Nikita Gavli

Horror Thriller

4.6  

Nikita Gavli

Horror Thriller

भुताची पंगत (भाग -३)

भुताची पंगत (भाग -३)

4 mins
376


आजी- "बराच येळ कवाड वाजीवल्या नंतरबी कुणीच कवाड उघडलं न्हाय. आम्हाला वाटलं भुतानी मारली म्हतारीला. म्हतारं बी त्याच धक्यात असन, म्हणून म्हतारा बी कवाड उघडीना. पर थोड्या वेळानी कवाड उघडलं."


आदर्श- "कोणी उघडलं दार? विठा म्हतारी होती का तिचा नवरा?"


आजी- "म्हतारीनंच उघडलं कवाड…"


हे ऐकून तर आदर्शला पुन्हा दरदरून घाम फुटला. तो अवाकच झाला. पुढे काय झालं हे जाणून घेण्याची आदर्शची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती.


आजी- "कवाड म्हतारीनंच उघडलं. मग हनम्यानचं विचारलं, व्हय गं म्हतारे, गेलती का राती पंगतीला? काय झालं तिथं? म्हतारीनं एक एक करत राती घडलेला समदा भयानक थरार सांगितला. एक कंदील नि भुतानं दिल्यालं ताटासकट, म्हतारी घरात आवरून बसली व्हती. सारं गाव झोपल्यावर कुणी तर म्हतारीचं कवाड लै जोर जोरात वाजीवलं. म्हतारं तर लै घाबरलं. मग म्हतारीनंच कवाड उघडलं, तवा… दारात दोन मशाली हवंत तरंगत व्हत्या. म्हतारीनं अंदाज लावला, भुत तिला पंगतीला न्यायाला आली आसणार. म्हतारीनं एका हातात कंदील नि दुसऱ्या हातात भुतानं दिल्यालं ताट अन् तांब्या घेतला, चपला घातल्या नि मशाली जात्याल त्या दिशानं मशालीच्या माघ दमादमान पावलं टाकित निघाली. 


पुढं मशाली समद्या गावातनं गल्ली बोळातनं येडा मारत जाय लागल्या. म्हतारी जस जशी पुढं जाय लागली, तस तसं माघं मशाली वाढत गेल्या. जणू काय जत्रा भरल्यागत, भुताचा त्यो एक उत्सवच व्हता. समदा गाव पालता घातल्यावरं, समद्या मशाली गावच्या वेशीबाहिरल्या वरल्या माळावर जाऊन थांबल्या, तसं म्हतारी बी थांबली.

तिथं थोड्या थोड्या अंतरावर छोटं छोटं खड्ड केल्यालं व्हतं. एक एक करत साऱ्या भुतानं त्या खड्ड्यात मशाली पुरल्या. समद्या मशाली पुरून झाल्यावर म्हतारीबी बसली. जसं म्हतारी खाली बसली, तसं म्हणं, समदी भुतं लै मोठमोठ्यानं हसाय लागली. जणू काय भुतासनी जनमाचा आनंद झाला व्हता. थोड्या वेळानं चार मशाली म्हतारीच्या दिशेनं याय लागली. मशाली संगट पत्रावळ्याबी हवंत तरंगत व्हत्या. मग त्यांनी म्हतारीच्या पुढ्यात एक पत्रावळी ठुली. म्हतारीनंतर समद्या पुरलेल्या मशालीजवळ समद्या भुतासाठी एक एक पत्रावळी वाढली." 

 

आदर्श- "आजी पत्रावळी कशाला? म्हतारीला तर ताट दिलं होतं ना? जे तिला घेऊन पंगतीला जायचं होतं. म्हणजे तसाच नियम होता ना?"

 

आजी- "व्हय. पर ताट ही फकस्त बाकी भुतांना दावायला पुराव्यासाठी एक निशानी व्हती. पुढं म्हतारीला लै काय काय वाढलं व्हतं म्हणं ताटात. चार पाच तास म्हंण्जी पहाट पतोर, दिस उजडोसतवर ती पंगत चाल्ली व्हती. पहाट पतोर ती भुत बी खात व्हती नं तवर म्हतारी बी खातच व्हती."

 

आदर्श- "बापरे! चार पाच तास? भुतांचं ठिक आहे पण येवढा वेळ कसं काय जेवत होती ती?" 

 

आजी- "आरं बाळा म्हतारी नुस्ती धिटच न्हाय तर लै डोकेबाजबी व्हती. तिनं काय केलं, तिला पत्रावळी वाढुन झाल्यावर बाकी भुतासनी पत्रावळी वाढोसतवर, तिनं तिच्या पत्रावळीला मदन फाडली. अन् तिला जे ताट दिलतंना भुतानी, त्या ताटालाबी घरणच एक मोठ भोक पाडून नेलं व्हतं. त्यानं काय झालं तरं, जवा तिला काय ताटात वाढलं जायचं तवा त्यातलं जी काय पातळ असण ती त्या फाटक्या पत्रावळीतनं फुटक्या ताटात जात व्हतं. ज्यामुळं तिच्या ताटातलं जेवान न खाताच संपत व्हतं."

 

आदर्श- "पण आजी चार पाच तासात तर तिला खूप वेळा वाढलं असेल. मग त्या ताटातून जमिनीवर सगळं पसरत असेलच ना? मग त्या भुतांना शंका नाही आली?"

 

आजी- "आरं म्हतारीनं त्याचा बी बंदोबस्त केला व्हता."

 

आदर्श- "तो कसा काय?"

 

आजी- "दुसऱ्या भुतासनी पत्रावळी नि जेवान वाढसतोवर म्हतारीनं तिच्या ताटाखाली एक खड्डा केला व्हता. ज्यामुळं पत्रावळीतनं ताटात अन् ताटातनं जास्तीचं जेवान त्या खड्यात जात व्हतं."

 

आदर्श- "पण जेवढ्या कमी वेळात तिने येवढं अन्न बसेल इतका खड्डा कसा केला?"

 

आजी- "म्हतारीकडं एक बारकं खुरप्यागत हत्यार व्हतं. म्हतारा-म्हतारी दोघंच राहत व्हती. वय झाल्यालं व्हतं दोघांचबी. अनं त्यात म्हतारं आंधळं व्हतं. त्याकाळात लोकवस्ती कमी असल्यानं रानडुकरांचा कळप राती शेतात घुसायचा, नि त्यात शेतकऱ्याचं लै नुकसान व्हायचं. मग कोण कोण ज्याला शक्य हाय ती शेतातच झोपाय जायची. पर म्हतारीचं शेत गावापासनं जवळचं व्हतं. रानडुकरं आली की गावात लोकांची पळापळ व्हयची शेताकडं जायला. त्यानं म्हतारीला कळायचं की रानडुकरं आल्याती. तवा ती शेतात जाऊन ती हत्यारं फेकून रानडुकरं मारायची. त्यानं तिला सवयच झालती ते हत्यारं जवळ ठुवायची. त्या दिशीबी ती हत्यार म्हतारी संगट घेऊन गेलती. त्या हत्यारानं तिनं त्यो खड्डा केलता."

 

आदर्श- "बापरे! आजी विठा म्हतारी किती विचार करायची?"

 

आजी- "व्हय."

 

आदर्श- "मग पुढे काय झालं?"

 

आजी- "पुढं काय नाय. तांबडं फुटसतोवर ही समदं असंच चालू राहिलं. भुत म्हतारीला वाढायची नि समदं त्या खड्ड्यात जायाचं. जवा तांबडं फुटाय लागलं तवा अचानक समद्या मशाली विझल्या तिथं फकस्त म्हतारी व्हती. म्हतारीला वाटलं पंगत संपली असन, म्हणून ती बी उठली. तवा तिला भुतानी काय बी केलं न्हाय. अन् म्हतारी घरी निघून आली. पुढं बी म्हतारी परतेक पंगतीला जायची नि जिती वापस यायची. पर नंतर दोन वरसांनी म्हतारी त्या पंगतीतच मेली. म्हण्जी ‍भुतांनीच मारली तिला."

 

आदर्श अवाक झाला. त्याला चकरावल्यासारखं झालं. म्हतारीचं कोडं सुटलं सुटलं म्हणता म्हणता अजूनच कठिण होत चाललं होतं. त्याला काहीच कळेना. आपण एका मेलेल्या व्यक्तीला भेटून आलोय जी एकेकाळी भुताच्या पंगतीत जेवून आली आहे आणि तिचा मृत्यूही त्या भुताच्या पंगतीतच झाला आहे, या विचारानं आदर्शचं डोक भांडावून सोडलं होतं. अजून बरेच असे प्रश्न होते ज्याची उत्तरं अजून आदर्शला मिळाली नव्हती. विठा म्हतारी जर मेली तर ती आदर्शला का दिसली? ती इतर कोणाला दिसण्याऐवजी नेमकी आदर्शलाच कशी का दिसली? तिला आदर्शला काही सांगायचं होतं का?

 

(क्रमश:)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror