Nikita Gavli

Drama Inspirational Others

4.9  

Nikita Gavli

Drama Inspirational Others

राखी - एक अतुट बंध

राखी - एक अतुट बंध

5 mins
398


रक्षाबंधन. भावा-बहिणीच्या पवित्र नात्यांचा जणू सोहळाच असतो. बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेला तो एक फक्त धागा नसून, ती एक जाणीव आहे सुरक्षिततेची, जी भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर अजून तीव्र होते. ती एक भावना आहे आपुलकीची. आजन्मासाठी बांधलेला तो एक जणू बंधच आहे.


हा जरी भावा-बहिणीने मिरवण्याचा सण असला तरी, घरी सारं आनंदाचं वातावरण असतं. दिवसाची सुरवातच अगदी प्रसन्न आणि उत्साहात होते. सकाळी लवकर उठणं, छान तयार होऊन ओवाळणीचं ताट तयार करणं, पाटावर मस्त थाटात बसलेल्या भाऊरायाला ओवाळणं आणि त्याने ओवाळणीत थोडं प्रेम आणि जिव्हाळा ठेवणं. हेच त्या सोहळ्याचं सार्थक.


पण या वेळी रेवाच्याबाबतीत यातलं काहीच घडणार नव्हतं. दरवर्षीप्रमाणे ना यावेळी तिचा भाऊ राखीपोर्णिमेला तिच्या घरी येणार होता, ना ती माहेरी त्याच्याकडे जाऊ शकत होती. दरवर्षी राघव राखी पौर्णिमेला रेवाकडे अगदी दोन दिवस आधी यायचा. दोन दिवस आपल्या सासुरवाशीण बहिणीचं सुख-दुःख वाटूव द्यायचा, चार आधाराचे शब्द तिच्या ओंजळीत टाकून वाऱ्यासारखा निघून जायचा. राघवचा फार जीव होता रेवावर. एकुलती एक धाकटी बहिण म्हणून राघव रेवाचे फार लाड करायचा.


याही वर्षी त्याने येऊन मायेच्या ओलाव्याच्या चांदण्याची उधळण आपल्यावर करावी आणि आपण त्या मायेच्या ओलाव्यात न्हाऊन निघावं अशी तिची फार इच्छा होती. पण ही इच्छा असूनही, या सोहळ्याच्या बासरीतून यावर्षी या भावाबहिणीच्या आयुष्यात आनंदाची धुन ऐकू येणार नव्हती. याच साऱ्या विचारांचं वादळ रेवाच्या मनात घोंघावत होतं. भावाच्या आठवणीने तिचा उर भरुन आला होता. आणि रेवा त्या आठवणीतल्या कडू सत्यात हरवली…


त्या घटनेला सहा महिने उलटून गेलते. त्याच्या जखमा आजही सगळ्यांच्या मनात तीव्र वेदना देऊन जातात. सहा महिन्यापूर्वी राघवच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला होता. ज्यात त्याच्या डोक्याला जबर मार बसला. तो फक्त राघवच्या डोक्याला बसलेला मार नव्हता, तर तो वार होता, घरच्या सगळ्यांच्या मनावर झालेला.

सहा महिन्याआधी राघव त्याच्या कंपनीच्या कामानिमित्त सातारला गेला होता. राघव ज्या कंपनीत नोकरी करत होता, ती कंपनी बांधकाम व्यवसायात होती. महाबळेश्वरला एक मोठं हॉटेल बांधण्याचं काम त्याच्या कंपनीला मिळणार होतं. त्याच संदर्भात एक मिटिंग महाबळेश्वरमध्ये होती. आणि कंपनीतर्फे हे डिल फायनल करण्यासाठी राघवची निवड करण्यात आली होती. मिटिंगची वेळ संध्याकाळी चार वाजताची ठरली. राघवने ती मिटिंग यशस्वी करत, ते काम त्याच्याच कंपनीला मिळवुनही दिलं. मिटिंग संपल्यानंतर रात्रीचं जेवळ सगळ्यांनी एकत्र करण्याचं ठरलं. राघवनेही त्याला होकार दिला. मिटिंग झाली, जेवण झालं, पण या सगळ्यात राघवला तेथून निघायला फार उशीर झाला. अंधारात घाट उतरणं कोणत्या दिव्यापेक्षा कमी नाही. त्यात राघव एकटा मुंबईवरून मिटिंगला गेलेला. सकाळी ऑफिसमध्ये जाऊन, तिथलं काम संपवून मग सातारसाठी निघालेला.


राघवने त्याची कार काढली व सावधगिरीने घाट उतरायला सुरुवात केली. रात्र बरीच झाली होती, त्यामुळे वाटेत गाड्यांची फार गर्दी नव्हती. घाट उतरल्यानंतर राघव आईला फोन करून कळवणार होता, जेणेकरुन ती फार काळजी करणार नाही. पण राघवचा फोन आलाच नाही. दुपारी फोन आला तो तिथल्या एका दवाखान्यातून. घाट उतरत असताना मागून एक गाडी आली, ज्यात पाच तरुण मुलं दारूच्या नशेत होती. त्यांनी राघवच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, पण तो नेमका वळणावर. त्यांचा अंदाज चुकला आणि त्यांच्या गाडीची धडक राघवच्या गाडीला बसली. त्यांच्या गाडीचा वेग खूप असल्याने त्यांची आणि राघवची दोघांची गाडी दरीत कोसळली. हा सगळा प्रकार समोरुन येणाऱ्या एका व्यक्ती समोरच घडला. ते तेथील स्थानिकच होते. त्यांनी त्वरीत रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतलं. शिवाय पोलिसांनाही सर्व प्रकार फोन करून सांगितला. पोलिस घटनास्थळी दाखलहि झाले. पण अंधार असल्याने पोलिसांनाही काही करता नाही आलं. त्यांनी फक्त पंचनामा केला. शेवटी सकाळी सारी यंत्रणा त्या गाड्या बाहेर काढण्याच्या मोहिमेत जुटली आणि शेवटी त्या दोन्ही गाड्या बाहेर काढल्या गेल्या. दुसऱ्या गाडीतले पाच आणि राघव एक असे सहा जण आणि दोन गाड्या त्या दरीतून बाहेर काढल्या नंतर, सगळ्यांच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरुन साऱ्यांची ओळख पटली. सगळ्यांच्या घरी फोन करून कळवण्यात आलं, त्या सगळ्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात गेल्यावर दुसऱ्या गाडीतल्या दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आणि थोड्या थोड्या वेळाच्या फरकाने बाकी तीनही जणांनी जीव सोडला. त्या दुर्घटनेतून वाचला तो फक्त राघव. पण तो फक्त शरीराने. तो कोमात गेला होता. गेली सहा महिने राघव कोमात होता. मुंबईत चांगले उपचार मिळतील म्हणून त्याला मुंबईच्या दवाखान्यात घेऊन गेले. मोठमोठे डॉक्टर झाले, पाण्यासारखा पैसा खर्च झाला पण राघवमध्ये काहीच फरक जाणवत नव्हता. वाट पाहण्या पलीकडे रेवा आणि तिच्या घरच्यांच्या हातात दुसरा कोणताच पर्याय नव्हता.


फोनची घंटी वाजली आणि रेवा तंद्रीतून भानावर आली. रेवाने फोन घेतला. तो तिच्या आईचा होता. रेवाचे बाबा कामामुळे एक दिवसासाठी बाहेर जाणार होते, म्हणून त्यांनी रेवाला मुंबईला बोलावून घेतलं.


'हा कसला योग आहे. आईने उद्या बोलावलंय आणि रक्षाबंधनही उद्याच आहे.' रेवाच्या मनात एक अस्वस्थ भाव उमटून गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे रेवा आणि तिचा नवरा अजय मुंबईला जायला निघाले. ते थेट दवाखान्यातच पोहोचले. राघवला पुन्हा पुन्हा या अवस्थेत पाहावं लागतंय यासारखे दुसरे दुर्दैव ते काय असणार. अजय, रेवा आणि रेवाची आई असे सगळेच राघव जवळ बसून होते. तेवढ्यात डॉक्टरांनी रेवाच्या आईला राघवचे काही रिपोर्ट दाखवण्यासाठी बोलावलं. अजयही त्यांच्या सोबत गेला.

तिथे होते ते फक्त दोघं बहिण-भाऊ आणि सोबतीला निरव शांतता. माहित होत राघव कोमातून बाहेर आलेला नाही, तरी न राहुण तिने तिच्या सोबत ए‍क राखी आणली होती. रेवा एक वेडी आशा बाळगून होती. 'न जाणो आपण तिथे जाऊ आणि राघवला शुद्ध आली तर? आपल्याकडे त्याला बांधण्यासाठी राखी हवीच', आणि रेवाने तिच्या मनाचे ऐकले. तिने तिच्या बॅगमधली राखी काढली आणि राघवकडे पाहिलं. तो निपचीत पडून होता. कसलीही हालचाल नाही. रेवाला राघवबरोबरचा प्रत्येक क्षण आठवू लागला. तिचे डोळे पाणावले. तिने राघवच्या मनगटावर भावा-बहिणीच्या प्रेमाचा बंध म्हणजे ती राखी बांधली. तिला अश्रू अनावर झाले आणि तिने राघवचा हात आपल्या हातात घेत तिच्या भावनांना अश्रुंमार्फत वाट मोकळी करून दिली.‍ तिचे अश्रू डोळ्यांच्या कडा ओलांडून वाहू लागले.


तेव्हाच राघवच्या हाताच्या बोटांची हालचाल झाल्यासारखं रेवाला जाणवलं. रेवाने चटकन राघवकडे पाहिलं तेव्हा त्याच्याही डोळ्यातून पाणी येत होतं. सहा महिन्यात पहिल्यांदाच राघवने हलकीशी का होईना हालचाल केली होती. रडण्याच्या मार्फत तो व्यक्त होत होता. रेवाने लगेचच डॉक्टर, नर्स, अजय, आई साऱ्यांनाच आवाज दिला. डॉक्टरही लगेचच आले. त्यांनी राघवला तपासलं. राघवने पहिल्यांदा डोळे उघडले होते. राघव कोमातून बाहेर आला होता.


त्या एका राखीच्या स्पर्शाने त्याच्या संवेदना जणू जाग्या झाल्या होत्या. जणू काही मनगटावरची ती राखी राघवला सांगत होती, 'राघव उठ. तू रेवाला वचन दिलं आहेस तिच्या सुरक्षिततेचं. तू ते पाळणार नाहीस का? दरवर्षी तू तिच्याकडे जातोस. उठ, बघ तिच्याकडे, आज ती तुझ्याकडे आली आहे. तू तुझं वचन विसरला असशील पण तिचं तुझ्यावरचं प्रेम, तुझ्यावरची माया कमी झालेली नाही.' रेवाच्या मनातील भाव जणू त्या राखीने तिच्या भावापर्यंत पोहोचवला होता.


राघवच्या तब्येतीमध्ये सुधार झालेला होता. डॉक्टरांनी काही दिवसातच राघवला घरी सोडलं. मग त्या बहिण-भावाने रीतसर त्यांचा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. हा प्रसंग भावाबहिणीच्या अतुट बंघनाचे उदाहरण होऊन गेला…


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama