Ramjan Tadavi

Classics Inspirational Others

4.1  

Ramjan Tadavi

Classics Inspirational Others

बोलका बोरखेडा

बोलका बोरखेडा

4 mins
804


   ज्या दिवशी रोजगार नाही त्या दिवशी गावात चर्चाचा पुर वाहायचा. दिवसभर टोपलं भरभरुन चर्चांचा उपसा व्हायचा.कधीकधी तर लोकं जेवण करायचेही विसरत. जेवायची आठवण झाल्यावर जेवायला बसत. जेवणाच्या वेळीही चर्चा सुरु ठेवत. अन्ननलिकेत जाणारा घास श्वासनलिकेत गेला की ठसका लागे. पाणी प्या! पाणी प्या!! अशी बायकोची किरकिर सुरु होई.मयत झालेले आईवडिल ठसका लागणाऱ्याला आठवण करीत अशी समजूत होई. बोरखेड्याला लोकं बोलघेवडा म्हणत.ऑल इंडिया लेव्हलवर चर्चा करायची स्पर्धा घेतली असती तर बोरखेड्याचा पहिला नबंर आला असता.

    दिवसभर करायचे काय ? असा प्रश्न पडलेल्यांना चर्चांचा मोठा आधार होई.गोठाणाकडच्या टपरीकडे एक बैठक बुड तापेपर्यत होई. लोकं कपडे झटकून उठत. भाकरतुकडा खावून झाल्यावर दुपारुन दुसरी बैठक हयाजवळ बसवत. हया जवळच्या टपरीवाल्याने चर्चा करणाऱ्यांची नस ओळखली होती. त्याच्या टपरीतले बिड्यांचे पुडे चर्चा करणाऱ्यांच्या पुढ्यात पडत. चर्चा करणाऱ्यांच्या भरोशावर टपरीवालाचा व्यवसाय चाले. चर्चा करणारे दिवसभर टपरीच्या चारही बाजूने घिरट्या घालत.बोलघेवड्या लोकांची बुड टेकविण्याची व्यवस्था टपरीजवळ बाकडे टाकून म्हणूनच त्याने केली होती.

    आजही फत्तु दादा, सिलदर दादा, दगडू दादा, नथ्थु दादा,सायबु दादा चर्चा करण्यात गढून गेले होते.

    ' आपण काय पाप केलं आपल्याला शेतीकामही नाही आणि नवकरीही नाही' सिलदर दादा तावातावाने सांगत होता.

    सेटनेट, पीएच.डी.डी.एड., बी.एड. वाले लोकं खड्डे खणताहेत, चिकन विकताहेत, त्यांना नवकऱ्या नाहीत. तुला चौथी शिकलेल्याला कोण देईल नोकरी' बारावी पास फत्तु दादाने व्यवहारी मुद्दा मांडला.

   'आजकाल वशिला चालतो. ओळख असल्याशिवाय कामे होत नाहीत' दगडू दादाने शहाणपणाची गोस्ट सांगितली.

    'शिक्षण संस्थावाले लोकं नोकरीसाठी म्हणे लाखोंनी पैसे मांगतात. कुठून देईल गरीब माणूस इतके पैसे. का स्वतला विकून देईल. गरीब होणं ह्या दुनियेत पाप आहे' नथ्थु दादा काळजीच्या सुरात म्हणाला.

    'नोकरी लागल्यावर पण सहा महिन्यात मोटारसायकल येते. शहरात स्वतचे घर होते. बागायती शेत विकत घेतले जाते' सिलदर दादाने वस्तुस्थिती सांगितली.

    'आपण खेड्यातले लोकं. आपल्याला देव धरेल तसं राहू. गाडी, मोठमोठे बंगले, शेतीवाडी ताबडतोब घेणारे लोकं म्हणे हरामाची कमाई करतात. ते इडी का फिडी अशाच लोकांची चौकशी करते म्हणे, तहसिल कचेरीत, पंचायत समितीत, झेडपीत, सरकारी कार्यालयात वरचे पैसे खाणाऱ्यांना कधीकधी अॅण्टी करप्शनवालेही पकडतात. काही काही सरकारी नोकर तर तेही मिळवतात व साहेबालाही मिळवून देतात. त्यांचे हप्ते ठरलेले असतात म्हणे' समाजात चर्चा होतात. शहरात ये जा असणाऱ्या फत्तु दादाने गुपित उघड केले.

   'परंतू हाताची पाची बोटे सारखी नसतात. प्रामाणिकपणे गरीबांची सेवा करणारे सरकारी अधिकारी आणि नोकरही आहेत. लोकं म्हणतात हरामाचा पैसा टिकत नाही. हरामाच्या पैशांना बारा पाय फुटतात. दवाखाना सुरु होतो. डॉक्टरचे खिसे भरावे लागतात. बापाचा हरामाचा पैसा असल्यावर मुलगा चरुनफुगून घोडे उडवतो. त्याला गांज्या, सट्टा, पत्ता, बाईबाटली असे व्यसने लागतात. तो दोन्ही दोन्ही हाताने पैसे उडवतो. हरामाचे पैसे मुलाबाळांना पचत नाहीत' उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या घटना दगडू दादाने बोलून दाखविल्या. 

    सायकलचे पायडल मारुन घामाघुम झालेल्या पोस्टमनला बघून सगळ्यांच्या चर्चेमध्ये व्यत्यय आला. तो कुणाचा तरी पत्ता विचारीत होता. फत्तु दादाने त्याला बोट दाखवून कुणबवाडीकडे पळवलं. पुढे पडलेल्या बिंडलातून सगळ्यांनी एक एक बिडी खेचली. आगपेटीवर घासून आगकाडी पेटवली.बिड्यांच्या पुढच्या टोकाला आग लावली. अवघी बैठक धुराने व्यापली. चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यात चर्चेची दिशा पालटली.

   'हे बघा गड्यांनो 'जो करेल तो भरेल' वरपैसे खाणाऱ्यांची मुलं लगंडीलुल्ली पण जन्मतात. आजोबाने खाल्लेला वरपैसा नातूला या ना त्या रुपाने नातूला फेडावा लागतो. गरीब लोकांची हाय चांगली नसते. आपण शेतीत ढोरमेहनत करावी आणि वरकमाई करणाऱ्यांनी मलई खावी ही गोष्ट देवालाही मान्य नाही. मानवी जीवन अंताच्या दिवशी याचा हिशोब द्यावा लागतो. माणसाच्या दोन्ही खांद्यावर दोन देवदुत बसलेले असतात. माणसाने दिवसभर काय काय केले ते हे देवदुत लिहीत असतात' नथ्थुदादाने दैवतकथेचा हवाला दिला.

   तुम्ही बघतातच प्रामाणिकपणे कमविणाऱ्याची मुलं कशी चांगल्या लाईनने असतात. बोलतात तर जणू त्यांच्या तोंडातून मध टपकतो. त्यांना काही व्यसने नाहीत की काही नाही. हिशोबशिर पैसे खर्च करतात. पैशांचा अपव्यय करीत नाहीत.पैशांचे महत्व जाणतात. शिकूनसवरुन चार पैसे कमवितात. आईवडिलांचा आधार होतात. आपल्या डोळ्यादेखत ह्या गोष्टी घडतात' सिलदर दादाने सविस्तर खुलासा केला.

    'आपण चटणीभाकर खाणारे, वख्खर हाकणारे, निंदणारे, टोपणारे लोकं चांगले आहोत. थकून आल्यावर डाराडूर झोपतो. हरामाची कमाई करणाऱ्यांना झोपा लागत नाहीत गड्यांनो. उद्या कुणाला फासावे ? पैसे कसे उकळावे ? असे षडयंत्र रचण्यामध्ये ते रात्रभर तडफडतात. अरे थु अशा जिंदगानीवर की तिच्यामध्ये जरासेही सुख नाही. पैसा तर बाईही कमविते पण तो कसा कमवावा, किती कमवावा याला काही नियम आहेत की नाही ? गरीबांचे शोषण करुन कमविलेला पैसा काय कामाचा !' सायबु दादाने पैसे कमविण्याचे चांगले रस्ते आणि वाईट रस्ते यावर भाषणच देऊन टाकले.

    काही काही खासदार, आमदारांची वर्तमानपत्रातून उघड होणारी बेहिशोबी मालमत्ता, सरकारचे कर्ज न फेडता परदेशात पळून जाणारे उद्योगपती, वाढती महागाई ह्या विषयावरही चर्चा झाल्या असत्या. पण सांगवीच्या वाटेहून आलेल्या एका आगंतुकाने बातमी आणली. म्हणे कुणीतरी मोठा सरकारी अधिकारी, गाडीबंगल्यावाला, जमीनजुमल्यावाला, नोकरचाकर वाला हार्ट अटैकने वारला. त्याने चारपाच शहरात पापर्टी जमविली होती. एका दिवसाची त्याची वरकमाई म्हणे हजारात, लाखात होती. मेला तर म्हणे काय घेवून गेला. खाली हात आला होता खाली हात गेला. 

   बातमी आणणाऱ्याने बोरखेड्याच्या बोलघेवड्या लोकांना मोठ्या उत्साहाने ही बातमी सांगितली. त्यांना कळून चुकले की आपण उचित चर्चा करत होतो. नितीने वागणाऱ्याचे भले होते. अनितीने वागणाऱ्याचा अकाली, अपघाती, दुर्धर आजाराने करुण अंत होतो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics