STORYMIRROR

Ramjan Tadavi

Inspirational Others

3  

Ramjan Tadavi

Inspirational Others

सरपटणारा जीव

सरपटणारा जीव

5 mins
284

    'आपण माणसे असून महिलांचे काम करतो' खुर्पीचे टोक गवताच्या बुडाशी टोचून गवत उपटता उपटता रमेश म्हणाला. उपटलेले गवत तो पाठीमागे टाकत होता. गवतावरच्या किड्यांचा रहिवास नष्ट होत होता. किड्यांना राग येत होता. परिणामी ते किडे रमेशच्या कपड्यांवर चढून तरतरत होते. रमेशला निंदायच्या कामाबरोबर किडे झटकण्याचेही काम करावे लागत होते. त्याच्या नजिकच्या शंकऱ्यांच्या आथ (रांग) मध्ये चिखल होता. निंदता निंदता शंकऱ्याचे पाय चिखलात फसत होते. बिचारा शंकऱ्या चिखलाने लथपथ झालेला होता. सबनुर मोठीआई व अजीकाकी यांच्या आथा कोरड्या होत्या. त्या सपासप गवत उपटून पुढे पोहचल्या होत्या.

   बिचारे शिकणारे पोऱ्ह धडपडताहेत. मधुनच शिक्षण सोडले नसते तर कशाला त्यांना हे दिवस बघावे लागले असते. सबनुर मोठी आई मागे पडलेल्या मुलांची परिस्थिती बघून किव करीत होती. 

    मोठीआई मी तरी बारावी पास आहे. हा शंकऱ्या तर दहावीही पास नाही झाला. शंकऱ्यापेक्षा आपण जास्त शिकलेले आहोत. हे रमेश अभिमानाने सांगत होता. आणि मोठीआई शिकलेल्या लोकांनी का शारिरीक श्रमाची कामे करु नये ? मग खावे काय ? आजकाल सगळ्यांना कामे आवडतात. माणसे आवडत नाहीत. आमचे आईवडिल आम्हाला किती दिवस पोसणार, त्यांच्या प्रौढपणी त्यांनी खूप काबाडकष्ट केले. रात्र नाही पाहिली आणि दिवस नाही पाहिला रक्ताचे पाणी केले. माझे वडिल भल्यापहाटे उठून गाडीला बैल जुंपायचे जंगलाच्या वाटेने जायचे, आम्ही भावंडे झोपलेलेच असायचे. आई लाल मिरच्या पाट्यावर रगडून भाकरीवर चटणी बांधून द्यायची. कधीकधी तर चटणीवर तेलाची धारही नसायची. आजही लोकं म्हणतात गुलाब दादा मुलांचे संगोपन करण्यासाठी अवघे जीवन शेतशिवारात राबला. रमेश एका श्वासात खूप बोलून गेला.

    अजीकाकीचे लक्ष आथीतले गवत उपटण्याकडे होते. तिच्या दोन्ही हातांना काम होते पण दोन्ही कान रिकामे होते. सबनुर मोठीआईचे व मुलांचे बोलणे तिच्या दोन्ही कानांमध्ये जात होते. न राहवून तिनेही चर्चेमध्ये भाग घेतला. वडिलांसारखा चतुर आहे रमेश तो कुणाला बोलू देईल का ? चार पुस्तके वाचून अधिकच हुशार झाला आहे. गुलाब दादा निरक्षर होते. त्यांना पुस्तकांनी नाही जीवनाने शिकविले. शेतशिवार, डोंगरदऱ्या, नदीओहोळ,टेकड्याटुकड्या तुडवता तुडवता त्यांना जीवनाचे गणित कळले. आज गुलाब दादा राहीला असता तर मुलाला पुढे शिकविता. रमेशला असे बायांबरोबर निंदायचे काम करावे लागले नसते. अजीकाकीला भूतकाळ आठवला.

   हात लवकर लवकर चालवारे आता! तुमच्यामुळे सगळ्यांना उशिर होत आहे. कुणब्याला कामही दिसायला हवे. तेव्हाच तर तो मजुरी देईल. दुपारच्या न्याहारीचीही वेळ होत आली आहे. सगळ्यांना भुका लागल्या आहेत. असे म्हणून मागे पडलेल्या मुलांच्या आथा सबनुर मोठीआई व अजीकाकी समोरुन निंदत आल्या. आपल्यावर माया करणाऱ्या काक्या, मोठ्याआया आपल्याला मदत करीत आहेत हे बघून मुलांना गहिवरुन आले. त्यांनीही मग लवकर लवकर निंदणी केली. सगळे विहीरीजवळच्या निंबाच्या सावलीत येवून बसले.

   ऐन दुपारची वेळ होती. सुर्य सगळ्यांच्या डोक्यावर होता. सुर्याकडे बघून वेळेचा अंदाज बांधायची जुनी पध्दत अजूनही टिकली होती. अजी काकीने दोन्ही हातांची झापळ केली. डोळ्यांच्या वर धरुन डोळ्यांवर अंधार केला. वर मुंडी करुन सुर्याकडे बघायला लागली. सुर्यप्रकाशामुळे दिवसाढवळ्या तिच्या डोळ्यांसमोर चांदण्या चमकल्या. पण आकाशात सुर्य कोणत्या ठिकाणी आला आहे. हे बघून तिला वेळेचा अंदाज बांधता आला. तिने अंदाजपंचे बारोशे दिड वाजल्याचा अंदाज वर्तवला. हीच वेळ न्याहारीची होती. निंबाच्या झाडाच्या डहाळ्या चार बाजूने पसरल्या होत्या. दोन्ही हातांच्या कवेत माहणार नाही एवढे निंबाचे खोड जाड होते. सगळ्या डहाळ्यांचा पसारा एकट्या खोडाने तोलून धरला होता. पसरलेल्या डहाळ्यांखाली घनदाट सावली पसरली होती. तळपत्या उन्हात कुंडातले पाणी चांदीसारखे चमकत होते. विहीरीतून पाईपाने येणारे पाणी अविरत मोठ्या कुंडात पडत होते. मोठ्या कुंडात जमा होणारे पाणी कोपऱ्यातील छिद्रात शिरुन लहान कुंडात येत होते. पुढे पाण्याने पाटापाटाने केळीच्या बागेचा रस्ता धरला होता. रस्त्यातील गवत आणि बागेतली केळीची झाडे त्याने हिरवीगार बनविली होती. तिनचार चिमण्या पाटाच्या नितळ पाण्यात पंखे फडफडवित होत्या. एकमेकांवर पाणी उडवित होत्या. जणू रंगपंचमी खेळत होत्या. निंबाचे झाड हिरव्यागार पानांनी बहरले होते. पाखरे रणरणत्या उन्हात डहाळ्यांच्या आश्रयाला आले होते. फडक्यात गुंडाळलेल्या भाकरी मजुरांनी फडक्याच्या गाठी सोडून वर काढल्या. महिला व पुरुष निंबाच्या दाट सावलीत मांडी मारुन बसले. अजीकाकीने शेंगदाणे लावून बनविलेल्या झुणक्या वांग्यांचा खमंग सुटला. सबनुर मोठी आईच्या उडदाच्या डाळीने तोंडाला पाणी सुटले. शंकऱ्याच्या भाकरीवर तिळाची लालभडक चटणी होती. रमेशने लवंगी मिरच्यांचा ठेसा आणला होता. तिखट खाणाऱ्यांना तो हवाहवासा होता. सगळ्यांना कडकडून भूक लागली होती. सगळ्यांनी एकमेकांच्या शाकभाज्यांची देवाणघेवाण केली. सगळी मिटक्या मारुन जेवू लागली.मजूर मंडळी बसली होती तिथे काळ्या मुंग्या तरतरत होत्या. काही काही मुंग्या कपड्यांवरही चढत होत्या. 

    काही करीत नाहीत रे त्या गरीब असतात. चावल्या तरी आग होत नाही. सबनुर मोठीआई फडक्यावरची काळी मुंगी झटकत म्हणाली. 

     निंदणीच्या वेळी लाल मुंग्यापासून मात्र सांभाळून राहा. त्या चावल्या की शरिराची लाहीलाही होते. ज्या ठिकाणी चावल्या ती जागा लालभडक होते. माणूस थयथय नाचतो. बागेतला थंड चिखल चोपडल्यावर आग थंड होते. अजीकाकीने लाल मुंग्या किती खतरनाक असतात याबाबत सावधान केले. 

    अजी काकी म्हणूनच चिनी लोकं मुंग्यांची चटणी करुन मटकावतात. लाल मुंग्या त्याच कामाच्या आहेत. जीवजंतुने कसे गरीब राहावे. माणसे त्यांना चावतात का? मग त्यांनी माणसांचा का चाव घ्यावा? हा निसर्गाचा न्याय नाही. माणूस असो वा जीवजंतु सज्जनासंगे सज्जनासारखे व शत्रुबरोबर शत्रुसारखे वागावे ही निसर्गाची शिकवण आहे. या पृथ्वीवर स्त्री पुरुष, जीवजंतु, पशुपक्षी सोबत नांदतात. सगळ्यांनी एकमेकांशी मिळूनमिसळून राहायला हवे. गुलाब दादाच्या रमेशने सहजीवनाबद्दल भाषणच देवून टाकले.

   न्याहारीचे घास चावताचावता मजुरांनी मानव आणि जैवविविधता यावर भरभरुन चर्चा केली होती. जेवताजेवता बोलू नये असे सांगणारा एकही मजूर या मजुरांमध्ये नव्हता. चाटुनपुसून शेवटचा घास पोटात जाईस्तोवर मजुरांमध्ये चर्चा झडल्या. पाईपाला तोंड लावून सगळ्यांनी विहीरीच्या ताज्या पाण्याने तहान भागविली. सगळ्यांची शरिरे भाकरीमुळे जड झाली. निंबाच्या सावलीत घटकाभर आडवे पडून पुन्हा सगळी निंदायला जुंपली. दुपारच्या अडीच वाजल्यापासून त्यांना पाच वाजेपर्यत निंदायचे होते. पाच वाजता त्यांना सुटका होण्याचा आनंद मिळणार होता. केळीच्या मोठमोठ्या पानांच्या खाली मजूर लोकं निंदणी करीत होती. उन्हाचा कडाका दाट सावलीत सैल झाला होता. विहीरीच्या पाण्याने केळीच्या झाडांसोबत गवतालाही पोसले होते. पोसलेले गवत कुठे दाट तर कुठे विरळ होते. उंचीने गवतापेक्षा केळीची झाडे चौपट उंच होती. केळीच्या झाडांखाली मजूर निंदणी करीत होते.

    निंदतानिंदता शंकऱ्या ताडकन उभा राहीला. त्याचं सर्वांग कापत होतं. त्याने तोंडातून गगनभेदी आरोळी ठोकली. अरे बापरे !!!! हे काय आहे. त्याने हात समोर पसरुन झटकला. त्यांच्या हातातून वळवळणारा काळाकुट्ट लांबट जीव समोर फेकला गेलेला सगळ्यांना दिसला. सगळ्यांच्या तोंडातून किंकाळ्या फुटल्या.साप साप पळा पळा... सगळ्यांच्या शरीरावर काटा उभा राहीला. पंधरावीस मिनीटांनी भीतीचा विळखा थोडा सैल झाल्यावर असली साप गवताबरोबर शंकऱ्याच्या हातात आल्याचे सगळ्यांना समजले. शंकऱ्याकडून इजा न झाल्याने नागाने प्रतिहल्ला केला नव्हता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. शंकऱ्या मृत्युच्या दाढेतून परत आला होता. शंकऱ्याने व त्याच्या आईवडीलाने नेहमी भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी पाजले होते. त्यांचे हे पुण्यकर्म शंकऱ्याला आडवे आले होते. संकट टळल्याचा, सुट्टी झाल्याचा व रोजभाग वसुल झाल्याचा असा तिहेरी आनंद घेवून मजूर गावात आले.

    वळवळणारी लाबंट वस्तु पाहून आजही शंकऱ्या भीतीने थरथरतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational