भयकथा : अमावस्याची रात्र
भयकथा : अमावस्याची रात्र
रम्या गावाकडे राहणारा साधा मुलगा. जेमतेम शिक्षण झाले होतें. त्याचे लग्न ही जेमतेम शिक्षण झालेल्या पण उत्तम घर सांभाळणाऱ्या मुलीबरोबर झाले . शेतीवर पोट चालत नसल्याने त्याने नौकरी करायचं ठरवलं. बायकोनेही त्याला मंजुरी दिली. शेताची जबाबदारी त्याच्या बायकोने म्हणजे मीनाने घेतली. घर सांभाळत ती रानातही काम करायला जात होती. रम्याला त्याच्या कुवतीनुसार नौकरी लागली. शेत पाहत बायकोला मदत करत,तो नौकरीही करू लागला.
रम्या आज भलताच खुशीत होता. त्याचा महिन्याचा पगार झाल्याने त्याने मित्रांना पार्टी देण्याचं ठरवलं होतं. आज त्याची पार्टी ठरली मित्रांबरोबर ...!! त्याचा बायको कितीवेळा तरी सांगत होती. "आहो धनी नका जाऊ... आज रातच्याला..! काहीतरी नको अघटीत घडायला, पण रम्या मात्र त्याच्याच हट्टाला पेटला होता. त्यात त्याचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. रम्या त्याच्या निर्णयावर ठाम राहून, तो निघून गेला. रात्रीचे आठ वाजत आले होतें. रम्याची बायको मात्र देवाच मनोमन नाव घेत होती. तिचा अशा गोष्टींवर खूप विश्वास होता. आज काही अमावस्याच अघटीत घडायला नको, असे देवाला विनवणी करत होती. माझ्या धन्याचं रक्षण कर....!!
रम्या एकटाच शेतातल्या माळरानात मित्रांच्या आधी सर्व साहित्य घेऊन पोहचला. आज मस्त मटणाचा बेत ठरला होता. रम्या ज्या जागेत गेला होता, ते माळरान तिथं माणसांची येणेजाणे कमीच. तिथं एका चिंचेच्या झाडाखाली आणलेले सगळं साहित्य मांडले.त्यामुळे रम्या एकटाच पार्टीची जोरदार तयारी करत होता. दिनेश रावांची झोपडी जवळच होती . त्या झोपडीत दिनेशराव नेहमी वाळकी लाकडे चुलीसाठी ठेवत . त्या झोपडीत तो दिनेशरावांना हाका मारायला गेला. आतून मात्र कोणाचाही आवाज न आल्याने तो एकटाच आतमध्ये गेला. आतमध्ये कोणीच नव्हतं. राहून राहून रम्याला जवळ कोणीतरी असल्याचा भास होतं होता. रम्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होता. चुलीसाठी लाकडे घेऊन रम्या निघणार तोच पाठीमागे दिनेशराव.. " रम्या दचकलाच...! त्यांना अचानक पाठीमागे बघून. रम्या,..तुम्ही...! मी किती हक्का देऊन रायलो,आणि अचानक कसे इथे. वाळकी लाकडं पाहिजे होती जरा...!म्हणून इथे आलो. रम्यान त्याच बोलणं पूर्ण केलं.
दिनेशराव...., मी इथेच होतो.हाक ऐकू आली नसेल. घ्या नां लाकडं हवी तेवढी घ्या ...! ते हसू लागले.
चिंचेच्या झाडाखालीच रम्याने चूल पेटवली. रम्या चुलीसाठी लाकडे घेऊन निघाला. जाता जाता दिनेशरावंशी बोलत मागे बघू लागला. पुन्हा मात्र दिनेशराव गायब झाले होतें. रम्याला मात्र काय होतंय...! काही समजत नव्हतं. रम्याने पुन्हा मित्रांना कॉल केला. तरी दोघंही फोन उचलत नव्हती. त्या अंधाऱ्या माळरानातील शांतता बघून रम्याला आता बायकोच बोलणं आठवू लागलं होतं. रम्या फोन खिशात ठेवून पुन्हा तयारी करू लागला. त्याच्या पुन्हा मागे दिनेशरावांचा हाक आली. पुन्हा रम्या दचकला... या नां तुम्ही.., बसा माझ्याबरोबर गप्पा मारत... अजून झोपला नाहीत का....?
दिनेशराव...., रोजच जागरनाची सवय आहे. आम्हाला झोप कुठली. आम्ही आमची शिकार शोधत रात्रभर भटकत असतो. दिनेशरावांचं वागणं रम्याला जरा वेगळंच वाटत होतं. तरीही त्यांन लक्ष न देता त्याच काम सुरु केलं.
दिनेशराव रम्याबरोबर गप्पा मारत बसले. लवकर उरकतं घ्या जरा. भूक लागली खूप....! रम्या आता विचार करत होता. यांना तर पार्टीचं आमंत्रण नसताना जेवायलाच येऊन कसे बसले...?? रम्या पुन्हा त्याच्याच धुंदीत काम करू लागला.
रात्रीचे बारा वाजत आले होतें. चुलीने आता चांगला पेट घेतला होता. जवळ जवळ रम्याच काम संपतच आलं होतं. रम्या भात थोडासा शिजायचा राहिला असल्याने पुन्हा झोपडीत लाकडे आणायला गेला. बाहेर येऊन पाहतोय तर, दिनेशराव आणि रम्याची दोन्ही मित्र मद्यपान करत होतें. त्यांची पार्टी रंगली होती . हे असे कसे मला सोडून बसलेत...,म्हणून रम्याला त्यांचा खूप राग आला, पण तो त्यांच्यापाशी आला की काय बोलायचं ते विसरून गेला, आणि त्याच्यात सामील झाला. रम्याही ग्लासला ग्लास लावून पार्टी करू लागला.
आता रम्याने सर्वाना जेवण वाढून दिलं . दिनेशराव आणि रम्याची मित्र जेवणावर तुटून पडली होती. ते अशी काही खात होते, की त्यांना कधी मिळाले नव्हते. "हातांच्या दोन्ही मुठीने खात होतें. दिनेशरावही त्याच्यात सामील होतें. ते त्यांचं अक्राळ-विक्राळ खाणं, विचित्र बोलन, वागणं पाहून रम्यालाही त्याची भीती वाटू लागली होती. त्यांचं जेवण खाताना पाहून त्याला उलटी येऊ लागली होती. त्यातच रम्याचा फोन वाजला. रम्या गपचूप तेथून उठून बाजूला बोलू लागला. रम्या...."मी विक्या बोलतोय, "अरे सॉरी यार आज मला जमणार नाही, पार्टीला येईला. अरे दिनेशरावांचा अपघात झालाय, त्यांना घेऊन मी आणि अज्या दवाखान्यात आलो आहोत . माझा फोन घरी असल्याने दुसऱ्या फोनवरून केला. त्यामुळे फोन करायला उशीर झाला. आता रम्याच्या लक्षात आले होते की," हे तिघे कोण आहेत...??
ते ऐकूनच रम्याचा फोन खाली पडला . त्याने तिघांकडे बघितले,तर तिघे त्याच्याकडे विशिप्त बघून हसत होते तिघेही त्याच्याकडे येत होते .तिघांचे उलटे पाय बघून रम्याची पॅन्ट ओली झाली. रम्या तेथून जीव मुठीत घेऊन तेथून त्याने पळ काढला . जी वाट दिसेल तिकडे पळत होता . मागे बघण्याची त्याच्याकडे हिम्मतच राहिलेली नव्हती . त्यांचे विष्पत हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता.
त्याचा श्वास अडकत होता. छातीतील हृदयाच्या ठोक्यांचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचत होता. गावाच्या हद्दीत येऊन तो ज़ोरदार कोसळला. गावाच्या वेशीवर बसणाऱ्या माणसांनी रम्याला ओळखले. त्याला लगेच त्याच्या घरी घेऊन गेले. घरी गेल्यावरही त्याच्या प्रकृतीत काही फरक नसल्याने त्याला पुन्हा दवाखान्यात ऍडमिट केले. तीन दिवसांनी त्याला जाग आली. तरी तो मधूनच किंचाळत होता, ओरडत होता, मला वाचवा..! मला वाचवा..!डॉक्टरांनी त्याला झोप येणारे इंजेकशन दिले . डॉक्टरांच्या बोलण्यात आलं होतं की त्याच्या डोक्यावर खूप भयानक परिस्थिचा परिणाम झाला आहे, आणि खरंच त्याच्या डोक्यावर अमानवीय भूतांबरोबर झालेल्या पार्टीचा खोलवर परिणाम झालेला होता.

