STORYMIRROR

Ramjan Tadavi

Children Stories Others Children

4.0  

Ramjan Tadavi

Children Stories Others Children

तीन दगडांची चूल

तीन दगडांची चूल

4 mins
734


   अनेर नदी झुळझुळ वहात येते. काठावरच्या झाडांना हिरवेगार करते. घनदाट सातपुडा पहाडात अनेर नदीचा उगम झाला आहे. अनेर नदी निसर्गाची अनमोल देणगी आहे. देवझिरी, देवगड, देव्हारी, कर्जाना, धवली, मुळ्याउतार या गावांचा शिवार तिने सुजलाम सुफलाम केला आहे. अनेर नदी वैजापूरपर्यंत नागमोडी वळणे घेते. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी तिच्यात मनसोक्त डुंबतात. तासनतास डोळे लाल होईतोवर पोहतात. तिचा तळ धुंडाळतात. निष्पाप मासे आणि निष्पाप विद्यार्थी संगतीनेच पोहतात. श्वास रोखून पाण्याखाली बराच वेळ राहतात. विद्यार्थ्यांना अनेर नदीचा लळा लागला आहे. हिवाळा,उन्हाळा पावसाळा अशा तिन्ही ऋतूंचे वैजापूर भागात गडद रुप आहे. पावसाळ्यात वैजापूरची चेरापुंजी होते. अनेर नदीच्या खो-याच्या वरच्या अंगाला आश्रमशाळा वसली आहे. पायवाटेने विद्यार्थी अनेर नदीच्या खो-यात उतरतात. अनेर नदीच्या थंडगार पाण्यात डुबकी मारतात. आदिवासी विकास विभागाने पुरवलेला लाईफबाय साबण अंगाला चोपडतात. खडकावर कपडे आपटून सनलाईट साबणाने चमकवतात. अट्टल जलतरणपटू टेकडीवरुन डोहात उडी ठोकतात. डोहाचे पाणी काठापर्यंत ढवळून निघते.. पोहता न येणा-या नवख्या गुरुजींना पोहणे शिकवतात. विद्यार्थी नवख्या गुरुजींचे गुरुजी होतात. रविवारी अनेर नदी एरवीपेक्षा जास्त गजबजलेली असते. मच्छीमार व विद्यार्थी जागोजागी दिसतात. नदीच्या कोरड्या पात्रात जांभळाचे बण आहे. पिकलेल्या जांभळांचा दगडवाळूवर सडा पडतो. विद्यार्थी आश्रमशाळेचा पिकलेली जांभळे मनभरुन खातो. गडद जांभळा रंग त्याच्या तोंडाचा होतो.

    तो दिवस रविवारचा होता. आंघोळ करायला व मळलेले कपडे धुवायला रमेश व रमण अनेर नदीवर आले होते. शासकीय आश्रम शाळा वैजापूरचे ते विद्यार्थी होते. रमेश पाण्याच्या प्रवाहात पाय सोडून बसला होता. त्याचे विचार जलप्रहाबरोबर प्रवाहित होत होते. त्याचे डोळे जलचरांचा मुक्त संचार बघत होते. हिरव्या पिवळ्या शेवाळात माशांची लपाछपी सुरु होती. छोट्यामोठ्या दगडाखालून खेकड्यांची इवली इवली पिल्ले बाहेर पडत होती. अनेर नदीचे थंडगार पाणी वरुन वहात येत होते. रमेशच्या गुडघ्यापाशी पाण्याची वलये निर्माण होत होती. रमेशच्या पायांना वळसा मारुन पाणी पुढे सरकत होते. अविरत वहाणे हा गुणधर्म अनेर नदीही निसंकोच पाळत होती.

    'रमेश पाण्यात डुबकी मार' अचानक मागून आलेल्या रमणने रमेशचे अवधान घालवले.

   'नाही रे पाणी खूप थंड आहे'

पायांना जाणवत असलेला थंडावा रमेशच्या तोंडातून बाहेर पडला.

   'एकदा पाण्यात डुबकी मारली की थंड पाण्याची सवय होते' रमणने रमेशला डुबकी मारण्याला प्रोत्साहन दिले.

   'खरे आहे आंघोळीसाठी येथे कुठून मिळणार ऊन ऊन पाणी' रमेश मनातल्या मनात पुटपुटला.

   'तु कालच घरुन आला आहे तुझ्या मनात आईवडिलांची आठवण ताजी ताजी आहे' रमेशच्या मनातील कोलाहल ओळखून रमण उद्गारला.

   'आता तुच माझी आई आहे आणि तुच वडिल आहे' अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी रमेशने रमणला म्हटले.

   आईवडलांपासून रमेश व रमणची ताटातूट झालेली होती. रमेश आणि रमण या दोघांची गावे दोन दिशांना होती. दुर्बल आर्थिक परिस्थिती असलेले दोघांचे पालक होते. ते दोघांना आदिवासी विकास विभागाच्या हवाली करुन गेले होते. आश्रमशाळेत खाणेपिणे, राहाणेरुहणे, कपडेलत्ते, तेलसाबण फुकट मिळते. ऐपत नसलेले दोघांचे पालक सरकारच्या भरवशावर होते. आश्रमशाळेत मुले शिकून मो

ठी होतील असा उदांत हेतू दोघा पालकांचा होता. पाटीपेन्सील,वह्या पुस्तके,अंथरुन पांघरुन वसतीगृह अधिक्षकाने दिले होते. दरिद्री आईवडिल जे देवू शकत नव्हते ते मायबाप सरकारने पुरवले होते. रमेश आणि रमण एकाच हाॅलमध्ये राहायला होते. दोघांची सामानाची पेटी जवळजवळ होती. रमण आणि रमेशची संगतही घनिष्ट होती. वर्गातील गुरुजींचे शब्द रमेश व रमण कानात साठवायचे. संध्याकाळी शेजारीशेजारी बसून त्याची उजळणी करायचे. शाळेत एकाच बाकळ्यावर बसायचे. गुरुजींनी फळ्यावर खरडलेले वाचायचे. वाचलेल्याचा अर्थ लावायचे. रमेश व रमण गुरुजींचे लाडके विद्यार्थी झाले होते. शाळेच्या वेळेत विद्याग्रहणाची प्रक्रिया पार पाडायचे. घंटा झाल्यावर शाळेच्या भल्यामोठ्या पटांगणात जेवायला बसायचे. रात्री शेजारीशेजारी झोपायचे.

    नदीवर येवूनही रमेश थंडगार पाण्यात लवकर आंघोळ करीत नव्हता. रमेशहून रमण मोठा होता. जिवाभावाचा मित्र होता. वडील भाऊच्या नात्याने रमणला रमेशची आंघोळ करवून घेणे भाग होते. रमेशला ताजेतवाने वाटल्याशिवाय त्याच्याकडून पुढच्या शैक्षणिक प्रक्रिया पार पडणार नव्हत्या. रमेशची गावाकडच्या आठवणींची श्रुंखला तोडावी लागणार होती. रमेशला वास्तवतेचे भान आणून देणे भाग होते. आता आपण घरी नसून आश्रमशाळेत आहोत. आश्रमशाळेचे नितीनियम आपल्याला पाळणे आवश्यक आहे. याची जाणीव करुन द्यायची होती. आश्रमशाळेत सगळी कामे वेळच्या वेळी करायला महत्व आहे. हे पटवून द्यायचे होते. आपल्या लहान भावाप्रमाणे असलेल्या मित्राला आपण आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करुन देवू शकत नाही याची खंत रमणला सतावत होती.

  'थंडगार पाण्याला घाबरुन असा किती वेळ बसणार आहे' रमेशने आंघोळ करावी म्हणून रमणने पुन्हा प्रयत्न करुन बघितला.

   'पायाचे रक्त गोठते की काय ईतके पाणी थंड आहे मी डोक्यावरुन कशी करु शकतो आंघोळ' थंडगार पाण्यात फक्त गुडघाभर उतरु शकलेला रमेश म्हणाला.

   'थांब मी काहीतरी शक्कल लढवतो' रमण दीर्घवेळेपासून उद्भवलेल्या समस्येवर तोडगा शोधू लागला.

   रमणने नदीपात्रात नजर भिरभिरवली. त्याच्या नजरेला दिसलेल्या वस्तु त्याने मिळवून घेतल्या. पकडलेले मासे साठविण्याच्या दोन पातेल्यांपैकी एक लहान पातेले त्याने मच्छीमारांकडून उपलब्ध करुन घेतले. बोरीभाबळीच्या व जांभळाच्या झाडाच्या सुकलेल्या फांद्या त्याने गोळा केल्या. चुलीतील जाळ पटकन पेटावा म्हणून जवळचा सुका पालापाचोळा हाताने आवरला. तीन दगडांची चूल नदीपात्रात मांडली. चुलीत पालापाचोळा कोंबला, काट्याकुटक्या वरुन टाकल्या. मच्छी भाजून खाणा-यांकडून काडीपेटी मागून घेतली. पातेल्यात नदीचे थंड पाणी घेवून ते चुलीवर तापवायला ठेवले. जळती काडी कोरड्या पाल्यापाचोळ्याला लावल्यावर धगधगून अग्नी पेटला. हळूहळू पाणी गरम झाले. आपल्या प्रिय मित्राला रमेशला गरम पाण्याने रमणने आंघोळ करविली. आईवडिल दुरावलेले असतांना रमेशच्या आईवडीलांची भूमिका वठविली. परंतू रोजरोज आंघोळीसाठी गरम पाणी मिळणार नाही असेही रमणने रमेशला बजावले. अडीअडचणी सोडवणारा, सुखादुखात सहभागी होणारा रमण पुढे शिकूनसवरुन यशस्वी जीवन जगू लागला. रमेशही रमणच्या मैत्रीचे किस्से वर्तमानपत्रात, पुस्तकात लिहू लागला. रमेश व रमणची जीवलग मैत्री शासकीय आश्रम शाळा,वैजापूर साठी आदर्श बनली. आपल्या मुलांना शिक्षणासाठी वसतीगृहात सोडून जाणारे आईबाप रमेश व रमण सारखे जीवलग मित्र बनून राहा असे सांगू लागले. आश्रमशाळेत शिकायला येण्याने विद्यार्थ्यांची आईवडिलांपासून होणारी ताटातूट सुसह्य झाली. शिक्षण सुकर झाले.


Rate this content
Log in