निर्णय
निर्णय


#SiddhiBaat
आई - " आज काहीही झालं तरी सोहमला मेडिकल प्रवेशा साठी तयार करायचंच."
मामा -"ताई, तू काळजी करू नकोस. मी बघतोच कसा तयार होत नाही ते."
बाबा - "नाही तर काय. काय तर म्हणे हॉटेल मॅनेजमेंट करायचेय त्याला. घराण्याची इज्जत मातीत मिळवणार बहुतेक हा मुलगा. लोकांना काय सांगायचं, एकुलता एक मुलगा आणि काय करतो... तर स्वयंपाकी आहे. चारचौघात मान खाली घालायला लावणार हा मुलगा."
आत्या - "असं कसं. त्याला येवढं लाडाकोडात काय स्वयंपाक करायला वढवलाय? ते काही नाही. सरळ भाषेत ऐकल तर ठीक, नाही तर दादा, दोन रट्टे दे. बरोबर ऐकेल बघ."
सोहम नुकताच विज्ञान शाखेतून बारावी पास झालेला, स्वयंपाकाची भयंकर आवड असलेला, स्वयंपाकघरात जास्तीतजास्त वेळ रमणारा असा मेहनती, सतत हसत मुख असणारा, समंजस मुलगा. नवनवीन पदार्थ करून घरच्यांना अगदी प्रेमाने खाऊ घालण्यात त्याला फार आनंद मिळायचा. सोहम लहानपणापासुन आईला स्वयंपाक करताना बघत आलेला. त्याला स्वयंपाक हे कंटाळवाण काम न वाटता, त्याला ती एक कला वाटायची.. आणि आता हीच कला जोपासत पुढे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करून, त्यातच स्वतःच करिअर घडवायचं त्याने ठरवलं. त्याला स्वतःच हॉटेल काढायचं होत.
पण त्याच्या या निर्णयाला त्याच्या आई – वडीलांपासून अगदी मामा, आत्या सगळ्या नातेवइकांचा विरोध होता. पुरुषाच्या जातीला हे काम शोभत नाही. त्यामुळे सोहमने हे असलं काम करू नये असं यांचं ठाम मत होतं. सोहमने हॉटेल मॅनेजमेंट करण्याचं खुळ डोक्यातून काढून, डॉक्टर व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. याच गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आणि हे प्रकरण निकालात काढण्यासाठी आजची ही सभा भरली होती.
बाबा – "सोहम, बाहेर ये."
बाबांनी सोहमला आवाज दिला. सोहम हिरमुसलेल्या चेहऱ्याने त्याच्या खोलीबाहेर आला. सर्यांच हे संभाषण तो त्याच्या खोलीतून ऐकत होता. एकूणच त्याला या गोष्टीचं फार वाईट वाटल होत.
' माझं म्हणणं कोणीच का ऐकून घेत नाही? या विचाराने तो दुखावला गेला होता. साऱ्यांचा हा विरोधाचा सुर पाहून, त्याचं मन स्वतःच्या निर्णयावरच शंका घेऊ लागलं होत.
बाबा – "सोहम, काय ठरलं मग तुझ?"
सोहम – "कशाच काय ठरलं बाबा?"
मामा – "अरे कशाच म्हणुन काय विचारतोस. करिअर कशात करायचं त्याबद्दल विचारत आहेत ते."
सोहम – "ते तर मी तुम्हाला आधीच सांगितल आहे. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. मला शेफ व्हायचं आहे. स्वतःच हॉटेल सुरू करायचं आहे. आणि मला यातच करिअर करायचं आहे."
आपल्या डगमगु पाहणाऱ्या आत्मविश्वासाला सावरत, सोहामने पुन्हा एकदा अगदी स्पष्टपणे आपला निर्णय सगळ्यांना सांगुन टाकला. आणि सोहमने या वेळी ठरवलंच होतं. 'जस, आज हे सगळे मी कोणत्या क्षेत्रात करिअर करावं याचा सोक्षमोक्ष लावायला आले आहेत, तस मिही आज ह्यांना माझा निर्णय योग्य आहे हे पटवुन देणारच.'
सोहमच हे वाक्य ऐकताच सोहमच्या आईने नेहमी प्रमाणे डोळ्यातून गंगा आणि जमुना ह्यांना वाट मोकळी करून दिली.
आत्या – "वहिनी तुम्ही रडू नका बरं. मी बघतेच हा कसा ऐकत नाही ते. हे बघ सोहम, तुला मी अगदी सरळ, स्पष्ट शब्दात सांगतेय. तुझा हा हॉटेल मॅनेजमेंट करायचा निर्णय आम्हाला बिलकुल पसंत नाही. एकुलता एक मुलगा म्हणुन तुला किती लाडात वाढवला माझ्या दादाने. चांगल्या मोठ्या शाळेत तुझ आत्ता पर्यंतच शिक्षण करून दिलं. त्यांची इच्छा आहे की तु डॉक्टर व्हावंस."
मामा – "हो. उदयाला तुझ्या लग्नाच्या वेळेस मुली शोधताना काय सांगणार आम्ही त्यांना? आमचा मुलगा स्वयंपाकी आहे म्हणुन."
बाबा – "सोहम बाळा तु तुझ्या निर्णयाचा पुन्हा विचार कर. अरे डॉक्टर झालास तर समाजात मोठं नाव कमावशिल. समाजात आमची किती इज्जत वाढेल. अभिमानानं सांगू आम्ही सर्वांना, आमचा मुलगा डॉक्टर आहे म्हणुन."
आई – "बाळा अरे तुझ्या भल्यासाठीच सांगतोय आम्ही. ऐक ना बाळा मोठ्यांच."
सगळ्यांचं आपआपल मत मांडून झालं. प्रत्येकाच्या बोलण्यातून आपल्या बद्दल सगळ्यांना किती काळजी आहे? आपल्या भविष्याची किती चिंता आहे हे सोहमच्या लक्षात आले, ' आपण डॉक्टर का व्हावं याची कित्तेक कारणे सोहमला मिळाली, पण शेफ का होऊ नये', याचं एकही समाधानकारक कारण मिळालं न्हवत.
सोहमने सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं. आता सगळ्यांना ऐकायचा होता तो सोहमचा निर्णय.
सगळ्यांना वाटल येवढं बोलल्या नंतर सोहम ऐकेल. कमीत कमी हॉटेल मॅनेजमेंट करण्याचं खुळ तरी काढून टाकेन डोक्यातून. पण कुठे तरी सोहमला ही एक गोष्ट कळून चुकली होती, 'आज जर मी स्वतःच्या स्वप्नाला मुरड घातली तर आयुष्यात पुन्हा कधीही स्वप्न पाहू शकणार नाही. डॉक्टर तर बनेल पण आयुष्यभर, नाइलाजाने घेतलेल्या या निर्णयाच्या ओझ्याखाली मी कायमचा दबून जाईल.
सोहम – "झालं तुमचं सगळ्यांचं बोलुन. आता माझ ऐका. तुम्ही सगळ्यांनी मला शंभर कारणे दिली की मी डॉक्टर का व्हावं. पण एकानेही मला, मी एक शेफ का होऊ नये याचं एकही, मला पटेल अस कारण दिलं नाही. बाबा तुम्ही म्हणाला जर मी शेफ झालो तर लोक काय म्हणतील? मग बाबा मि लहान असताना तुम्ही लोकांना येवढ्या कौतुकाने, मला किती छान स्वयंपाक बनवता येतो हे का सांगायचे? आत्या तुला तुझ्या आवडत्या हॉटेल मधलच जेवण का आवडत? दुसऱ्या कोणत्या हॉटेल मध्ये जर आपण गेलो तर तु काहीही न खाता परत येतेस. असं का? कारण तुला त्या हॉटेल मधल्या जेवणाची चव आवडते. हो ना?"
