बंदिनी...
बंदिनी...


अहो मी वेडी नाही हो... मला सोडून द्या, घरी माझ्या दोन लहान मुली आहेत. मी खरंच सांगते, मी नाही वेडी. कल्याणी अगदी हात जोडून त्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगत होती. पण तिचे कोणी ऐकून घेत नव्हते.
एक जण म्हणाला, ओ बाई इथे येणारा प्रत्येक पेशंट असंच म्हणतो. चला उगाच आमचा वेळ घालवू नका. त्यांचा हा गोंधळ आत केबिनमध्ये बसलेल्या डॉ. विभाला ऐकू आला. तशी ती बाहेर कॉरिडॉरमध्ये आली. तिने पाहिले हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय आणि आया एका बाईला रूमकडे नेत होते, पण ती बाई त्यांना विनवणी करत होती. माझं ऐका मी वेडी नाही ओ... असं ती बोलत होती.
विभा म्हणाली, थांबा सगळे जण, तुम्ही जा सगळे, मी बघते. ती बाई विभा जवळ आली. म्हणाली, डॉक्टर मी वेडी नाही आहे. मी एक शिक्षिका आहे.
विभा म्हणाली, तुम्ही शांत व्हा आणि चला माझ्या केबिनमध्ये जाऊन आपण बोलू. विभाला ही बाई कुठे तरी खरे बोलत आहे असे वाटत होते. चेहऱ्यावरून चांगली सुशिक्षित वाटत होती अंगावर बऱ्यापैकी साडी होती. विभा तिला घेऊन आपल्या केबिनमध्ये आली.
इथे बसा तुम्ही खुर्चीवर. ती बाई बसली. मग तिच्या समोर विभा बसली. विभाने तिला टेबलवरचा पाण्याचा ग्लास दिला. तिला पाण्याची गरज होती. तिने एका दमात ते पाणी पिऊन टाकले. विभाने बोलायला सुरुवात केली. मी डॉ. विभा या मेंटल हॉस्पिटलमध्ये मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. तुम्हाला पाहून असे वाटत नाही की तुम्ही वेड्या आहात किंवा मानसिक रुग्ण आहात.
हो डॉक्टर मी वेडी नाही. माझ्या नवऱ्याने मुद्दाम खोटे सांगून तुमच्या हॉस्पिटलमध्ये कळवले की मी वेडी आहे. मला वेडाचे झटके येतात, मला ताबडतोब घेऊन जा, असे.
ओह, असे का सांगितले तुमच्या नवऱ्याने?
डॉक्टर तुम्हाला ऐकायची आहे का माझी कथा.
हो सांगा, का आणि कशा आलात तुम्ही इथे?
मग कल्याणी बोलू लागली. डॉक्टर मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. आई-वडील, मी, एक बहिण आणि दोन भाऊ. मी सगळ्यात मोठी मुलगी. जामिनीचा छोटा तुकडा आहे त्यावर आई-बाबांनी कसे तरी कष्ट करून आम्हाला मोठे केले. मी डीएड केले आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करु लागले. तेव्हाच माझे लग्न जमले शेजारच्या गावातील मोहन कदम यांच्याशी. ते गावातील मातब्बर कुटुंब त्यांचा गावात दरारा पण जास्तच. माझ्या आई-वडिलांना वाटले की माझे रूप, नोकरी बघुन ते लग्नाला तयार झाले असतील तेव्हा आपल्या मुलीचे चांगलेच झाले. इतके श्रीमंत घर मिळाले. मोहनही दिसायला छान होता. आमचे लग्न झाले. मी माझ्या सासरच्या गावी शाळेत नोकरी करावी त्याला आडकाठी नव्हती. सुरुवातीला सगळं छान मजेत नव्या नवलाईत दिवस चालले होते. मी ही आनंदात होते. सासरी सासु-सासरे, मोठे दिर-जावू त्यांची मुलं असा मोठा परिवार होता. काही महिन्यानंतर मला जाणवू लागले की घरात सगळं काही सासु म्हणेल तसेच केले जाते. सुनांना तिथे काही किंमत नव्हती.
एक दिवस जावेच्या खोलीमधून भांडणाचा आवाज येत होता. मी सकाळी जावेला विचारले की का भांडण चालले होते तुमच्यात? तसे जाऊ बाई रडू लागली. म्हणाली, तुझ्या दिराचे म्हणजे तिच्या नवऱ्याचे बाहेर एका बाईसोबत संबंध आहेत त्याचा जाब मी विचारत होते तर उलट मलाच मारले खूप. मग तुम्ही आईंना सांगा ना हे सगळं. त्यांना सगळं माहित आहे त्या मुलांचीच बाजू घेतात. आणि माहेरी माझं ऐकून घेणारं कोणी नाही. त्यामुळे हे घर सोडून जाऊ शकत नाही. सगळं सहन करत राहायचे. कल्याणीला तिच्या जावेबद्दल वाईट वाटले पण ती ही यात काहीही करु शकत नव्हती.
रात्री मोहन घरी आला. दोघं भाऊ त्यांच्या शेतावर लक्ष ठेवायला, कामगारांकड़ून काम करून घ्यायला जात असत. भरपूर पैसा होता त्यामुळे त्यांना काम असे काही करावे लागत नसे. तिने मोहनकड़े त्याच्या भावाबद्दल तक्रार केली. तसा तो भड़कला, हे बघ आम्ही भाऊ काय करतो कुठे जातो हे तुला सांगायला आम्ही बांधील नाही आहोत. माझ्या भावाबद्दल काही एक ऐकून घेणार नाही मी. त्यामुळे मग कल्याणी गप्प बसली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच मोहन घरी आला तो पूर्ण दारुच्या नशेत होता. कल्याणी दुपारीच शाळेतून घरी येत असे. अहो काय हे तुम्ही पिऊन आलात. तसा त्याने तिच्या मानेला घट्ट पकड़त म्हणाला, तुझ्या बापाच्या पैशाने नाही पिऊन आलो समजले. आमच्याकड़े गड़गंज पैसा आहे. काल काय बोलली तू माझा भाऊ बाहेर लफडी करतो. तिला मानेला दुखत होते. सोडा मला. मान दुखते माझी. पण मोहनने तिला जोरात धक्का दिला. ती बेडवर पडली तसा त्याने आपला बेल्ट काढून तिला मारायला सुरवात केली. ती रडत हात जोड़त होती पण दारुच्या अंमलाखाली त्याला काही समजत नव्हते. मारून त्याचे मन भरले तिचे अंग अंग ठणकत होते. मग त्याने तिचा साड़ीचा पदर बाजूला केला आणि तिच्या अंगावर आला. स्वतःची भूक भागवूनच तो बाजूला झाला. कल्याणी रडत होती तसेच उठून तिने साडी नीट केली. बाथरूममध्ये जाऊन खुप रडली. मग चेहरा पाण्याने धुवून बाहेर आली. स्वयंपाक घरात आली. तिची जाऊ काम करत होती. कल्याणीकडे बघूनच ती समजून गेली की काय झाले असेल. ती म्हणाली, कल्याणी इथे असंच आहे सगळं. मी सहन करते तसं तुलाही करावे लागणार पण एक जमेची बाजू तुझ्याकडे आहे की तू नोकरी करतेस. कल्याणी काहीच बोलली नाही निमूटपणे काम करत राहिली.
असेच आता रोज घडत होते. मोहन रोज पिऊन यायचा मग पाशवीपणे तिच्यावर बलात्कार करायचा त्यात त्याला असुरी आनंद मिळायचा. हो नवऱ्याने केलेला समाजमान्य बलात्कारच! मुळात त्याच्या घरी हे संस्कार नव्हते की स्त्रीला सन्मान द्यावा तिचा आदर करावा. काही महिन्यांनी कल्याणीला दिवस गेले आणि तिला मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून परत तिच्या त्रासात वाढ झाली. ती ही गप्प राहून सहन करत होती कारण माहेरी बहीण-भाऊ यांचे अजून लग्न व्हायचे होते. हिच्या लग्नाला नुकतेच दोन वर्षे झाले होते. आईलाही ती काही सांगत नसे. मुलीला मी काही सांभाळायची नाही असे सासूने सांगितले होते. त्यामुळे कल्याणीला नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. घरकाम मुलीला बघणे आणि मोहनचा अत्याचार सहन करणे इतकंच तिचं आयुष्य बनले होते. मुलगी चार वर्षांची झाली.
कल्याणीला परत दिवस गेले. ती मनातून देवाला विनवणी करत होती की या वेळेस मुलगा होऊ दे निदान माझा थोडा त्रास कमी होईल. पण तिचे दुर्दैव परत आड आले पुन्हा तिला मुलगी झाली. आता सासू खूप बोलायची तिला. शिव्या पण द्यायची. आता मोहन तिच्यासोबत त्यांच्या बेडरूममध्ये झोपत नसायचा. तो दुसऱ्या खोलीत झोपू लागला. तिने याबद्दल विचारले तसा तो भडकला म्हणाला, तुझ्यात इंटरेस्ट नाही राहिला मला. दोन दोन मुलींना जन्माला घालणारी तू. अहो पण यात माझी काय चूक? मग काय माझी चूक आहे? अहो तुम्हाला माहीत असेलच की मुलाचे गुणसूत्र पुरुषाकडे असतात. ती असे म्हणताच तो अजून भडकला तिच्या केसांना धरून बोलला मला शहाणपणा शिकवतेस काय आणि तिला ढकलुन दिले. ती भिंतीला जाऊन धडकली. तो रूम बाहेर पडला. आता तो फक्त तिच्या चुका काढायचा आणि तिला मारायचा. त्यात कधी तरी मग स्वतःच्या शरीराची भूक भागवायचा. पण तिला हवे असणारे नवऱ्याचे प्रेम, आपुलकी, माया, काळजी हे काहीही तिच्या नशिबी नव्हते.
अलीकडे तिच्या कानावर गोष्टी येऊ लागल्या की मोहनचे एका विधवा बाईसोबत संबंध आहेत. त्या बाईच्या घरी जाता येता गावातील लोकांनी पाहिले होते पण त्याच्याबद्दल बोलणार कोण... कारण गावात त्यांचा दरारा होता. कल्याणी या बाबत त्याला काही विचारू शकत नव्हती. तिच्या लग्नाला आता बारा वर्ष झाली होती. मोठी मुलगी दहा आणि छोटी आठ वर्षांची होती. कल्याणी हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. ती नीट खात पित नसे. मुलींकडे तेवढ लक्ष देत होती. मोहन मुलींशी ही नीट बोलत नसे. बाप म्हणून तो त्याचं प्रेमही मुलींना देत नसे.
एक दिवस मोहन घरी आला तो त्या बाईला सोबत घेऊनच! आईला म्हणाला, ही तुझी सून आम्ही लग्न करून आलो आहोत. हे ऐकून कल्याणीच्या पाया खालची जमीनच सरकली. ती खोलीत जाऊन खूप रडली. आपल्या नशिबाला दोष देत राहिली. आता तर ती अजूनच खचली. मोहन मुद्दाम कल्याणीसमोर त्या बाईशी लगट करायचा, ते दोघे मोठमोठ्याने बोलायचे हसायचे. कल्याणीला हे सहन होत नसे मग तिला नैराश्याचे झटके येऊ लागले. तिच्यावर उपचार कोण करणार हा मोठा प्रश्न होता तिथे तिच्यासाठी कोणी पैसे खर्च करणारे नव्हते. सासू-सासरे स्वभावाने सारखेच होते. कोणाकडे दाद मागणार ती.
एकदा रात्री तिच्या खोलीचे दार कोणीतरी वाजवत होते. ती उठली तिला वाटले जाऊबाई असतील. म्हणून तिने दार उघडले तसे तिचा मोठा दीर पटकन खोलीत शिरला. आणि त्याने कडी घातली. ती भांबावून गेली तुम्ही का आलात इथे काय पाहिजे तुम्हाला... भीतभित तिने विचारले. तसा तिचा दीर तिच्या जवळ आला म्हणाला, मी सांगतो तसे कर नाहीतर आता सगळ्यांना आवाज देतो आणि तू मला तुझ्या रुममध्ये बोलवलेस तू बदफैली आहेस असे सांगेन. कल्याणी हात जोडून त्याला बाहेर जाण्यासाठी सांगत होती पण तो ऐकत नव्हता. म्हणाला,तू मला आवडतेस आपण लग्न करू तसेही मोहनने दुसरे लग्न केलेच आहे. मी तुला सगळं सुख देईन. नका हो असे काही बोलू नका मी पाय धरते तुमचे ती म्हणाली. पण त्याच्या अंगात आता वासनेचा राक्षस शिरला होता. आवाज नको करू पोरी उठून बसतील मला काही नाही तुझा तमाशा होईल. त्याने डीम लाईट बंद केली आणि कल्याणीवर जबरदस्ती केली.
आता हे रोजच होऊ लागले ती निमुटपणे त्रास सहन करत होती कारण घराबाहेर पडायला तिला परवानगी नवहती. आता तिला नैराश्याचे झटके जास्तच आणि सारखे येऊ लागले. मोहनच्या नवीन बायकोने त्याला सांगितले की तिला आता वेड लागले आहे. ठार वेडी झालीय ती. तिला घरात नको ठेवूस. मोहनला ते पटले आणि त्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले तिला वेडाचे झटके येतात असे सांगितले. तिच्यापासून घरच्यांना मुलींना त्रास होतो असे सांगितले. एका डॉक्टरकडून खोटे तिच्या नावाचे रिपोर्ट आणले की तिला वेड लागले आहे तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या आधारावर तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे असे सांगितले.
मग एक दिवस मेंटल हॉस्पिटलचे लोक मोहनच्या घरी आले. ती रडत होती. मुली रडत होत्या. पण मोहन ऐकणारा नव्हता. तिने खूप हात जोडले त्याचे पाय धरले पण तो बधला नाही. कारण त्याला आता ती नको होती. कल्याणी म्हणाली, मी जाते या लोकांसोबत पण माझ्या मुलींना माझ्या माहेरी सोडा, अशी तिने विनंती केली. तेवढे मोहनने मान्य केले. त्याला त्या मुलींची जबाबदारीही नकोच होती. मग कल्याणीला ते लोक इथे मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले.
आपली कहाणी डॉ. विभाला सांगून ती रडत राहिली. आजही स्त्री अत्याचार संपले नाहीत. मोहनसारखे नराधम आजही मोकाट फिरत आहेत. यांना वेळीच नाही ठेचले तर असे अनेक मोहन राजरोसपणे या समाजात फिरत राहतील असा विचार विभा करत होती. ती कल्याणीला म्हणाली, हे बघ कल्याणी तू जर मला मदत केलीस तर मी तुला नक्की न्याय मिळवून देईन.
डॉक्टर मी कशी तुम्हाला मदत करणार आणि तो खूप पैसेवाला आहे. माझा त्याच्यासमोर निभाव नाही लागणार.
कल्याणी तू नको काळजी करू माझ्या ओळखीचे आहेत काही एनजीओचे लोक आपण त्यांची मदत घेऊ. पण तुझी तयारी आहे का मोहनला धडा शिकवण्याची?
हो मॅम त्याने मला आयुष्यातून उठवले. हाल हाल केले त्याला मी सोडणार नाही.
गुड चल मग मी तुला तुझ्या आई-वडिलांकडे सोडते तुझ्या नोकरीचेही बघते. तू आता काळजी नको करू.
खूप खूप आभार मॅडम कल्याणीने हात जोडले. डॉ. विभा कल्याणीला घेऊन तिच्या माहेरी आली. आई पाहताच कल्याणीच्या मुली पळत येऊन तिला बिलगल्या. विभाने कल्याणीबाबत जे घडले ते सगळं तिच्या आई-वडिलांना भाऊ-बहिणीला सांगितले. त्यांनाही खूप राग आला मोहनचा.
कल्याणीचा भाऊ म्हणाला, डॉक्टर तुम्ही जी आम्हाला मदत करत आहात त्याची परतफेड नाही होऊ शकत. मोहनसारख्या राक्षसाला वेळीच ठेचणे गरजेचे आहे आणि मी एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर होणार अन्याय कसा सहन करू म्हणूनच मी कल्याणीला मदत करायचे ठरवले आहे. इतकं बोलून विभा निघून आली. कल्याणीला न्याय कसा मिळवून देता येईल हाच विचार करत ती घरी आली. एक कल्याणी खरोखरच वेडी होण्यापासून वाचली हे समाधान जास्त होते.
समाप्त...