Ramjan Tadavi

Others

4.4  

Ramjan Tadavi

Others

निसर्गचक्र

निसर्गचक्र

5 mins
298


     उकाड्याने हैरान झालेल्या गावकऱ्यांना पावसाने मृग नक्षत्रातच दिलासा दिला होता. दोन तीन दिवस गावावर व शिवारावर पावसाच्या सरी वर सरी कोसळल्या होत्या, नदीनाले दुथडी भरुन वाहिले होते. तहानेने व्याकुळ झालेली जमिन पावसाचे पाणी मनमुराद पित होती. ओट्यावरुन व मेनरस्त्यावरुन वाहणारे पावसाचे गढूळ पाणी इझवाई नदीला जावून मिळत होते. जमिनीतील गवताचे बीज अंकूरले होते, पृथ्वीने हिरवे स्वप्न पाहिले होते.गावाच्या चौकातून दिसणारा सातपुडा पहाड भरपूर पावसाच्या पाण्याने आंघोळ करुन उभा होता. लोकांचे चेहरे उजळले होते. प्राथमिक शाळेच्या भिंतीवर लिहीलेले 'जल ही जीवन है' हे घोषवाक्य खरे ठरले होते. इझवाई नदी पुर ओसरल्यावरही नितळ पाण्यासमवेत झुळझुळ वाहात होती. गावातल्या चौकाचौकात जमिनीत काय पेरावे याबाबत प्रश्न उत्तरांची घेवाणदेवाण होत होती. मागच्या हंगामातील उत्पादनाचा नफातोटा मांडण्यात येत होता. कुणबवाडीतील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले होते. हाताच्या मुठीतले बियाणे जमिनीत ढेकळांच्या खाली पाठवणाऱ्या नळकांड्या साफसुफ केल्या जात होत्या. अडगळीत पडलेली पेरणी औजारे चव्हाट्यावर आणली जात होती. पेरणी करण्यात निष्णात महिलांना रोजगाराचा सांगावा धाडला जात होता. तडवी भिल्ल वस्तीही खुश होती. गावातल्या अंर्तगत रस्त्यावरील गल्लीबोळातून येवून कुणबी लोकं थेट तडवी भिल्लांच्या दारात उभे राहात होते. पेरणी करण्याचा रोजगार पुरवत होते.

    

म्हातारेकोतारे लोकं व शेंबडेलेंबडे पोरं सोडून गावात दिवसाढवळ्या कुणीही दिसत नव्हते. हिंगोण्याहून येणारा पोस्टमन तरुण मुलांचे काॅललेटर म्हाताऱ्यांच्या हातात कोंबून पसार होत होता. गावातली माणसे व महिला शिवारातली पेरणी करण्यात जुंपले होते. कुत्रे, मांजरे, शेळ्या, कोंबड्या गावातली भयाण शांतता कधीकधी विशिष्ट ध्वनीने चिरत होत्या.भूक लागल्यावर दुरडीत झाकून ठेवलेली भाकर म्हातारे व मुलं फस्त करीत होती. त्यांच्या घरातले प्रौढ व तरुण सदस्य पुढच्या वर्षाची खाण्याची बेगमी व्हावी म्हणून जमिनीत बियाणे टाकत होते.


    पेरणे, उगवणे, जोपासणे, कमावणे, खाणे, जगणे व पुन्हा पेरणे या जीवनचक्रात अख्खा गाव गुरफटला होता. कैक उन्हाळेपावसाळे खाल्लेले म्हातारेकोतारे लोकं बियाणे, पाऊसमानाबाबतचे पारंपरिक शहाणपण प्रौढांना व तरुणांना पुरवत होते. त्याकाळचे बियाणे व या काळचे बियाणे यांची तुलना केली जात होती. अख्खा आठवडा गावकऱ्यांनी शिवारात घालवला गावकरी फक्त संध्याकाळचे खायला व रात्रीचे झोपायला गावात यायचे. नाना तऱ्हेचे बियाणे शिवारातली जमिन तिच्या कुशीत घेवून बसली. सांगवीचा बाजार शेतमजुरांनी भरभरुन केला व काही काळ शेतकरी व शेतमजूर विसावला.