सोहमला अपेक्षित असल्याप्रमाणे आत्याने होकारार्थीच उत्तर दिलं आणि आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय याची सोहमलाला खात्री पटली.
सोहम – "तुला माहित आहे ती उत्तम चव एका पुरुषाच्याच हाताची आहे. मी स्वतः त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्या कडून काही पदार्थ शिकून घेतले. रात्री जेवताना तु मी केलेल्या पनिरच्या भाजीचं कौतुक करत होतीस ना, ती ही त्याच शेफनेच शिकवली आहे.
मला माहीत आहे जशी माझी काही स्वप्नं आहेत, तसेच तुम्हीही माझ्यासाठी बरीच स्वप्नं पहिली आहेत. मी डॉक्टर होणं हे ही त्यातलाच एक. देवासमान दर्जा आहे डॉक्टरांना. या जगातलं सगळ्यात महान काम आहे हे. मला या कामाचा आदरही आहे. मलाही डॉक्टरांच्या कामाचं फार कौतुक वाटतं. तुम्हाला मी डॉक्टर झाल्यावर किती आनंद होणार आहे ह्याचीही मला कल्पना आहे. आणि मलाही मी जर डॉक्टर झालो तर आनंदच होईल. पण मला एक गोष्ट मिळणार नाही …… आणि ती म्हणजे समाधान. तुमच्या इच्चेखातर मी डॉक्टर होईनही, पण मला स्वयंपाकघरात काम करून जो आनंद मिळतो, तो आनंद मला हॉस्पिटल मध्ये काम करून नाही मिळणार. मी स्वतःच्या हातांनी मायेने, प्रेमाने बनवलेला एखादा पदार्थ खाऊन तुमच्या चेहऱ्यावर जे तृप्त झालेले, आनंदाचे भाव उमटतात ना, त्यातून मला खरं समाधान मिळतं. का माहितीये? कारण तुम्हाला तो पदार्थ खाऊ घालण्याआधी मी त्यात माझा आत्मा ओततो. आणि माझी मेहनत काय आहे, हे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगुन जातो.
तुम्ही सगळे नेहमी म्हणताना की माझ्या आनंदातच तुमचा आनंद आहे. मग जर असं असेल तर शेफ न झाल्यामुळे मला जे दुःख होईल त्यातून तुम्हाला तरी कसा आनंद मिळेल?
मला जे सांगायचं होत, जे बोलायचं होत ते बोलुन झालंय. माझं म्हणणं तुम्हाला थोडं का होईना पटल असेल अशी आशा आहे मला. तुम्ही विचार करा आणि मला तुमचा निर्णय सांगा. माझा निर्णय मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि तरिही मी डॉक्टर व्हावं हीच तुम्ही इच्छा असेल तर मी डॉक्टर व्हायला तयार आहे.
कित्तेक दिवसांपासून मनात साठलेलं सगळ मनमोकळेपणाने बोलुन सोहम मोकळा झाला. तो तडक त्याच्या खोलीत गेला आणि खोलीचं दार आतून बंद करून घेतलं. सोहमच्या बोलण्याने सगळ्यांना फेरविचार करायला भाग पाडलं.
त्याच्या स्वप्नाचा, आनंदाचा विचार न करता, आपण आपलं मत त्याच्यावर लादतोय हे सगळ्यांच्याच लक्षात आले. सोहमचा एक एक शब्द सगळ्यांना निरुत्तर करून गेला. अखेर सगळ्यांनी सोहमच्या शेफ होण्याच्या स्वप्नाचे पंख होण्याच्या निर्णय घेतला आणि सोहमला मनापासून आशीर्वाद देत, सोहमच्या निर्णयाचे स्वागत केले.