बाण...
बाण...


पहाटेच झोप चाळवली. प्रयत्न करूनही परत डोळा लागेना. तशी कविता उठली. आवरून चहाचा कप हातात धरून शाल अंगावर लपेटत गॅलरीत आली.
कालच्या दिवाळीच्या रात्रीच्या पार्श्वभूमीवर आताची पहाटेची नीरव शांतता सुखद वाटत होती.
फटाक्यांची आतिषबाजी... ते सभोवार दणाणून सोडणारे आवाज... दिव्यांचा झगमगाट... गडबड... लगबग... सारं सारं निवलं होतं.
निवांतपणे आठवणींचे रेशीम धागे उलगडत ती चहाचा आस्वाद घेत गॅलरीत उभी होती. पहाटेचा गार वारा अंगाला झोंबू लागला तसं शहारून तिने शाल अजून घट्ट गुंडाळली.
थोडं दूर कोपऱ्यात काहीतरी हालचाल जाणवली. सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करत ती त्या पहाटेत रममाण झाली. परत तिथेच काहीतरी हलल्यासारखं वाटलं.
आता मात्र तिची अस्वस्थता तिला चैन पडू देईना.
टक लावून निरखून पाहिलं तशी एक बारीकशी आकृती खाली रस्त्यावर काहीतरी शोधत होती. थोडावेळ तिथेच उभा राहून तिने त्या आकृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. शेजारून कार गेली तसं तर गाडीच्या दिव्याच्या उजेडात स्पष्ट दिसलं तिला.
एक लहान मुलगा होता तो.
"ए कोण आहेस रे तू?
इकडे काय करतोयस?"
तिने आवाज दिला पण त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही.
तो त्याच्या कामात मग्न होता. कविताला राहवेना. पायात चप्पल अडकवली. दार लावून शाल डोक्यावरून लपेटून ती त्या दिशेने चालू पडली.
जवळ जाऊन पाहते तर एक छोटा मुलगा रस्त्यावर काहीतरी शोधत होता. मध्येच काही हातात घेऊन परत फेकून देत होता. त्याच्या हालचाली निरखत ती थोडा वेळ तशीच उभी राहिली.
दहा-पंधरा मिनिटांनी तिने हाक मारली.
"काय शोधतो आहेस रे इथे असा?
काही हरवलंय का तुझं?
इतक्या पहाटे सकाळी इथे काय करतोयस?"
केवढ्यानं दचकला तो... एखादी चोरी पकडली जावी तसा.
"काय धुंडाळतोयस रे..
चोरीबिरी करत नाहीयेस ना?"
तसा तो चपापला.
"नाही...नाही काकू!
मी?
मी... मी तर...
जाऊ दे काही नाही. "
"एss एsss ए इकडे ये आधी.
असा समोर उभा राहा."
कवितानं दम भरला.
तिच्या समोर उभा राहून हमसून हमसून रडायलाच लागला तो
.
"खरंच सांगतो काकू. मी चोर नाही हो.
मी तर रॉकेट बाण शोधतो आहे हो."
"पण इथे असा कचऱ्यात? का?" कविताने विचारलं...
"मी आणि आजी इथे मागच्या झोपडीत राहतो. मला रॉकेट बाण विकत घ्यायचे होते दिवाळीसाठी उडवायला. पण आजी म्हणते इथे दिवाळीचं खायला करायला पैसे नाहीत तर फटाके कुठून आणणार.
पण मला हवेतच बाण...
म्हणून शोधतो आहे..
कोणाचा एखादा असाच सापडला तर उडवायला!"
"हात्तिच्या! एवढंच ना?
मी देते मग तुला आणून इतक्यात. आवडतात का रे तुला फटाके उडवायला?"
"सगळे फटाके नाही. फक्त बाण हवाय..."
"छान वाटतं का बाण उडताना पाहून?
थांब हं इथेच. आलेच मी बाण घेऊन." कविता बाण आणायला म्हणून माघारी वळली.
ती वळली तसा तोही पळत पळत घराकडे गेला.
कविता बाण घेऊन परत आली तोवर तोही काहीतरी हातात घेऊन परत आला. कवितानं त्याला रॉकेट्स बॉक्स दिला.
"घे उडव! पण सांभाळून हं.
उडव तू आत्ताच एखादा मी थांबते इथे."
त्यानं अधाशासारखा एक बाण हातात घेतला. पळत पळत बाजूला गेला आणि त्या बाणाला काहीतरी चिकटवलं.
घाईघाईने येऊन म्हणाला,
"थॅंक्यु काकू! थँक्यू!!"
"हो! पण तू काय चिकटवलंस रे बाणाला ? "
"हॅप्पी दिवाली लिहून चिट्ठी लावली आहे...”
"कोणासाठी रे?"
"ते ना....माझं एक सिक्रेट आहे.”
तो पायाच्या अंगठ्याने रस्त्यावरची माती उचकटत चाचरत म्हणाला.
"मग उडव ना आता.”
“नको तुम्ही गेल्यावर उडवीन.”
"बरं! बर! जा आता घरी.
मागाहून उडव."
ती घराकडे चालू लागली. थोडं अंतर पुढे गेली आणि त्याच्या आवाजाने थबकून तशीच एका जागी खिळल्यासारखी उभी राहिली मागे वळली आणि त्याच्याकडे पाहून कविताच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर ओसंडू लागला...
त्याने पेटवलेला बाण आकाशात उंच उंच उडाला.
बाण उडाला तसं जोरजोरात टाळ्या वाजवत तो नाचत नाचत ओरडत होता...
"हॅप्पी दिवाली ! हॅsssप्पी दिवाली.
हॅप्पी दिवाली
आई आणि बाबा...”