कुटुंब नियोजन
कुटुंब नियोजन
मिसरुड येणे अजून बाकी होते, जीवनातील भल्याबुऱ्याचे अजून भान नव्हते, स्त्री-पुरुषातील भेदाची हळूहळू समज येत होती, पण आपण भले व आपले गाव भले याच्यापलीकडे विचारांच्या कक्षा हळूहळू रुंदावत होत्या. गावात एखाद दुसऱ्याकडे आलेल्या व त्याने वाचून झालेल्या लोकमतवर ताजीतवानी नजर फिरत होती. लोकमतची सुबक छपाई व बातम्यांची पद्धतशीर मांडणी यामुळे लोकमत वृत्तपत्राबद्दल त्यावेळेपासूनच लगाव होता. मूळचा साहित्याचा असलेला पिंड त्याच्या उत्तेजक घटकांना बघून उत्तेजित होत होता. कधीतरी आपण यात कथा, कविता व ललित लेख लिहू अशी स्वप्ने बघत होता.
बोरखेड्याहून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील भालोद या गावी 'सदगुरु' आणि 'जय दुर्गा' नावाच्या दोन टुरिंग टाॅकीज अगदी शेजारी शेजारी होत्या. एक टाकी पूर्व पश्चिम अशी उभी होती तर दुसरी उत्तर-दक्षिण अशी पसरली होती. थर्ड क्लासमध्ये वाळू टाकून थर्ड क्लास प्रेक्षकांची बसण्याची सोय केली होती, तारेच्या कंपाऊंडच्या वर निकृष्ट दर्जाच्या लाकडी फळ्या खिळ्यांनी ठोकून बाकळे बनविले होते, तेथे खिशातले थोडे अधिकचे पैसे तिकिटावर खर्च करु शकणारे सेकंड क्लास लोकं बसत होते, फर्स्टक्लासमध्ये खुर्च्या ठेवून अधिक पैशांचे तिकीट काढणाऱ्यांची फर्स्टक्लास लोकं म्हणून संभावना केली होती.
कमी-अधिक आर्थिक उपलब्धीप्रमाणे व्यक्ती विभागणी तेव्हापासूनच कळायला लागली होती. पडद्याच्या जितक्या जवळ तितका डोळ्यांना त्रास आणि पडद्यापासून जितके लांब तितके डोळे सुरक्षित व चित्र दिसायला व्यवस्थित सोईचे असे ते समीकरण होते.
दोन्ही टुरिंग टाॅकीजमध्ये व्यवसायावरुन कमालीची चुरस चालायची, चित्रपटातील एखादे आवेगपूर्ण चित्र असलेले, नटनट्या नटूनथटून असलेले व खलनायकाचा क्रूर चेहरा नजरेत भरणारे पोस्टर सायकलच्या पुढे बांधून दोन्ही टाक्यांतील सेवक लाऊडस्पिकरवरुन लागलेल्या पिक्चरचे गुण गायचे, खेडोपाडी लहानथोरांची गर्दी जमवायचे, गुणवर्णन करुन झालेले गाव सोडताना पोरेटोरे त्यांच्या मागे लागायचे, बोंबलाबोंबल करुन गावकऱ्यांच्या कानठळ्या बसवायचे, 'कितने आदमी थे' असे गब्बरचे भारदस्त डायलाॅग गावागावातील शांतता चिरायचे, 'सरदार मैने आपका नमक खाया है' असे कालिया व त्याचे जोडीदार काकुळतीला यायचे, गावोगावी झालेले असे प्रचार प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कुतूहल जागवायचे, प्रेक्षक संध्याकाळी बैलगाड्या जुंपायचे, बायका-पोरांसकट भालोदला पोहचायचे, पोरेटोरे दिड दोन रुपयांसाठी आईवडीलांजवळ हट्ट करायचे.
संर्घषमय जीवन पुढ्यात वाढून ठेवलं होतं, भूक आ वासून उभी होती, तरीही मरणाची भीती वाटायची, कारण जिंदगी आताशी सुरु झाली होती, तिला जगायची होती, त्यामुळे ती समोर येईल तशी तिला जगणे भाग होते. तेव्हा भुते, चेटकिनी यांचा अवघ्या गावात व शिवारात दरारा निर्माण झाला होता. एका किनाऱ्यावर एक व दुसऱ्यावर दुसरा पाय ठेवून आधोळ्या नाल्यावर अवाढव्य भूत उभा राहातो, सांगवी रस्त्यावर अड्डूच्या झाडावर काळ्याकुट्ट रात्री भुते निवास करतात, तिकडे ईझवाई नदीच्या उतारावर बिनशेऱ्या (बिनडोक्याचा) भूत नजरेस पडतो, शौचास गेलेल्या महिलांना चेटकिनी घुंगट घेऊन गुपचूप उभ्या असलेल्या दिसतात. एकटीदुकटी महिला दिसली रे दिसली की तिला झपाटतात. अशा चर्चा गावात महिला व पुरुषांमध्ये दबक्या आवाजात रात्री चालायच्या, या चर्चा ऐकून लहानांनाच काय मोठ्यांनाही दरदरुन घाम फुटायचा, लहान मुले तर गोधडीत घुसून थरथर कापायची. काळ्याकुट्ट रात्री गहू, हरबरा, केळी, ऊस या पिकांना पाणी पाजायला जाणारी वाघाच्या काळजाची माणसे मात्र कुऱ्हाडीच्या एका घावात भुताचे मुंडके छाटायची हिंमत ठेवायचे, रोजीरोटी कमविली नाही तर कुटुंब नावाच्या याच्याहूनही मोठ्या भुताशी त्यांची गाठ पडायची. भीतीवर भूक हावी व्हायची, भीती कुठल्याकुठे पसार व्हायची.
भुतांची काल्पनिक दहशत जिकडे-तिकडे पसरुनही पिक्चर बघायचा शौक काही आवरता येत नव्हता, जाणीवांच्या विस्तारकक्षेत पिक्चर नावाचा मसालेदार मामला स्थिरावला होता, स्वकमाई बिनभरवशाची होती, त्यामुळे पिक्चरच्या तिकीटाच्या दिड रुपयासाठी आईकडे लालाईत व्हावे लागायचे, सोमवारच्या सांगवीच्या बाजारादिवशी मोठे बाबाकडून दोन तिन रुपये हमखास मिळायचे.
टुरिंग टाॅकीजच्या वर छत नव्हते, खुले आकाश होते, त्यामुळे अंधार पडल्याशिवाय चित्र दिसणे मुश्कील होते. सं
ध्याकाळी साडेसहाला आमचे टोळके पिक्चर बघण्यासाठी बोरखेड्याहून भालोदसाठी निघायचे, अवघ्या एका किलोमीटरवर भालोद राहिल्यावर काफोया नाल्यात 'जय जय नारायण नारायण हरी हरी' हे शेवटचे भक्तीगीत ऐकू यायचे, यानंतर पिक्चर सुरु व्हायचा, हे भक्तीगीत ऐकून आम्ही पिक्चरच्या टाॅकीकडे पिक्चर पहिल्यापासून सापडवण्याकरिता दुडकी धरायचो, दिड रुपयाचे तिकीट काढून थर्डक्लासमध्ये जाऊन बसायचो. गडद अंधाऱ्यात स्पष्ट दिसणारे पडद्यावरचे चित्र चांदण्या रात्री फिक्कट दिसायचे, पिक्चर बघताबघता मी अधूनमधून मनोहारी चंद्राकडे व त्याच्या शीतल प्रकाशाकडेही बघून घ्यायचो.
चित्रपट बघण्याच्या आधी असलेला उत्साह पिक्चर बघून होईपर्यंत टिकायचा नाही. रात्री साडेदहाच्या पुढे भालोदहून बोरखेडा पायी गाठावे लागायचे, काफोया नाल्यात ट्रक उलटून मेलेली माणसे भूत बनून मनात उभी राहायची, रस्त्याकडेच्या घनदाट केळीच्या बागेत भुते बिनदिक्कत हिंडतानाचे भास व्हायचे, धूळ तुडवणारे पाय लटलट कापायचे, टोळक्याच्या मधोमध शिरायचे, भित्रा, पळपूटा हे विशेषण इतरांकडून चिपकायचे. ठेचकाळत, धडपडत, थरथरत रस्ता कापल्यावर, बोरखेड्याजवळ आल्यावर, रातराणी नावाच्या फुलांचा सुगंध मात्र मन मोहवून टाकायचा, घरी पोहोचल्यावर आईने दुरडीत झाकून ठेवलेली भाकर व पातेल्यातील डाळ टोळके वरपायचा व गपगुपान गोधडीत शिरायचा.
एकदा असे झाले खेडी कोरपावली गावचे बहणोई बोरखेड्यात अचानक उगवले. खेडी कोरपावली गावच्या शिवारातील विहीरी खोदायची ढोर हमाली बहणोई करायचे, त्यामुळे थोडी अधिकची मजुरी त्यांच्या पदरी पडायची, जास्तीचे चार पैसे त्यांच्या खिशात खुळखुळायचे, आम्हा लहान मेहुण्यांना ते येताना पिकनिकचे गोड पाव, शेवचिवडा व फुटाणे आणायचे. वडील वारल्यावर आमच्या भूमिहीन कुटुंबात, कच्च्या घरात आर्थिक तंगी ठाण मांडून बसायची, कधीकधी तर आलेल्या पाहुण्यालाही खाऊ घालायची ऐपत नसायची, आई रुखीसुखी भाकर व डाळ त्याच्यापुढे मांडायची, पाहुण्याला घरातली लक्तरे बघूनच आर्थिक परिस्थितीची कल्पना यायची, त्यालाही वेळ निभावून न्यावी लागायची.
आले तसे दोन दिवस राहा! असा आग्रह बहणोयाला आईने केल्यावर खरोखर बहणोई राहून गेला, पण आमचा शौक पुरवायच्या कामी आला, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरानंतर भालोदला पिक्चरला जाण्याचा बेत रचला, आम्हा दोघा भावांचा आनंद गगनात मावेनासा झाला, बहणोई की ज्याला आम्ही भावा म्हणायचे, त्याने एक भाऊ पुढे तर एक भाऊ मागे सायकलच्या कॅरीयरवर बसवला व पैडल मारत भालोदला पिक्चरला निघाला. पाच किलोमीटरचा रस्ता भावाने कापला, पिक्चरच्या टाॅकीजपासून दोन पावलाच्या अलीकडील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर आमचा चार-पाच जणांनी रस्ता अडवला, भावाला जमावाने पकडला, प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून गेला, भाऊ व मला सायकलीसह पिक्चरच्या टाॅकीकडे पिटाळला, भावाला पोलिसांनी पकडले असा आमचा समज झाला, भाऊ आणि मी रडू लागला, पिक्चरच्या टाकीजवळ आमचा अर्धा तास अस्वस्थतेत गेला, तेवढ्यात भावा आमच्या दिशेने येताना दिसला, भावाला बघून आमचा जिवात जीव आला.
फक्त दोनच मुले असल्याचे सांगून भावा कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेपासून वाचला होता.
आता भारताची एकसेतीस कोटी लोकसंख्या आहे, तेव्हा नव्वद कोटी असावी, लोकसंख्या कमी असल्यास सगळ्यांना सकस अन्न मिळेल, धान्यटंचाई जाणवणार नाही, सगळ्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा व्यवस्थित भागतील, असा कुटूंब नियोजनाच्या योजनेमागे सरकारचा हेतू होता, आजही आहे.
पण तेव्हा असे गरिबांना जबरदस्तीने कुटूंब नियोजनासाठी पकडले जायचे, प्राथमिक आरोग्य केंद्राची जिपगाडी दिसली की गरीब लोकं पळापळ करायचे, कोणत्याही लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचे संकट गरिबांवरच कोसळायचे, जमीनदार, मालदार, करप्ट नोकरदार लोकं सगळी सुखे विनासायास लाटायचे. आजही लाटतात. लोकसंख्या नियंत्रित करण्याआधी सरकारने विषम आर्थिक परिस्थिती समान आर्थिक परिस्थितीत परिवर्तीत केल्यास, गरिबांना अतिरिक्त जाच सहन करावा लागणार नाही.
भावाची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्याने, आमचा जीव भांड्यात पडला होता. आम्ही तिघेही पिक्चर बघून हासत मुरडत घरी परतलो, पुढे भावाला अप्रेशनवाल्यांनी पकडल्याची घटना गाव वर्षभर चवीने चघळत राहीले.