Ramjan Tadavi

Tragedy

3.4  

Ramjan Tadavi

Tragedy

मुक्ती

मुक्ती

5 mins
960


   त्याच्या जीवनात संर्घष ओतप्रोत भरला होता. खानदानी दारिद्र्य त्याच्या वाट्याला आले होते. घरची शेती नव्हती. दुसऱ्यांच्या शेतात राबल्यावरच हात तोंडाशी गाठ घेवू शकायचा, साधे राहाणीमान, नैसर्गिक वागणूक व प्रामाणिकपणा यामुळे तो माझ्याकडे आकर्षित झाला होता. जास्त पैसे लवकर येण्यासाठी अवाजवी खटाटोप त्याला करता येत नव्हता, शानशौकीने तो राहात नव्हता, त्याला गुलछबू तरुणांच्या क्रिकेट टीममध्ये कोणताही इंटरेस नव्हता, म्हणूनच तो आमचा जीवलग झाला होता. तो मी व आणखी एक असे आम्ही तीन होतो. पूर्ण गावापेक्षा वेगळे, मजुरीला तिघेही एकत्रच जात असू, केळीचे बिनकामाचे खोड धारदार विळ्याने कापून बांधावर फेकायचो, महिलांनी खुरपलेले पिकाशेजारील गवताचे ढिग डालक्यात भरुन शेताबाहेर टाकायचो, भुईमुगाचे झाड मुळासकट उपटून शेंगा पिळून वेगळ्या काढायचो, ज्वारीची कणसे कापून ढिग लावायचो. कडबा धांड्याने बांधून पेंड्या करायचो व आठवडा भरला की मजुरी कमवायचो.


     निसर्गाशी आमचा रोजचा संवाद होत होता, शेतात राबतांना चिमण्याकावळे निंबाच्या झाडावर बसून आमची गंमत बघायचे, न्याहारीलाही आमच्या अवतीभवती जमायचे, भाकरीचा तुकडा कुस्करुन आम्ही त्यांच्या पुढ्यात टाकायचो, चोचीच्या चिमट्यात ती पाखरे भाकर उचलून पसार व्हायची, शेतमजूर महिलांच्या सोबत आमचे त्रिकुट जेवायला बसायचे, स्वतला व महिलांना बुक्कीने कांदा फोडून द्यायचे, ठेचा, चटण्या, शाकभाज्यांची घेवाणदेवाण चालायची, सगळी शेतमजूर मंडळी मिटक्या मारुन जेवायची, शेतमालकाचा रुबाब असायचा, त्याच्या मुबलक तेल, मसाला युक्त भाजीचा खमंग सुटायचा, आमच्यात त्या मिळण्याची लालसा जागवायचा, लुसलुशीत चपात्या कुणाकुणाच्याच नशिबी असायच्या, लोणचे न्याहरीची रंगत वाढवायचे. भरपूर न्याहारीने शरीर सुस्तावायचे, निंबाच्या गर्द सावली खाली डोळे आपोआप मिटायचे, पाच-दहा मिनीटाच्या विश्रांतीशिवाय इतर सवलती मिळायच्या नाहीत, त्यामुळे पाच-दहा मिनिटे उलटली की, डोळ्यांना वटारुन वटारुन झोप पळवून लावावी लागायची. केळीच्या बागेच्या चारीतून जाणारे विहीरीचे थंडगार पाणी पिवून तृप्त व्हायचो.


      शेतमालकाने बहूधा मागच्या जन्मी मोठे पुण्य केले असावे, म्हणूनच इतक्या निसर्गरम्य वातावरणातील मळ्याची मालकी त्याच्याकडे आली होती. आईवडीलांची स्थावर व जंगम मालमत्ता आयतीच त्याच्या पदरात पडली होती, शेतमजुरांना राबविणे आणि भरघोस उत्पन्न घेणे, एवढ्यापुरता शेतमालकाचा विचारांचा आवाका सिमीत असायचा, त्याला मळ्याशी घेणेदेणे होते, मळ्याच्या अवतीभवतीच्या निसर्गाशी त्याला सोयरसुतक नव्हते.



     दिवसामागून दिवस जात होते, सुखी जीवनाचे स्वप्न आम्ही रंगवत होते. 'पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा' असे म्हणायला मुळात जास्तीचा पैसाच हातात येत नव्हता. सांगवीच्या बाजाराच्या दिवशी मजुरीच्या रुपात जो येत होता तो एका हाताने यायचा दुसऱ्या हाताने पसार व्हायचा. मिठमिरची, डाळी, चहासाखर, शेंगदाणे, दाह्याफुटाणे, शेवचिवडा अशा जिनसा पिशवीत यायच्या व खिसा खाली करायच्या, पुढे आठवडाभर त्या सकाळ संध्याकाळ पोटात जात राहायच्या. कुणब्याच्या शेतात मजुरी करता येईल एवढी शक्ती त्या शरिरात उत्पन्न करायच्या. मधल्या भाऊला नोकरी होती तो सणासुदीला घरी यायचा व त्याचे जुने पुराने कपडे मला घालण्यासाठी देवून जायचा. तो माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठा असल्याने, त्याचे कपडे मला फार डगले व्हायचे नाहीत.


    अन्न, वस्त्र, निवारा या गरजा कशातरी भागायच्या, शिक्षण, आरोग्य, उच्च राहणीमान या अतिरिक्त गरजा जर भागवायच्या म्हटल्या तर नाकेनऊ यायचा. त्यामुळे दहावीबारावी पासनापासच्या पुढे शिकलेले बोटावर मोजण्याइतकेच दिसायचे, उन्हातान्हात राबणाऱ्यांच्या शरिरातून घामाच्या बरोबर शरिरातील सगळे उपद्रवी व चरबीयुक्त घटक बाहेर पडून जात, त्यामुळे कष्टकरी ताजे, टवटवीत व प्रसन्न दिसत. बध्दकोष्ठ, ह्रदयविकार, ब्लडप्रेशर असले गंभीर आजार त्यांच्या जवळपासही फिरकत नसत, किंबहूना या आजारांची नावेही या कष्टकऱ्यांच्या कानावर पडलेली नसत. कधीतरी ताप, सर्दी, खोकला,पडसे झाले की, चोपडे डॉक्टरने लिहून दिलेल्या दोन-तीन रुपयांच्या गोळ्या सांगवीला जावून घेवून येत व गिळत बसत. उत्तम आरोग्य, नैसर्गिक शिक्षण व पोटापुरते अन्न या मूलभूत गरजा निसर्गाकडून भागविल्या जात, त्यामुळे जीवनाबद्दल लोकांची फारशी तक्रार नसायची.



    दरम्यान दहावी व ८० ची स्टेनो परिक्षा पासचे सर्टिफिकेट घेवून मी जिकडे-तिकडे फिरायचो, व्यवहारी जगात नाहीच कुणाला पटवू शकायचो, तब्बल तीन वर्षे मी दरदर भटकलो, महत्प्रयासाने, महतप्रतिक्षेने साताऱ्यात नोकरीला चिकटलो.



    आमचे त्रिकुट फुटले, आता ते दोघं बोरखेड्याला मजुरीच करत राहिले व मी नोकरी करीत राहिलो. इमानदार माणसाकडे मुंगीच्या चालीने पैसा येतो व वाऱ्याच्या वेगाने उडून जातो. रोज मग त्याला पोट भरण्यासाठी धडपडावे लागते. म्हणजे इमानदार माणसाला कुणी विचारले की, कुठं राहातो ? कुठं झोपतो ? तर त्याचे उत्तर ठरलेले असते, 'असमान के निचे रहता हु, जमिनके बिस्तरपे सोता हु.' या उत्तरावरुन भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील इमानदार माणसाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येते. नोकरी लागल्यावरही माझी आर्थिक परिस्थिती अशाच प्रकारची होती, त्यामुळे बोरखेड्याला शेतमजुरी करणाऱ्या माझ्या दोघा जोडीदारांना मी इच्छा असूनही फारशी आर्थिक मदत करु शकायचो नाही. कधीतरी पन्नास, शंभर रुपये त्यांच्या हातावर ठेवायचो. एकोणीस वर्षांनी भटकतभटकत मी साताऱ्याहून जळगाव बदलून आलो. जळगावहून जवळ असलेले चाळीस किलोमिटरवरील बोरखेडा या माझ्या गावाला आता जास्त जाणेयेणे वाढले व माझे हे दोघे जोडीदारही जादा संर्पकात आले. या दोघांपैकी एक भुसावळ सुरत पॅसेंजरने सुरतला कामधंद्यासाठी अधूनमधून निघून जायचा, दुसरा गावातच रडतखडत जगायचा. 



    गावात असणाऱ्या जोडीदाराला बिळ्यांचे तर होतेच, दारुचे नव्याने व्यसन कसे लागले कुणास ठाऊक ? गावठी दारु पिवून तो जमिनीवर लोळतांना दिसायचा. एकदा मी व माझी पत्नी सांगवीहून बोरखेड्याला जात असताना, रस्त्याच्या शेजारील खड्ड्यात बेशरमीच्या जाळीत पिवून धूत पडला होता. सुरक्षित आर्थिक कुटुंबातून आलेल्या माझ्या पत्नीने मला त्याच्याजवळ गाडीही थांबवू दिली नाही. असल्या पेदाडांच्या फंद्यात आता ती मला कशाला पडू देईल, तीला माझा दरिद्री भूतकाळ दोहरावयाची मुळीच इच्छा नाही, तो आठवून ती कशाला सुखात दुःख ओढवून घेईल. मी बघीतली आहे भूक, अभावग्रस्तता ! त्यामुळे सगळ्या रंजल्यागांजलेल्यांच्या प्रती बाळगून आहे सहानुभूती !



    आमच्या बोरखेडा गावातले व परिसरातील गावातले शेतमजूर म्हणतात की, 'बिळ्या पिल्याशिवाय आमच्याने मेहनतच होत नाही'. दारु पिणारे म्हणतात 'दिवसभर शेतात ढोर हमाली केल्यावर अंगअंग दुखतं, दारु पिली की या दुखण्याची जाणीव होत नाही, झोप चांगली लागते.' बिळ्या आणि दारुचे असे फायदे त्यांच्या तोंडून ऐकल्यावर कोण शहाणा त्यांना बिळ्या व दारु सोडण्याचे तत्वज्ञान पाजणार आहे? ग्रामीण कृषी उत्पादनात हे बिळ्या व दारु पिणारेही योगदान देतात. त्यामुळे जास्त बोलणेही उचित नव्हे. 'उन्हे उनकी हालत पे छोड दो भाई' असेच म्हणावे लागते. 



     पण खायलाप्यायला सकस अन्न नसले, आहारात फळफळावळं नसली की बिळ्या व दारु पिणाऱ्यांची शक्ती दिवसेंदिवस क्षीण होते. शक्ती क्षीण झाली की मजुरी होणार नाही व मजुरी नाही झाली तर पैसे येणार नाहीत, पैसे नाही आले तर खायला मिळणार नाही, अशा दुष्टचक्रात बिळ्या आणि दारु पिणारे अडकतात. या दुष्टचक्रावर मात करणारेही बहाद्दर आहेतच ते व्यसने जरी करीत असले तरी भरपूर मेहनत करुन स्वतला व कुटुंबाला भरपूर खावू घालून शरिरात भरपूर शक्ती उत्पन्न करतात. जीवनाचा मुकाबला करुन दीर्घायुषी होतात.



    व्यसनांचा अतिरेक व मजुरी कमवायचा आळस असलेले या दुष्टचक्रात बरोबर अडकतात. असेच आचरण असलेला  आमचा हा तिसरा जोडीदार या दुष्टचक्रात अलगद अडकला होता. एकटी बायको कमवायची कसेतरी दोन घास त्याच्या पोटात ढकलायची, पण वरुन तीच्याकडून दारुसाठी पैसे कुठून मिळणार ? मग याच्यात्याच्याकडे लाचारी पत्करावी लागायची, लाजीरवाणे जिणे जगायचे. अभावग्रस्त घरात मूलभूत गरजा पुरेशा न भागल्या गेल्यामुळे रोज कटकटी, मारझोड,शिवीगाळ व्हायची. आलेला दिवस ढकलणे चालू होते.



    याच दिनचर्येचा एके दिवशी अतिरेक झाला व मला जळगावलाच संदेश आला आमचा तो तिसरा जोडीदार गळफास लावून मेला. मी मनातल्या मनात म्हटले बरं झालं यातनादायी जीवनातून व दुष्टचक्रातून सुटला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy