भुताळीन
भुताळीन


आमच्या गावात भुताळनींची भीती पसरली होती. भुताळीन म्हणजे कोण तर संशयावरुन एखाद्या स्त्रीला अशुभ मानणे व तिचा एखाद्याच्या घरात शिरकाव झाल्यास फार मोठी हानी होणे. त्यामुळे अशा स्त्रीपासून लोक लांबच राहत. गावातून जाताना लोक भीतीपोटी पाहात नव्हते. काही म्हणायचे, आजपर्यंत गावात तीन-चार पोरं मारले. त्यामुळे अशा स्त्रीला पाणीसुद्धा पाजत नव्हते. काहीजण तर संशयावरुन तिला शिव्या देत होते. काहीजण तर मारायचेच बाकी राहिले होते. असे जवळ जवळ एकाच्या तोंडी ते अनेकांच्या तोंडी झाले. काहीजण म्हणायचे तिने स्वतःची दोन पोरं खाल्ली. काहीजण म्हणायचे, ती रात्री दोन वाजता गंगेवर अंघोळीला जाते. उघड्या अंगाने साऱ्या गावाला चकरा मारायची. ती फक्त गावच्या कुत्र्यांना दिसत होती. ज्याला दिसली की तो जगत नसे. असा समज साऱ्या गावात पसरला होता. गावातली जनावरे मेली तरी लोक तिलाच दोष देत होते. गावात एखादे आजाराने मेले तरी तिच्यावरच संशय असायचा.
अमावस्या-पौर्णिमेला त्या मारुतीच्या मंदिरासमोर नागड्या नाचतात. मारुतीचा शेंदुर काढतात. मारुतीला भोग लावतात. अशा भुताळनीमुळे गावात अंगणात झोपणारी मंडळी घरात झोपू लागली. हळूच रात्री बारा वाजता उठून आम्ही पाहत असू, पण आम्हाला ती भुताळीन दिसलीच नाही. त्यांना विद्या शिकवणारे त्यांचे गुरु स्मशानात बोलावतात. मेलेल्या प्रेताचे मांस खायला लावतात. ती विद्या ते खाल्ल्यानेच प्राप्त होते असा समज होता. ती मेल्यावर ती विद्या तिच्या वंशात शिकविली जाते. त्या भुताळनी मरताना हालहाल होऊन मरतात. त्यांचा शेवट फार वाईट होतो अशी समजूत होती.
एखादे पीक कमी आले तर म्हणायचे भुताळनीचाच प्रकार आहे. लोक चिड़ून शिव्या द्यायचे. काही तर ती दिसली की घराचे दरवाजे बंद करून दरवाजांच्या फटीतून पाहत असत, मगच दरवाजा उघडत असत. ती भुताळीन वय झाल्यावर मरण पावली तरी लोक तिच्या मरणावर शिव्या देत होती. गावाची पीडा गेली म्हणायचे. तिला का आता यम सरळ मरण देणार आहे का?म्हणायचे. तिचे लई हाल होणार, असे म्हणून लोक शेवटपर्यंत संशयीत राहिले.