    आजच्या तथाकथित नितीमत्तेपेक्षा त्यावेळची नितीमत्ता चांगली होती. गावातला कुणीही तरुण पोरगा कुणाही तरुण पोरीकडे वाकड्या नजरेने बघत नव्हता. मुलीने एखादा कटाक्ष टाकल्यावर लाजून चुर चुर होत होता. आईवडीलांचा, म्हाताऱ्या आजीआजोबांचा आदर राखला जात होता. कटू का असेनात उपदेशाचे डोस लहानगे पचवून घेत होते. कुटुंबातील कामात व अर्थाजनाच्या प्रक्रियेत सगळ्यांचा हातभार लागायचा. ऐतखावू बनून आईवडीलांवर बोझ बनलेली मुलं सहसा आढळून येत नव्हती.


    माणसांचे बघून निसर्गही संस्कारीत झाला होता, वेळच्यावेळी यायचा, वेळच्यावेळी थांबायचा, वेळच्यावेळी रेंगाळायचा व माणसांच्या सोयीप्रमाणे वागायचा. माणसेच बदलली आहेत तर निसर्ग का नाही बदलणार ? असा कुणीच त्या काळी नाही म्हणायचा. कारण माणसे बदललेली दिसायची नाहीत.

     

अख्खा शिवार पेरुन झाला आहे, जमिनीतल्या बियाण्याला आता अंकूरण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे, हे पावसाला कुणी शहाण्याने सांगायची गरज नव्हती. आभाळभर व शिवारभर पसरलेला निसर्ग गेल्या आठ दिवस पेरणीत व्यस्त असणारे बायाबापडे बघतच होता. शेवटचे बी जमिनीत पडण्याचीही त्याला चाहूल लागली होती. सोमवारचा सांगवीचा बाजार पावसाने गावकऱ्यांना करु दिला, दाह्या, फुटाणे खावून लहान मुलं आनंदली, मच्छी, मटणावर गावकऱ्यांनी ताव मारला, सोमवारचा दिवस कोरडा गेला.


    मंगळवारी भल्या पहाटेपासून पावसाने मात्र रिपरिप सुरु केली. आज्ञाधारी मुलाला सांगावे की बस अनं आता उठ तसा निसर्ग माणसाच्या गरजेबरहूकूम पावसाळी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातही वागत होता. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार काय ? पाऊस आठवडाभर गावावर व शिवारावर रेंगाळला, जमिनीतील बियाण्यांना हा उपयोगी ठरला. आठ दिवसांची झळी होती ती, कुणालाही शिवारात पाय ठेवता आला नाही. अख्खा गाव आपापल्या घरातच 'देवाने लावली झळी आणि लोकं बसले घरी' असे सुर लावून पेटत्या चुलीपाशी आंग शेकू लागला. पेरणीचे कर्तव्य पार पाडून बिनफिकर झालेला गाव श्रमपरिहारात आठवडा घालवू लागला, मनसोक्त जेवून, डाराडूर घोरु लागला.


    मुरवणी पाण्याने जमिनीवर, जमिनीखाली जे असेल नसेल ते सगळे वर उगवून आले, अख्खे शिवार हिरवेगार दिसू लागले, जमिनीचे हिरवाईचे स्वप्न पूर्ण झाले. अधूनमधून सरीवर सरी येत होत्या. 'रिमझिमके गित सावन गाये भिगी भिगी रातो मे' अशा रेडीयोतून निघालेल्या शब्दलहरी कानाना सुखावत होत्या. वेळच्यावेळी पडलेल्या पावसामुळे पिके जोमात वाढली होती आणि पिकांच्या वाढीच्या बरोबरीने वाढले होते गवत. जिकडे-तिकडे नजर दवडवली की हिरवीगार पिके, गवत, झाडे, झुडपे, वेली दिसायच्या.


    निसर्ग शेतकरी व शेतमजूर यांच्यात तफावत नाहीच करायचा, दोन्हींवर समसमान प्रसन्न व्हायचा. यावेळी तो शेतमजुरांवर जरा जास्तच प्रसन्न झाला. अख्ख्या शिवारात गवताने अराजक माजवले होते. पिकांची वाढ खुंटवणाऱ्या गवताला खेचून शेतातल्या बांधावर फेकणे आवश्यक होते. कसेही करुन शेतकरी शेतमजुरांकरवी गवत निंदायचे काम करुन घेवू लागला, शेतमजुरांना चांगला रोजगार मिळाला.चहा पिवून व भाकर बांधून सकाळी नऊला गेलेला शेतमजूर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गवत उपटू लागला.


    आकाशात ढग नसलेला एक दिवस उगवला, सुर्य नेहमीप्रमाणे पूर्व दिशेने निरभ्र आकाशात वरच्या अंगाने सरकू लागला. ढगांचा अडथडा नसलेली सुर्यकिरणे थेट जमिनीवर पोहचू लागली. आज पाऊस अजिबातच येणार नाही अशी खुणावू लागली. पाऊस नसला अथवा भूरभूर असला की शेतीकामे करता येतात आणि खूप पाऊस असला की चिखलात शेतीकामे ठप्प असे ते समिकरण होते. वाफ तर हवीच हवी ! पावसाची खुली उघडीप बघून शेतमजुरांनी शेतात निंदायला जाण्याची तयारी केली, भाकरी बांधल्या. सकाळी आठ साडेआठला शिवाराकडे कुच केली.


    शिवारातील ज्या त्या शेतात रमतगमत आलेले शेतमजूर दहाला पोहचले व आल्याआल्या गवतासाठी कर्दनकाळ ठरले. अचानक एक ढग आकाशात अवतरला, बैठकीला यावे तसे मग एक एक करुन ढग त्या ढगाला येवून मिळू लागले, ढगांची घनता हळूहळू वाढू लागली, पांढरट दिसणारे ढग आता काळे काळे दिसू लागले, शुन्यातून निर्माण होणारे ढगांचे अस्तित्व पूर्ण आकाशाला व्यापू लागले. शेतमजूर निसर्गाची ही घडामोड उघड्या डोळ्यांनी बघत होते. क्षणार्धात रंग बदलणाऱ्या निसर्गाच्या किमया खरोखर चमत्कारिक होत्या, जेमतेम निंदणीचे काम सुरु करुन एक तास उलटला होता. सकाळचे अवघे अकरा वाजले होते. काळ्याकुट्ट ढगांना थंडगार हवा लागून ढगातून टपोरे थेंब पृथ्वीकडे झेपावू लागले, निंदणीचे काम सोडून शेतमजूर निंबाच्या झाडाच्या आश्रयाला आले.


    यंदाच्या पावसाळी हंगामात मनाजोगता वागणारा निसर्ग शेतमजुरांच्या दृष्टीने पहिल्यांदाच काहीसा मनाविरुद्ध वागला होता. कारण हातावर पोट असणाऱ्या शेतमजुरांना निंदणीचे काम अर्धवट सोडावे लागले होते. पावसाच्या टपोऱ्या थेंबांची संख्या वाढली व सातत्यही वाढले, पाऊस थांबेल अशी शक्यता मावळली, शेतात आता पाय ठेवला तर चिखलात पाय फसेल इतका चिखल झाला, निंदणीचे काम ठप्प झाले.


     शेतमजुरांची मनोवस्था दोलायमान झाली. अर्धवट सुटलेल्या कामाची मजुरी शेतमालक पूर्ण देतो की नाही ? याची उलघाल झाली. ओलेचिंब झालेले शेतमजूर परतीच्या प्रवासाला निघाले. निसर्गाच्या मनाविरुद्ध वागणारी माणसे आणि माणसाच्या मनाविरुद्ध वागणारा निसर्ग येथूनच दिसायला सुरुवात झाली. हातातोंडाशी आलेले उभे पिक भिजविणे, गरज नसतांना बरसणे, गरज असतांना डोळे वटारणे येथूनच सुरु झाले. असे असले तरी कायम निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या निसर्गाने या दिवशीही अर्धी मजुरी शेतमजुरांच्या पदरात पाडली. निसर्गचक्राशी मानव आजवर जुळवून घेत आला आहे पुढेही जुळवून घेईल.            


Rate this content
Log in