विरपत्नी – एक लखलखता दागिना
विरपत्नी – एक लखलखता दागिना


“हॅलो”
“हॅलो. कोण बोलतय?”
“मि भारत पाकिस्तान सिमेवरून…………………………”
बसं येवढच तिच्या तोंडुन बाहेर पडलं. पुढचं काही सांगायच्या आत तिची शुद्धच हरपली. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. सिमेवरून फोन आला आणि हि अशी कोसळली. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. तिकडे सिमेवर लढणारा माझा जीव आणि बेशुद्ध पडलेल्या राणीचा……………… कदाचीत दोघींचाही जीव धोक्यात असल्या सारख वाटत होतं. सतिशच्या बाबांनी लगेचचं डॉक्टरांना फोन करून बोलावलं. डॉक्टरांनी राणीला तपासल. काळजीच काही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितल. साधारण अरध्या तासाने राणी शुद्धीवर आली, पण ती काहीच बोलत नव्हती. काही हालचाल नाही, आम्ही काय विचारतोय त्याचीही उत्तरं ती देत नव्हती. सतिशच्या बाबांची आणि माझी काळजी वाढत चालली होती.
तेवढ्यात पुन्हा फोनची घंटी वाजली. तेव्हा मि फोन उचलला.
“हॅलो”
“हॅलो, मि कर्नल सुखविंद सिंग. शहिद लान्स नायक सतिश कदम ह्यांच पार्थीव आज संध्याकाळी दिल्लीला आणण्यात येइल. तेथे त्यांना काही मान्यवरांकडुन श्रद्धांजली वाहिल्यानंतर, विशेष विमानाने त्यांच पार्थीव सकाळी सातच्या सुमारास तुमच्या घरी आणण्यात येईल………………… ”
माझ्या तोंडुन शब्दच फुटत नव्हता. हातापायातले प्राण जनु माझ्या सतिश सारखे मला सोडुन गेलेत असचं वाटत होतं. कर्नल साहेब जे म्हणाले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि कसा बसणार ? आठवड्याभरापुर्वी जो माझा मुलगा बोहल्यावर चढला होता, उद्या माझा तोच मुलगा सरणावर जाणार ह्याची कल्पनाही भयावह होती. आणि हे तर वास्तव होत, जे राणी एैकुन बेशुद्ध झाली. एक असं सत्य जे कितीही असत्य वाटत असलं तरी सर्वांना स्विकारण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
नऊ महिने आपण ज्याला आपल्या पोटात वाढवलं, जो आपल्या श्वासासोबत श्वास घेतं चंद्रा प्रमाणे कलेकलेने मोठा होत या सुंदर जगात येण्यासाठी आतुर झाला होता, ज्याला शिकवुन लहानाचं मोठ केलं, स्वत:च्या पायावर उभ केलं, तोच उद्या चार खांद्यावर माझ्या समोर येणार, हे दु:ख कितीही मोठ असलं, तरी कदाचीत, जीने आठवड्याभरापुर्वी माझ्या मुलावर विश्वास ठेवत त्याच्यासोबत साता जन्माची गाठ बांधली, एका परक्यासाठी आपल्या आईबापाला परकी झाली त्या राणीच्या दु:खा पेक्षा नक्कीच मोठ नव्हतं.
“अगं कला कितीवेळ झाल मि विचारतोय काय झालं? मघाशी फोन आला तेव्हा हि बेशुद्ध पडली आणि अता फोन आला त्यानंतर तु काहीच बोलत नाहीयेस. काय झालयं कोणी सांगणार आहे का मला?”
सतिशच्या बाबांचा आवाज कानावर पडला तसं मि भाणावर आले. बसलेल्या धक्यातुन सावरण्याचा प्रयत्प करत होते. त्यांना काहीही सांगण्याआधी मला समोर दिसली ती राणी. मि राणीच्या जवळ जाऊन बसले. तिला झालेल दु:ख तिच्या चेहर्याचर लख्ख दिसत होतं. मि तिच्या डोक्यावरुन हात फिरवला तेव्हा ठरवुन ही मि माझ्या डोळ्यातील पाण्याला अडवु शकले नाही. जसा मि माझा हात राणीच्या डोक्यावरून फिरवला तेव्हा तिला कदाचीत ति मायेची उब जाणवली असावी. तिने माझ्याकडे पाहीलं. तेव्हा मात्र ति स्वत:ला रोखु शकली नाही. तशी ती माझ्या कुशीत शिरली आणि जीवाचा आकांताने रडु लागली. आम्हा दोघिंचाही आक्रोश पाहुण सतिशचे बाबा फारच घाबरले.
“काय झालयं कला. अगं सांग ना. तुम्ही का रडतायं? काळजीने अता जीव जाईल माझा”
पाणावल्या नैनांनी, धिट होत राणीनेच त्यांचा मुलगा देशाचे रक्षण करताना शहीद झाला, दहशतवादी हल्यात लढताना त्याला विरमरन आले हे तिच्या जड झालेल्या आवाजात सांगितलं.
त्यांनाही फार मोठा धक्का बसला. एकुलता एक तरणाबांड मुलगा देशासाठी आपल्याला कायमचा सोडुन गेला हे आभाळा येवढ दु:ख त्यांनाही झालंच होतं. आम्हा तिघांच्याही डोळ्यातील पाण्यांला बांधचं उरला नव्हता. आमचा आक्रोश हा शेजार्यांना एैकु गेला.
‘‘अचानक कदमांच्या घरुन येवढा हा आवाज कसला ? हे सगळे येवढ्या मोठ्या मोठ्याने का रडतं आहेत ?’’
असं म्हणतं हळु हळु सारेच शेजारी आमच्या घरी जमा झाले. शेजार्यांच्या मागोमाग सगळे नातेवाईक जमा होवू लागले. आठवड्याभरापुर्वी अशीच चपलांची गर्दि होती दारा बाहेर, आणि आजही पुन्हा तसाच चपलांचा लागलेला हा मेळा पाहुन माझ्या काळजात चर्र झाल. आठवड्याभरापुर्वी एकाचे स्वागत करण्यासाठी आणि आज आठवड्याभरानंतर एकाला अखेरचा, कायमचा निरोप देण्यासाठी, येवढाच काय तो फरक होता.
ति एक रात्र जणु संपुर्ण एका जन्माप्रमाणे भासत होती. रात्र सरता सरत नव्हती. सगळ्यांच्याच रडण्याचा आवाज येवढा जास्त होता कि संपुर्ण परीसरात भयान शांतता पसरली होती. कर्कश ओरडणारी टिटवी, कानात घोंघावणारा रातकिड्यांचा आवाज जणु सतिशच्याच जाण्याचं दु:ख करत आहेत असचं वाटत होतं. बराच वेळ रडल्यानंतर राणी शांत झाली, पण ती फार मोठ्या धक्यात अखंड बुडाली आहे हे जाणवत होतं. ती एका कोपर्यात जाऊन बसली. भिंतीला पाठ टेवकत, डोक भिंतीला टेकवत ती छताकडे एकटक बघत राहीली अगदी सकाळी सतिशला घरी आणे पर्यंत. नेहमि हसत मुख, उत्साही असणारी राणी आज हाथावर हाथ ठेऊन बसली असताना काहीशी हतबल भासत होती अगदि पेचात पकडलेल्या निशस्त्र योद्या सारखी. नियतीनेही हा क्रुर खेळ खेळत तिला पेचातच पकडल होतं.
कशी बशी रात्र सरली आणि नको ते दृश्य डोळ्यासमोर आलं.
सतिशचं पार्थीव घरी आणण्यात आलं. सतिश कदम अमर रहे…….., चंद्र तारे असे जोवर, सतिशचे नाव गाजेल तोवर……., भारत माता कि जय…………, वंदे मातरम……, अश्या अनेक घोषणांनी सारा आसमंत दुमदुमुन गेला. सार्याचेंच डोळे पाणावले होते. सतीशने आपल्यासाठी, आपल्या देशासाठी स्वत:चे प्राण वेचले. दुष्मणावुरद्ध तो प्राणपणाने, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढला, याची जाणिव प्रत्येकालाच होती. प्रत्येकजण जणु कोणी तरी आपल्याच घरातील एक सदस्य गेल्या प्रमाणे शोक करत होता.
राणीच्यातर डोळ्यातील पाणीच आटले होते. आठवड्याभरापुर्वी तिच्या अंगाला लागलेली हळद अजुन उतरली नव्हती. पण सतीशच्या अंगाची हळद दहशतवाद्याच्या हल्यात जखमि झाल्याने, घळाघळा वाहिलेल्या रक्तानेच धुतली गेली होती. राणीच्या मेहेंदीचा रंग आजही तसाच होता, पण दहशतवाद्यांशी लढताना सतिशच्या मेहेंदिचा रंग मात्र उडाला होता. शेवटचे संस्कार सुरु झाले. अंतिमसंस्कारांच्या विधी पाहुण, काहीच क्षणात अता समोर दिसणारा हा आपला भारतमातेचा विरपुत्र, हा निधड्या छातीचा वाघ अनंतात विलीण होणार याची जाणिव सार्यांच्याच मनात तिव्र होत चालली होती. सार्यांच्या आक्रोशाने आज कदाचीत आक्रोशालाही स्वत:चा आक्रोश अनावर झाला असणार. तिरंग्यात लपेटलेलं सतीशचं पार्थिव पाहुण सार्यांनाच शोक अनावर झाला पण राणी……………..
ती मात्र सुन्न होती. निशब्द. एका पिंजर्यात अडकलेल्या पक्षासारखी. नवरा मेल्या नंतर एका सुहासिणीचं लेण असलेल्या तिच्या बांगड्या फोडल्या जातात, पण बिचार्या राणिचं येवढ भयाण र्दुदैव होत की तिचा तर लगन चुडाच फोडण्यात आला. तेव्हाही ती रडली नाही. तिच्या माथ्यावरचं कुंकु पुसण्यात आलं. तेव्हा ही तिच्या डोळ्यातुन पाण्याचा एक थेंबही बाहेर पडला नाही. साता जन्मासाठी ज्याच्याशी गाठ बांधली गेली होती त्याच्या नावचं ते मंगळसुत्र जे सरळ ही केल नव्हतं ते ही तोडण्यात आलं, तरीही राणीचे डोळे कोरडेच होते.
“अरे कोणी तरी हिला रडवा. हिला मोकळ होऊ द्या. असं न रडता शांत राहणं बरं नाही”,
असं बर्याच जणांच म्हणणं आलं. कित्तेक प्रयत्न केले पण राणी काही रडली नाही. तिरंग्यात लपेटलेल्या सतीश कडे ती एकटक पाहत होती, अगदी प्रेमाणे. जणु काही त्या रात्रभर रडुन सुजलेल्या डोळ्यांचा आणि त्या कायमचं बंद झालेल्या डोळ्यांचा अबोल संवाद सुरू होता. कदाचीत नवरा बायकोचं शेवटचं हितगुज सुरू होतं.
सतिशच्या पार्थीवावरील तिरंगा शिस्तीत घडी करुन, अशोकचक्र समोर दिसणारा तो मानाचा तिरंगा अगदी सन्मानाने राणीच्या हातात सुपुर्त करण्यात आला. सतीशला सैन्य दलाकडुन तिन फायर करत सलामि देण्यात आली. संपुर्ण शासकिय इतमामात आणि भावपुर्ण वातावरणात सर्वांनीच पाणवल्या नैनांनी सतिशला अखेरचा निरोप दिला.
पण लक्षात राहणारा निरोप होता तो राणीचा. रात्रीपासुन सुन्न आणि शांत असणारी राणी सतिशला मुखाग्नी देताना अचानक बोलु लागली……………
“साता जन्मासाठी माझ्याशी बांधला गेला होतास. पण सात दिवसातच मला इतका कंटाळलास कि मला कायमचाच सोडुन गेलास. पण तु काळजी करु नकोस, मि तुझ्यावर अजिबात नाराज नाही. थोड वाईट वाटतयं इतकचं. पण मला खुप अभिमान आहे तुझा. माझं तुझ्यासारख्या शुर आणि निडर वाघाशी लग्न झालं याचा मला सार्थ अभिमान आहे. आज माझ्या अंगावरचे सगळे दागिने काढुन टाकण्यात आलेत……… पण तु जाता जाता मला एक असा दागिणा देऊन गेला आहेस जो ह्या जगातील कोणिच माझ्याकडुन परत घेऊ शकत नाही……. आणि त्या दागिण्याचं नाव आहे ‘विरपत्नी’. मला आठवतय तु म्हणाला होतास, “राणी, माझी एकच इच्छा आहे आणि कदाचीत शेवटची, मला ना अरध्यावर नाही मरायचं. जोवर माझी ड्युटी आहे तो वर मला आपल्या देशासाठी लढायचे आहे. ज्या दिवशी मि रिटायर होणार असेल त्या दिवशी मि मेलो तरी चालेल, कारण तेव्हा मि माझ्या देशासाठी, देशाच्या रक्षणासाठी घेतलेली शपथ पुर्ण केलेली असेल.” मला माहिती आहे तुझी ही इच्छा अपुर्ण राहीली. पण तुझी ही इच्छा अता मि पुर्ण करणार आहे. मि मेहनत घेऊन जिद्दीने सैन्यात भरती होऊन लवकरात लवकर देश सेवेत रुजु होणार आहे. हे आज मि वचन देते तुला. आणि मि हे शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार आहे. तु स्वत:ची काळजी घे…………………….”
त्या एकपात्री संवादाने सर्वांना हेलावुन सोडले. फारफार तर महिणाभराची ओळख होती दोघांची. एका महिण्यात जनु राणी सतिशशी विधीवतचं नाही तर आत्म्याने जोडली गेली होती. जेमतेम २२-२३ वर्षाच्या, विधवा राणी समोर संपुर्ण आयुष्य पडलयं. अता जोडीदाराशिवाय हि पुडचं आयुष्य कसं काय काढणार याची मला काळजी होती. काही दिवसांनी राणीच्या आई-बाबांशी चर्चा करुन आणि राणीचं मत विचारात घेऊन तिच दुसरं लग्न करून द्यावं, त्या बिचारीचा काय दोष. तिने का एकल आयुष्य जगावं? असाही विचार एक क्षण माझ्या मनात येऊन गेला. पण तिच्या सैन्यात भरती होऊन सतिशचं स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द पाहुण मला खर्या अर्थाने राणीचा अभिमान वाटला. विरपत्नीचा दागिणा तिच्यावर किती शोभुन दिसतोय हे तिनेच सिद्ध करुन दाखवलं. माझा मुलगा गेला, पण राणीच्या रुपात एक कणखर, जिद्दी आणि धाडसी लेक मला मिळाली यातच मि समाधान व्यक्त केलं……………. आणि सतिशला मि शेवटचं डोळे भरून पाहिलं………..