झाली की तेवढ्यात शेजारील तीन चार मुले आरतीचा आवाज ऐकून घरात आली आणि तीसुद्धा आरती म्हणू लागली. माझ्या आनंदाला पुर आला होता. नकळत माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू निघू लागले होते. स्वराताईने सर्वांना तिने बनवलेला शिरा प्रसाद म्हणून दिला. स्वराताईने याआधी कधीही इतका स्वादिष्ट शिरा बनविला नव्हता.
मी स्वराताईला विचारलं, स्वराताई तू नेहमी असा शिरा का नाही बनवत???
तेव्हा स्वराताईने उत्तर दिलं की, जेव्हा आपला प्रसाद बाप्पाच्या चरणी पोहोचतो तेव्हा त्या प्रसादामध्ये एक वेगळाच गोडवा निर्माण होतो.
बाबांनी सांगितलं की, पहिल्या वर्षी बाप्पा दीड दिवस वास्तव्य करतात. आपणसुद्धा असंच करूया.
बाबांनी मूर्ती आणायला जाताना गावातील पुजाऱ्यांचा सल्ला घेतला होता. त्यांनी दिलेला सल्ला संपूर्ण गाव पाळत असायचं. आम्ही रात्रभर खेळ खेळत होतो. तेव्हा जुगार नावाची गोष्ट कळतसुद्धा नव्हती. आम्ही दिवटीच्या प्रकाशात जे सोपे खेळ खेळता येईल तसे मला तर काही कळत नसायचं पण कच्चा लिंबु म्हणून मला स्वराताई आणि बाबा दोघे पण घेत होते.
सकाळी उठून मी असाच बाप्पाचा फोटो न्याहाळत होतो. तेव्हा स्वराताई म्हणाली, नितु कसे आहेत बाप्पा?
मला हुंदका येत होता, डोळ्यांतून नकळत अश्रू निघाले.
आणि स्वराताईने मला जवळ घेत, माझ्या डोक्यावर मायेचा हात फिरवत म्हटले, आपण दरवर्षी या बाप्पाचे पुजन करूया आणि असेच त्यांचं प्रेमाने स्वागत करूया...