Pratibha Tarabadkar

Drama Horror

3  

Pratibha Tarabadkar

Drama Horror

भूत

भूत

7 mins
299


 दोन दिवसांपासून पाऊस धो धो कोसळत होता.त्याला थोडी म्हणून उसंत नव्हती.सर जरा कमी होतेय असं वाटून हुश्श करावं तोच पावसाचा जोर पुन्हा वाढावा.दिवसरात्र हत्तीच्या सोंडेतून पाणी पडावं तसा पाऊस कोसळत होता.

   'कंटाळा आला बुवा या पावसाचा',हात वर ताणत जांभई देत विक्रांत म्हणाले.

  'मुंबईचा पाऊस तो,असाच कोसळणार!'लॅपटॉपवरुन नजरही न हटवता रॉकी उत्तरला.कुठलातरी डब केलेला साऊथ इंडियन सिनेमा बघत बसला होता तो.ती अतरंगी मारधाड, अनाकलनीय गोष्टी रॉकीला कशा काय आकर्षित करु शकतात याचा विक्रांतला कायम अचंबा वाटे.त्यांनी खिडकीतून खाली डोकावून पाहिले.रस्त्यावर छत्र्यांचा महासागरच उसळला होता जणू! नुसत्या रंगीबेरंगी छत्र्या,काळ्या छत्र्या पुढे मागे जात होत्या.त्या खालची माणसे दिसतच नव्हती.

   'ट्रिंगsss', डोअर बेल अधीरपणे वाजली आणि विक्रांतला हुश्श झाले.'चला, आता वेळ बरा जाईल'.

   रॉकीने दार उघडले.तीन माणसे दारात उभी होती.नखशिखांत भिजलेली.त्यांच्या बंद छत्र्यांमधून टपटप पाणी ओघळत होते.रॉकीने तत्परतेने त्यांच्या हातातील छत्र्या घेऊन दाराशी असलेल्या बादलीत ठेवल्या.खोलीच्या पायपुसण्याला पाय पुसून तिघेही सोफ्यावर स्थानापन्न झाले.

विक्रांतने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

'आम्ही तिघे डोंगरगावहून आलोय.'

'ते हिलस्टेशन?'

'हो तेच.या दोघांची तिथे हॉटेल्स आहेत.मी आधी आमची ओळख करून देतो.मी वसंत माने.हे रमणिकलाल,हे गोविंद प्रसाद.'

  'रमणिकलाल म्हणजे गुजराती?'

  'हो'.

 रॉकीच्या हातातून चहाचा वाफाळता कप घेत रमणिकलाल हसून म्हणाले.'अहो, आमच्या परिसरात सगळीकडे मराठीतूनच व्यवहार चालतात त्यामुळे मीच काय, हे गोविंदजी सुद्धा शुद्ध मराठीत बोलतात.ते तर राजस्थानी आहेत.'

   'बरं,काय काम काढलंत?'विक्रांत मुद्द्यावर आले.

 'आमची हॉटेल्स आहेत हे रमणिकने तुम्हाला सांगितलंच आहे.'पुढे सरसावत गोविंदजी म्हणाले.'हा पावसाचा सिझन आम्हाला मंदीचा असतो कारण आमच्या गावात पडणारा मुसळधार पाऊस! भिजण्यासाठी म्हणून थोडेफार पर्यटक येतात पण एकूण संख्या कमीच.मग पावसाळ्यात आम्ही आमची साचलेली कामं करून घेतो.प्लंबिंग,फॅन्सची दुरुस्ती, दारं खिडक्यांची डागडुजी वगैरे.पण मध्यंतरी आमच्या कडे अशा विचित्र घटना घडल्या की आम्ही अगदी बेचैन झालोय.'

   'तुमची जाहिरात पेपरमध्ये पाहिली आणि आम्हाला आशा वाटली की तुम्ही आमची केस नक्की सोडवाल.'वसंतराव उद्गारले.

   'केस?'विक्रांतने प्रश्नार्थक नजरेने भुवया उंचावल्या.

    'हो.सांगतो तुम्हाला ',गोविंदजी पुढे सरसावले.'मध्यंतरी माझ्या हॉटेलमध्ये फर्निचर करण्यासाठी मुंबईहून कारागीर आले होते.दिवसभर काम करीत असत आणि रात्री झोपण्यासाठी त्यांना हॉटेलमधील एक रुम दिली होती.पर्यटक कमी असल्याने आम्हाला ते शक्य होते.दोन तीन दिवस झाले अन् एका रात्री अचानक 'भूत भूत' करीत ते रुमचे दार उघडून बाहेर पळाले.एक काळी आकृती रुममध्ये शिरताना त्यांनी पाहिली आणि ती आकृती अचानक अदृष्य ही झाली.आम्ही घाबरलोच.असं पूर्वी कधी घडलं नव्हतं.'गोविंदजींनी बोलणं संपवलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता.

  'आमच्या हॉटेलला चादरी,पडदे सप्लाय करणारा व्यापारी आला होता.त्याची तर भीतीने वाचाच गेली होती.एक काळी आकृती त्याच्या छातीवर बसून त्याचा गळा आवळत होती.'रमणिकलाल सांगतांनाच शहारले होते.

   'सर,आमचे सबकुछ पर्यटनावर अवलंबून आहे.जर आमच्या हॉटेलात भूत आहे असं सगळीकडे पसरलं तर आमचा धंदा बसेल.कोणी फिरकणार नाही'बोलता बोलता रमणिकभाईंचा आवाज चिरकला.'प्लीज आमच्या समस्येवर उपाय शोधून काढा.'

 विक्रांत तिघांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते.'तुमची काही व्यावसायिक दुष्मनी? काही वैयक्तिक हेवेदावे?'

  'छे,ते सर,'तिघेही घाईघाईने म्हणाले.'उलट सारे हॉटेल मालक एकमेकांशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत.सर, आमच्या गावाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की आम्ही एकमेकांवर अवलंबून असतो.आमचा बिझनेस परस्पर सहकार्याशिवाय चालूच शकणार नाही.'

   'मी हॉटेल मध्ये भाजीपाला तसेच कर्मचारी पुरवतो.गाव छोटे असल्याने सर्वच जण एकमेकांना ओळखतात.'वसंतराव म्हणाले.

  'हॉटेल कर्मचाऱ्यांचे एकमेकांशी काही वैयक्तिक वैर?की त्याचा सूड उगवण्यासाठी ही खेळी?....'

 'छे,ते सर,सारे कर्मचारी अतिशय साधे सरळ आहेत.'तिघांनीही विक्रांतचे बोलणे उडवून लावले.

   'सर, लवकरात लवकर येऊन तुम्ही आमची समस्या दूर करा.तुम्ही मागाल ती फी देण्यास आम्ही तयार आहोत.'तिघांनी कळकळीने विनंती केली.

विक्रांतने रॉकीला खूण केली तशी त्याने डायरीत बघून सांगितले की या शुक्रवारी ते फ्री आहेत.

विक्रांतची टॅक्सी डोंगर चढू लागली तसतसा वातावरणातील फरक जाणवू लागला.नाहीतरी मुंबईतील पावसाने कंटाळाच आला होता,या बदलाने विक्रांतला ताजेतवाने वाटू लागले.रॉकीच्या चेहऱ्यावरही टवटवी दिसू लागली.

टॅक्सी डोंगरगावच्या अर्ध्या अंतरापर्यंतच जात होती.पुढे मात्र घोडे अथवा माणसांनी ओढावयाच्या गाड्या होत्या.

ते उमदे,तगडे घोडे बघून रॉकीने तर आनंदाने उडीच मारली.दोघेजण घोड्यावर स्वार झाले.नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखल्यामुळे सर्वत्र शुद्ध हवा, घनदाट झाडी होती.सृष्टीसौंदर्याचे अवलोकन करत डोंगरगावची हद्द कधी पार केली ते दोघांनाही कळले नाही.

त्यांच्या स्वागतासाठी स्वतः रमणिकलाल,गोविंदजी आणि वसंतराव जातीने हजर झाले होते.

  

'हे माझे हॉटेल,हिल टॉप आणि ते शेजारचे गोविंदजींचे,निसर्ग.'

दाट झाडीत लपलेल्या दोन्ही हॉटेल्सकडे निर्देश करीत रमणिकलाल म्हणाले.

  'आपण आधी त्या खोल्या पाहू जिथे भूत दिसले.'

  दुसऱ्या मजल्यावरील त्या खोलीबाहेर कापलेले लिंबू,गुलाल,बिब्बे इ.पडले होते.

 'हे आमच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांचे उद्योग!'रमणिकभाई ओशाळून म्हणाले.त्यांनी खोलीचे दार उघडले.खोली इतर हॉटेलमध्ये असते तशीच होती.विक्रांतने खोलीचे बारकाईने निरीक्षण केले.

गोविंदजींच्या हॉटेल मधील खोली पण साधारण अशीच खोली होती.विक्रांतने त्या खोलीचीही तपासणी केली.दोघांना काही प्रश्न विचारले.या खोलीच्या बाहेर सुद्धा कापलेले लिंबू गुलाल बिब्बे वगैरे होतेच!

 'ज्यांनी हे भूत प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांच्याशी मला बोलायचे आहे.'विक्रांतच्या या बोलण्यावर तिघे एकमेकांकडे बघू लागले.

'बरं, प्रयत्न करुन पहातो ते बोलताहेत का 'वसंतरावांनी शांततेचा भंग केला.'ते इतके हादरले आहेत की सगळं काम अर्धवट टाकून पळून गेले आहेत ते परत यायला तयारच नाहीत.'बोलता बोलता वसंतरावांनी फोन लावला.अनेकप्रकारे विनंती केल्यावर एकजण कसाबसा तयार झाला.

  'साब,उस भूत के बाल बहोत लंबे थे, और दांत इतने बडे बडे थे बाप रे याद करते हैं तो नींद उड जाती है', त्या कामगाराने समारोप केला.

'बघितलंत,केव्हढा घाबरला होता बोलताना सुद्धा!तो व्यापारी तर आजारीच पडला.अजूनही झोपूनच आहे.'

  'हं' विक्रांत विचारात बुडाले होते.

  'मी आणि रॉकी याच खोलीत आज रात्री झोपू.'विक्रांतने जाहीर केलं आणि एकच खळबळ उडाली.

त्यांचे सामान घेऊन येणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरील घबराट स्पष्ट दिसून येत होती.

   'साहेब,या खोलीत राहू नका.'तो मुलगा विक्रांतच्या कानात कुजबुजला.'इथे भूत येते.तेआलं की कावळे खूप कलकलाट करतात.कावळ्यांना भूत,आत्मे दिसतात म्हणे'.

   'अच्छा?', विक्रांत गालातल्या गालात हसत म्हणाले.'मग मला त्याची भेट घेतलीच पाहिजे.'

  संध्याकाळी विक्रांत आणि रॉकी बाहेर पडले.विक्रांतची चौकस नजर आजूबाजूला फिरत होती.रॉकी मात्र हिलस्टेशन ची मजा लुटत होता.एका दुकानातून त्याने खारे शेंगदाणे घेतले आणि एक एक दाणा तोंडात टाकत मजेत फिरत होता.बघता बघता एक माकड अचानक त्याच्यासमोर आले आणि त्याच्या हातातील शेंगदाण्याच्या पुडीवर झडप घातली आणि सरसर करीत झाडावर चढून शेंगदाणे खाऊ लागले.हे सारे इतके क्षणार्धात घडले की रॉकी भानावर येऊन अरे अरे म्हणत दगड उचलू लागला.रॉकीची फजिती बघून आजूबाजूच्या दुकानदारांची चांगलीच करमणूक झाली.

रात्रीचे जेवण करुन रॉकी आणि विक्रांत आपल्या रुमवर आले.ते रुमवर येताना हॉटेलमधील काम करणारी मुलं भेदरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पहात होती.भूत आहे हे माहित असूनही ते कसे काय त्याच खोलीत रहाण्याचा अट्टाहास का करत आहेत हे कोडं त्यांना काही केल्या सुटेना.

    रात्री झोप लागू नये म्हणून दोघांनी माफकच जेवण केले होते.रॉकीने आल्या आल्या कानाला इयरफोन लावून डब केलेला साऊथ इंडियन सिनेमा बघण्यास सुरुवात केली.विक्रांतने युद्धांच्या कथांचे पुस्तक वाचावयास घेतले.

 पाऊस थांबला होता आणि हवेत उकाडा वाढला होता.

विक्रांतचे पुस्तकात लक्ष लागेना.फॅन बिघडलेला होता आणि ए.सी.त्या खोलीत नव्हता.वैतागून विक्रांतने पुस्तक बाजूला टाकले आणि दार उघडून ते बाल्कनीत आले.वाऱ्याच्या झुळुकीने त्यांना जरा बरे वाटले.ते तिथेच थोडा वेळ बसून राहिले.सर्वत्र निःशब्द शांतता पसरली होती.झाडांच्या काळ्या सावल्या वातावरणात भय उत्पन्न करीत होत्या.

  थोडा वेळ बाल्कनीत बसून विक्रांत परत रुममध्ये आले.

 रॉकी सिनेमात रमला होता.त्याला ओरडून त्यांनी सिनेमा बंद करायला लावला आणि लाईट ऑफ केला.

गावात सर्वत्र नीजानीज झाली होती.फक्त रातकिड्यांची किर्रर्र शांततेत व्यत्यय आणत होती.मुंबईच्या कोलाहलापासून सुटका मिळवण्यासाठी आपण आधी या हिलस्टेशन वर कधीच का बरं आलो नाही? मुंबई पासून इतक्या जवळ असूनही वातावरणात किती जमीन अस्मानाचा फरक आहे! विक्रांत विचारात गढले होते तेव्हढ्यात त्यांना खोलीत खसफस जाणवली आणि ते एकदम सावध झाले.अनेक वर्षे डिटेक्टीव्ह म्हणून वावरल्याने त्यांची इंद्रियं कायम तल्लख असायची.

त्यांनी डोळे उघडून पाहिले.लोकांनी वर्णन केल्याप्रमाणे खरंच एक काळी आकृती बाल्कनीतून हळूच आत आली आणि चालत चालत त्यांच्या पलंगाजवळ येऊन उभी राहिली.विक्रांतला ती स्पर्श करणार एव्हढ्यात रॉकीने त्या आकृतीला मागून विळखा घातला व दोरीने बांधून टाकले.विक्रांतने झटकन् उठून बेडजवळचा दिवा लावला आणि त्या भुताकडे पाहिले.

   'अहो रमणिकभाई,बघा, तुमच्या भुताला आम्ही पकडलंय, लवकर या'विक्रांतची हाक ऐकून रमणिकभाई आणि हॉटेल मधील कर्मचारी धावतच आले.

सर्वांनी खोलीत पाऊल टाकले आणि त्यांचे डोळेच विस्फारले.विक्रांत आणि रॉकीबरोबर सारेच जण हास्यकल्लोळात सामील झाले.रॉकीने खिडकीच्या गजांना बांधलेले माकड सुटण्यासाठी सारखे हिसके मारत होते.चावू नये म्हणून रॉकीने त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावली होती.

  हो.ते भूत म्हणजे एक माकड होते.जे रात्री उघड्या राहिलेल्या बाल्कनीच्या दारातून खोलीत येत होते.

   'आम्हाला कल्पनाही नव्हती की रात्री बेरात्री माकड खोलीत शिरुन असा गोंधळ घालत असेल म्हणून!'सकाळी चहाचा घोट घेत रमणिकभाई म्हणाले.

  'माकड हे जात्याच चौकस असते.त्याला खोड्या काढायला आवडते तसेच माणसांची नक्कल करायलाही आवडते.म्हणूनच हे खोडकर माकड माणसासारखे दोन पायांवर चालत येत असे.बाल्कनीलगत असलेल्या झाडाच्या फांदीवरून बाल्कनीत येत असे आणि खोलीचे उघडे दार बघून खोलीत शिरत असे.आणि चौकस स्वभावानुसार माणसांच्या जवळ जाऊन त्यांना चाचपडून पहात असे.'

'मग त्याचे अचानक अदृष्य होणे,कावळ्यांची काव काव?'

  'अहो, चाहूल लागली की ते आल्या वाटेने पसार होत असेल.त्याने झाडावर उडी मारली की फांद्या हलत असतील आणि त्यावर झोपलेल्या कावळ्यांची झोपमोड होऊन ते काव काव करत असतील.'

  'आता आठवले,तो माणूस म्हणाला होता की भुताच्या अंगावर लांब केस होते.माकडांच्या अंगावरही लांब केस असतातच.पण खरं सांगू का, आम्ही इतके वर्ष इथे‌ रहातोय पण कधी असं घडलं नव्हतं.'

 'कुठलीही गोष्ट कधीतरी पहिल्यांदाच घडते ना! मात्र आता पर्यटक आले की त्यांना बाल्कनीचे दार लावून घेण्याची सूचना द्या म्हणजे झालं!'विक्रांत हसत म्हणाले.'बरं आता भुताचे रहस्य तर उलगडले पण आमची इच्छा आहे की अजून दोन चार दिवस या तुमच्या रमणीय अशा डोंगरगावला राहून येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा.'विक्रांतच्या या बोलण्यावर गोविंदजी म्हणाले,'अहो दोन चार दिवसच काय,हवे तितके दिवस रहा, फक्त आमची एक अट आहे,'विक्रांतने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.'झोपतांना बाल्कनीचे दार लावत जा नाहीतर 'भूत' येईल.'रमणिकभाईंच्या बोलण्यावर हास्याची लाट उसळली.

'हो, आणि मी पण एक नियम पाळणार आहे,'रॉकी म्हणाला,'रस्त्यातून फिरताना खाद्यपदार्थ खाणार नाही . नाहीतर 'भूत 'ते पळवेल.'

सर्वांच्या हास्य कल्लोळाने हॉटेल दुमदुमून गेले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama