Jyoti gosavi

Classics Inspirational

4  

Jyoti gosavi

Classics Inspirational

चिंधीचा झाला पितांबर

चिंधीचा झाला पितांबर

2 mins
342


चिंधीचा झाला पितांबर


कधी बरं भेटले मी त्या माय माऊली ! अनाथांच्या मायेला, साधारण दहाएक वर्षांपूर्वी, "कोपरीच्या जिजामाता गार्डन" मध्ये अत्रे कट्ट्यावर त्यांचे व्याख्यान ठेवलेले होते.

तोपर्यंत त्यांचा सिंधुताई सपकाळ रिलीज झालेला होता.आणि बऱ्यापैकी त्या प्रसिद्धीस आलेल्या होत्या.त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला देखील चांगलीच गर्दी होती.

आता आपण फोटोमध्ये पहातो, तशीच मूर्ती, तेच गुलाबी लुगडे, डोईवरती पदर ,चेहऱ्यावरती मात्र तेजोवलय जाणवत होते.कदाचित त्यांच्या समाजसेवेच्या साधनेचे ते फळ असावे.

वागण्यात, बोलण्यात एक खंबीरपणा .तरीही आवाजात मार्दव. स्वतःची सगळी इत्यंभूत कथा सांगून झाली.अमेरिकेला कशा गेल्या ,तेथील सभागृहात काय बोलल्या, तेथून कशी आणि किती मदत झाली हे सांगितले.

सुरुवात कशी झाली ,सासूने दिलेला त्रास, मार, नवऱ्याच्या लाथा.

गायीच्या गोठ्यात बाळंतपण ,अगदी सगळ्यात नाठाळ आणि मारक्या गाईच्या जवळ आणून टाकलेलं, मार खाऊन खाऊन अर्धमेल्या झालेल्या, अर्धवट बेशुद्धावस्थेत मुलीला जन्म दिला .

त्या म्हणाल्या माणसांपेक्षा प्राण्याला खूप काही वेदना कळतात! म्हणून ती नाठाळ गाय रात्रभरात इकडची तिकडे हलली नाही का खाली बसली नाही.

कारण तिच्या पायामध्ये एक बाळंतीण आणि बाळ होतं.

असा नवर्याचा मार खाणाऱ्या ,आणि सासूचा जाच सहन करणाऱ्या कित्तेक सासुरवाशिणी तेव्हाही होत्या , आणि आताही असतील .पण म्हणून काही सगळ्यांची सिंधुताई सपकाळ होत नाही.

ही सेवावृत्ती जन्मता रक्तातच असावी लागते. ती त्यांच्यात होती, म्हणून दिवसभर फिरून, ट्रेनमधून भीक मागून, ते अन्न जमा करून त्या लहान बालकांना, आंधळ्या-पांगळ्यांना वाटत असत .


मूळ आई-वडिलांनी ठेवलेले नाव चिंधी, पण त्यांच्या समाज सेवेने परोपकारी वृत्तीने, चिंधीचा भरजरी पितांबर झाला होता.


त्यानंतर पुन्हा एकदा सिंधुताई अशाच कुठल्यातरी कार्यक्रमात भेटल्या. तेच बोलणे, तीच लकब, तीच कहाणी, पण पुन्हा ऐकावीशी वाटणारी. भाषणानंतर त्या लोकांसमोर आपला पदर पसरत असत ,आणि त्या चालवित असलेल्या उपक्रमासाठी मदत मागत असत .

"माझ्या लेकरांसाठी मदत मागायला मला कोणती लाज वाटत नाही" आणि मंडळी, त्यांच्या पदरात लोक पाचशे, हजार, गरीबतला गरीब शंभर रु तरी, अशा नोटा देखील टाकत असत. 

मीदेखील माझ्या परीने करायची ती मदत केली.कारण खात्री होती हा पैसा अनाठाई जाणार नाही.ज्या कारणासाठी आपण देत आहोत त्यासाठीच तो वापरला जाईल, असा विश्वास वाटत होता .

असो अशा कित्येकांच्या अनाथांच्या मायेने माय झालेल्या माईला सलाम.


माय तू गेलीस

 सगळं सोडून

 तिथेच टाकून 

पण तुझी अनाथ झालेली लेकरं ,आता कोणाचं तोंड बघतील? 

असा चिंधीचा पितांबर काही वारंवार होत नाही.

तो कधीतरी शतकातून एकदाच होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics