पहिली भेट
पहिली भेट


ग्रामपंचायतीच्या लायटाखाली खावूनपिवून बसलेल्या कमलेश व रमेश शेजारी चंदूही येवून बसला.
'तुम्हाला काही माहित पडले का'
आल्या आल्या चंदूने दोघांना कोड्यात पाडले
'नाही'
'गावात एक पाहूणी आली आहे'
'गावात कैक पाहूणे येतात, गावातले लोकं पाहूणे म्हणून परक्या गावात जातात यात विशेष ते काय'
तसे नव्हे ती नुसती पाहूणी नाही तर सुंदर पाहूणी आहे
नुकत्याच तारुण्यात पाय टाकलेल्या कमलेश आणि रमेशने कान टवकारले, त्यांना चंदूचे निरस वाटणारे संभाषण आता सरस वाटायला लागले, अधिकची माहिती घेण्यासाठी ते त्याच्याकडे तोंड करुन बसले.
'पण पाहूणी आहे कुठली'
'लोहाऱ्याची'
बोरखेड्याच्या अनेक मुली लोहाऱ्यावाले करुन घेवून गेले आहेत आणि लोहाऱ्याच्याही अनेक मुली बोरखेड्यावाल्यांनी करुन आणलेल्या आहेत. या दोघा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नातेसंबंध आहेत. त्यामुळे या दोघा गावांदरम्यान सतत पाहूणेपईचे येणे जाणे सुरु असते.
'कोणाच्या घरी आली'
'नोकरदाराच्या घरी'
रोज कमवून रोज खाणाऱ्या कमलेश,रमेश व चंदूला नोकरदाराच्या घरी आलेल्या पाहूणीबद्दल कुतूहल निर्माण झाले.
साडेचारशे घरांच्या गावात रोज नवा विषय चघळला जात होता. ज्या दिवशी नवा विषय सापडला नाही त्या दिवशी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यातच धन्यता मानण्यात यायची. वृध्द, तरुण आणि किशोरवयीन मुले अशा तीन गटात चर्चेची खलबते चालत. शिवारात घडलेल्या घडामोडी, पाऊसमान, गावात येणारे जाणारे चर्चेच्या केंद्रस्थानी असत. आज या तिघांना नविनच आणि मनोरम विषय चघळायला सापडला होता.
लग्नाचे वय झालेल्या तरुणाने सोताच्या पायावर उभे राहण्याची गावकऱ्यांची अट असायची. तो स्वतला खावू घालू शकत नाही तर बायकोला काय खावू घालणार असा प्रश्न गावकरी बेहिचक उपस्थित करत. त्यामुळे बिनभरवश्याची आर्थिक प्राप्ती असणारे कमलेश, रमेश व चंदूलाही नव्या पाहूणीची चर्चा करण्यात अपराधीपणाची भावना होत होती. पण तरीही ते असा मधूर विषय चर्चेविना थोडाच डावलणार होते. दोन तीन तासांच्या चर्चेत एरवी बरेच विषयांतर होत असतांना आज मात्र पाहूणी हा एकूलता एक विषय चर्चेला शेवटपर्यंत पुरला. डोळ्यांमध्ये पेंग यायला लागला तेव्हा कमलेश, रमेश व चंदूने विषय तहकूब केला व ज्याचेत्याचे घर गाठले.
सकाळी रमेश उठला तेव्हा त्याचा रेडीओ 'सोला बरसकी बाली उमरको सलाम ऐ प्यार तेरी पहली नजरको सलाम' हे गाने गुणगुणत होता. दात घासताघासता रमेशची नजर पाणी भरुन परत येणाऱ्या महिलांमध्ये त्या पाहूणीचा शोध घेत होती. रमेशला पहिल्यांदाच त्याच्या काळ्याभोर केसांवर गर्व होत होता, तो आरशात आता घळीघळी बघत होता, त्याचा सुंदर व कोवळा चेहरा उलट बाजूने आरसा त्यालाच दाखवत होता. रमेश क्षणाक्षणाला केसांची रचना बदलवत होता. कोणत्या बाजूने भांग चांगला दिसेल याची चाचपणी करीत होता. त्याच्या दातांची,नाकाची, डोळ्यांची ठेवण रेखीव होती. त्याच्या चेहऱ्याकडे बघणारीचा ह्रदयाचा ठोका चुकत होता. एक सुंदरी तर त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे लक्ष असतांना खालच्या दुर्लक्षित खड्ड्यात पडली होती.
ती गावात आलेली पाहूणी कशी असेल याचे तर्कवितर्क रमेश मनातल्या मनात लढवत होता. रमेशची प्रतिक्षा एके दिवशी संपली, परकर व पोलक्यावर त्याची स्वप्नसुंदरी दिसली. पाणवठ्याहून पाणी भरुन आणलेला हंडा डोक्यावर ठेवून ती महिलांच्या बरोबर येत होती. ती पाहूणी दिसल्यावर 'इसे नशिब कहे या कुदरतका करिश्मा' मेरा महेबूब है कितना सुहाना' अशी रमेशला नैसर्गिक रित्या अवगत असलेली शायरी आपोआप रमेशच्या ह्रदयातून द्रवली.
खरोखर ती पाहूणी खूप सुंदर होती. एरवी रमेशचा चेहरा बघून सुंदऱ्यांचे मन थाऱ्यावर नसायचे आज त्या पाहूणीचा चेहरा बघून रमेशचे मन सैरावैरा झाले होते.
जन्म, बालपण, किशोरपण अशा सर्व अवस्थांमध्ये निसर्गावर प्रेम करणारा रमेश आज त्याच्या प्रेमाची वाटणी करायला निघाला होता. शेतमजुरी करतांना निसर्गाचा हवाहवासा वाटणारा सहवास त्याला फारसा सुखावू शकत नव्हता. कमलेश व चंदू त्याचे जिगरी दोस्त होते. त्याच्या ह्रदयाची धडधड त्यांना जाणवत होती.
'तुझे लक्ष हल्ली ठिकाण्यावर नसते'
न राहवून रमेशच्या आईने एके दिवशी
रमेशला टोकले
'आई आहे लक्ष ठिकाण्यावर'
असे उडवाउडवीचे उत्तर देवून रमेशने वेळ निभावून
नेली.
पण मनात चाललेली चलबिचल, रात्रीची उडालेली झोप, या कुशीहून त्या कुशीवर शरिराला करावी लागणारी कसरत, झोपण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या डोळ्यांसमोर येवून झोप उडवणारा पाहूणीचा सुंदर चेहरा, रेडीयोतून निघणाऱ्या मधूर प्रेमगितांशी एकतान होणारे मन असे बदल रमेशमध्ये गावकऱ्यांना जाणवत होते.
रमेशचा मोठा भाऊ एकदा बोरखेड्यात आला, चार पैसे कमवायला लागल्यावर रमेशचेही हात पिवळे करुन टाकू असे रमेशच्या आईजवळ म्हणाला. रमेशने हे ऐकल्यावर रमेशच्या मनात लड्डू फुटू लागले, गावात आलेल्या त्या सुंदर पाहूणीच्या विचारात रमेश आधीच तल्लीन झाला होता.
रमेश अतिशय सुंदर होता. त्याचा रंगही उजवा होता, पण परिस्थितीने त्याला आर्थिक सुरक्षा दिलेली नव्हती. उन्हातान्हात मजुरी करतांना त्याचा रंग करपत होता. तुटपुंज्या मजुरीवर जगणाऱ्या रमेशला मोठे मन करुन कोणी मुलीवाला मुलगी द्यायला तयार नव्हता, गावातले सुंदर मुलींचे अनेक बाप त्यांची मुलगी त्याला नोकरी लागल्यावरच देण्याची मतलबी भाषा करीत होते. रमेशचे कोवळे मन दुखावत होते.
एके दिवशी गावाशेजारच्या केळीच्या मळ्यात रमेश, कमलेश व चंदू आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले होते. पाच फुट उंच असणाऱ्या पण भराव टाकून जेमतेम अडीच फुट खोल बनविलेल्या पाण्याच्या सिमेंट क्रांकीटच्या टाकीत डूंबत होते, विहीरीतून पाईपाने येणाऱ्या पाण्याच्या थंडगार जाड धारेत मनसोक्त भिजत होते. निसर्गाच्या सहवासात आंघोळीचा स्वर्गीय आनंद घेत होते.
क्षितिजापर्यंत नजर जात होती, स्वच्छ सुर्यप्रकाशात हिरवेगार शिवार न्याहाळत होती, हत्तीच्या कानांएवढी केळीची पाने अख्ख्या शिवाराला आच्छादून होती, दूरवर उत्तरेला सातपुडा पहाड स्तब्ध उभा होता. अस्तित्वहिन पांढरट ढग आकाशात कुठेतरी दृष्टीस पडत होते, लख्ख सुर्यप्रकाशाने त्यांचे अस्तित्व हिरावून घेतले होते.
टाकीतल्या ताज्या पाण्यात किती वेळ डुंबावे याला काही मर्यादा नव्हत्या, दिड तास दोन तासांपासून हे त्रिकुट डुंबत होते. दरम्यान टाकीतून खालच्या पसरट कुंडात पडणाऱ्या पाण्यात धुणे धुवायला ती बहूचर्चित पाहूणी आल्याचा या तिघा त्रिकुटांना पत्ताही लागला नाही. ओल्याचिंब अंगाने रमेश टाकीच्या पायऱ्यांवरुन उतरायला लागला तेव्हा प्रथम त्याच्या नजरेला तो सुंदर मुखडा पडला. पहिली नजरका पहिला प्यार त्याला भेटला. रमेशने त्या पाहूणीकडे व त्या पाहूणीने रमेशकडे जेव्हा बघीतले तेव्हा अवघा आसमंत थांबला, तो पहिला क्षण दोन अनुपम सौन्दर्याच्या दर्शनाने भारावला, पाने, फुले, फळे, वनस्पती, पक्षी ही सगळी या पहिल्या आकर्षणाची साक्षीदार झाली.
पाहूणीचा सुंदर चेहरा रमेशची नजर लोहचुंबकासारखी खेचून घेत होता. त्या पाहूणीलाही तीच्यासोबत आलेल्या दोन मुलींचे भान नव्हते.ती ही रमेशच्या ताज्या टवटवीत चेहऱ्याकडे दुनियाजहान विसरुन बघत होती. रमेशच्या शरिरावरील पाण्याचे थेंब सुर्यप्रकाशात मोत्यांसारखे चमकत होते. पाहूणीचा चेहरा रमेशच्या आवडीच्या साच्यात फिट्ट बसणारा होता. पाहूणीने उर्वरित धुणे सोडून द्यावे, रमेशने अंर्तवस्त्रे विस्कटणे राहू द्यावे व फक्त पाहूणीकडे बघत बसावे पाहूणीने त्याच्याकडे बघत बसावे असा बाका प्रसंग उद्भवला होता.
मुलीच्या सुखासाठी नोकरदाराचा शोध घेणारी जालीम दुनिया तेथे नव्हती. मुलामुलींच्या निखळ नैसर्गिक नजरानजरीकडेही संशयाने बघणारे दुष्ट गाव लांब होते. तेथे फक्त होता रमेश व ती सुंदर पाहूणी.
नोकरी लागेल तोपर्यंत मजुरी करु, जे मिळेल ते खावू, पाहूणी नाहीच रमेशकडे नोकरी बघून आकर्षित झाली होती. ती ज्यांच्या घरी पाहूणी म्हणून आली होती त्या घरचे घरकाम केल्यावर तीला अन्न मिळत होते, रमेश जमेल तशी मजुरी करुन दोन घास मिळवत होता. त्यामुळे पाहूणी आणि रमेश जगत होते. एकमेकांच्या सौन्दर्याचा आस्वाद घेत होते.
लाजराबुजऱ्या रमेशने त्या दिवशी तोंडातून एक चकार शब्द काढला नाही, रुपसुंदरी पाहूणी तर शरमेने लालमलाल झाली. त्या दिवशी फक्त डोळ्यांनी प्रेमाची भाषा बोलली होती. रमेश व पाहूणी त्या दिवशी धुणे धुवून गावात आले. पाहूणी ज्याच्या घरी आली होती त्याचे ते घर रमेशच्या घराच्या अगदी समोर होते. त्यामुळे आता रमेश व ती पाहूणी रोज सकाळ संध्याकाळ नजरेचे बाण एकमेकांच्या दिशेने फेकू लागले, एकमेकांची ह्रदये घायाळ करु लागले. ही प्रेमाची भाषा पुढे रमेश व ती पाहूणी व्यवहारी जगाच्या नाकावर टिच्चुन दोन-तीन वर्षे डोळ्यांमार्फत बोलत राहिले.